वारी १२

       अमेरिकेला आल्यावर इथली महत्त्वाची स्थळे बघणे हा कार्यक्रम ओघानेच आला.अमेरिकेला गेलो असे न्हणताच प्रथम मग तेथे काय पाहिले हा प्रश्न विचारला जाणार हे उघड होते.पूर्वी तिकडून काय आणले याविषयी पण उत्सुकता असे आता तिकडे मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे मिळत असल्यामुळे ती बाब एवढी महत्त्वाची राहिली नाही म्हणा ! तरीही आम्ही परत जाताना भारतातील तपासणी अधिकाऱ्याला मात्र आम्ही काहीतरी आणले असलेच पाहिजे असा कसा काय पण संशय आला होता.आणि त्याने आम्हाला बॅगा उघडायला लावल्या होत्या. माझ्या मागून आलेल्या प्रवाशाने मला नंतर सांगितल्याप्रमाणे मी गुपचुप दहा डॉलरची नोट त्याच्या हातात न ठेवल्यामुळे आमच्यावर हा प्रसंग आला होता.त्यामुळे एकवेळ आम्ही काहीच आणले नाही हे कबूल केल्यावर आम्हाला काही फार नावे ठेवली गेली नसती, पण  आम्ही काहीच न पाहता फक्त मुलाकडे राहून परत आलो असे सांगितल्यावर मात्र आमची वेड्यात गणना झाली असती.(अजूनपर्यंत काहीच न पाहता इथले रस्ते आणि इतर बाबींचेच वर्णन करीत बसल्याबद्दल काहीजणांनी आम्हास वेड्यात काढलेच आहे.)
       मला स्वतःला असा पाहण्याचा उत्साह जरा कमीच आहे. आता हा वयाचा परिणाम म्हटले तरी पहिल्यापासूनच अनायासे जमेल ते पहावे त्यासाठी फार दगदग करू नये ही माझी नेहमीची चाल.शिवाय प्रवासवर्णन लिहिण्यासाठीच प्रवास करून आणि मग प्रवासवर्णनकार अशी ख्याती मिळवून साहित्यसम्मेलनाच्या अध्यक्षपदाच्या मारामारीत उतरण्याएवढी माझी योग्यता नाही याविषयी मला खात्री आहे .जे काही दोन चार मनोगती वाचत असतील त्यापलिकडे भारतात कोणी मायमाउली मी लिहिलेले वाचत नाही की ज्यासाठी पाहण्याचा आटापिटा करून त्यावर आपल्याला ती गोष्ट कशी दिसली यावर फार मोठे भाष्य मी करावे. माझी मोठी बहिण ( आता ती गेली बिचारी) या बाबतीत माझ्याही वरताण म्हणजे आम्ही काही पहायला जाऊ म्हटले तर कुठ जाताय धडपडत त्यापेक्षा बसा टी .व्ही,बघत सगळ काही त्याच्यावर छान दिसेल .छान स्वयंपाक करते खा प्या आणि आराम करा अस म्हणून आम्हालाच घरी रहायचा आग्रह करणार.कधीकधी ती मारे मोठ्या सहलीच्या योजना करायची आणि आयत्या वेळी जाण्याचे  रद्द करायची त्यामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांनी तिच नाव कॅन्सल आँटी असच ठेवल होत.तिच्या मते जाण्याची योजना ठरवण्यात जी मजा असते ती प्रत्यक्ष जाण्यात नसते.अशा बहिणीचा भाऊ असल्याने ते गुण माझ्यातही उतरले आहेत.
         माझ्या आईची गोष्टच वेगळी ! आणि तिचा काळही वेगळाच होता.तिच्या मते आमच्या छोट्या गावातच तिने इतके काही पाहिले होते की दुसरीकडे  फार बघण्यासारखे काही उरले आहे असे तिला वाटलेच नाही.तसे छोटे असले तरी ते एक संस्थान होते आणि बऱ्याच मोठ्या शहरातील नागरिकाना पहायला मिळणार नाही असा संस्थानी रुबाब तिला पहायला मिळाला होता ही गोष्ट मात्र खरी !
          पण तरीही आपल्या आडगावात येणाऱ्या पाहुण्यालाही गावातले वैशिष्ट्य म्हणून निदान गावातले गणपती वा मारुतीचे मंदीर दाखवल्याशिवाय गाववाल्याला चैन पडतच नाही. न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर अशाच आडगावी  गेले असता त्यांच्या यजमानानी गावातील सुप्रसिद्ध गायकाचे गाणे ऐकवण्यासाठी कसा जिवाचा आटापिटा केला , त्यासाठी वाद्ये गोळा करण्यापासून किती अडचणी आल्या आणि त्या पाहुणचारात त्यांची गाडी कशी चुकली याचे अगदी मजेदार वर्णन त्यांच्या "माझी गाडी कशी चुकली " या विनोदी कथेत केले आहे. अर्थातच सुजितला आईवडिलाना अमेरिका दाखवण्याची इच्छा आणि उत्साह होता त्यामुळे काही गोष्टी पाहण्याचा योग आलाच. शिवाय साखरेच खाणार त्याला देव देणार म्हणतात तसा प्रकार होऊन माझ्या बरोबर आलेले माझे जे मित्र सान्फ्रान्सिस्कोला आपल्या मुलाकडे गेले होते ते मात्र हौशी असल्यामुळे त्यानी निघतानाच आन्हाला बजावून सांगितले होते की  नायगारा पहायला जाताना आम्ही  त्यांना आमच्याकडे बोलवायचे आणि त्यानी हॉलिवुड डिस्नेलेंड पहायला जाताना आम्ही त्यांच्याकडे जायचे.त्यामुळे आमच्या दोघांच्या मुलांना पूर्वपश्चिम भागाचा दौरा करण्याचे कारण पडले नाही. पहिल्याच अमेरिका वारीत पूर्वपश्चिम भाग पहाण्याची संधी आम्हास मिळाली.
           आम्ही काय काय पाहिल याच सविस्तर वर्णन देऊन मनोगतींचा अंत पाहण्याची माझी इच्छा नाही. ज्यानी या गोष्टी पाहिल्या असतील त्यांना त्यात नवीन काही वाटणार नाही आणि ज्यानी पाहिले नसेल त्यांना पूर्ण कल्पना देण्याइतके शब्दसृष्टीवर माझे प्रभुत्व नाही त्यामुळे काही ठिकाणी मला काही गमतीदार अनुभव आले तेवढेच सांगतो.
           अगदी सुरवातीला घराजवळील काही स्थळांना आम्ही भेटी दिल्या.त्यात अगदी जवळचे म्हणजे रूझवेल्ट पार्क.भारतातही काही शहरातील बागा प्रेक्षणीय आहेतच. मुघल गार्डन तर जगातील उत्कृष्ट बागेत जमा होते. पण अमेरिकेत जागेचा तुटवडा नसल्याने येथील बागा आकाराने खूपच प्रचंड आहेत.रूझवेल्ट पार्क लहान म्हटली तरी तिचे क्षेत्रफळ २७१ एकर आहे. आणि अशा बागांची संख्याही भरपूरच आहे. प्रत्येक बागेत मुलाना खेळण्यासाठी घसरगुंड्या झोके असतातच त्याच्यावर खेळणारी मुले पाहून त्यांचा मला हेवा वाटला कारण आता आपल्याकडे बुभुक्षित नगर्सेवकांनी मैदाने बागा यांचा स्वतःच्या फायद्यासाठी बाजार मांडून नव्या पिढीला मुक्त बागडण्याच्या सुखापासून कायमचे वंचित केले आहे.नुसत्या न्यू जर्सी स्टेटमध्ये महत्त्वाच्या १९ पार्क्स आहेत.आणि छोट्यामोठ्यांची तर गणतीच नाही. या स्टेटला गार्डन स्टेट असेच म्हणतात.
          रूझवेल्ट पार्कमध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे बरोबर मध्यभागी असणारा खूपच मोठा तलाव.तो आवडण्याचे  कारण म्हणजे आमच्या छोट्या गावात पण अगदी असेच मोठे तळे होते आणि त्या तळ्याच्या सभोवताली गुलमोहराची संपूर्ण झाडी होती.त्याची आठवण या तलावामुळे झाली.आणि लहानपणी त्या तलावात मारलेल्या उड्या आठवल्या या तलावाकाठी मोठी शाळा आहे तिचे नावही लेक व्ह्यू स्कूल असेच आहे. आमची लहानपणीची एक शाळाही अशीच तळ्याकाठी होती आणि आम्ही तिला तळ्यावरची शाळा असेच म्हणायचे.आणि शेजारीच एक बागही होती आणि तिचे नाव विशालबाग असे होते पण या विशाल बागेचा विस्तार जेमतेम एकादा एकर असेल पण त्यावेळी ती विशाल वाटायची हे खरेच.येथील बागांच्या आकारमानापुढे जशा आपल्याकडील बागा कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी अशा आहेत तीच अवस्था शाळेचीही आहे.आमची शाळा तळ्याच्या काठी होती एवढ्यावरच दोन शाळातील साम्य संपते.कारण आमच्या त्या प्राथमिक शाळेत पहिले चार वर्ग भरायचे आणि प्रत्येक वर्गात मोजून तीस पस्तीस मुले असायची.येथील शाळा अवाढव्य.प्रत्येक वर्गात मुलांची संख्या मर्यादित असली तरी प्रत्येक वर्गाच्या बऱ्याच तुकड्या असल्याने मुलांची संख्या हजाराच्या वरच असते. पुढे माझ्या मोठ्या मुलालाही अमेरिकेत यावे लागले त्यावेळी त्याची सदनिका तर रूझवेल्ट पार्कपासून केवळ पाच मिनिटात पायी जाण्याच्या अंतरावर असल्याने मी दररोज फिरायलाच तेथे जाऊ लागलो.
             लाँगवुड गार्डन ही अशीच एक भव्य(१३५० एकर क्षेत्रफळ) आणि सुंदर बाग आम्ही लवकरच पाहिली.आम्ही गेलो तो मे महिना असल्यामुळे बागेतील वनसृष्टीला वसंतबहार आलेला होता आणि जवळजवळ १३५० एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या बागेत बरेच प्रेक्षणीय भाग होते आणि अशा वेळी तेथे मुक्काम करूनच या भागाना भेटी द्यायला हव्यात असे वाटते पण आमच्यासारख्या पर्यटकांना थोडक्या वेळात जास्त गोष्टी बघण्याची घाई असते किंवा आपण पाहिले एवढेच समाधान हवे असते.खरे तर जगात इतके सौंदर्य पसरले आहे की त्याचा सर्वांचा आस्वाद घ्यायला अनेक जन्मही पुरणार नाहीत आणि आपण मात्र काही तासात त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतो लाँगवुड गार्डनमध्ये  बरेच शोज चालू होते आम्हाला शक्य होते तेवढे बघितले.बागेत त्यावेळी इतकी वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि वृक्षराजी पसरली होती की केवळ ते सौंदर्य डोळ्यात साठवण्यातच आनंदाची परिसीमा होती.तेथे अचानक एक मराठी भाषिक कुटुंब दिसले त्यामुळे बोलण्याची इछा झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते गृहस्थ माझ्या नोकरीच्या पहिल्या वर्षी आमच्याच महाविद्यालयात प्राध्यापक होते. [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18;]जवळ जवळ चाळीस वर्षानंतर आमची गाठ पडली होती त्यामुळे आमची स्वरूपे एकदम एवढी बदलून गेली होती की आम्हीच स्वतःला ओळखू शकलो नसतो.[/float]पण गाठ पडल्यावर एकमेकांची ओळख सांगितल्यावर पूर्वीचे दिवस आठवून मजा वाटली. रात्री फौंटन शो होता.त्यानंतर अलिकडे आम्ही लास वेगासलाही एक फौंटन शो पाहिला.मी पाहिलेल्या भारतातील फौंटन शोजमध्ये मैसूरची वृंदावन बाग आणि औरंगाबादजवळील जायकवाडी धरणाशेजारील ज्ञानेश्वर उद्यान या दोन्हीतील फौंटन शोज पण खूपच चांगले आहेत मात्र भव्यतेच्या बाबतीत येथील शोज जास्त सरस आहेत असे मला वाटले. 
           नायगारा पहायला आम्ही चार जुलैला म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी गेलो होतो त्यामुळे तेथे त्या दिवशी रात्री बरीच रोषणाई केलेली दिसली अशी रोषणाई इतरही बऱ्याच दिवशी करतात म्हणे !आणि अक्षरशः हजारोंच्या संख्येने पर्यटकांचे तांडे तेथे आले होतें .आमच्याबरोबरही आमचे सांफ्रान्सिस्कोचे दोस्त होतेच.नालाच्या आकाराचा हा धबधबा कॅनडाच्या बाजूने अधिकच चांगला दिसतो असे ऐकले होते पण त्यासाठी व्हिसा काढावा लागणार असल्यामुळे तो उपद्व्याप न करण्याची  आम्ही काळजी घेतली.त्या दिवशी आम्ही संध्याकाळी नायगारा शहराजवळ पोचलो तेव्हा संध्याकाळचे आठ वाजले होते पण संधिप्रकाश अगदी आपल्याकडे संध्याकाळी सहा वाजल्यासारखा होता. आमचे पूर्वनियोजित उतरावयाचे ठिकाण म्हणजे एक गुजुभाईचे मोटेल होते.तेथून धबधबा अगदी जवळ म्हणजे अर्ध्या तासाच्याच अंतरावर होता. पण रात्री रोषणाई पाहून परत येताना काहीतरी चूक होऊन सुजितचा मार्ग चुकला.तरी त्याने बरोबर नकाशा घेतला होता.आजकाल मार्गदर्शक जी.पी. एस. (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम)मिळते तसे त्यावेळी नव्हते त्यामुळे जाताना अर्ध्याच तासात गेलेलो आम्ही परत येताना तब्बल दोन तासानी मोटेलवर आलो.
           उन्हाळ्याचे दिवस असल्याने हवा बरीच गरम होती अर्थात याचा जास्त अनुभव दुसऱ्या दिवशी धबधब्याखालून नावेतून जाताना परिधान करायच्या रेनकोट आणि बूट या वस्तूंसाठी कडक उन्हात रांगेत उभे रहायला लागले तेव्हा आला.दोन ठिकाणी रेनकोट घालण्याची वेळ आली.मेड ऑफ मिस्टमधून धबधब्याखालून जाताना निळा रेनकोट परिधान करावा लागतो आणि धबधब्याजवळून लाकडी मार्गावरून पायी फिरतानाही उडणाऱ्या तुषारांपासून कपडे भिजू नयेत म्हणून घालावा लागणारा पिवळा ! त्यातला निळा रेनकोट काहीजणांनी आठवण म्हणून ठेवूनही घेतला होता. रेनकोटसाठीच्या रांगांचे नियंत्रण सर्व ठिकाणी सुट्ट्यांवर असलेली चौदा पंधरा वर्षे वयाची  शाळेतील मुलेच करत होती ही बाब उल्लेखनीय !  एकदा धबधब्याजवळील लाकडी पायऱ्यांवरून चालताना  चष्मा न काढण्याची चूक मला चांगलीच भोवली,कारण चष्म्यावर उडणाऱ्या त्या तुषारांमुळे मला काही दिसेनासे झाले म्हणून गडबडीत चष्मा उतरवून माझ्या अंदाजाने रेनकोटच्या आत असणाऱ्या शर्टाच्या खिशात म्हणून टाकला पण प्रत्यक्षात मात्र तो सरळ खाली जाऊन पडला अर्थातच त्यानंतरचा प्रवास मला चश्म्याशिवायच करावा लागला.अमेरिकेत डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन डोळ्याचा नंबर काढणे आणि चष्मा तयार करून घेण्याचा उपद्व्याप टळावा म्हणून अगोदरच मी दोन चष्मे नेले होते म्हणून बरे पण तो दुसरा चष्मा पण असाच गहाळ होण्याची वेळ पुढे आली होती.पण त्याची कहाणी पुढे कधीतरी !