मराठी भाषेसंबंधी शासनाचे (युनिकोड) धोरण

महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी मराठी भाषेविषयी एक निर्णय जारी केला होता.
http://tinyurl.com/y8pzet3

त्यावर उपक्रम या संकेतस्थळावर काही चर्चा झाली होती.
http://mr.upakram.org/node/2207

१३ – १४ वर्षांपूर्वी संगणक बऱ्यापैकी रूढ झाले असले तरी युनिकोडचा तितकासा स्वीकार झालेला नव्हता. त्यामुळे या शासन निर्णयाची पुन्हा एकदा चर्चा करण्याची गरज मला वाटत आहे. युनिकोडला सामावून घेण्यासाठी ३ सुधारणा सुचवीत आहे. मी काही यातला तज्ज्ञ नाही. त्यामुळे लोकांचे ऐकून मी माझ्या सूचना सुधारू शकेन. पण सध्यातरी हे माझे "ड्राफ्ट" मागणीपत्र आहे!

१) “श” आणि "ल” चे लेखन
२) जोडाक्षरांसाठी उभ्या मांडणीऐवजी आडव्या मांडणीचा वापर
३) नियम १.२ बाद करणे

१) श चे लेखन देठयुक्त करावे. गाठयुक्त करू नये. ल चे लेखन दंडयुक्त करू नये.
“श” आणि "ल” चे लेखन हा विषय प्रतिष्ठेचा करण्यात काही अर्थ नाही. सरकारला अपेक्षित असलेले टंक फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. नेमक्या कोणत्या टंकात ही अक्षरे बरोबर दिसतात असे विचारले तर आजही फार कमी लोकांना अशा टंकांची नावे सांगता येतील आणि ती देखील एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच असतील. हा फॉण्टशी संबंधित विषय असून याचा आग्रह धरला तर फॉण्टचा चॉईस कमी होईल आणि डी. टी. पी. वगैरेची कामे कठीण होतील. 

२) जोडाक्षरांसाठी उभ्या मांडणीऐवजी आडव्या मांडणीचा वापरः

A) श नंतर व, च, ल किंवा न आल्यास त्याचे दोन प्रकारे लेखन होते.
उभी मांडणीः अश्व, आश्चर्य, विश्लेषण, प्रश्न
आडवी मांडणीः अश्‍व, आश्‍चर्य, विश्‍लेषण, प्रश्‍न

सरकारी नियमाप्रमाणे दोन्ही शब्द सारखे असले तरी युनिकोडच्या नियमाप्रमाणे ते शब्द वेगवेगळे आहेत. श हे अक्षर इतर अक्षरांशी जोडताना जसे त्याचा दंड काढून जोडला जातो (उदा. आवश्यक) तसे वर दिलेले चार शब्द लिहायला हवेत तरच नियमात समानता राहील. ही सोय आपल्या पूर्वजांनी जागा वाचविण्यासाठी केली होती त्याचा आग्रह धरू नये. उभी मांडणी दिसायला सुबक दिसते असे वाटले तरी तो सवयीचा भाग असू शकतो. युनिकोडला मराठी लिहा/ वाचायला सुलभ करण्यासाठी श ची उभी मांडणी रद्द करणे आवश्यक आहे. 

B) रक्‍त चे जोडाक्षरलेखन विकल्पाने रक्त असे करण्यास हरकत नाही.
आहे, आक्षेप आहे. फक्त युनिकोडला समजायला कठीण म्हणून नव्हे तर उभ्या पद्धतीने क्त चे जोडाक्षर लेखन करताना सरकारने घालून दिलेल्या नियमाचे देखील उल्लंघन होत आहे. नियम असा आहे की "उच्चारात ज्या क्रमाने व्यंजने असतील त्या क्रमाने जोडाक्षराचे लेखन व्हायला पाहिजे.” या नियमानुसार क आधी आला पाहिजे आणि मग त - तेव्हा क्‍त हे जोडाक्षर स्वीकारायला पाहिजे. उभ्या पद्धतीचा क्त बाद करावा लागेल. त्याच न्यायाने पुढे दिलेल्या नियमात देखील बदल करावा लागेल. म्हणजेच “चक्र चे जोडाक्षरलेखन विकल्पाने चक्र असे करण्यास हरकत नाही.” हा विकल्प काढून टाकावा लागेल. चक्र हा शब्द असाच लिहायचा आहे - त्यात काहीही विकल्प नाही. 

C) छ हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास त्यातील दंड काढून टाकू नये.
ठीक आहे. पण सरकारने दाखविल्याप्रमाणे उच्छ्वास असे उभ्या मांडणीत न लिहिता उच्छ्‌वास असे पाय मोडके पण आडव्या मांडणीत लिहावे असे माझे मत आहे. या मतामागील कारण मीमांसा पुढे येणार आहे.

D) जेव्हा दोन विभिन्न पदांच्या संयोगातून 'द’ चे जोडाक्षर तयार होते तेव्हा, ते 'द’ चा पाय मोडूनही लिहिण्याचा विकल्प आहे. उदा. उद्गार / उद्‍गार, भगवद्गीता / भगवद्‍गीता उद्घाटन / उद्‍घाटन

यात जो विकल्प दिला आहे त्याचा स्वीकार करून मूळ शब्द लिहिणे थांबवावे लागेल. 

क्ष आणि ज्ञ ही दोन उभ्या मांडणीतील जोडाक्षरे आहेत तशी उभ्या मांडणीत इतरही काही जोडाक्षरे आहेत. त्यांची यादी खाली दिली आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व जोडाक्षरे आडव्या मांडणीत लिहायची आहेत. 

द्य विद्या
द्द मुद्दा
द्ध उद्धव
द्व द्वेष
ट्य कोट्यवधी
ठ्य साठ्यात
ड्य साड्या
ढ्य वेढ्यामध्ये
ह्य बाह्य
ह्म ब्राह्मण

जोडाक्षरात "र” शेवटी येत असेल तर त्याचे वेगळ्या प्रकारे लेखन होते. उदा. प्रकार, द्रव आणि राष्ट्र आता हे शब्द आडव्या मांडणीत प्‍रकार, द्‍रव आणि राष्ट्‍र असे लिहा असे कोणीच म्हणणार नाही. त्यामुळे "र” शी संबंधित सर्व शब्द उभ्या मांडणीत असतील हे स्पष्टच आहे.
वर दिलेली अक्षरे सोडून इतर कोणतेही जोडाक्षर उभ्या मांडणीत लिहू नये. या १० शब्दात 'द' शी संबंधित पहिले चार, 'य' शी संबंधित पाच तर शेवटचे एक जोडाक्षर 'म' शी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर "लग्न रत्नागिरी किल्ला” हे उभे शब्द "लग्‍न रत्‍नागिरी किल्‍ला" असे आडवे लिहावे लागतील. सुरवातीला सवयीमुळे थोडा त्रास होईल पण पुढे सर्वांना शिकायला / शिकवायला आणि वाचायला सोपे जाईलच त्या बरोबर युनिकोड देखील संतुष्ट होईल!

१९६२ सालापासूनचे शुद्धलेखनाचे जे नियम आहेत त्याबद्दल आमच्यासारख्या युनिकोडवाल्यांची काही तक्रार नाही. फक्त एक नियम (१.२) सोडून.

३) नियम १.२ बाद करणे

तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे. उदाहरणार्थ : पंकज=पङ्कज, पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज.

युनिकोडच्या दृष्टीने पंडित आणि पण्डित हे दोन शब्द समान नाहीत. त्यात जमीन आणि आसमान इतका फरक आहे. पर – सवर्ण सोय बंद केली तरच युनिकोड नियमांशी सहमत होईल.