यशस्वी शब्दांचे कौतुक

आपली भाषा आपण सर्वजण अखंडपणे घडवत असतो.
त्या त्या काळानुरूप आपल्याला वेगवेगळे भाव, विचार व्यक्त करण्याची आवश्यकता भासते आणि तिची पूर्ती करायला आपण शब्द शोधतो.
भाषेत असलेले शब्द सहजासहजी सापडले तर आपण ते वापरतो, न मिळाल्यास एक तर नवे शब्द तरी बनवतो, नाहीतर दुसऱ्या भाषांतील शब्द सोईस्करपणे उसने घेऊन ते उपयोगात आणतो. असे होत होत असले शब्द आपल्या भाषेत ठाण मांडून बसतात.
कधीकधी हे उसने घेतलेले शब्द आपल्याला डाचत राहिल्यामुळे आपण त्यांच्यासाठी नवे प्रतिशब्द घडवण्याचा निकराचा प्रयत्न करतो, हट्टाने जमेल तेथे ते वापरत राहतो.
पण बरेच वेळा हे प्रतिशब्द किंवा आपल्या मते "योग्य" शब्द सर्वांपर्यंत पोहोचत नाहीत, सर्वांनाच रुचतात असे होत नाही, त्यांच्या तोंडात बसत नाहीत व शेवटी भाषेत रुळत नाहीत.
काही नव्या शब्दांना मात्र सामान्यांपासून सगळे लोक उचलून धरतात आणि ते नुसतेच टिकत नाहीत तर यशस्वी होतात व भाषेच्या मुख्य प्रवाहात मिसळून जातात.
अशा काळाने यशस्वी ठरविलेल्या शब्दांचा शोध घेऊन त्यांचे कौतुक करण्याचा या लेखाचा उद्देश आहे.


मी असे शब्द शोधतो आहे की जे
         आधी नव्हते व नवीन घडवले किंवा आले आहेत
         (निदान असे वाटते, चू.भू.द्या̱.घ्या.),
         आता लिखाणापासून बोलण्यापर्यंत सर्वत्र पसरले आहेत
         व वापरात येतात,
         गट/प्रदेश/धर्म इ. ची मर्यादा न येता लोकांनी स्वीकारले आहेत.
हे शब्द तांत्रिक असण्याचीही गरज नाही. इंग्रजी शिक्षणामुळे या काळात आपल्या अभिव्यक्तीच्या गरजाही वाढल्या आहेत. मराठीत रुळलेले प्रतिशब्द नसल्यामुळे "ऍप्रिशिएट" करणे, "इंटरेस्टिंग" हे व असेच इतर भाव आपल्याला इंग्रजी शब्द भाषेत घुसडल्याशिवाय व्यक्त करणे अजूनही कठीण जाते.

यशस्वी शब्दांचे एक उदाहरण म्हणून "हुतात्मा" हा शब्द घ्या. एके काळी हा अस्तित्वात नव्हता, इंग्रजीतल्या "मार्टीर" या शब्दाला प्रतिशब्द शोधताना, "देशवीर", "क्रांतिकारक", इ. अयोग्य वाटलेले शब्द नाकारून स्वा. सावरकरांनी संस्कृतचा आधार घेऊन हा नवा शब्द घडवला. आणि काय आश्चर्य, तो समाजमनात चपखल बसला, भाषेत रुळला. तो नवीन आला असे कोणालाही आता वाटणार नाही.
तसे सावरकरांनी अनेक शब्द घडवले पण ते सगळेच मराठी भाषेने स्वीकारले असे झाले नाही. "विधिमंडळ" (कायदे-कौन्सिल), "आरक्षीदल" (पोलीस), "निर्बंध" (कायदा), "दंडविधान" (क्रिमिनल कोड) या त्यांनी बनवलेल्या शब्दांपैकी अपवादात्मक शेवटचा सोडल्यास इतर विशेष प्रचारात आले नाहीत. "हुतात्मा" मात्र अत्यंत यशस्वी ठरला.
"पालक", "शुल्क" यासारखे शब्ददेखील जुन्या वाङ्मयातले वाटत नाहीत, ते बहुधा नवीनच आले असणार. "पालक" हा शब्द तर सामान्यातले सामान्यही वापरताना दिसतात. म्हणून हाही यशस्वी. "विमा" हा आणखी एक नवा यशस्वी शब्द. 
पण वर दिलेले शब्द आपल्यापैकी बहुतेकांच्या जन्माआधीच्या काळातच भाषेत समाविष्ट झालेले असावेत. ते आधीच्या काळातले यशस्वी शब्द झाले.


मी आता शोधतो आहे आपल्या काळातले म्हणजे गेल्या पंधरा-वीस-तीस-पन्नास वर्षांत आलेले शब्द.
तसे कितीतरी चांगले (पण कदाचित अनाकलनीय) शब्द, जसे इरावतींचा (की दुर्गाबाईंचा) "पैस", अशोक रानडेंचा "पौर्वापर्य", आपल्या काळात आले होते पण सामान्यांपर्यंत त्यांचा प्रभाव पडला नाही व शेवटी ते यशस्वी ठरून भाषेत समाविष्ट झाले नाहीत. तसे शब्द आपल्याला नको आहेत.

आतापर्यंत तीन यशस्वी शब्द मला मिळाले आहेत -
"पुरस्कार" - हा शब्द मला अजिबात आवडत नाही. पारितोषिक हा चांगला शब्द असताना पुरस्कार या शब्दाची कोणती गरज होती देव जाणे. पण माझ्यासारख्या अल्पसंख्यांची सत्ता भाषेवर चालत नसते. भाषा ही स्वयंचलित व स्वयंशासित असते. तिच्या सार्वभौम निर्णयाने हा शब्द यशस्वीपणे मराठीत घुसलाच.
"मानसिकता" - "मेंट्यालिटी" या अव्वल इंग्रजी काळातल्या तत्कालीन "मराठी" शब्दाचा प्रतिशब्द म्हणून हा सध्या वापरात आहे. खरे तर माझ्या लहानपणी "मनोवृत्ती" हा उत्तम शब्द याच्या स्थानी होता आणि तो सार्वत्रिक वापरातही होता. "मानसिकता" हा शब्द "मेंटॅलिटी"साठी चुकीचा आहे असे मला नेहमी वाटते. पण पुन्हा, शास्त्रात् रूढिर्बलीयसी म्हणतात ना त्यातली गत. जिथे तिथे कोणाची ना कोणाची "मानसिकता" हल्ली आड येतेच. नाइलाजाने का होईना मी याला यशस्वी शब्दांसाठीचे दुसरे पारितोषिक देत आहे.
आता (माझ्या मते) प्रथम पारितोषिकपात्र शब्दः
"भावणे" - इंग्रजीतल्या "अपील" होणे यासाठी हा प्रतिशब्द असावा. काही असो, या शब्दाची आपल्याला मराठीत गरज भासली व तो कुठून तरी येऊन हजर झाला. त्याने सध्या आपल्या भाषेत त्याची हक्काची जागा पटकावली आहे. या शब्दाविषयी तक्रारीला जागा नाही व तो अगदी "फ़िट" बसला आहे असे मला वाटते. याला माझे पहिले बक्षीस.

आपल्यापैकी कोणाला असे आणखी यशस्वी शब्द सुचत आहेत का? त्यांचेही या निमित्ताने कौतुक करूया.