हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार

हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार 


प्रस्तावनाः इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.


श्रेयअव्हेरः हा वैद्यकीय सल्ला नाही. तशी माझी पात्रता नाही. मी धमनी स्वच्छता उपचारांची केवळ माहिती देत आहे. समर्थन करीत नाही आहे. हे केवळ अनुभवातून आलेले शहाणपण आहे.


टीपः इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील. ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत. त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही.


सम्यक जीवनशैली परिवर्तनांचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आणि तो वसा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही ह्या निष्ठेने अंमलात आणण्यास सुरूवात केली की मग त्याचे प्रभाव शऱीरावर दिसू लागण्यासाठी किमान तीन ते चार सप्ताहांचा अवधी लागू शकतो. हृदयरोगाची अवस्था जर गंभीर असेल तर ह्या काळात त्यामुळे हृदयाघात, पक्षाघात, मूत्रपिंड बिघाड इत्यादींचा धोका कायमच असतो. त्या धोक्याची गंभीरता एमड़ी. कार्डिओलॉजिस्ट कडून तपासून घ्यावी व केवळ औषधाच्या बळावर धोका निवारता येण्यासारखा असेल तर औषधे तात्काळ सुरू करावी. धोका औषधांनी निवारता येण्यासारखा नसेल तर 'धमनी स्वच्छता उपचारां'चा पर्याय उपलब्ध असतो. तो पत्करावा. धोका त्यानेही निवारता येणारा नसेल आणि तीन प्रमुख हृदयधमन्यांपैकी एखादीतच, एखादाच गंभीर अडथळा असेल तर 'हृदयधमनी रुंदीकरणा'चा पर्याय उपलब्ध असतो. त्यानेही न निवारता येण्यासारखी जर धोक्याची अवस्था असेल तर 'हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया' हा अंतिम पर्याय पत्करावा लागतोच.

 

आपण इथे 'धमनी स्वच्छता उपचारां' (धस्वो-Arterial Clearance Therapy-ACT) चा पर्याय काय आहे त्याची माहिती करून घेणार आहोत. ह्या  संकेतस्थळावर ह्याची माहिती उपलब्ध आहे. त्यापैकी काही सारभूत माहिती मराठीत अनुवाद करून इथे देत आहे.

 

धमनी स्वच्छता उपचारांनाच संधारणा उपचार (Key-Lay-Tion Therapy - किलेशन थेरपी) असेही म्हणतात. शीरेतून करायचे संधारणा उपचार, हे सोपे, इथिलीन डाय अमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड (इ.डी.टी.ए.) वापरून केल्या जाणारे उपचार आहेत. ह्या उपचारांमुळे धमनीकाठीण्य आणि इतर वयपरत्वे येणाऱ्या अवनतीकारक रोगांची प्रगती मंदावते. शरीरातील अनेक निरनिराळ्या भागांवर प्रभाव टाकणारी लक्षणे बहुधा सुधारतात. त्याची कारणे अजूनपर्यंत पूर्णपणे कळलेली नाहीत. हृदय, मेंदू, पाय आणि सर्वच शरीरास रक्तपुरवठा करणाऱ्या अवरुद्ध धमन्यांतील रक्तप्रवाह वाढतो. ह्या उपायांनी हृदयाघात, पक्षाघात, पायातील वेदना आणि अचेतनता (गँगरिन) यांचा प्रतिबंध करता येतो. बहुतेकदा, संधारणा उपचारांनंतर, हृदयधमनीउल्लंघन आणि फुग्याद्वारे केलेल्या हृदयधमनीरुंदीकरणाची गरजच राहत नाही. प्रसिद्ध झालेले संशोधन असेही दर्शविते की संधारणा उपचार कर्करोग प्रतिबंधकही आहेत. मुक्त प्राणवायू-मूलकांमुळे होणाऱ्या रोगांपासूनही ह्या उपचारांमुळे मुक्ती मिळते. तज्ञपरीक्षित नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले अनेक वैद्यकीय अभ्यास, लाभांचे ठोस पुरावे देतात. ही अनातिक्रमक उपचारपद्धत खूपच सुरक्षित आणि उल्लंघन शल्यक्रिया अथवा रूंदीकरण यांचे मानाने खूपच कमी खर्चाची असते.

 

संधारणा उपचार ही एक उपचारपद्धती आहे जिच्याद्वारे थोडेसे इथिलिन डायमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड (इ.डी.टी.ए.), रुग्णास शीरेतून सावकाश (अनेक तासांच्या कालावधीत) चढवितात. कालावधी, परवानापात्र डॉक्टरांच्या सल्ल्यावरून ठरविल्या जातो. आणि त्याच्याच निगराणीखाली उपचारही दिल्या जातात. इ.डी.टी.ए. धारक द्रव, रुग्णाच्या हातातील शीरेत घातलेल्या छोट्या सुईतून आत सोडले जाते. आत सोडलेले इ.डी.टी.ए. शरीरातील नको असलेल्या धातूंना चिकटते आणि त्यांना त्वरेने लघवीत घेऊन जाते. अवघड जागेतील पोषक धातू जसे की लोह; शिसे, पारा आणि अल्युमिनियम यांसारख्या विषारी मूलद्रव्यांसोबतच इ.डी.टी.ए. संधारणा उपचारांनी सहज हटविले जातात. आरोग्यास आवश्यक असणारी सामान्यत: आढळणारी खनिजे आणि विरळ मूलद्रव्ये शरीरासोबत घट्ट बांधलेली असतात; आणि योग्यप्रकारे संतुलित पुरक पोषणाद्वारे कायम राखता येतात.

 

संधारणा उपचार पद्धतीत प्रत्येक रुग्णाच्या आरोग्यस्थितीनुरूप २० ते ५० स्वतंत्र टोचण्यांद्वारे इलाज केल्या जातो. समुचित लाभ मिळण्यासाठी, सरासरी ३० वेळा उपचार घेणे, धमनीत अडथळे असण्याची लक्षणे असलेल्या रुग्णांना आवश्यक असते. काही रुग्णांना अनेक वर्षांच्या काळात १०० हून जास्त वेळा उपचार घ्यावे लागतात. तर काहींना प्रतिबंधक कार्यक्रमाचा भाग म्हणून केवळ २० टोचण्याच दिल्या जातात. प्रत्येक संधारणा उपचारास ३ ते ४ तास लागतात. आणि दर सप्ताहात रुग्णास १ ते ५ उपचार दिल्या जातात. परिणाम एकूण उपचारांवरच ठरतात. वेळापत्रक आणि वारंवारतेवर नाही. काही काळानंतर ह्या टोचण्यांमुळे मुक्त मूलकांच्या रोगाची प्रगती थांबते. धमनीकाठीण्य आणि इतर अनेक वयपरत्वे येणाऱ्या अवनतीकारक रोगांच्या पाठीमागे मुक्त मूलकेच असतात. हानीकारक मुक्त मूलके घटविल्यास रोगग्रस्त धमन्या बऱ्या होऊन रक्तपुरवठा पूर्ववत होतो. संधारणा उपचार काळासोबत अनेक आवश्यक शारीरिक आणि चयापचयासंबंधी सखोल सुधारणा घडवितात. पेशींच्या अंतर्गत रसायनस्थिती सामान्य करून शरीराचे कॅल्शियम व कोलेस्टेरॉल नियमन पूर्ववत केल्या जाते. शरीरावर संधारणा उपचाराच्या अनेक वांछनीय क्रिया घडून येतात.

 

शरीरारातील प्रत्येक धमनीतील रक्तप्रवाहास संधारणा उपचार लाभकारक ठरतात. अगदी मोठ्यात मोठ्यात धमनीपासून सूक्ष्म केशवाहिन्यांपर्यंत, ज्यांपैकी बव्हंशी वाहिन्या शल्यचिकित्सेच्या दृष्टीने खूपच लहान असतात, किंवा मेंदूत खोलवर असतात, जिथे शल्यक्रियेसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचताच येत नाही. अनेक रूग्णांमध्ये, बारीक रक्तवाहिन्याच सर्वात जास्त रोगग्रस्त असतात, विशेषत: मधूमेह असतो तेव्हा. संधारणा उपचारांचे लाभ डोक्यापासून पायापर्यंत एकसाथ घडतात, ज्यांचे उल्लंघन शक्य असते अशा केवळ काही मोठ्या धमन्यांच्या छोट्या भागापर्यंतच नाही. बव्हंशी प्रकरणांमध्ये संधारणा उपचार बाह्यरुग्ण उपचार असतात, जे डॉक्टरच्या दवाखान्यातच करवून घेता येतात.

 

इतर उपचारांच्या मानाने संधारणा करवून घेणे हा एक वेगळाच अनुभव असतो. काहीही दु:ख नसते आणि बव्हंशी प्रकरणांमध्ये अस्वस्थताही फारच थोडी जाणवते. रुग्णांना आरामखुर्चीत बसवतात. उपचार घेत असतांना, इ.डी.टी.ए. धारक द्रव त्यांच्या शरीरांमधून वाहत असते तेव्हा, ते वाचू शकतात. डुलकी घेऊ शकतात. टी.व्ही. पाहू शकतात. विणकाम करू शकतात. गप्पा मारू शकतात. गरज पडल्यास रुग्ण, सभोवार चालूही शकतात. प्रसाधनगृहात जाऊ शकतात. इच्छेनुरूप खाऊपिऊही शकतात. दूरध्वनी करू शकतात. फक्त त्यांच्या शीरेतून आत शिरवलेली सुई बाहेर येणार नाही ह्याची काळजी मात्र घ्यावी लागते. काही रुग्ण त्यांचे व्यवसायही दूरध्वनी वा संगणकाद्वारे, संधारणा उपचार घेत असतांनाही चालवितात.

 

संधारण उपचार हे निर्विषारी आणि निर्धोक आहेत. विशेषत: इतर उपायांच्या तुलनेत. संधारणा उपचारांनंतर रुग्ण नेहमीप्रमाणे स्वत:च्या पायांनी, स्वत:च वाहन चालवत सहज घरी जातात. योग्यरीत्या दिल्या गेल्यास, उपचारित १०,००० रुग्णांमागे एखाद्याच रुग्णाला दखलपात्र उपप्रभावांचा धोका असतो. तुलनेत, थेट हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रियेमुळे उद्भवणारा एकूण मृत्यूदर १०० रुग्णांगणिक तीन रुग्ण असा असतो. व तो शुश्रुषालय आणि शस्त्रक्रिया करणार्‍या चमूवर अवलंबून बदलत असतो. शस्त्रक्रियेनंतर उद्भवणर्‍या गंभीर गुंतागुंतींचे प्रमाण खूपच जास्त असते. ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचणारे असते. ज्यात हृदयाघात, पक्षाघात, रक्तगुठळ्या, मानसिक अवनती, संसर्ग आणि दीर्घकालीन दु:ख यांचा समावेश होतो. संधारणा उपचार हे हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रियेपेक्षा कमीत कमी ३०० पट सुरक्षित आहेत.

 

क्वचित कधीतरी रुग्णाला शीरेत सुई टोचतात त्या जागी थोडेसे दु:ख जाणवू शकते. काहींना तात्पुरते सौम्य मळमळणे, चक्कर येणे किंवा डोके दुखणे अनुभवास येते. हे उपचाराचे तात्कालीन दुष्परिणाम असतात. पण बव्हंशी प्रकरणांमध्ये ही बारीकसारीक लक्षणे सहज निवळतात. संधारणा उपचार, ह्या प्रकारच्या उपचारांमध्ये तज्ञ असणार्‍या डॉक्टरने, योग्य रीतीने उपचार केले असता, इतर अनेक औषधोपचारांच्या मानाने सुरक्षित असतात. सांख्यिकीच्या दृष्टीकोनातून बोलायचे तर, हे उपचार, डॉक्टरकडे स्वयंचलित वाहन चालवत जाण्यापेक्षासुद्धा जास्त सुरक्षित असतात.

 

जर इ.डी.टी.ए. संधारणा उपचार खूप जलद अगर मोठ्या प्रमाणात दिले गेले तर त्याने धोकादायक उपप्रभाव उद्भवू शकतात. जसे कुठल्याही औषधाच्या अतिरिक्त मात्रेमुळे घडू शकतात तसेच. अनेक वर्षांपूर्वी गंभीर आणि प्राणघातक गुंतागुंतीही, अतिरिक्त इ.डी.टी.ए. मात्रेमुळे, जलद गतीने दिल्यामुळे आणि योग्य प्रयोगशाळेच्या निगराणीअभावी उद्भवल्याचे अहवाल आलेले आहेत. जर तुम्ही योग्य, प्रशिक्षित आणि अनुभवी इ.डी.टी.ए. वापरण्यातील तज्ञ डॉक्टर निवडाल तर संधारणा उपचारांतील धोके खूपच कमी पातळीवर राहतील.

 

जेव्हा असेही म्हटल्या गेले आहे की इ.डी.टी.ए. संधारणा उपचार तुमची मूत्रपिंडे बिघडवितात, तेव्हा नविनतम संशोधन (ज्यामध्ये ३८३ एकापाठोपाठच्या एक अशा रुग्णांमध्ये बद्धमूल अवनतीकारक रोगांकरीता केलेल्या संधारणा उपचारांच्या आधी आणि नंतर केल्या गेलेल्या मूत्रपिंड कार्य चाचणीचा समावेश आहे.) दर्शविते की सत्य याचे विपरितच आहे. सरासरीने, संधारणा उपचारांनंतर मूत्रपिंडकार्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते. क्वचित एखादा रुग्ण प्रमाणाबाहेर संवेदनाक्षम असतो. मात्र, संधारणा उपचार तज्ञ असलेले डॉक्टर मूत्रपिंडांवर अतिभार येणे टाळण्यासाठी मूत्रपिंडांच्या कार्याचे बारकाईने निरीक्षण करत असतात. मूत्रपिंडांचे कार्य जर सामान्य नसेल तर संधारणा उपचार जास्त सावकाश आणि कमी वेळा द्यायला हवेत. काही प्रकारच्या गंभीर मूत्रपिंड समस्या असलेल्या रुग्णांनी इ.डी.टी.ए. संधारणा उपचार घेऊ नयेत.

 

संधारणा उपचारांची आवर्तने सुरू करण्याआधी संपूर्ण वैद्यकीय इतिहास मिळविल्या जातो. आहार, पोषणपूर्ती आणि संतुलन ह्यांकरीता विश्लेषित केल्या जातो. त्यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल आणि शुश्रुषालय भरतीबाबतचे गोषवारे यांच्या प्रती मिळविल्या जातात. प्रत्यक्षात नखशिखांत संपूर्ण वैद्यकीय तपासणी केल्या जाते. प्रचलित औषधोपचारांची संपूर्ण यादी नोंदविल्या जाते. ज्यामध्ये औषधांचे वेळापत्रक आणि प्रमाण यांचा समावेश असतो. कुठल्याही अतिसंवेदनाशीलतेची स्वतंत्र नोंद केली जाते. संधारणा उपचारांनी बिघडू शकेल अशी कुठलीही अवस्था नाही ह्याची खात्री करण्यासाठी केल्या जाणार्‍या अनेक तपासण्यांतर्गत रक्त आणि मूत्र नमुने मिळविल्या जातात. मूत्रपिंडाचे काळजीपूर्वक आकलन केल्या जाते. बहुधा एक विद्युत हृदयालेखही काढल्या जातो. वैद्यकीय लक्षणांनुरूप अनातिक्रमक चाचण्या, उपचारांपूर्वीची धमनींतील रक्तप्रवाहस्थिती जाणून घेण्यासाठी केल्या जातात. इतर वैद्यकीय तज्ञांसोबत विचारविनिमयही केल्या जातो.

 

सर्वात आधीचा, मनुष्यावरील संधारणा उपचारांचा दाखला दुसर्‍या महायुद्धातील आहे. जेव्हा ब्रिटिशांनी ब्रिटिश अन्टीलेवेसाईट (बी.ए.एल.), हे दुसरेच औषध संधारणेसाठी वापरलेले होते. हे वापरले होते विषारी वायूवर उपाय म्हणून. बी.ए.एल. आजही औषधशास्त्रात वापरले जाते.