झाक

प्रदीप कुलकर्णी

बाळगावा स्वतःचा किती धाक मी?
आज मारीन म्हणतो मला हाक मी!

शब्द गेलेत माझ्याच वळणावरी...
दोष द्यावा न अर्थांस हकनाक मी!

ये, गळाभेट होऊन जाऊच दे...
व्यर्थ केली तुझी खूप दमछाक मी!

तू कितीही बरस पावसाळी नभा...
हा जसाच्या तसा कोरडाठाक मी!

शब्द गेले अखेरीस वाया तुझे...
मारली मौन पाळून चपराक मी!

आज नाही तिथे बाग ती आपली...
पाहिला मोडका-तोडका बाक मी!

आज पाहूच आगीत पाणी किती!
आज होणार नाही मुळी खाक मी!

मी विचारात आहे उतारावरी...
थांबवावे मनाचे कसे चाक मी!

आज माझ्याच डोळ्यांत, ऐन्यापुढे...
शोधतो ओळखीची जुनी झाक मी !