हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष

हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष


हृदयविकार असतो तेव्हा आपण स्वस्थ नसतो. म्हणजे स्वस्थ असणे हे आपले इप्सित असायला हवे. मग आपल्याला स्वस्थता कशी मोजतात ते माहीत असायला हवे.


एकाला विचारले की तू पौष्टिक आहार घेतोस का? तर तो म्हणाला 'हो. नेहमीच'. मग त्याला विचारले की तुला पौष्टिक म्हणजे काय ते माहीत आहे का? तर त्याने उत्तर दिले 'नाही'. आपली अवस्था नेहमी बहुधा अशीच असते. म्हणूनच स्वस्थतेच्या निकषांचा हा प्रपंच.


मानवी शरीराच्या स्वस्थतेचे ढोबळमानाने तीन निकष मानल्या जातात.


१. विश्रांत अवस्थेतील हृदयस्पंदनदर कमीत कमी असणे. हृदयस्पंदनदर मनगटातील, मानेच्या बाजूने डोक्याकडे जाणाऱ्या किंवा मांडीतील धमनीवर बोटे ठेवून मोजतात. पुरूषांमध्ये सामान्यतः ७२ स्पंदने दर मिनिटास तर स्त्रियांमध्ये त्याहून जास्त आढळतो. विश्रांत अवस्थेतील हृदयस्पंदनदर  जेवढा कमी असेल तेवढीच प्रकृती स्वस्थ. आयुष्य दीर्घ.


२. परिश्रमाने हृदयस्पंदनदर वाढतो. वाढायलाच हवा. मात्र त्यानंतर श्रम थांबतात तेव्हा तो पूर्ववत होतो, त्यावेळी किती लवकर तो पूर्ववत होतो त्यावर स्वस्थता अवलंबून असते. जेवढा लवकर हृदयस्पंदनदर पूर्ववत होऊ शकेल तेवढी स्वस्थता अधिक.


३. एकूण कार्यक्षमता. माणूस किती वेगाने, किती काम, किती वेळ करू शकतो त्याने त्याची एकूण कार्यक्षमता ठरते. माणसाने कामाची गती, परिश्रमाचे परिमाण अथवा परिश्रमकाल यांपैकी काहीही किंवा सगळेच वाढविल्यास हृदयस्पंदनदर वाढत जातो. मग माणूस 'थकलो' म्हणून निवृत्ती पत्करतो. हृदयस्पंदनदर किती वाढत जातो त्याला मर्यादा असते. माणूस थकतो त्यानंतरही तो काम करत राहू शकतो. मात्र लवकरच तो अंतीम मर्यादा गाठतो. तिही ओलांडून एकूण कार्य वाढवतच नेणारा उरस्फोट होऊन मृत्यू पावतो. त्यावेळी तो जो हृदयस्पंदनदर गाठतो त्यास अंतीम हृदयस्पंदनदर मर्यादा म्हणतात. प्रत्येक व्यक्तीसाठी ही मर्यादा जाणून घेण्याचा एक ठोकताळा आहे. २२० उणा तुमचे वय म्हणजेच तुमची अंतीम हृदयस्पंदनदर मर्यादा. साधारणपणे ह्या मर्यादेचा ७०-८० टक्के हृदयस्पंदनदर गाठल्यावर मनुष्य थकलो म्हणतो. मात्र, चुकूनही त्याने अंतीम मर्यादेच्या ९० टक्क्यांहून अधिक काम करू नये.


तेव्हा कमीत कमी विश्रांत हृदयस्पंदनदर, परिश्रम थांबविल्यानंतर लवकरात लवकर पूर्ववत हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता आणि एकूण जास्तीत जास्त काम करता येणे यावरून तुमची स्वस्थता ठरते. ती वाढवत नेणे हाच प्राणायाम, योगसाधना आणि व्यायामाचा उद्देश असायला हवा. अर्थातच जो स्वस्थता उंचावेल तो अवनतीकारक विकारांपासून निःसंशय आणि नक्कीच दूर जाईल. तेव्हा हे साधण्याचा आटोकाट प्रयत्न करा!