आपण आणि सैन्यदळ

मनोगतावर सुरु असणाऱ्या एका चर्चेतून मला काही समज/ गैरसमज दिसून आले. (माझेही असण्याची शक्यता आहे) एक गंभीर चर्चा सुरु करायची आहे. मनोगतींकडून प्रतिसाद आवश्यक.


आमचे एक स्नेही सैन्यात ले. कर्नल आहेत. बेळगावला त्यांनी कमाण्डोचे प्रशिक्षण घेऊन ते पायदळात खूप लहान वयांत या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या आणि इतरांच्या शौर्याबद्दल मनात किंतु नाही. परंतु त्यांच्या घरातली परिस्थिती अशी की त्यांची आई गेले काही महिने कॅन्सरने आजारी आहे. वडील लहानपणीच वारलेले. सुविद्य पत्नी मोठ्या पदाची नोकरी सोडू इच्छीत नाही. यांत तिचा स्वार्थ म्हणता येणार नाही,  एकंदर परिस्थिती पहाता सैनिकांच्या बायकांनी नोकरी जरूर करावी. त्यांची बदली आसामच्या दुर्गम भागांत आहे. दोन बाजूंनी ब्रह्मपुत्रेचा नद वाहातो. बांग्लादेश घुसखोर आणि आसामातले दहशतवादी यांचा सामना करावा लागतो. सुट्टी नाही, कुटुंब बरोबर ठेवू शकत नाही. एकदम या वयांत नोकरी सोडायची म्हंटल तर दुसरं काय करायच हा प्रश्न आहेच.


त्यांच्या गोष्टीवरुन; मग काय सैन्यात आहेत ना, लग्न कशाला करायच? सैनिकाला आई वडील नसतात. इतकी असहायता असेल तर सैन्यात भरती तरी का व्हावं असं विचारणारे आणि सल्ला देणारे बरेच भेटले.


असो. ही सत्यस्थिती केवळ कथा म्हणून घ्यावी यावर चर्चा अपेक्षित नाही.


-----


वातानुकूलित कचेरीत बसून आणि ढमाढम पगार घेऊन आपल्याला सीमेवर लढणारे आपले सैनिक "केवळ" शूर दिसतात (ते शूरच असतात... माझं दुमत नाही), शिवरायांच्या सैनिकांच्या ठायी दिसतात. आपण मुक्त कंठाने त्यांची स्तुती करतो. जिथे तिथे त्यांची वारेमाप उदाहरणे देतो.  पण कधी त्यांची कुतरओढ, असहायता दिसते का?


मला खरचं हे जाणून घ्यायचं आहे की --



  • सुमारे ५५०० मनोगतींपैकी या पीढीतील किती जणांचे जवळचे नातेवाईक सैन्यात भरती आहेत?

  • किती जण आपल्या मुलांना सैन्यात पाठवण्यास उत्सुक आहेत?

  • आपल्या माहितीतील एखादा सैन्यात भरती झाला असल्यास त्याने तसं का केलं?

सुरूवात स्वतःने करते. एका जवळच्या नातेवाईकाला सैन्यात भरती होण्याची फार इच्छा होती, पण आई वडीलांनी प्रयत्न हाणून पाडले. या पीढीत माझ्या घरातले कोणीही सैन्यात नाही.


----


ही चर्चा टीकेच्या उद्देशाने सुरु केलेली नाही. सकस चर्चा व्हावी ही अपेक्षा.


प्रियाली