हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना

हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना


आपण सारेच हा प्राणघातक आजार बाळगत असतो. आपले हृदय कितपत प्रभावित झालेले आहे याची आपल्याला कल्पना नसते. आणि मग आपण आपल्या शरीराने दिलेल्या पूर्वसंकेतांकडे पुरेसे लक्ष देण्यात अपयशी ठरतो. याकरता हे जाणणे आवश्यक असते की हृदयाघाताच्या पूर्वसूचना काय असतात.


आपले नेहमीचे काम करीत असतांनाही आपल्याला थकवा जाणवतो. आजूबाजूचे सर्व लोक आपआपली कर्तव्ये यथासांग बजावत असतांना उगाचच 'थकलो बुवा' असे म्हणत नाहीत. मात्र आपल्यालाच थकवा वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.


व्यायामानंतर, परिश्रमांनंतर, उत्तेजनेनंतर अथवा रागावल्यावर श्वास घेण्यास त्रास जाणवतो. अपुरी श्वसनक्षमता हे हृदयविकाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे.


शारीरिक श्रमांनंतर आणि खाल्ल्यानंतर छातीत अस्वस्थता जाणवते. तिच्याकडे दुर्लक्ष करू नये.


छातीच्या मध्यावर वेदना सुरू होते. ती डाव्या हाताकडे व कधीकधी उजव्या हाताकडे पसरत जाते. चालल्यावर डाव्या हाताकडे व पाठीकडे पसरत जाणारी वेदना जाणवते. ह्या वेदनेस हृदयशूळ (अन्जायना पेन) म्हणतात. पोटातील वातामुळेही अशी वेदना जाणवू शकते. मात्र ही वेदना काही खाल्यावर, प्यायल्यावर अथवा थोडेसे चालल्यावर कमी होऊ शकते. खाल्यावर, प्यायल्यावर अथवा थोडेसे चालल्यावर हृदयशूळ मात्र वाढू शकतो. अर्ध्या तासापर्यंत जर वेदना शमली नाही, तर ती हृदयशूळ असण्याची शक्यता दाट असते.


हृदयाघात अगदी नजीकच्या भविष्यात येऊन ठेपलेला असेल तर दरदरून घाम सुटतो (आंघोळ घतल्यागत), प्रचंड थकवा जाणवतो. श्रम केल्यास हृदयशूळ वाढतो. परसाकडची भावनाही होऊ शकते. मात्र अशावेळी क्षणाचाही विलंब करू नये. वैद्यकीय मदत मिळवावी. डॉक्टर धमनीविस्फारक औषधे देऊन रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला देतात.


एकदा हृदयाघात झाला तर दरम्यानच्या काळात हृदयस्नायूच्या ज्या भागास रक्तपुरवठा बंद पडतो तो भाग कायमचा मरण पावू शकतो. म्हणून अर्ध्या तासाच्या आत तातडीच्या मदतीची गरज असते.