जिप्सींचे गाणे

अदिती

एव्हाना चौकामध्ये बरीच गर्दी जमा झाली होती. आणि ती वाढतच होती. पायी जाणाऱ्या लोकांना त्या गर्दीतून वाट काढण्यासाठी वाट वाकडी करावी लागत होती.

"आपल्याला गाडीभाड्यापुरते तरी पैसे जमा करावे लागतील आणि त्याला थोडा वेळ लागेल. " पॅटी म्हणाली. तिच्या काळा रंग फासलेल्या चेहऱ्यावर एक मिस्कील छटा उमटली होती. "तू खंजिरी वाजव आणि मी आपला खलाशांचा नाच करते."

"पॅटी तुझं डोकंबिकं फिरलंय का? आठवड्याभराने आपण ग्रॅज्युएट होऊ. त्याच्या आत आपल्याला शाळेतून काढून टाकावं अशी तुझी इच्छा आहे का? " कॉनीने आपल्या मैत्रिणीच्या डोक्यात अक्कल घुसवण्याचा प्रयत्न केला आणि पॅटीचं बखोट धरून तिला रस्त्याला फुटलेल्या फाट्याकडे न्यायला कॉनीने सुरुवात केली. जॉन ड्र्यू मर्फी आणि त्याचे मित्र थोडा वेळ त्यांच्या मागून चालत होते. पण जिप्सी बायकांचा गाण्याबजावण्याचा काही विचार नाही असं पाहून शेवटी ते सगळे निघून गेले.

त्यांच्या मागून चालत असलेली लहान मुलंही परत फिरल्यावर कॉनी म्हणाली "आता काय करायचं आपण? "

"आता आपल्याला चालत जावं लागणारसं दिसतंय."

"छे! हा असला फाटका बूट घालून मी तीन मैल चालत जाऊ शकत नाही.. " आपला फटाक फटाक वाजणारा बूट काढून दाखवत कॉनी म्हणाली.

"चांगलंय. मग काय करूया? "

"आपण फोटोग्राफरकडे जाऊन त्याच्याकडे पैसे उसने मागू या का? "

"मी हे असले भोकं पडलेले स्टॉकिंग्ज घालून मुख्य रस्त्याच्या आसपाससुद्धा फिरकणार नाहीये पुन्हा कधी."

"ठीक आहे. मलाच काहीतरी विचार केला पाहिजे. ", खांदे उडवत कॉनी म्हणाली.

“ आपण गावातल्या घोड्यांच्या तबेल्यातून एक.. "

"पण तो तबेला गावाच्या दुसऱ्या टोकाला आहे. मी तिथवर चालूच शकणार नाही. या फाटक्या टाचेमुळे प्रत्येक पाऊल टाकताना मला माझा पाय दहा दहा इंच उचलून टाकावा लागतोय, माहितेय? "

"छान. आता तुलाच काही चांगला मार्ग सुचत असेल तर बघ. " आता खांदे उडवायची पॅटीची वेळ होती.

"मला वाटतं, सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे एखादी बस पकडायची आणि कंडक्टरला विनंती करायची की पैसे नंतर आणून देतो."

"वा वा! आणि बसमधल्या सगळ्या लोकांसमोर त्याला सांगायचं की आपण सेंट उर्सुला शाळेत शिकतो? रात्र पडण्यापूर्वी ही गोष्ट सगळ्या गावभर होईल आणि मग आपल्या मोठया बाई संतापतील. "

"हं! काय करूया मग? "

त्या दोघी उभ्या होत्या तिथे समोरच एक टुमदार घर होतं. घराच्या पुढच्या सोप्यात दोन तीन लहान मुलं खेळत होती. जिप्सी बायकांना पाहून ती मुलं आपला खेळ सोडून बाहेर आली आणि त्यांच्याकडे उत्सुकतेने बघायला लागली.

"चल ना आपण जिप्सींचं गाणं म्हणू या (सध्या हे गाणं सगळ्या शाळेत दुमदुमलं होतं). तू खंजिरी वाजव आणि तुझ्या पायांनी ताल धर. माझा आवाज दहा सेंट मिळवण्याच्या लायकीचा आहे असं मला वाटतंय. कदाचित ही मुलं आपलं गाणं ऐकून आपल्याला गाडीभाड्यापुरते दहा सेंटस देतील. "

कॉनीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडे नजर टाकली. रस्ता निर्मनुष्य होता. शिवाय कोणी पोलीसही आसपास दिसत नव्हता. हताश झाल्यासारखी तिने या बेताला संमती दिली. गाणं सुरू झालं. ऐकणाऱ्या मुलांनी जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. हे पाहून दोघी खूश होतायत न होतायत तोच त्या घराचं मुख्य दार उघडून एक बाई बाहेर आली. ती लॅटिन शिकवणाऱ्या लॉर्डबाईंची बहीण होती.

"ए, काय गोंगाट चालवलाय? आधी आवाज बंद करा. घरात आजारी माणसं आहेत.... "

तिच्या आवाजात, बोलण्यातही लॅटिनचा भास होता. कॉनीला फाटके बूट घालून जितकं जोरात पळणं शक्य होतं तितक्या जोरात त्या दोघी तिथून पळत सुटल्या. त्या घरापासून तीन चार घरं पलीकडे गेल्यावर एका घराच्या बाहेर असलेल्या पायरीवर त्या जराशा टेकल्या आणि त्यांना एकदम जोरजोरात हसूच यायला लागलं.

त्या घराभोवती असलेल्या बागेत एक माणूस लॉन-मोअर घेऊन हिरवळ कापत होता. त्याने जोरात या दोघींना हटकलं आणि तिथून हुसकून लावलं. "ए शुक शुक.. चला पळा इथून!"

दोघीजणी तिथून उठल्या आणि पुढे चालू लागल्या. खरं तर त्या ज्या दिशेने निघाल्या होत्या, ती गावाची बाजू सेंट उर्सुला शाळेच्या बरोबर विरुद्ध दिशेला होती. पण काय करायचं हे त्यांना सुचत नव्हतं आणि करायला दुसरं काहीच नसल्यासारख्या त्या पुढेपुढेच चालल्या होत्या. अशा प्रकारे आणखी बरंच अंतर चालून गेल्यावर त्या दोघी गावाच्या शिवेवर येऊन पोचल्या. त्यांच्या पुढ्यातच काही छोट्या बैठ्या इमारती होत्या आणि त्यातल्या एकीची चिमणी उंच आकाशात गेली होती. तिथे गावाचा पाणी पुरवठा विभाग आणि वीज मंडळाची कचेरी होती.
कसल्या तरी आशेने पॅटीचे डोळे एकदम लकाकले.

"ए कॉनी, आपण मि. गिल्रॉयला सांगू या का आपल्याला त्याच्या गाडीतून घरी सोडायला? "

"तुझी ओळख आहे का त्याच्याशी? " कॉनीने खात्री करून घेण्याच्या सुरात विचारलं. एव्हाना तिने इतके फटके खाल्ले होते की ती ताकही फुंकून प्यायला लागली होती.

"हो. तो मला चांगलं ओळखतो. नाताळच्या सुट्टीत तो रोज आपल्या शाळेत यायचा. एक दिवस तर आम्ही एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकायचा खेळही खेळलो होतो. चल माझ्याबरोबर. तो नक्की आपल्याला घरी सोडेल. त्या निमित्ताने जेलीशी झालेलं भांडण मिटवायची आयतीच संधी पण मिळेल त्याला. "

पलीकडे 'ऑफिस' अशी पाटी लावलेली एक विटांनी बांधून काढलेली इमारत होती. त्या इमारतीकडे जाणाऱ्या वाटेवरून दोघी चालू लागल्या. ऑफिसमध्ये चार कारकून आणि एक टायपिस्ट मुलगी आपापलं काम करत होते. ऑफिसच्या दारात उभ्या राहिलेल्या दोन जिप्सी बायकांकडे पाहून ते सगळे जण आपलं काम सोडून हसायला लागले. दाराजवळ बसलेल्या कारकुनाने तर आपली खुर्ची फिरवून घेतली आणि तो या मुलींची मजा बघायला लागला.

"हॅलो! स्त्रियांनो, कुठून प्रकट झालात आपण? "

एकीकडे ती टायपिस्ट मुलगी पॅटीच्या स्टॉकिंग्जला पडलेल्या भोकांबद्दल शेरे मारत होती.

चेहऱ्यावर कॉफी थापलेली असूनही पॅटीचा चेहरा आणखीच काळवंडला.

"आम्ही मि. गिल्रॉयना भेटायला आलोत. " आबदारपणे पॅटी म्हणाली.

"मि. गिल्रॉय कामात आहेत. तुमचं काय काम आहे ते मला सांगा" कारकुनाने हसू दाबत दाबत म्हटले.

पॅटी निग्रहाने म्हणाली, "कृपा करा आणि मि. गिल्रॉयना सांगा की आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय. लवकरात लवकर !"

"जरूर. आता सांगतो बाईसाहेब. असं करता का? तुमचं व्हिजिटींग कार्ड माझ्याकडे देता का? " कारकून खोट्या नम्रपणे म्हणाला. या दोन जिप्सी मुलींची चेष्टा करताना त्याला खूपच मजा वाटत होती.

"आत्ता माझं कार्ड माझ्याकडे नाहीये. पण मि. गिल्रॉयना सांगा की दोन सभ्य स्त्रिया त्यांना भेटायला आल्या आहेत. "

"ठीक आहे बाईसाहेब, तुम्ही असं करा, इथे बसा. मी त्यांना निरोप सांगून येतो. "

त्याने आपली खुर्ची पॅटीला दिली आणि शेजारची एक खुर्ची कॉनीला दिली. मग त्याने खोट्या अदबीने कमरेत वाकून त्यांना सलामी दिली. हा सगळा प्रवेश पाहताना इतर कारकून मनसोक्त हसत होते पण दोघी जिप्सी बायका मात्र खूपच गंभीर झाल्या होत्या. त्या दोघींनी खुर्च्या दिल्याबद्दल त्या कारकुनाचे आभार मानले आणि त्या आपापल्या खुर्चीमध्ये अगदी ताठ बसल्या. त्यांचा सगळा आविर्भाव अगदी अचूक आणि सामाजिक शिष्टाचारांचं व्यवस्थित पालन करणारा होता. तो कारकुन या अजब पाहुण्यांच्या आगमनाची वर्दी आपल्या साहेबाला देऊन परत आला तोपर्यंत पॅटीच्या स्टॉकिंग्जबद्दलची चर्चा कॉनीच्या फटाक फटाक वाजणाऱ्या बुटापर्यंत आली होती. परत आल्यावर त्याने पुन्हा एकदा कमरेत झुकून जिप्सी बायकांना अभिवादन केलं आणि आपल्या मागून येण्याची त्यांना विनंती केली. त्या दोघी गिल्रॉयच्या खोलीत पोचल्या.
गिल्रॉय काहीतरी लिहीत होता. त्यातून मान वर करून बघायला त्याला थोडासा वेळ लागला. त्याला निरोप देताना कारकुनाने एका शब्दाचाही बदल केला नव्हता. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांकडे पाहून तो चकित झाला. खुर्चीत रेलून बसत त्याने दोघी बायकांना आपादमस्तक न्याहाळून घेतलं आणि विचारलं

"हं ? "

त्याच्या चेहऱ्यावर ओळख पटल्याचं एकही चिन्ह नव्हतं.

पॅटीचा असा बेत होता की आपली खरी ओळख सांगून आपल्याला सेंट उर्सुला शाळेपर्यंत नेऊन सोडण्यासाठी गिल्रॉयला विनंती करावी. पण या गोष्टीचा बोभाटा होईल अशी परिस्थिती समोर दिसत असताना ती यातलं काहीच करू शकत नव्हती. समोर आलेल्या प्रश्नांच्या भूलभुलैय्याला तोंड द्यायचं असा तिने निर्णय घेतला आणि संभाषणात अशी काही उडी घेतली की ते पाहून कॉनीला धक्काच बसला.