ह्यासोबत
- हृदयविकारः १-झटका का येतो?
- हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
- हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
- हृदयविकारः ४-रक्तदाब
- हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
- हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
- हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
- हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
- हृदयविकारः ९-पहिला दिवस
- हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
- हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १३-पुनर्वसन
- हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
- हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
- हृदयविकार-१६ आहार
- हृदयविकार-१७ विहार
- हृदयविकार-१८ व्यायाम
- हृदयविकार-१९ प्राणायाम
- हृदयविकार-२० शिथिलीकरण
- हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
- हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
- हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
- हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
- हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
- हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
- हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
- हृदयविकार: २८-एकाकीपणा
- हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
- हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण
हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
'योग-एक जीवनशैली' हे नाव आहे एका पुस्तकाचे ज्याचे लेखक आहेत डॉ. नंदकुमार गोळे. मात्र 'तो' मी नव्हेच. ते मात्र स्वतः डॉक्टर असण्यासोबत योगशिक्षकही आहेत. मी जेव्हा योगाची माहिती शोधत होतो, तेव्हा योगाबाबत शास्त्रीय माहिती असलेली अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यातील दोन पुस्तके निकम गुरूजींच्या अंबिका योग कुटिर ची आणि दोन जनार्दनस्वामींच्या योगाभ्यासी मंडळाची होती. ही पुस्तके योगाभ्यासी गुरूकुलांची होती. मात्र मला, डॉक्टर असून योगशिक्षक झालेल्या गोळ्यांच्या पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झाले. मी ते वाचले आणि मला जाणवले ते हे, की मला हवी तशी शास्त्रीय माहिती त्यात उत्तम रीतीने दिलेली आहे. आपणही ती अवश्य वाचा. योग आणि व्यायाम एकच नाहीत. योगात रक्तदाब कमी होतो तर तो व्यायामात वाढतो. ह्याचे सविस्तर निरुपण त्यांनी ह्या पुस्तकात केलेले आहे. अवश्य वाचावे.
हठयोग म्हणजे काय? माझा तर आता आतापर्यंत असाच समज होता की कुठे अंगठ्यावर उभे राहून तपश्चर्या कर, कुठे वायू भक्षण करून जग असली खडतर व्रते म्हणजेच हठयोग असावा. मात्र, 'ह' म्हणजे सूर्य आणि 'ठ' म्हणजे चंद्र. सूर्यचंद्र, दिवसरात्र, प्राणअपान, धनऋण इत्यादी द्विस्तरीय प्रणालींमध्ये जग वाटल्या गेलेले असते. त्या दोन्ही स्तरांतील संतुलन साधणे म्हणजे 'हठयोग' असे निकम गुरूजींच्या पुस्तकात सांगितलेले आहे. जीवनातील द्वैतात अद्वैत शोधण्याचे काम निकम गुरूजींनी फारच सोपे करून सांगितलेले आहे. ते पुस्तक आपण मुळातच वाचावे.
प.पू. जनार्दनस्वामींच्या पुस्तकातील सूर्यनमस्कार मला सर्वात शास्त्रशुद्ध वाटले. त्यातील इतरही सांघिक आसने करून पाहण्यासारखी आहेत. लहानपणी स्वतः जनार्दनस्वामींच्या मार्गदर्शनाखाली सांघिक आसने करण्याचे सौभाग्य मला अनेकदा लाभले. मात्र त्यावेळी मला तो जुलुमाचा रामराम वाटे. झडझडून धावपळ करण्याचा अवखळ वयात, सावकाश हातवारे करण्याने काही साध्य होईल असे मला मुळीच वाटे ना. पुढे त्यांचे 'योगस्वरूप' नावाचे पुस्तक मोठेपणी वाचल्यावर मात्र माझी मते बदलली.
ज्या 'सम्यक जीवनशैली परिवर्तना' बाबत मी सतत लिहीत आहे, त्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे योगसाधना. हृदयविकारनिवारणार्थ आजकाल प्रत्येक प्रगत उपचाऱप्रणाली मग ती उपखंडीय असो वा अपूर्व (पाश्चिमात्य) योगास उच्च कोटीचे साधन मानते. हृदयोपचाराचा एक भाग म्हणून त्याचा उपयोग करण्याआधी योग स्वतःहून काय आहे ते जाणून घेणे आवश्यक वाटल्याने हा योगाच्या समर्थनाचा प्रपंच केला आहे. योग म्हणजे आपल्या संस्कृतीची संपत्ती आहे. आपल्याकडे पुस्तकप्रदर्शनांमध्ये योगावरील पुस्तकांचे ढीग सापडतात. जरूर वाचावेत. आपण योगाच्या पालनासाठी आणि संवर्धनासाठी वेळ खर्च केल्यास आपले आयुरारोग्य वाढेल ह्यात काय संशय?