हृदयविकार-१६ आहार


हृदयविकार-१६ आहार


प्रस्तावनाः
इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे.
तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरीतासुद्धा होऊ शकेल.


श्रेयअव्हेरः
हा वैद्यकीय अथवा आहारविषयक सल्ला नाही.
तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून आलेले शहाणपण आहे.


असे म्हणतात की आहाराने रोग हरा. हे खरेच आहे. मग तो हृदयविकार असो अथवा इतर कुठलाही अवनतीकारक विकार असो. आहाराने केवळ रोगहरणच साधते असे नसून रोगप्रतिबंधनही अवश्य साधते. मात्र आहारात स्थायी स्वरुपाचे बदल केल्यास, त्या बदलांचा शरीरप्रकृतीवर परिणाम दिसून येण्यास किमान तीन सप्ताहांचा कालावधी लागतो, असे आढळून आले आहे. कुठले बदल करावेत हा अभ्यासावर आधारित तज्ञ सल्ल्याचा भाग आहे.


ह्यामुळे, ज्यांच्या रोगाची अवस्था तीन सप्ताहांपर्यंत कुठलाही धोका न पत्करता टिकाव धरू शकेल अशी असेल त्यांनी आहाराने रोगाचे हरण करणे तत्त्वतः शक्य आहे. मात्र वर्तमान रोगाच्या अवस्थेमुळे ज्यांना तीन सप्ताहांच्या आतच लक्षणीय धोका संभवतो, त्यांनी वेळीच औषधे वा शस्त्रक्रियांचा आधार वैद्यकीय सल्ल्यानुरूप घ्यावा हेच योग्य. हृदयविकाराच्या बाबतीत, हृदयाघात, पक्षाघात, मूत्रपिंडदोष, दृष्टीदोष इत्यादींचे धोके विनाऔषध व विना शस्त्रक्रिया अनावर होऊ शकतात. मात्र, औषधे वा शस्त्रक्रियांचा आधारे धोका टाळण्यात यशस्वी होता आले तरीही रोगनिवारण होतेच असे नाही. रोगनिवारणाचा अंतिम इलाज आहार हाच असतो.


त्यामुळे औषधे वा शस्त्रक्रियांच्या आधारे धोका टाळण्यात यशस्वी झाल्यावरही, आणि रोगाची अवस्था गंभीर नसल्याने त्वरीत औषधे वा शस्त्रक्रियेची गरज न भासल्यावरही, आहार हाच रोगनिवारण आणि प्रतिबंधाचा रामबाण उपाय बाकी उरत असतो. हे एकदा मान्य केल्यावर सम्यक जीवनशैलीगत परिवर्तनांचा स्वीकार करण्याचा निर्णय घेता येतो. असे केल्यास त्याअंतर्गत आहार कसा असावा हा विषय इथे बघायचा आहे.


मुळात माणसाचा नैसर्गिक आहार काय आहे? काय असावा? ह्याची अनेक उत्तरे संभवतात. माणूस निर्जीव गोष्टी जशा की काच दगड, लोखंड ह्या कधीच खाऊ शकत नाही. माणसास स्वसंवर्धन आणि विकासासाठी सजीव गोष्टींचाच वध करून वधानंतर शक्य तेवढ्या लवकर त्यांचा आहारात समावेश करावा लागतो. करावा. सजीवांमध्ये वनस्पती आणि प्राणी दोन्ही येतात. मात्र माणसाची शरीररचना वनस्पतीजन्य आहाराकरता घडलेली असल्याने माणसाने प्राणीजन्य आहार घेणे अनैसर्गिक व म्हणूनच अपथ्यकर ठरते. तेव्हा माणसाने वनस्पतीजन्य आहार, शक्यतोवर वनस्पतीच्या मुळावेगळा करण्याच्या वेळेपासून लवकरात लवकर, मुळीच प्रक्रिया न करता अथवा कमीत कमी प्रक्रिया करून सेवन करावा.


प्रक्रिया दोन कारणांनी केल्या जातात. चव वाढविण्यासाठी आणि अन्नपदार्थ टिकविण्यासाठी. दोन्हीही कारणांनी अन्नपदार्थ टिकवण्यासाठी लागणाऱ्या मीठ, साखर, संरक्षके (प्रिझर्वेटिव्हज) इत्यादी पदार्थांची त्यात भरच केली जाते. आणि अशी भर करणे आरोग्यास खरोखरीच अपायकारक असते. माणसाने नाशिवंत पदार्थ विनाश पावण्याआधीच सेवन करून उपजीविका चालविल्यास सर्वात अधिक आयुराआरोग्य लाभू शकेल.


माणसाने जिव्हालौल्याखातर रस, अर्क व इतर संहत पदार्थ (तेल, साखर, मीठ इत्यादी) मुबलक प्रमाणात सेवन करण्याची प्रथा पाडली आहे. कायम संहत पदार्थांचे सेवन अनारोग्यकारक ठरते. त्यांचा त्याग करण्यासाठी मनाची तयारी करावी. ह्या प्रथेमुळे निसर्गात सापडणारे अनेक सकस पदार्थही आपल्याला गोड लागेतनासे झालेले आहेत. आपण आमरसातही साखर घालतो. केळ्यातही साखर घालतो. साखरेचा अनिर्बंध वापर आजच्या जीवनशैलीतील मूलभूत समस्या आहे. बैठ्या जीवनशैलीत भरपूर साखर पचवून तिचे सममूल्य ऊर्जेत रुपांतर करण्याची क्षमता राहत नाही. म्हणून साखरेचा वापर शक्य झाल्यास बंद करावा. निदान कमीत कमी तरी अवश्य करावा. 'मला मधुमेह आहे काय?' हा प्रश्न विचारू नये. शरीर वापरू न शकलेली आणि शरीरातून काढूनही टाकू न शकलेली साखर, ते मेदामध्ये रुपांतरित करून शरीरात साठवत जाते.


शरीराच्या बाह्य जखमा बुजविण्याकरीता शरीर रक्त साखळण्याची प्रक्रिया वापरते. त्याचप्रमाणे अंतर्गत जखमा बुजविण्याकरीता शरीर मेदाचा (कोलेस्टेरॉलचा) उपयोग करीत असते. हृदयधमन्यांतील जखमा भरून येण्यासाठी वापरला जाणारा मेद जेव्हा मुबलक प्रमाणात रक्तात उपलब्ध असतो तेव्हा हृदयधमनीस आतून पुटे चढतात. अशाच पद्धतीने रक्तात उतरणारे अतिरिक्त (खरे तर हाडांतील) कॅलशियम, अशी पुटे कठीण करते. त्यामुळे धमनीकाठीण्य येते. हृदयधमनीचा अवरोध होतो, आणि हृदयाघाताचा धोका निर्माण होतो. शरीरातील ७५ टक्के कोलेस्टेरॉल शरीरनिर्मित असते. शरीर ते साखरेपासून निर्माण करू शकते. ही प्रक्रिया मानसिक तणावाच्या अवस्थेमुळे गती प्राप्त करते.


तेल, तूप, बटर, लोणी, चीज इत्यादींचे आजकालच्या आहारातील अपरिमित प्रमाण, केवळ अनारोग्यकारकच राहिलेले नाही तर विनाशक पातळ्यांपर्यंत पोहोचलेले आहे. हृदयधमनीविकार आणि कोलेस्टेरॉल यांचा अन्योन्य संबंध प्रस्थापित झाल्यापासून कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी या पदार्थांचा वापर कमीत कमी करण्याकडे कल असतो. मात्र संशोधनात असे सिद्ध झालेले आहे की केवळ मेदाद्वारे बव्हंशी ऊर्जा मिळविणाऱ्या लोकांनी, जरी मेदाद्वारे मिळणाऱ्या ऊर्जेत ३० टक्केपर्यंत घट घडविली तरी आधीच विकारग्रस्त झालेल्यांना ते मुळीच पुरेसे ठरत नाही. हृदयधमनीतील काठीण्याची माघार घडवून आणण्यासाठी मेदाद्वारे मिळणाऱ्या ऊर्जेत ३ टक्केपर्यंत घट घडवावी लागते. याकरीता आपण आपली सारी ऊर्जा प्रथिनांद्वारे मिळविणे उत्तम, कर्बोदकांद्वारे मिळविल्यास शरीरातील साखर व म्हणून पुढे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका उरतोच. मात्र, मेदाद्वारे ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्नही करू नये. अर्थातच हे सर्व पदार्थ शक्यतोवर पूर्णतः बंद करावेत.


असे म्हणायचाच अवकाश की काही लोक म्हणतात की यंत्रेसुद्धा वंगणाविना चालत नाहीत मग शरीरे कशी चालतील? तुम्ही तेल, तूप यांच्याशी फारकत घ्याल आणि मग सांधेदुखीशी झगडत बसाल! ह्यात मुळीच तथ्य नाही. गाय गवत खाऊन दुध, तूप निर्माण करते. आपल्याही शरीरात स्वतःला लागणारे सारे पदार्थ नैसर्गिक अन्नांतून निर्माण करण्याची उपजत क्षमता असते. ती जर आपण गमावून बसलो तर मात्र आपली धडगत राहत नाही.


माझी ऍन्जिओप्लास्टी झालेली असल्यामुळे मला दोन चमचे (१० ग्रॅम) स्निग्ध पदार्थ दोन चमचे साखर आणि दोन चमचे मीठ दिवसाकाठी चालवून घेतल्या जाईल असा उःशापही मिळालेला होता. पण मूळ शापाप्रमाणे, सतत तीन सप्ताहांपर्यंत निष्तेल, निष्तूप, निर्मीठ (साऱ्याच जणांना हे आवश्यक असतेच असे नाही) आणि निर्साखर राहिल्यास हृदयधमनीविकाराची पिछेहाट निःसंशय सुरू होते. वजन कमी होऊ लागते. हा स्वानुभव आहे.


कुठले पदार्थ खावेत ते 'हृदयविकार निवारण - शुभदा गोगटे' ह्या मेहता प्रकाशनाच्या पुस्तकात भारतीय पाकक्रियांसकट सविस्तर दिलेले आहेच. मात्र तसे का खावे ह्याची मिमांसा इथे दिलेली आहे.


टिपः
इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील.
ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत.
त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही.
मात्र ती साधकबाधक चर्चा इतरत्र चर्चाविषय उघडून करावी.