वाढवू तूर्तास कविते शून्य मी अन शून्य तू
व्यर्थ सारा त्रास कविते, शून्य मी अन शून्य तू
आकड्याची योग्य बाजू लाभण्याचे.... राहिले!
डावरे सायास कविते, शून्य मी अन शून्य तू
सर्वव्यापी वर्तुळाचे पितळ उघडे पाडतो
कल्पनेचा व्यास कविते, शून्य मी अन शून्य तू
व्यर्थ मैदानात ठरली छंद, माधुर्ये तुझी
व्यर्थ सारे प्रास कविते, शून्य मी अन शून्य तू
छेदण्या जाता नभाला कोसळावे लाखदा
वास्तवांचे दास कविते, शून्य मी अन शून्य तू
साहुनी दुनिया दुपारी, गुंफते ओळी निशा
पौरुषाचा ऱ्हास ...कविते, शून्य मी अन शून्य तू
लाजणे, स्वीकारणे अन निर्विरोधी गुंतणे
मिथ्य प्रणयाभास कविते, शून्य मी अन शून्य तू
देह जळताना कवीचा भाजते कोठे तुला?
देत अग्नी हास कविते, शून्य मी अन शून्य तू
पाय टाकावा तिथे बेडी निखाऱ्यांची निघे
चांदण्याचा ध्यास कविते? शून्य मी अन शून्य तू
अक्षरांची माळ तू, श्वासींधनी सीमेत मी
सर्वथा उल्हास कविते, शून्य मी अन शून्य तू
का सुचावे मी तुला, का सुचत ठेवावे तुला?
मागतो सन्यास कविते, शून्य मी अन शून्य तू