मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
जिप्सींचे गाणे
अनुवादकर्त्रीचे मनोगत :
जीन वेब्स्टर नावाच्या लेखिकेच्या १९११ साली म्हणजे शंभर वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ’जस्ट पॅटी’ या पुस्तकातली ही एक कथा आहे. पॅटी ही वेब्स्टरबाईंची मानसकन्या आहे. हजरजबाबी आणि कुठल्याही प्रसंगाला हसतमुखाने सामोरी जाणारी ही चुणचुणीत धिटुकली वाचकांना भुरळ घातल्याशिवाय राहात नाही. कॉन्व्हेंट शाळेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेणारी पॅटी पुढे कॉलेजमध्ये जाऊनही बरीच मजामजा करते. ही कथा वाचकांना रंजक वाटेल अशी आशा आहे.
![]() |
जिप्सी मुलींचे एक छायाचित्र* |
"टाचा जुळवून घ्या. कमरेत वाकू नका. एक दो तीन चार... मॅक्कलो, खांदे सरळ ठेव. पोट आत ओढून घे. ताठ उभी राहा. किती वेळा तेच तेच सांगायचं तुला? हं. आता ठीक आहे. चला सगळ्या पहिल्यापासून पुन्हा एकदा सुरू करा. एक दो तीन चार..."
पी.टी. अत्यंत कंटाळवाणी होती. पण ती तशीच सुरू राहिली. आठवड्याभरात वेगवेगळ्या कारणांसाठी शिक्षा झालेल्या वीस मुली आपापल्या चुकांची भरपाई म्हणून पी.टी. करत होत्या. खरं तर शनिवार दुपार ही काय पी.टी. करायची वेळ असते का? वीसही जणींचं लक्ष मिस जेलिंग्जच्या मागे लावलेल्या दोर्या, रिंग्ज आणि डबल बार्सच्याही पलीकडे असलेल्या गर्द झाडीकडे आणि नितळ निळ्या आकाशाकडे गेलं आणि वीसही जणींना त्या क्षणी तरी आपल्या वागण्यात चूक झाली असं मनापासून वाटून गेलं.
स्वतः मिस जेलिंग्ज सुद्धा आज जराशी घुश्श्यातच होती. बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तशा तिच्या तोंडून सूचना सुटत होत्या . चाळीस मुद्गलांचे व्यायाम अगदी तिच्या इशाऱ्याबरहुकूम चालले होते. पी.टी.चा पोषाख चढवून ताठपणे उभी असलेली मिस जेलिंग्ज आधीच अंगकाठीने बारीक होती. त्यात उन्हात उभी राहिल्यामुळे तिचे गाल लालबुंद झाले होते. त्यामुळे ती समोरच्या विद्यार्थिनींपैकीच एक वाटत होती. पण लहान दिसत असली तरी तिच्या चेहर्यावर निग्रह झळकत होता. लॅटिनच्या शिक्षिका मिस लॉर्ड यांच्यापेक्षाही तिची शिस्त जास्त करडी होती.
"एक.. दो .. तीन.. चार...”
“पॅटी वॅट! समोर बघ, काही गरज नाही घड्याळ बघायची. मला वाटेल तेव्हाच मी तुम्हाला सोडणार आहे. कदमताल एक दो तीन चार... "
शेवटी मुलींचा अगदी अंत पाहिल्यावर एकदाची पी.टी. संपल्याची घोषणा झाली.
" सावधान. एका रांगेत उभ्या राहा. मुद्गले जागेवर ठेवा. पळा! "
मुलींनी अगदी सुटकेचा निःश्वास टाकला आणि त्या आपापल्या खोल्यांकडे पळाल्या.
पॅराडाईझ ऍलीमधल्या आपल्या खोलीत शिरता शिरता पॅटी म्हणाली, "हुश्श ! आता फक्त एकच आठवडा राहिलाय पी.टी. करायचा. "
"मग पी.टी.ला कायमचा रामराम! हुर्रे !!" आपला हात हवेत नाचवत कॉनी म्हणाली.
"जेली कसली दुष्ट आहे ना! " पॅटी हे वाक्य अशा थाटात म्हणाली की कोणीही याला तात्काळ संमती दिलीच पाहिजे. काही वेळापूर्वी मिळालेल्या तंबीमुळे ती अजूनही धुमसत होती. "जेली इतकी वाईट वागायची नाही. सध्या तिच्या डोक्यात काहीतरी खूळ शिरलंय."
"हल्ली ती जरा जास्तच कडक झाल्ये खरी. पण तरीही मला ती दुष्ट वगैरे नाही हं वाटत. ती कसली भारी आहे! नेहमी उत्साहाने सळसळत असते. " प्रिसिला म्हणाली.
"जेलीला ना कोणीतरी सरळ करायला हवं. तिला वठणीवर आणणारा माणूस तिला भेटायला हवा. " पॅटीचा राग अजूनही शांत झालेला नव्हता.
"तुम्ही दोघी जणी लवकर आवरा बरं का. अर्धाच तास शिल्लक आहे अजून. त्यानंतर मार्टिन बाहेर पडेल गाडी घेऊन. " प्रिसिलानी त्यांना आठवण करून दिली.
"मी तयार झालेच... " पॅटी म्हणाली आणि तिने एक काळा थर आपल्या चेहर्यावर लावायला सुरुवात केली.
दर वर्षी मे महिन्यामध्ये सेंट उर्सुला शाळेतर्फे एक वेशभूषा स्पर्धा घेतली जात असे. मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ही स्पर्धा असे. कालच ही स्पर्धा पार पडली होती आणि आज दुपारी शाळेतल्या सगळ्या मुली पुन्हा एकदा कालचे पोषाख चढवून गावात फोटो काढायला जायच्या होत्या. ज्या मुलींच्या वेषभूषा वेळखाऊ आणि विचित्र होत्या, त्यांनी शाळेतच सगळी तयारी करून मग चारी बाजूंनी बंद असलेल्या घोडागाडीतून गावात जायचं होतं. ज्यांच्या वेषभूषा साध्या सोप्या होत्या त्या मुली शाळेच्या उघड्या गाडीतून पुढे जाणार होत्या आणि फोटो स्टुडिओमध्येच तयार होणार होत्या.
पॅटी आणि कॉनी दोघी शाळेतच आवरून तयार होणार होत्या कारण त्यांचा मेक-अप हे भलतंच नाजूक प्रकरण होतं. दोघींनी जिप्सी मुलींची सोंगं काढली होती. एखाद्या नाटकातल्यासारखी झुळझुळीत कपडे घालून नव्हे तर खरीखुरी. मळलेले, फाटलेले आणि ठिगळं लावलेले कपडे घालून. (आपले कपडे मळवण्यासाठी त्या दोघी आठवडाभर फॅन्सी ड्रेसच्याच कपड्यांमध्ये आपल्या खोलीचा केर काढत होत्या आणि धूळ पुसत होत्या. ) पॅटीने एका पायात तपकिरी स्टॉकिंग घातला होता तर दुसऱ्या पायात पांढरा स्टॉकिंग चढवला होता. त्यात उजव्या पायातल्या स्टॉकिंगला घोट्याच्या वर एक मोठं भोक पडलेलं होतं. कॉनीच्या एका बुटाच्या फाटक्या चवड्यातून तिच्या पायाची बोटं बाहेर आली होती आणि दुसर्या बुटाची टाच गायब असल्यामुळे तो फटाक फटाक वाजत होता. दोघींचे केस भरपूर विस्कटले होते आणि चेहर्यावर थापलेल्या काळ्या रोगणाला चिरा गेल्या होत्या. दोघीही अगदी खऱ्या जिप्सींसारख्याच दिसत होत्या.
दोघींनी घाईघाईने आपापले पोषाख चढवले. कॉनीने हातात एक खंजिरी घेतली होती. पॅटीच्या हातात एक जुनाट पत्त्यांचा कॅट होता. आपल्या खोलीच्या मागच्या दारातून पत्र्याच्या छपराखालून त्या खालच्या हॉलमध्ये आल्या. तिथे त्यांची गाठ मिस जेलिंग्जशी पडली. तिने मलमलीचा झुळझुळीत झगा घातला होता आणि तिची चर्या प्रसन्न दिसत होती. घड्याळ बघू दिलं नाही याबद्दल असलेला ’जेली’वरचा आपला राग पॅटी एव्हाना विसरून गेली होती. ती फार काळ अशा गोष्टींचा विचार करत बसत नसे.
"बाय, माज्या हातावं चार पैकं टाका. तुमचं भोविष्य सांगतू... "
पॅटीने पी.टी.च्या बाईंपुढे आपला गुलाबी परकर नाचवला आणि आपला काळा काळा झालेला , मळलेला हात पुढे केला.
"अगदी झ्याक भौष्य सांगतू बगा. येक देकना तरून किनई.... ",कॉनी खंजिरी वाजवत वाजवत म्हणाली.
"कार्ट्यांनो, काय अवतार करून ठेवलायत हा... आणि हे तोंडाला काय लावलंय? ", त्यांच्या खांद्याला धरून दोघींनाही गोल फिरवत मिस जेलिंग्ज म्हणाली.
"कोरी कॉफी.... "
मिस जेलिंग्ज जोरजोरात हसायला लागली.
"तुम्ही दोघींनी शाळेचं नाकच कापून टाकलंयत, आता जर तुम्ही एखाद्या पोलिसाच्या हातात सापडलात ना तर घुसखोर म्हणून पकडून नेईल तुम्हाला तो. ", ती म्हणाली.
" ए पॅटी, कॉनी... लवकर या. गाडी निघाली आहे... ", आपल्या हातातलं पातेलं जोरजोराने हलवत प्रिसिलाने त्यांना हाक मारली. खूप उशिरापर्यंत कुठलं सोंग काढायचं हे न ठरवता आल्यामुळे प्रिसिलाने सेंट लॉरेन्सचा वेष केला होता. तिने अंगभर एक पांढरी चादर गुंडाळली होती आणि स्वयंपाकघरातलं मोठं पातेलं हातात घेतलेलं होतं.
"त्यांना थांबायला सांग. आम्ही आलोच.... ", पॅटी धावत सुटली.
"पॅटी, तुझा कोट नाही का घेतलास?", कॉनी म्हणाली.
"पळ लवकर. आपल्याला कुठे लागणारेत कोट? "
दोघीजणी घोडागाडीच्या मागून पळत सुटल्या. शाळेचा गाडीवान मार्टिन उशिरा येणाऱ्या मुलींसाठी थांबत नसे. उशिरा येणाऱ्यांनी गाडीमागून पळत जाऊन ती पकडायची असे. पॅटी आणि कॉनी धावत धावत गाडीच्या मागच्या पायरीवर चढल्या. त्याबरोबर गाडीतून पाचसहा हात बाहेर आले आणि त्या दोघींना आत ओढून घेण्यात आलं.
घोडागाडीतून निघालेला गट फोटोग्राफरकडे पोचला तेव्हा तिथल्या मेकअपच्या खोलीमध्ये एकच गोंधळ सुरू होता. बारा लोक मावतील अशा जागेमध्ये साठ शाळकरी मुलींना उभं केल्यावर हा असा अनेकरंगी गोंधळ माजायचाच ना!
"काजी आणल्येत का कोणी? "
"थोडी पावडर दे गं मला.. "
"बापरे! माझी सेफ्टीपीन कुठेय? "
"जळलेलं बुच कुठे ठेवलंस गं? "
" ए, माझे केस व्यवस्थित दिसतायत ना? "
"माझ्या पाठीवरची बटणं लावून देतेस का जरा? "
"माझा परकर दिसत नाहीये ना? "
सगळ्या एकाच वेळी बडबडत होत्या आणि कोणीच कोणाचं बोलणं ऐकत नव्हतं.
"शी!! किती उकडतंय इथे! चला आपण जरा बाहेर जाऊ या... "
सेंट लॉरेन्सने दोन्ही जिप्सी बायकांना हाताला धरून बाहेरच्या रिकाम्या सज्जात नेले. तिथे एक खिडकी होती आणि ती उघडी असल्यामुळे तिथे वाऱ्याची छानशी झुळूक येत होती. एक सुस्कारा सोडून त्या तिघी तिथल्या सहा पायऱ्या चढून गेल्या आणि खिडकीजवळ उभ्या राहिल्या.
______________________________________________________
* दोन जिप्सी मुलींचा रोमेनियातील ओराविक्झा येथील स्टुडिओमध्ये फोटोग्राफर ओल्गा ह्यांनी काढलेला फोटो https://cabinetcardgallery.wordpress.com/category/gypsies/ येथून साभार.