हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा

हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा


कुणा एका हृदयरुग्णाची प्रथमपुरूषी एकवचनी कहाणी पुढे सुरूच ...


तपास करता असे समजले की हृदयोपचारासाठी ऍलोपॅथीत दोन शाखा आहेत. पारंपारिक शाखा 'अधिक्षेपक हृदयोपचारशाखा  (इन्व्हेझिव कार्डिओलॉजी)' म्हणून ओळखल्या जाते. वाढलेल्या रक्तदाबावर उपचाराची पारंपारिक पद्धत ह्या शाखेत पुढीलप्रमाणे आहे. १२०/८० पासून वाढत वाढत रक्तदाब १३०/९० च्या पुढे गेल्यावर ते रक्तदाबनियंत्रक गोळ्या देऊन त्याचे व्यवस्थापन करतात. १६०/१०० पेक्षा जास्त झाल्यावर रुग्णालयात दाखल करतात. मेदविदारक (कोलेस्टेरॉलनाशक) गोळ्या सुरू करतात. त्यांनीही रक्तदाब नियंत्रित न राहिल्यास विद्युत हृदयालेखन, ताणचाचणी आणि हृदयधमनीआलेखन इत्यादी चाचण्या करवतात. त्यात हृदयधमनीत अडथळे निपजल्यास हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेद्वारा ते रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.


ह्या शाखेच्या मान्यतेनुसार हृदयधमनीविकार प्रगतीशील असतो. तो वयानुसार वाढतच जातो. औषधे व शस्त्रक्रियांच्या आधारे तो केवळ नियंत्रणात ठेवता येतो. नियंत्रणात न राहिल्यास जास्त औषधे व आणखी शस्त्रक्रिया यांद्वारेच इलाज केल्या जातो. माझी उपाययोजनाही ह्याच वाटेवर वाटचाल करीत होती. म्हणून मी ह्या वाटेवर माझ्याआधीच गेलेल्या चारपाच स्नेह्यांना भेटलो. त्यांच्या कहाण्या सविस्तर ऐकल्या. मला अनेक हृदयधमनी रुंदीकरणे व उल्लंघन शस्त्रक्रिया झालेले लोक भेटले. आपण आता पुन्हा कधीच पूर्णतः बरे होणार नाही असे मला वाटू लागले. आपली औषधे कधीच पूर्णपणे सुटणार नाहीत असेही वाटे.


बराच शोध घेतल्यावर मला 'प्रतिबंधक हृदयोपचार शाखे (प्रिव्हेंटीव्ह कार्डिओलॉजी)' बाबत माहिती कळली.  तिच्याद्वारे मला माझ्या उद्दिष्टांची पूर्तता होऊ शकेल असा आशेचा किरण दिसला. प्रतिबंधक हृदयोपचार शाखा त्यामानाने नवोदित आहे. ह्या शाखेत औषधे आणि शस्त्रक्रियेविना हृदयविकार माघारी परतवता येतो अशी मान्यता आहे. हे मला समजताच, मला ह्या निव्वळ पोकळ बढाया वाटू लागल्या. मी विचारले की "डॉक्टर मला तुम्ही औषधे पूर्णपणे थांबलेली आहेत असा एखादा हृदयरुग्ण दाखवू शकाल का? ज्याला हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेचा उपाय सुचविण्यात आलेला आहे अशा रुग्णास, तुम्ही त्या शस्त्रक्रिया न करता बरे करू शकता का? तसे काही बरे झालेले रुग्ण तुम्ही दाखवू शकाल का?" अनपेक्षितरीत्या ह्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली. प्रत्यक्षात तशी काही उदाहरणे पाहिली आणि मग मी प्रतिबंधक हृदयोपचार करवून घेण्याचा निर्णय घेतला.