ह्यासोबत
- हृदयविकारः १-झटका का येतो?
- हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
- हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
- हृदयविकारः ४-रक्तदाब
- हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
- हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
- हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
- हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
- हृदयविकारः ९-पहिला दिवस
- हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
- हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १३-पुनर्वसन
- हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
- हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
- हृदयविकार-१६ आहार
- हृदयविकार-१७ विहार
- हृदयविकार-१८ व्यायाम
- हृदयविकार-१९ प्राणायाम
- हृदयविकार-२० शिथिलीकरण
- हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
- हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
- हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
- हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
- हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
- हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
- हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
- हृदयविकार: २८-एकाकीपणा
- हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
- हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण
हृदयविकारः १३-हृदयरुग्ण पुनर्वसन कार्यक्रम (हृदयपुकार)
जरी माझी हृदयधमनी शस्त्रक्रिया होऊन माझ्यावरील हृदयाघाताचा धोका टळलेला होता तरी चढेल रक्तदाब (१३०/९० ते १४०/१००) आणि वाढलेली कोलेस्टेरॉल पातळी (१९२) यांचा सामना मला करायचा होता. आणि भविष्यात औषधविरहित, विना शस्त्रक्रियाहस्तक्षेप, आरोग्यपूर्ण आयुष्य मला जगण्याची इच्छा होती. म्हणून, प्रतिबंधक हृदयोपचाराबद्दल मनात विश्वास निर्माण झाल्यावर मी हृदयरुग्ण पुनर्वसन कार्यक्रम (हृदयपुकार) मध्ये सहभागी झालो. मला सांगण्यात आले की आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम, शिथिलीकरण, तणाव व्यवस्थापन, मनोव्यवस्थापन या सर्वांचा यथोचित आधार घेऊन सर्वंकष जीवनशैली परिवर्तन घडवता येते. त्या व्रताचे कठोर पालन केल्यास तीन महिन्यांच्या 'हृदयपुकार' ने हे साध्य दृष्टीपथात येऊ शकते.
तिथे योगावर्ग सुरूच होता. मी त्यात रुजू झालो. प्रशिक्षक म्हणाल्या डोळे मिटा. आणि काय नवल, माझे डोळेच मिटेनात. अत्यंत प्रयत्नांनी डोळे मिटल्यावरही, सारखे ते किलकिले करून बाहेर काय चाललेले आहे ते पाहण्याची इच्छा अनिवार होई. साधे डोळे मिटून घेणे एवढे अवघड असेल असे मला कधीच वाटले नव्हते. मग मी पापण्यांचे पडदे बळे बळेच ओढून डोळे मिटायला शिकलो. पण ते पुरेसे नव्हते. त्या म्हणत डोळे 'अर्धोन्मिलित' असावेत. म्हणजे ते मिटण्यासाठी पापण्यांची ओढगस्त त्यांना मंजूर नव्हती. मात्र, अर्धोन्मिलित डोळ्यांनी योग्साधना करणे मला तीन महिन्यांच्या प्रयासाने सहज जमू लागले. माझ्यासोबत आणखीही लोक होते. एकदोघांचे भ्रमणध्वनी वाजत असत. त्या म्हणायच्या योग साधनेसाठी बसतांना भ्रमणध्वनी, घड्याळे वगैरे तर आणूच नयेत पण डोळे मिटून घेण्याचे कारणही नीट समजून घ्यावे -ते म्हणजे योगसाधनेत कुठलेली दुसरे व्यवधान नसावे. त्या म्हणायच्या, जरी आपल्याला काही मिनिटेच योगसाधना करायची असेल तरी, साऱ्या जगातील सारा वेळ आपल्याला योगसाधनेसाठी उपलब्ध आहे असे समजावे, म्हणजे मन सहज स्थिर होऊ शकते.
प्रार्थनेदरम्यान डोळे मिटून घेऊन, पावलांचे अंगठे जुळवून ताठ उभे राहणे किती कठीण आहे हेही मला तेव्हाच कळले. सवय नसेल तर तोल जातो. हळूहळू सवयीने मला ते साधले. समोर छातीशी हात जोडून आपण नमस्कार करतो तसा पाठीशी हात जुळवून नमस्कार केल्यास हातांच्या मोठ्या स्नायुंना कार्यरत राखण्यास मदत होते हेही मला तेव्हाच कळले. टाचांवर चालणे, पौच्यांवर चालणे, पर्वतासन, उभे राहून समोर हात जमिनीला समांतर धरून पाय ताठ ठेवत कमरेत वाकवत हातास टेकवणे इत्यादी लवचिकतेसाठीचे व्यायाम मी तिथे शिकलो.
बैठ्या जीवनशैलीमुळे आखडलेल्या स्नायुंना कार्यरत राखण्यासाठी लवचिकतेसाठीचे व्यायाम दिवसातून १०-२० मिनिटे तरी करणे आवश्यक असते. ४०-६० मिनिटे जलद चालणेही किमान स्वस्थतेसाठी आवश्यक असते. श्वसनशक्ती वाढविण्यासाठी १० मिनिटे तरी प्राणायाम करायलाच हवा. आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी विवक्षित आहार निष्ठेने अंमलात आणायला हवा हे मला सहजच पटले. मात्र तणाव व्यवस्थापन, शिथिलीकरण आणि मनोव्यवस्थापन म्हणजे काय ते समजून येण्यास बराच काळ जावा लागला. सुरुवातीला तर ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण असल्या भाकड उपायांमध्ये मी हकनाकच गुंतत चाललो आहे असे मला वाटत असे.