हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन

हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन


सम्यक जीवनशैली परिवर्तन म्हणजे काय? तर आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम, शिथिलीकरण, तणाव व्यवस्थापन, मनोव्यवस्थापन यांची व्यवस्थित योजनापूर्वक आखणी करून त्यानुसार आरोग्यहितकर जीवन जगल्यास विकार/विकृती दूर होऊन निसर्गनियमित/प्राकृत स्वस्थ आयुष्य घडू लागते.


१. आहारः कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी विवक्षित आहार निष्ठेने अंमलात आणायला हवा. तसा आहार मला सुचविण्यातही आला. मात्र, मला सुचविलेल्या आहाराचे माझे आवडते वर्णन आहेः निष्तेल, निष्तुप, निर्दही, निर्साखर आणि निर्मिठ. हा असला शाप मिळाल्यानंतर मी आपोआपच उःशाप शोधू लागलो. मग समजले की दिवसाला २ चमचे (दहा ग्रॅम) तेल/तुप, तेवढीच साखर आणि तितपतच मिठ घेतलेले चालू शकेल. सुरूवातीला काही दिवस, मी जो जो आहार (जेवण, नाश्ता, चहापाणी, च्याऊम्याऊ वगैरे सर्व) त्यापूर्वी घेत असे तो लिहून ठेऊन त्याची चिकित्सा करून काय ठेवावे, काय सोडावे हे ठरविण्यात आले.


२. विहारः ४०-६० मिनिटे जलद चालणेही किमान स्वस्थतेसाठी आवश्यक असते. मग दोन तास किंवा त्याहूनही जास्त का चालू नये? तर चालल्यामुळे जेवढा अतिरिक्त आयुष्यलाभ होतो तो जेवढा वेळ आपण चालत असतो त्याचे एवढाच असतो. म्हणून त्याहून जास्त चालून अतिरिक्त फायदा होत नाही. चालल्यामुळे एरव्हीही दिवसभर ऊर्जस्वल वाटत राहते म्हणूनच चालावे. मात्र ३० मिनिटांहूनही कमी चालल्यास, शरीरास चालण्याचा लाभ होण्यास सुरूवात होते तोपर्यंत तुम्ही ते बंद करू लागत असता म्हणून चालूनही फायदा होत नाही.


३. व्यायामः बैठ्या जीवनशैलीमुळे आखडलेल्या स्नायुंना मोकळे करण्यासाठी /कार्यरत राखण्यासाठी लवचिकतेसाठीचे व्यायाम दिवसातून १०-२० मिनिटे तरी करणे आवश्यक असते. बैठी आसने (खुर्चीवर, दिवाणावर, पलंगावर) घालून तासंतास बसणाऱ्यांनी वारंवार आसन मोडून थोडेसे चालून घ्यावे. एकाच स्थितीत अवघडून राहणे टाळावे. कमी करता येईल तेवढे कमी करावे. शरीराचे किमान मोठे स्नायू (हात, पाय वगैरे) दिवसातून एकदा तरी त्यांच्या संपूर्ण क्षमतेने ताणले जायला हवे असतात. तरच ते शाबूत राहतात. माणसाला पूर्वी शेपूट होती. ती न वापरल्याने नष्ट झाली असे म्हणतात. तेव्हा जे अवयव वापरात राहत नाहीत ते नष्ट होण्याची भीती असतेच. 'वापरा अथवा गमवा' (use it or loose it).


४. प्राणायामः श्वसनशक्ती वाढविण्यासाठी १० मिनिटे तरी प्राणायाम करायलाच हवा. कपालभाती, उदरश्वसन आणि अनुलोमविलोम यांचा उपयोग सर्वाधिक होतो. खरे तर श्वसन कायमच चालू असते. पण आपण फारच थोड्या श्वसनशक्तीचा उपयोग करत असतो. तेव्हा नेहमीच दीर्घश्वसन करावे. संथ श्वसन करावे. योगासने आणि प्राणायाम यांना मिळून 'योगसाधना' असेही म्हणातात. त्याचा उपयोग आरोग्यसाधनेत अपार आहे.


५. शिथिलीकरणः हे शिथिलीकरण शारीरिक ताणांसाठी जरूर असते. आपण दिवसातला बराचसा काळ कशाच्या तरी प्रतीक्षेत, अवघडत बसून उभे राहून वा थांबून घालवत असतो. ह्या काळात आपण निरनिराळे शारीरिक तणाव गोळा करत असतो. सुखासन, शवासन ही आसने दररोज करावीतच. एरव्हीही हातपाय ताणणे, फिरविणे, त्यातील ताण मोकळे करणे हे करतच राहावे. त्यामुळे ते ताण वेळीच निरस्त होऊ शकतात.


६. तणाव व्यवस्थापनः आपल्यासोबत कायमच मानसिक तणाव असतात. न सुटणारे प्रश्न, न आवडणारी माणसे, गोंधळ गडबड, प्रदूषण ह्यांचे तणाव एकापाठोपाठ एक आपल्यावर आक्रमण करत असतात. शरीराचा व मनाचाही प्रतिसाद 'लढा वा पळा' (fight or light) स्वरूपाचा असतो. म्हणजे झेपत असेल त्याच्याशी लढा आणि झेपत नसेल त्यापासून पळ काढा. मात्र साऱ्याच तणावांनी एकदम हल्ला बोलताच शरीर वा मन प्रत्येक बाबतीत लढायचे वा पळायचे ह्याचा निर्णय करण्याआधीच ती समस्या येऊन ठेपते आणि मग आपण तिचा सामना करू शकत नाही. तेव्हा एका वेळी एकच समस्या हाताळणे आणि 'लढा वा पळा' चा निर्णय त्वरीत घेणे ह्यामुळे तणावांचे व्यवस्थापन सोपे होते.


७. मनोव्यवस्थापनः मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते. ह्यातून बाहेर पडण्याचा राजमार्ग म्हणजे ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण इत्यादींच्या उपयोगाने मन एकाग्र करण्याची किमया साधणे. ह्यालाच 'ध्यानधारणा' म्हणतात.


ह्या सात कलमी कार्यक्रमाचा आपण तपशीलवार उहापोह करणारच आहोत.