ह्यासोबत
- हृदयविकारः १-झटका का येतो?
- हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
- हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
- हृदयविकारः ४-रक्तदाब
- हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
- हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
- हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
- हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
- हृदयविकारः ९-पहिला दिवस
- हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
- हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १३-पुनर्वसन
- हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
- हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
- हृदयविकार-१६ आहार
- हृदयविकार-१७ विहार
- हृदयविकार-१८ व्यायाम
- हृदयविकार-१९ प्राणायाम
- हृदयविकार-२० शिथिलीकरण
- हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
- हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
- हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
- हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
- हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
- हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
- हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
- हृदयविकार: २८-एकाकीपणा
- हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
- हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण
हृदयविकारः ४-रक्तदाब
उच्च रक्तदाब म्हणजे हृदयविकाराचे कारण आहे की उच्च रक्तदाब हृदयविकाराचे पर्यवसान आहे, हा वाद 'अंडे आधी की कोंबडी आधी' असा आहे. मात्र दोघांचाही परस्परांशी घनिष्ट संबंध आहे. आणि हेही खरेच की आपल्या आजकालच्या बैठ्या, श्रमविहीन, खाद्यविपूल राहणीमानामुळे ह्या दोहोंचा जन्म होतो. म्हणूनच विशेषतः सदरहू वर्णनाचे जीवनमान धारण करणाऱ्या ३० अधिक वयाच्या प्रत्येकाने वर्षातून किमान चारदा आपला रक्तदाब वैद्यकीय व्यक्तीकडून मोजून घ्यावा आणि त्याची तपशीलवार नोंद ठेवावी.
निरोगी माणसाचा सामान्य रक्तदाब कुठल्याही वयात, प्राणभरीत रक्त हृदयातून बाहेर टाकतानांचा दाब (systolic pressure) १२० मिलीमीटर तर अपानमिश्रीत रक्त हृदयात खेचतांनाचा दाब (diastolic) ८० मिलीमीटर पारा पातळी इतका असतो. तो १२०/८० असा लिहीतात. हल्ली १३०/९० रक्तदाब आढळल्यास 'तो तुमच्या वयासाठी (४० वर्षे) सामान्य आहे' अशा प्रकारची वाक्ये ऐकू येतात, ती सर्वथैव निराधार आहेत. वयोमानानुसार हृदयधमन्यांमध्ये कीटण साठून धमनी काठीण्य येते. धमन्या प्रत्यास्थ (इलॅस्टीक) राहत नाहीत, व कीटणामुळे अरुंदही झालेल्या असतात. म्हणून त्यांमधून रक्त ढकलण्यासाठी हृदयास जास्त दाबाने रक्त ढकलावे लागते. हेही रक्तदाब वाढण्याचे एक कारण असते. मात्र, आवश्यक तेवढाच निरामय आहार घेणाऱ्या निरोगी माणसात वयपरत्वेही धमन्या प्रत्यास्थच राहतात आणि कीटण चढून अरुंदही होत नाहीत. म्हणून अशा लोकांत रक्तदाब कोणत्याही वयात १२०/८० असाच राहतो. आपलाही तेवढाच राहावा असा आपण आग्रह धरावा. मात्र ह्यासाठी औषधांचा, शस्त्रक्रियांचा आग्रह धरून उपयोग होत नाही. योग्य त्या 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाने' हे निश्चित रूपाने साधता येते. त्या शैलीबाबत संपूर्ण चर्चा आपण यथावकाश करणारच आहोत.
हल्ली १३०/९० रक्तदाबास दखलपात्र न समजण्याची प्रथा आहे. १४०/१०० झालेला आढळल्यास 'उच्च रक्तदाब' आहे असे मानून तो कमी करण्यासाठी औषधे देतात. १६०/१०० वा त्याहून अधिक असल्यास रुग्णालयात भरती करून, धमनी विस्फारक औषधे देऊन त्वरीत उतरवतात. नंतर रक्तदाब कमी करणारी औषधे व मेदविदारक (कोलेस्टेरॉल कमी करणारी) औषधेही सुरू करतात. याहूनही रक्तदाब वाढतांना दिसला तर विद्युत हृदयालेख (ECG: electro cardio gram) काढण्यास सांगतात. त्यात संशय गडद झाल्यास ताणचाचणी (stress test) करवतात. इथे निर्णय होतो तो तुम्हाला हृदयधमनीविकार (IHD: Ischemic Heart Disease) आहे की नाही त्याचा. तो असल्यास हृदयधमनीआलेखन (Angiography) करवतात. ह्या चाचणीत हृदयाच्या तीन प्रमुख धमन्यात असलेले अडथळे पाहता येतात. ते ७० टक्क्यांहून अधिक असल्यास हृदयधमनीरुंदीकरण (Angioplasty) अथवा हृदयधमनीउल्लंघन (Bypass) करण्याचा सल्ला दिला जातो.
इथवर पोहोचूनही मनुष्य वैद्यकाच्या कचाट्यातून मुक्त सुटू शकतो. जर गंभीर अडथळा नसेल तर याऊपरही माणुस विनाऔषध, विनाशस्त्रक्रिया पूर्ववत निरोगी होऊ शकतो. 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाने'. कसा ते आपण यथावकाश पाहूच.
उच्च रक्तदाब शारीरिक, मानसिक, आनुवांशिक अशा अनेक कारणांनी निर्माण होत असला तरी निवळ रक्तदाब मोजल्याने त्यामागचे कारण समजत नाही. तसेच, तो किती काळपासून तसा असावा याचे निदान येत नाही. ते जाणून घेण्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागतात. त्याविषयीही वेगळ्याने लिहायचे आहे.
उच्च रक्तदाब दीर्घकाळ बाळगल्याने मेंदूतील रक्तवाहिन्या क्षीण होऊन पक्षाघात होऊ शकतो. हृदयधमन्या अरुंद होऊन हृदयाघात येऊ शकतो. हृदयाचा आकारच वाढू शकतो. डोळ्यांच्या रक्तपुरवठ्यास क्षती पोहोचून दृष्टी उणावू शकते. मूत्रपिंडे खराब होऊ शकतात. हे सर्व हानीकारक प्रभाव प्रत्यक्षात घडलेले आहेत अथवा नाही ते नक्की करण्यासाठीही विविध चाचण्या केल्या जातात. त्यांचेविषयीही स्वतंत्रपणे लिहायचे आहे.
मात्र, 'सम्यक जीवनशैली परिवर्तना' व्यतिरिक्त कशानेही प्राथमिक (ज्याचे कारण वैद्यकीयदृष्ट्या नक्की झालेले नाही असा) उच्च रक्तदाब सामान्य होऊन, कायम सामान्यच राहू शकत नाही. औषधाने तो केवळ तात्पुरता (औषधाचा प्रभाव असेपर्यंत म्हणजे बहुधा २४ तास, त्यानंतर पुन्हा औषध घ्यावे लागते) नियंत्रणात ठेवतात. हे उमजून घेतल्यास उच्च रक्तदाबाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आमुलाग्र बदलेल, ह्यात काय संशय?