का आज सारखी तुझी आठवण येते?

प्रदीप कुलकर्णी

का आज सारखी तुझी आठवण येते?
पुन्हा पुन्हा येते, पळ पळ, क्षण क्षण येते!

तुज ओझरते भेटून परत जाताना...
का असे मनाला रितेरितेपण येते?

लाभतो कुणाला कायम शांत विसावा...
वाट्यास कुणाच्या सदैव वणवण येते!

येताना माझी मुकी न येते कविता...
नादाचे पायी लेउन पैंजण येते!

ज्या क्षणी तुला मी इथे आठवत असतो...
तुज त्याच क्षणी का सय माझी पण येते?

मी रोज ठरवतो तुझ्या घरी येण्याचे...
आडवे मला पण रोजच अंगण येते!

बोलून टाकतो मनातले मी सारे...
पण आधी त्याच्या उगाच दडपण येते!

मी लिहून जातो मनासारखे जेव्हा...
मग मनास धुंदी किती विलक्षण येते!