ह्यासोबत
- हृदयविकारः १-झटका का येतो?
- हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
- हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
- हृदयविकारः ४-रक्तदाब
- हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
- हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
- हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
- हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
- हृदयविकारः ९-पहिला दिवस
- हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
- हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १३-पुनर्वसन
- हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
- हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
- हृदयविकार-१६ आहार
- हृदयविकार-१७ विहार
- हृदयविकार-१८ व्यायाम
- हृदयविकार-१९ प्राणायाम
- हृदयविकार-२० शिथिलीकरण
- हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
- हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
- हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
- हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
- हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
- हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
- हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
- हृदयविकार: २८-एकाकीपणा
- हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
- हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण
हृदयविकार: २८-एकाकीपणा
प्रस्तावनाः इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.
श्रेयअव्हेरः हा वैद्यकीय सल्ला नाही. तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून/वाचनातून आलेले शहाणपण आहे.
टीपः इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील. ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत. त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही.
एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो. आणि मग सर्व शरीर सुदृढ आणि निरोगी असूनही हृदयधमन्यांमध्ये किटण साठू लागते. त्या अवरुद्ध होतात. हृदयविकार होतो. असल्यास बळावतो. म्हणूनच हृदयविकार झालेल्यांना समाजात मिळून-मिसळून राहण्याचा सल्ला दिला जातो. इतरांशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने फायदाही होतो.
ह्याकरिताच एकाकीपणा उद्भवतो कसा? त्याचा सामना कसा करावा? हृदयविकाराचा प्रतिबंध करण्यासाठी, एकाकीपणा टळावा म्हणून जीवनशैलीत काय परिवर्तन करावे? ह्या प्रश्नांचा उहापोह इथे करण्याचे योजिले आहे.
हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात माणसेच मुळात कमी असतात. दार बंद संस्कृतीमुळे शेजाऱ्यांशी संवाद मर्यादितच असतो. त्यात घरातील प्रत्येक व्यक्ती इतकी व्यस्त असते की एकमेकांशीही बोलायला फुरसत असू नये. घरात माणसे एकतर झोपलेली असतात किंवा घराबाहेरच जास्त वेळ असतात. जागेपणी घरातील दोन-चार व्यक्ती घरात असण्याचा काळ, तीन-चार तासांचाच काय तो असतो. ह्या 'काळास' ते एकतर प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विश्रांती घेण्याचा काळ मानतात किंवा सामुहिकरीत्या दूरदर्शन बघण्याचा काळ मानतात. व्यक्तीव्यक्तींमध्ये अर्थपूर्ण संवाद होतच नाही.
ह्यामुळे, व्यक्तींचे न सुटणारे प्रश्न, साखळलेली निराशा, कामाचे जागी कधीही उद्भवू शकणारे वैमनस्य, अनपेक्षित रीतीने वेळाचा, कष्टाचा, पैशाचा झालेला ऱ्हास इत्यादी समस्यांना श्रोता सापडत नाही. दिलासा मिळणे तर दूरच राहते. अशा परिस्थितीत शरीरभर चैतन्य मंद होते. मनाचे अस्वास्थ्य शरीरात अवतरू लागते.
वाढत्या वयात माणूस कार्यशक्तीच्या बहरातून प्रथम चढत असतो व पन्नाशीनंतर उतरत असतो. उत्तरोत्तर उत्कर्ष साधत तो स्वत:ची एकमेवाद्वितीय जागा बनवत जातो. एकटा पडत जातो. त्याची कामे करण्यास केवळ तोच सक्षम राहतो. इतरांची मदत त्याला होईतनाशी होते. आपले पद अबाधित राहावे म्हणून कधीकधी तो स्वत:च इतरांना सुगावा लागू देत नाही. व्यावसायिक गुप्ततेच्या भिंती बांधत जातो. त्यामुळे कुठेही काहीही बोलू शकण्याचे, वागू शकण्याचे त्याचे स्वातंत्र्य उत्तरोत्तर घटत जाते. मन कैदेत पडल्याचा अनुभव घेते. आणि शरीर परिणाम भोगू लागते.
घरात आणि बाहेरही आपण क्षणोक्षणी असंख्य लोकांना भेटत असतो. मात्र मनातली किल्मिषे दूर करण्यासाठी त्यांच्याशी अनेकानेक कारणांनी संवाद साधता येत नाही. कधी ते लोक आपल्या बौद्धिक क्षमतेचे नाहीत असे आपल्याला वाटत असते. कधी पुरेसा वेळच हाताशी नसतो. कधी समोरच्याला तुमची रामकहाणी ऐकण्यात मुळीच स्वारस्य नसते. कधी परिस्थिती सोयीस्कर नसते. अगदी ओठांवर आलेली गोष्ट बोलण्याच्या वेळेसच काही दुसरी महत्त्वाची घटना बोलणेच खुंटवते.
अशा असंख्य कारणांनी येणारा एकाकीपणा जाणून घेण्याची माझ्यावर जेव्हा पाळी आली तेव्हा सुदैवाने 'मनोगत' हजर होतेच. माझी रामकहाणी ऐकून घेण्यासाठी. मग मी माझे आकलन खालील अभिव्यक्तीत रूजू केले.
'समष्टी' केंद्रितता (समस्यापूर्ती) नरेंद्र गोळे बुध, ०४/०५/२००५ - १०:४२.
हल्ली समाज फारच 'व्यक्तीकेंद्रित' होत चालला आहे. तो समाजाभिमुख व्हावा, 'समष्टीकेंद्रित' व्हावा. त्याला व्यक्ती-व्यक्तींतील संघटनेचे महत्त्व समजावे ह्या उद्देशाने ही समस्यापूर्ती सुरू केलेली आहे.
व्यक्तींमध्ये प्रबळ संघटना असावी । व्यक्तींतली विघटना अवघी टळावी ॥
व्यक्तित्त्ववर्धन घडो म्हणूनी तदर्थ । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ १ ॥
मात्र, सावधान! इथे संघ म्हणजे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' असा अर्थ अभिप्रेत नाही. योगायोगाने, शब्दसाधर्म्याने अथवा यदृच्छया जर कुणाला तो अर्थ तसा भासला तर अनर्थ न व्हावा म्हणूनच हा इशारा!
झाले किती खचित होतीलही अनेक । राष्ट्रा समर्थ करण्या झटले कृतार्थ ॥
त्यांच्या स्मृतीस स्मर तू सदा मनात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ २ ॥
स्वार्था सोड, नी सोड दुराभिमान । संघकार्य करता, व्यर्थ मानापमान ॥
राष्ट्रधर्मसमर्पणसिद्ध हो तू जनात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ३ ॥
विद्युल्लता जशी चमकते घन अंबरात । लढल्या स्त्रियाही पूर्वी भर संगरात ॥
त्यांच्याविना अधूरा संसार स्मर मनात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ४ ॥
सुहृदांस का न तू जवळी करीसी । फुटीरांस रान सगळे का मुक्त करीसी ॥
परके स्वकीय कोण, ओळख अंतरात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ५ ॥
जरी वाटते सावरेन हे सर्व मीही । जरूर मुळी नाही मजला कुणाची ॥
देती तरीही साथ, जन संकटात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ६ ॥
मौखिक परंपरेने आले कितीक ज्ञान । ते सर्व एक व्यक्ती पेलू शके मुळी न ॥
जनसंघ त्यास जपतो सदैव भारतात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ७ ॥
तुसडी विभक्त वृत्ती, व्यक्तीत वाढलेली । अन् एकलेपणाची, सीमा न राहिलेली ॥
हिंडून ये जरा तू, सर्वत्र माणसांत । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ ८ ॥
वरील दुव्यावर इतरही अनेक समस्यापूर्तीच्या ओळी आहेत, त्या इथल्या संदर्भात महत्त्वाच्या नसल्यामुळे इथे पुन्हा उद्धृत केलेल्या नाहीत. तिथे वरील ओळींना फारसा प्रतिसाद मिळाला असेही नाही. मात्र मी माझे मन मोकळे करू शकलो. कदाचित भविष्यात जे वाचतील त्यांच्यासाठी. हीच 'मनोगता'ची महत्तम उपलब्धी आहे. भविष्यातील संवादकर्त्यांशी एकतर्फी संवाद साधून एकाकीपणा कमी करता येतो. कमी होतो. कविवर्य सुरेश भट म्हणतात तसे:
आज ह्या वर्तमानाला कळेना आमुची भाषा ।
विजा घेऊनी येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही ॥
ही भविष्यातील संवादकर्त्यांशी एकतर्फी संवाद साधून देण्याची किमया घडवून आणल्याखातर श्री.महेश वेलणकर ह्यांचा मी ऋणी आहे.
अशाप्रकारे, एकाकीपणा कसा उद्भवतो आणि तो तसा का नसावा हे समजल्यानंतर त्यासाठी आपण काय करू शकतो हे पाहायला हवे. तेच आपण पुढल्या प्रकरणात पाहणार आहोत.