जिप्सींचे गाणे

अदिती

"त्ये लॉरेन्स के गिल्रॉय त्ये तुमीच म्हनायचे का? म्या तुमालाच शोदायला आलू हाय." आपल्या परकराची खालची टोकं हातात धरून तिने गिल्रॉयला दरबारी प्रणाम केला.

"ते दिसतंच आहे." गिल्रॉय खोचकपणे म्हणाला. "आता मला शोधत आलाच आहात तर बोला काय काम आहे तुमचं माझ्याकडे? "

"तुमचं भोविष्य सांगतू... " आदल्या रात्री तिने आणि कॉनीने बसून या गोष्टीचा सराव केला होता. शाळेतल्या मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी केलेल्या त्या सरावाचा चांगला वापर करत पॅटी म्हणाली, "माज्या हातावं चार पैकं टाका."

हा सगळा प्रकार कॉनीला फारसा मंजूर नव्हता पण आता वेळ पडल्यावर तिनेही यात उडी घेतली.

"अगदी झ्याक भौष्य सांगतू बगा! येक सुंदर पोरगी.. " कॉनी तिची री ओढत म्हणाली.

"वा वा !"

गिल्रॉयने पुन्हा एकदा या जिप्सी बायकांचं गंभीरपणे निरीक्षण केलं. पण या सगळ्याची त्यालाही आता गंमत वाटायला लागली आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं. "माझं नाव कसं कळलं तुम्हाला? "

खिडकीतून पलीकडची जनित्राची खोली आणि कोळशाचं कोठार दिसत होतं. त्या दोन्ही इमारतींच्या मधून क्षितिजाची रेषा दिसत होती. तिकडे बोट दाखवून पॅटी म्हणाली, "जिप्सी लोकांच्या खुना आस्तात. त्या जिप्सींना भेटतात. आबालात, बादलात. वादलात... पर तुमाला त्या नाई कळाच्या. लॉरेन्स के गिल्रॉय साब, आमी तुमाला निरोप सांगाया आलू. लई लांबून आलो बगा" आणि तिने आपल्या आणि कॉनीच्या पावलांची दुर्दशा त्याला दाखवली. "दमलो सायब. लांबून आलो आणि दमलो. "

गिल्रॉयने खिशात हात घातला आणि अर्ध्या डॉलरची दोन नाणी काढली.

"हं. हे घ्या पैसे. आणि आता मला खरं खरं सांगा. हा कुठला फसवणुकीचा नवा प्रकार आहे? आणि मुळात तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? "
त्याने दिलेले पैसे दोघींनी खिशात टाकले. पुन्हा एकदा आपल्या परकराचं खालचं टोक हातात धरून त्याला दरबारी प्रणाम केला आणि संकटात पाडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याचं टाळून मोठ्या शिताफीने बगल दिली.

"तुमचं भौष्य सांगतू हा.. " कॉनी एखाद्या विक्रेत्याच्या तत्परतेने म्हणाली. हातातला पत्त्यांचा गड्डा पिसत पिसत तिने खाली जमिनीवर बैठक मारली. मांडी घालून खाली बसल्यावर हातातले पत्ते तिने स्वतःभोवती गोलाकारात पसरले. इकडे पॅटीने आपल्या कॉफीचे डाग पडलेल्या हातांमध्ये गिल्रॉयचा तळहात धरून त्याचं निरीक्षण सुरू केलं. गिल्रॉयला एकदम संकोचायला झालं आणि त्याने आपला हात मागे ओढून घ्यायचा प्रयत्न केला. पण पॅटीची पकड एखाद्या माकडासारखी घट्ट असल्यामुळे तिने मुळीच गिल्रॉयचा हात सोडला नाही.

"मला एक तरुण मुलगी दिसती... " जास्त वेळ न घालवता पॅटी म्हणाली.

कॉनीने पसरलेल्या पत्त्यांमधून बदामाची राणी बाहेर काढली आणि तिच्याकडे बघत बघत ती म्हणाली "उंच, पिवळी क्येसं, बदामी डोले, आक्षी सुंदर... "

"पर तुमाला लई तरास देती. भांडान करती." त्याच्या हातावर आलेल्या लहानश्या फोडाकडे बघत पॅटी म्हणाली.
गिल्रॉयचे डोळे संशयाने बारीक झाले. हा सगळा फालतूपणा आहे हे माहीत असूनही तो यात ओढला जात होता.
"तुमाला ती खूप खूप आवडती. ", कॉनी म्हणाली.

"पर तुमाला ती भ्येटत नाय. येक दोन तीन चार म्हैनं जालं बगा तुमची तिची कायबी गाट भेट नाय का बोलनं चालनं नाय." त्याच्या बुचकळ्यात पडलेल्या चेहऱ्याकडे नजर टाकून त्याच्या डोळ्यात बघत पॅटी हळू आवाजात म्हणाली "तुमी रोज तिचाच इच्यार करत आस्ता."
हे ऐकल्यावर त्याने आपला हात ओढून मागे घ्यायचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. पॅटी घाईघाईने म्हणाली, "तुमच्याबिगार ती बी दुक्कात हाये. पहिल्यावानी हसत नाय का बोलत नाय."

आता मात्र गिल्रॉयचं कुतूहल फारच चाळवलं होतं. आता पुढे काय ऐकायला मिळणार हे पाहण्यासाठी तो हात मागे घेताघेता थबकला.
"ती दुक्कात हाए. तुम्च्यावं चिडली हाए. एकदा भांडान जालं तवाधरनं चार म्हैनं जालं ती तुम्ची वाट बगत बसली हाए. पर तुमी काय परत तिला भेटाया ग्येला न्हाई."

गिल्रॉय अचानक उठला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला.

त्याचे हे अनाहूत पाहुणे अगदी योग्य क्षण साधून प्रकट झाले होते. दुपारपासून जवळजवळ दोन तास तो याच गोष्टीचा विचार करत होता आणि आपल्या मोडक्यातोडक्या भाषेमध्ये या जिप्सीं बायकांनी त्याला योग्य ठिकाणी आणून ठेवलं होतं. त्याच्या मनात विचार पुन्हा सुरू झाले. काय करावं? अपमान गिळून पुन्हा तिला भेटायला जावं का? शाळेची उन्हाळी सुट्टी तोंडावर आली होती. काही दिवसातच ती आपल्या घरी गेली असती. कोणी सांगावं, कदाचित परतही आली नसती. या जगात देखण्या तरुण मुलांना काहीच तोटा नव्हता आणि मिस जेलिंग्जसाठी तर तसा तोटा असण्याचं काहीच कारण नव्हतं.

कॉनी एकाग्रतेने हातातल्या पानांकडे बघत होती.

"एक संधी भ्येटल. ती घ्येताल तर जिंकताल. सोडताल तर हरताल." कॉनी एखाद्या वाचासिद्धी मिळालेल्या ग्रीक भविष्यवेत्त्याच्या थाटात म्हणाली.

कॉनीच्या खांद्यावर वाकून तिच्या हातातली पानं बघत पॅटीने मात्रेचा आणखी एक वळसा दिला.

"ही पोरगी - लई शिष्ठ हाए. डोस्क्यात हवा ग्येलेली. आपलं तेच खरं करती. तुमालाच तिला पटवाया लागल. समज्लं का? "

गोल गुबगुबीत आणि गोबऱ्या गालांच्या चौकट गोटूकडे पाहताना कॉनीला एक भन्नाट कल्पना सुचली.

"यात एक दुस्रा मानूस पन हाए. मला दिस्तोय. लाल लाल क्येसं हायती आणि जाडाजुडा हाए चांगला. तसा देकना न्हाई पर... "

"लई डेंजर हाए बगा त्यो. आता ज्यादा टाईम नका घालवू सायब. न्हाईतर त्यो मदी घुसंल." पॅटीने कॉनीला भरघोस अनुमोदन दिले.

पॅटी आणि कॉनीला या दुसऱ्या माणसाचं वर्णन करताना चौकट गोटूची मदत झाली असली तरी त्यांच्या दृष्टीने असा कोणी माणूस त्यांच्या कल्पनेतूनच जन्माला आला होता. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी नकळत एका ठुसठुसणाऱ्या जखमेवर अचूकपणे बोट ठेवलं होतं. कारण कॉनीचं हे वर्णन शेजारच्या गावातल्या एका माणसाला अचूक लागू पडत होतं. हा माणूस मिस जेलिंग्जवर भेटवस्तूंचा वर्षाव करत असे आणि याच गोष्टीसाठी गिल्रॉयला त्याचा मनापासून तिरस्कार वाटत असे. आज दिवसभर गिल्रॉयच्या मनात चाललेले विचार, भवति न भवति असा त्याला पडलेला प्रश्न यांच्या पार्श्वभूमीवर प्रेमातल्या या प्रतिस्पर्ध्याचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. गिल्रॉयचा नशीब, दैव, त्याचे शुभाशुभ संकेत वगैरे गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. पण प्रेमात पडलेल्या माणसांना शकुनांचं वावडं नसतं म्हणतात, तसा या सगळ्यामागे नक्की काहीतरी दैवी संकेत असावा असं त्याला वाटायला लागलं.

खिडकीतून दिसणारं कोळशाचं कोठार, जनित्राची खोली आणि आजूबाजूला असलेल्या ऑफिसमधल्या परिचित गोष्टींकडे पाहून त्याने आपण स्वप्नात नाही याबद्दल स्वतःचीच खात्री पटवून दिली. मग आकाशातून पडल्यासारख्या दिसणाऱ्या आपल्या या अजब पाहुण्यांकडे तो बघायला लागला. त्याच्या मुद्रेवर उत्सुकता, अविश्वास आणि अस्वस्थपणा यांचं मिश्रण दिसत होतं.

पॅटी आणि कॉनी एकाग्रतेने हातातल्या पानांकडे बघत होत्या. आपल्या कल्पनेतून त्या जे चित्र रंगवत होत्या त्यामध्ये आणखी कोणते रंग भरावेत याबद्दल त्यांची विचारचक्रं वेगाने फिरत होती. पॅटीला वाटलं की पन्नास सेंटसमध्ये जेवढं भविष्य सांगण्यासारखं होतं तेवढं त्यांनी आधीच सांगितलं होतं. आता हा गोंधळ आवरता कसा घ्यावा आणि बिनबोभाट इथून बाहेर कसं पडावं याबद्दल ती विचार करत होती. तिच्या लक्षात आलं होतं की त्या दोघींचं नाटक इतकं पुढे गेलं होतं की गिल्रॉयला आपली खरी नावं सांगून शाळेपर्यंत नेऊन सोडण्याची विनंती करायला आता फार उशीर झाला होता. आता हे नाटक असंच चालू ठेवून झाल्या प्रवेशाला साजेसा काहीतरी शेवट करावा आणि गुपचूप इथून बाहेर पडावं हेच उत्तम झालं असतं. शिवाय आता घरी जायला त्यांच्याकडे अख्खा एक डॉलरही होता.

"तुम्चं नशीब चांगल हाए सायब. जर... "

बोलता बोलता तिचं लक्ष खिडकीतून बाहेर गेलं आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. शाळेच्या मुख्याध्यापिका ट्रेंटबाई आणि त्यांची मुलगी सारा या दोघीजणी गाडीतून खाली उतरत होत्या. त्या दोघी शाळेत नव्यानेच बसवलेल्या विजेच्या दिव्यांबद्दल तक्रार दाखल करायला आल्या होत्या.

पॅटीने कॉनीचा खांदा जोरात दाबला.

"सॅली आणि मोठ्या बाई आल्या आहेत. माझ्या मागून ये." ती कॉनीच्या कानात पुटपुटली.

एका क्षणात पॅटीने सगळे पत्ते हातात उचलून घेतले. मोठ्या बाईंचा आवाज बाहेरच्या खोलीतून येत होता त्या अर्थी दारातून पळून जायचा मार्ग बंद झालेला होता.

"जातो सायब. जिप्सींची हाळी आली." खिडकीतून बाहेर उडी मारता मारता पॅटी म्हणाली.

आठ फूट उंचावरच्या खिडकीतून उडी मारून पॅटी थेट जमिनीवर उभी राहिली. कॉनीही तिच्या मागोमाग खाली आली. या दोघी 'जेली'च्या तिला शोभणाऱ्या विद्यार्थिनी होत्या ते काही उगाच नाही!

त्या दोघींच्या या पलायनाकडे लॉरेन्स के. गिल्रॉय आ वासून बघतच राहिला. पुढच्याच मिनिटाला सेंट उर्सुला शाळेच्या मुख्याध्यापिका त्याच्या ऑफिसात शिरल्या. गिल्रॉयने अदबीने त्यांना प्रणाम केला. शाळेच्या इमारतीच्या पश्चिमेकडच्या बाजूला शॉर्ट सर्किट का झालं या विषयावर लक्ष केंद्रित करायला त्याला बरेच प्रयास पडले.

शाळेच्या कोपऱ्यावर पॅटी आणि कॉनी बसमधून खाली उतरल्या. सगळी बस त्यांच्याकडे अचंबित होऊन बघत होती. शाळेच्या भिंतीला गोल वळसा घालून घोड्यांच्या तबेल्याच्या बाजूने त्या गुपचूप आत शिरल्या. पॅरेडाइझ ऍलीपर्यंत जाताना त्यांना शाळेच्या स्वयंपाकीण बाई सोडता कोणी पाहिलं नाही. (स्वयंपाकीण बाईंनी आलं घालून केलेला ताजा ब्रेड त्यांना खाऊ घातला. ) झाल्या प्रकाराचा गाजावाजा न होऊ देता त्या अल्लादपणे आपल्या खोलीत पोचल्या तेव्हा या प्रकरणातून झालेली कमाई - नव्वद सेंटस त्यांच्या खिशामध्ये खुळखुळत होते!
---------------------------------------------------