ह्यासोबत
दत्तूच्या बाजूला आणखी कुणीतरी खुर्ची ओढली. गणपतनाना आले म्हणताच दत्तू आदबीने बाजूला सरला. गणपतनाना उगाचच हसले. त्यांनी हातातील पुस्तक व काठी काळजीपूर्वक खिडकीत ठेवली व आपली व्हॉयोलिनवर शोभणारी लांबसडक बोटे जुळवून ते खेळ पाहू लागले. साऱ्या क्लबात दत्तूला फक्त गणपतनानांविषयी कुतूहल व आदर वाटत असे. त्या गृहस्थाने खोऱ्याने पैसा ओढला. सुपासुपाने खर्च केला. साऱ्या आयुष्यभर शौकही असा कलंदर केला की ते अत्तराच्या दिव्यांनी सुगंधी प्रकाशले. चाळीस वर्षांपूर्वी एल.एल.बी. ला पहिला वर्ग मिळवलेले गणपतनाना आजपर्यंत हायकोर्ट जज्ज होऊन जायचे. पण त्यांनी काढली मोटर कंपनी. मोठमोठ्या पिशव्यांतून गल्ला बँकेत भरला. गावातला पहिला रेडिओ गणपतनानांचा. पहिले सिनेमा थिएटर त्यांचे. त्यांच्या दिवाणखान्यात मोठमोठ्या गायकांच्या मैफली झडल्या. त्यांचे कपडे असे ऐटबाज असत की, कधी तरी कंपनीच्या कामाला विजापूर - बागलकोटकडे ते गेले की त्यांचा रुबाब पहायला लोक मुद्दाम येत. एका संस्थानिकाकडे असलेल्या एका कोकिलकंठी कुलवतीला त्यांनी उघडपणे मोटारीतून आणले. तिची पहिली शेज झाली ती म्हणे रुपये व फुले यांच्या शय्येवर! पण तिने पत्नीला एक शब्द उर्मटपणे बोलताच भर अंगणात त्यांनी तिला वेताने फोडून काढले. मुंबईला कंकय्या खेळणार, पुण्याला बालगंधर्वांचे 'स्वयंवर' लागणार म्हटले की, गणपतनाना फर्स्ट क्लासमधून लवाजम्यासह चालले. नवीन शाळेसाठी मदत मागायला त्यांच्याकडे काही लोक आले त्या वेळी, आपले नाव शाळेला न देण्याच्या अटीवर ड्रॉवरमधून पंचवीस हजारांच्या नोटांचा अस्ताव्यस्त ढिगारा त्यांनी त्या लोकांपुढे टाकला. गावातल्या सहा मोठ्या विहिरी त्यांनी बांधल्या. गावातल्या सध्याच्या निम्म्या डॉक्टरवकीलांचे शिक्षण त्यांच्या आतषबाजीतून झाले. पण बहर ओसरला. सारा पैसा गेला. पण तो स्वतः मिळवलेला. वडीलोपार्जित मिळकत त्यांनी जशीच्या तशी मुलाच्या हवाली केली. आपली दोन हजार इंग्रजी पुस्तके नेटिव्ह लायब्ररीला देऊन टाकली. मैफल संपून गेली, पण ना खंत ना खेद. कुठे चिकटून राहिल्याची खूण नाही, काही तुटून गेल्याचा डाग नाही. आता ते एका खोलीत राहात, पांढरा शुभ्र, गुढग्यापर्यंत नेहरू शर्ट घालीत, पांढरे झालेले केस सारे मागे वळवीत. हातात नेहमी चांदीच्या मुठेची काठी, व हातात डिक्सन कार किंवा गार्डनरचे एक पुस्तक. ते स्वतः कधीच रमी खेळत नसत. साऱ्या आयुष्याचा धुंद जुगार करणाऱ्याला पै-आण्यात काय आकर्षण वाटणार? अलिप्त नजरेने ते सारा खेळ पाहात, दोनचार आण्यासाठी चाललेली बाचाबाची ऐकत, निर्लज्जपणे देणी बुडविणाऱ्यांकडे 'काही समजत नाही' अशा नजरेने पाहात. एखादा ग्रीक देव माणसांच्या किरकोळ जगात येऊन जावा त्याप्रमाणे त्यांचे क्लबला येणे असे.
मोरे एकदम ताठतो. त्याचे डोळे एकदम ठिणगी टाकणार त्याप्रमाणे लांबट जांभळाच्या आकाराचे होतात. तो आता खात्रीने एकाच पानासाठी थांबला आहे. कारण नेहमीचा मोरे व आताचा मोरे यांत फरक आहे. आताचा मोरे शिकारीसाठी टपलेल्या कुत्र्यासारखा आहे, त्याचे ओठ विलग आहेत, व सिगारेटवर अर्धा इंच राख जमली आहे. तो टेबलावरून पान उचलतो व सरपटत टेबलाच्या कडेला आणून कोपरा मोडून पहातो. पण त्याबरोबर त्याच्यातील तणाव ओसरतो, व डोळे चेचल्याप्रमाणे होतात. तो खुर्चीत विस्कळीत पडतो, व चिडून तेच पान भिरकावून देतो.
त्याला पाहिजे होता बदाम दहा, पण निघाला इस्पिक आठ. जर तो दहा मिळाला असता तर दुप्पट पॉइंटस मिळाले असते. मायनस साडेसहाशेमधून निम्मे तरी कमी झाले असते. इथेच काय, पण आयुष्यातही कधी त्याला हवा त्या वेळी बदाम दहा मिळाला नाही. त्याचा हातच दुर्दैवी. त्याने जरी बाभळीचे रोपटे लावले असते तरी ते जळून गेले असते. त्याने चालवायला घेतलेले हॉटेल बंद पडले. बायको बाळंतपणात खलास झाली. आता त्याने व्यापार सुरु केला होता. पण गेल्या शनिवारी मालाने भरलेली वेंगुर्ल्याला निघालेली ट्रक सातव्या मैलाजवळ उलटली. आणि आता त्याचा थोरला दहा वर्षाचा मुलगा टायफॉईडने आजारी आहे. त्याला कधीच बदाम दहा मिळत नाही. पण पिंजारलेल्या केसांनी वखवखलेल्या मनाने दररोज येतो, नशीबाची परीक्षा पहातो, नव्या अपेक्षेने प्रत्येक क्षण कुरवाळतो, व शेवटी चारसहा नाणी टेबलवर टाकून 'बराय मंडळी' म्हणत कोट अडकवून निघून जातो.
पण मोरेच्या हातून इस्पिक आठ पडताच वकील त्यावर तुटून पडतो व चित्कारत पाने खाली मांडतो. त्याला नेमके तेच पान पाहिजे असते, त्यामुळे मोरेच्या हातातोंडाशी आलेली रमी त्याला मिळते. मोरे रागाने सारी पाने टेबलावर भिरकावतो, व कोट उचलून चालू लागतो. स्वतः कडेच पाहिल्याप्रमाणे दत्तू त्याच्याकडे कळवळून पहातो. त्याचेही तसेच झाले होते. रेखेशी जवळ जवळ लग्न ठरले होते. 'आता बोहल्यावरून पळून जाऊ नको' असेही त्याने तिला बजावले होते. पण नाही, तो प्रसंगच आला नाही. एका इंजिनियरशी ( इंजिनियरशी! सुंदर नाजूक पत्रे लिहिणारी, आर्त भावगीते म्हणणारी रेखा इंजिनियरबरोबर चौपाटीवर हिंडणार!) लग्न करून ती निघून गेली. आणि दत्तूने साऱ्या काळ्या लाल आठवणी पत्त्यांप्रमाणे फेकून दिल्या... मोरेप्रमाणे!
अचानक कधी तरी जागी होणारी कळ आज तीव्रतेने जागी झाली. दत्तू अस्वस्थ झाला. कुंद धुरकट खोली, अस्पष्ट अस्पष्ट चेहरे, टेबलाच्या खवल्याप्रमाणे दिसणारे पत्ते, त्यावरील काळे तांबडे डोळे. त्या जागी त्याला तिची पत्रे. कोरीव अक्षरे, रेशमी रिबन बांधून लाकडी पेटीतून दिलेली बुद्धाची छोटी मूर्ती दिसू लागली. अबोलीची फुले, बॉटल ग्रीन जॉर्जेटचे पातळ, तिने म्हटलेल्या पूरियाधनश्रीचे स्वर, शारदा नाटकातील तिचे शारदेचे काम... दत्तू तेथून एकदम उठला व भटकत दुसऱ्या टेबलाजवळ आला. त्याला खेळायचे नव्हते नाही तर तेथे वास्तविक एक जागा रिकामी झाली होती. ऍनिमिया झालेल्या मुलीसारखा दिसणारा केळकर साडेसात वाजले म्हणताच दंश झाल्याप्रमाणे एकदम घरी जायला उठला होता. तसी त्याच्या बायकोची ताकीदच होती. त्याच्या बाजूला फोपसा, जून पांढऱ्या बटाट्यासारखा दिसणारा मडीमन तोंडात तंबाखू असल्यामुळे तोंडाची कुंची करून काहीतरी बडबडत होता, त्याच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते, व त्या अवस्थेत ते कुणाला समजलेही नसते.
त्या केळकराचा दत्तूला फार राग आला. गाढवाने त्या वासंती पोतदारशी प्रेमविवाह केला होता. त्या बाईची कीर्ती जगजाहीर होती. अद्यापही तिच्या भटक्या आयुष्यावर कसलाच दाब नव्हता. पाच महिन्यांपूर्वी नायलॉनचे झकपक पातळ नेसून ती दत्तूच्या घरी आली होती. का, तर म्हणे सुधाला भेटायचे होते. पंधरा दिवसांपूर्वी सुधा माहेरी गेली आहे हे त्याने तिला दोनदा सांगितले होते. एकदा बाजारात व एकदा सिनेमा थिएटरात केळकर समोर असताना. सुधाला भेटायचे आहे! कसले तरी धुंद अत्तर; आताशा ती ब्रा देखील रेशमीच वापरत आहे की काय कुणास ठाऊक. ती जायला निघाली त्या वेळी तिच्या चेहऱ्यावर विजयाचे कुत्सित स्मित होते. मांजर जिभल्या चाटते तसे! ते पाहून दत्तू शरमला. आपण जास्त ताबा दाखवायला पाहिजे होता, असे त्याला वाटले. त्या आठवणीनेही तो आत्ता शरमला. राखेची चिमूट जिभेवर पडल्याप्रमाणे त्याचे मन कडवटले. त्याचप्रमाणे ती मनोहर देसाईकडे जात असे. रत्नाकर अमलाडीच्या मोटारीतही तिला अनेकांनी पाहिले होते. आणि हा केळकर जीव तोडीत साडेसातला घरी जातो. साऱ्या गावाला जे माहीत आहे, ते त्याला माहीत नाही? की माहीत असून ते सगळे स्वीकारून तो आनंदाने जगतो? खाली महारोग्याचा संसार घेऊन आनंदाने फुलणाऱ्या गुलमोहोरासारखा? केळकरचे मन दत्तूला कधीच समजले नाही. लग्नापूर्वी पत्नीला इतर कुणाच्या हाताचा स्पर्श झाला आहे असे समजले तरी साऱ्या आयुष्यभर, डिटेक्टिव्ह पुस्तकावर असते, त्याप्रमाणे उघड्या पंज्याची छाया पडते, आणि हा डोळ्याला झापड्या लावून साडेसातच्या ठोक्याला लोंबकळत आयुष्य काढतो आहे! चिडून दत्तूला वाटले, एक ब्लेड घेऊन त्याच्या त्या तृप्त बावळट चेहऱ्यावर चराचरा रेघा ओढाव्यात, व म्हणावे " नीट डोळे उघड, उघड्या डोळ्यांनी सारी स्वीकार. आयुष्यभर असाच पंचवीस वर्षांचा राहू नको..."
त्याला मिळालेले दोन आणे न घेता, छत्री विसरून तसाच केळकर बाहेर धावला, व सायकलीवरून निघून गेला. त्याच्याविषयी दत्तूला संताप, सहानुभूती वाटली - आणि थोडा हेवाही! सुख असावे तर असे अभंग, निरामय, परिस्थितीच्या लाटांपलीकडले. नाहीतर ज्याच्यामुळे काहीही बदलता येणार नाही, ते काटेरी ज्ञान हवे तरी कशाला?
मडीमन पुन्हा काहीतरी बोलत होता, सांगत होता. या खेपेला त्याने कचदिशी दत्तूच्या पोटात बोट खुपसले. तो काय सांगत आहे, हे दत्तू ऐकू लागला. मोरेचा आजारी मुलगा आज सकाळी वारला, तेरी तो मूर्ख लेकाचा संध्याकाळी क्लबला येतो, हे तो सांगत होता.
दत्तू एकदम बधिर झाला. त्याला तेथे उभे राहवेना. त्या मडीमनच्या लठ्ठ पांढऱ्या तोंडाची कुत्री मोरेवर भुंकत आहेत, त्याचे लचके तोडीत आहेत, व तो काटक्या वेचणाऱ्या म्हातारीप्रमाणे बदाम दहा शोधीत हिंडत आहे, असे त्याला वाटू लागले.तो बाहेर आला. नुकतेच अवखळ हुंदडणाऱ्या वाऱ्याला आता शीतल, कुरवाळणारी माया आली होती. त्या थंड हिरवळीवर आडवे व्हावे, गवताच्या पात्यांचा स्पर्श तळव्यांना व्हावा, वाऱ्याची झुळूक छातीला बडवावी, अशी त्याला इच्छा झाली. तो पायरीवरच थोडा वेळ गप्प गोंधळून उभा राहिला. वाऱ्याच्या तलम फडफडणाऱ्या आकृतीप्रमाणे.
... क्रमशः