शोभा डे आणि मराठी लोक.

ई सकाळ वर वाचनात आलेला लेख खाली निळ्या अक्षरामध्ये चिकटवला आहे ..
वाचून कीव आली लेखिकेची. पेशव्यांच्या पंक्ती आणि थाटमाट याबद्दल कधी लेखिकेने वाचले नसावे.
काय तर म्हणे घरी आलेल्याना मराठी लोक स्टील च्या पेल्यातून पाणी देतात. बाकी काही देतच नाहीत आणि फार फार तर केळी आणि कॉफी दिली जाते. मला तर लहानपणापासून कधीही आलेल्या पाहुण्याना केळी आणि कॉफी दिल्याचे स्मरत नाही. हे काय कॉम्बिनेशन तरी आहे का? भात आणि मासे खाउन झाल्यावर याना आता असले कॉंबिनेशन खरेच खायला दिले पाहिजे

शेवटी म्हणले आहे "महाराष्ट्रीय क्विझीन असं म्हटल्यावर जे कुत्सितपणे दात विचकून हसतात, असले काही अस्तित्वातच नाही म्हणतात, त्यांना मी सांगू इच्छिते- मराठी पदार्थ नुसते अस्तित्वातच आहेत असे नाही, तर ते फार चांगले आहेत." अरे हो.. आता हे सांगणार पुरण्पोळी आणि तुपाचे कोतुक. थोडे खाली जाउन वाचा बंगाल्यांच्या संदेशांचे काय कोतुक केले आहे, तसेच त्यांच्या चोट्या कपांचा उल्लेखही किती बेमालुम पणे कुतुकात झाकाळला आहे

असले बोलणे म्हणजे थोडक्यात असेच झाले की पहिले शक्यतो लाथा घालून झाल्याच आहेत तर आता अम्मळ मलम लावूनच जावे.. कसे? कुणीही यावे आणि थोबडीत मारून जावे. महाराष्ट्र आणि त्यातले लोक काही म्हणणार नाहीत असे वाटते का काय या लोकाना? आणि या सगळ्याच्या वर येउन वरील सर्व भोजनकडे भारतीय खाणे असे म्हणून आपण कधी पाहणार आहोत काय माहित?

दुवाः दुवा क्र. १ 

चिकटवलेला लेख:
(शोभा डे)
कोण काय खातो त्याच्यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते. आपण जे अन्न खातो, त्यासारखीच आपली जडणघडण होते, यावर तर माझाही विश्वास आहे. भारतात प्रादेशिक विविधता फार. वेगेवगळे खाद्य पदार्थ वेगेवगळ्या प्रादेशिकतेचे द्योतक असतात........
पाश्चिमात्य म्हणतात - कोण काय खातो त्याच्यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते. आपण जे अन्न खातो, त्यासारखीच आपली जडणघडण होते, यावर तर माझाही विश्वास आहे. भारतात प्रादेशिक विविधता फार. वेगेवगळे खाद्य पदार्थ वेगेवगळ्या प्रादेशिकतेचे द्योतक असतात. एक छोटेसे उदाहरण देते- पंजाबी, गुजराती, गोवेकर आणि बंगाली खाण्यासाठीच जगतात. मराठी आणि दाक्षिणात्य जगण्यासाठी खातात. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाबद्दल मला फारशी माहिती नाही; पण त्यांचे तेच ते खाद्यपदार्थ पाहिले तर जगण्यातला त्यांचा रस खाण्यात नसावा असे वाटते. हवामानाचाही आहारावर परिणाम होतो, शिवाय तिथल्या मातीत जे उगवेल तेच खाण्याकडेही लोकांचा कल असतो.

संपन्न, दुधदुभत्याच्या प्रदेशात खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असते, तर अभावाच्या गरीब भागात आहे त्याच पदार्थांचा वापर करून स्वयंपाक शिजवला जातो. महाराष्ट्रीयन त्यांचे मोजके निवडक पदार्थच खातात. अगदी धनाढ्य मराठी मंडळींचा कलही मिताहारावरच असतो. मराठीपणा थोडथोडके खावे या तत्त्वावरच उभा राहिला आहे. अर्थात या मानसिकतेचा वास्तवाशी तसा फारसा संबंध नाही. कुठल्याही मराठी घरात पोहोचा- पहिल्यांदा विचारतात पाणी हवे का? देतात काय तर पाणी. पाणी हवे का? - थंड पाणी - तेही घरात रेफ्रिजरेटर आहे ते दाखवायला. नसेल तर साधे पाणी. सांपत्तिक स्थिती कशीही असली तरी स्टीलच्या ग्लासमध्ये आणून द्यायचे - तेही प्लॅस्टिक ट्रेमधून. शिवाय हे पाणी देताना "जास्त बसू नका - आणखी कशाची अपेक्षा करू नका' अशी नजर. पाहुणा फारच तयार, मुजोर असेल तर आणखी एक ग्लास द्या, असे ठासून सांगणार.

पाहुणा फारच महत्त्वाचा असला तर मग केळी आणि कॉफी असे स्टॅंडर्ड कॉंबिनेशन समोर येणार. पण तेवढेच हां. (आजची आभाळाला भिडणारी महागाई आणि साखरेच्या किमती बघितल्या तर कदाचित कॉफी-केळीही बंद झाली असावीत. ) कॉफीत वेलची, जायफळ तर नसतेच; शिवाय अर्धे पाणी-अर्धे दूध प्रकाराबरोबर दिली जाणारी केळीही वेलची नाहीत. घरी येणारा अतिथी फार फार महत्त्वाचा असेल, तर ती गृहस्वामिनी पदर बांधून घरच्या तुपावर परतलेला खमंग सांजा करणार. ही आतिथ्याची परिसीमा. गुज्जू पण असलेच. मात्र त्यांना स्वतःला खाण्यात फार फार रस असल्याने तिन्हीत्रिकाळ खाण्यात असलेल्या ढोकळा, खांडवी, गाठी किंवा त्यांची खासीयत असलेली कोल्ड कॉफी (असली कॉफी कुठेही मिळत नाही. )

बंगाली तर खात नसतानाही स्वप्ने पाहतात खाण्याचीच - सर्वाधिक प्रेम खाण्यावर. चहाच्या बरोबर संदेश हा त्यांचा आवडता प्रकार. संदेश मिळतोही वेगवेगळ्या स्वरूपांत. कोणी पाहुणा अवचितपणे आला की घरातला एखादा इसम नाक्यावरच्या मिठाई दुकानापर्यंत जाणार आणि संदेशबरोबर भलेमोठे सामोसे घेऊन येणार. या सामोशांना "सिंघाडा' का म्हणतात ते देवच जाणे.

या खाण्यावर नेहमी चहाच दिला जाणार - कॉफी नाही. छोट्या छोट्या कपातला वाफाळलेला चहा. छोटासाच कप असल्याने पाहुणा आणखी एक कप मागून घेणार. तळलेला मासाही पुढे केला जाणार - अगदी सकाळ असली तरी. बड्या पाहुण्यांची बड्या पाहुण्यांची मिष्टी दोईने (गोड दही) सरबराई. तेही त्याचा खास स्वाद तसाच राहावा म्हणून मातीच्या भांड्यात.

दाक्षिणात्यही मराठी माणसासारखेच किंवा मराठी माणसे साऊथ इंडियन्ससारखी. पाणी द्यायचे ते स्टीलच्या छोट्या ग्लासातून. घरच्या भांड्यांपासून हे ग्लास दूर ठेवायचे. (पाहुणा परजातीचा असेल तर?... ) भांडी प्रदूषित होऊ नयेत यासाठीचा आटापिटा. जात हा त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा. अनोळखी इसमांना घरात घेण्याचीही तयारी नाही. परिणाम काय, तर येणारा लगेच बाहेर पडणार. निमंत्रण जेवणाचे असेल तर मद्रासी माणसे भाताने वाढपाची सुरवात करणार आणि भातावर थांबणार.

जेवणाला पाच कोर्सेस असले तरी. रस्सम म्हणजे जाळ. लिंबू भात... हा भात, तो भात आणि शेवट म्हणून पुन्हा भात - या वेळी दही आणि लोणचे बरोबर. गोड डेझर्ट काय, तर भातच; पायस म्हणून तयार केलेला (म्हणजे आपली खीर हो! )

गोंयकर पाणी देत नाहीत - ते देतात थेट पाणी..... अगदी पहाटेपहाटेही. गोव्याच्या पदार्थांत काहीही घातले असेल... चव व्हिनेगर ओतल्यासारखी. कॅथालिक घरांमधला थाटमाट हीच गोव्याची ओळख. मला गोव्याच्या हिंदू घरातले जेवण आवडते; पण त्यातही व्हिनेगर असतेच.

"इंडियन क्विझीन' या शब्दांमुळे परदेशी पाहुणे फार गोंधळतात. त्यांना आपला प्रत्येकच पदार्थ बटरचिकनसारखा वाटतो. त्यांना माहीत असलेला तो एकमेव पदार्थ आहे बहुतेक. लुधियानात मिळणारे खरेखुरे बटरचिकन - असली मुर्ग माखनी खरे तर फार वेगळे असते.

सरसों का सागही! (करण जोहरच्या सिनेमातले नाही म्हणत मी! ) तर महाराष्ट्रीय क्विझीन असं म्हटल्यावर जे कुत्सितपणे दात विचकून हसतात, असले काही अस्तित्वातच नाही म्हणतात, त्यांना मी सांगू इच्छिते- मराठी पदार्थ नुसते अस्तित्वातच आहेत असे नाही, तर ते फार चांगले आहेत. ते फार चविष्ट आहेत आणि पौष्टिकही. जेवणाच्या ताटात आपण जे पदार्थ करतो ना, तेही असतात सर्व रसांचा स्वाद देणारे - सर्वसमावेशक. माझी आई जो साखरभात करत असे, तो तर जगात सर्वश्रेष्ठ होता.

आमसुलाची कढी - ती आठवणही भन्नाट वाटते. हे दोन्ही पदार्थ वेगळे वाटत असले तरी एकत्र खाऊन तर पाहा. पुरणीपोळी मिरचीच्या लोणच्याबरोबर खाणेही असाच भन्नाट प्रकार. त्या पुरणपोळीवर घरी कढवलेल्या तुपाची धार मात्र हवी. पृथ्वीवरचा स्वर्ग असेल तर तो हाच. उद्या कुणी मराठी जेवणाला नावे ठेवलीच, तर त्याला दादरच्या शिवाजी पार्कवर घेऊन जा. तिथल्या जिप्सी कॉर्नरमध्ये मिळणारी भरलेली वांगी खाऊन बघा आणि मगच मराठी जेवणाला नावे ठेवा.

- शोभा डे