जिप्सींचे गाणे

अदिती

"जेलीला काय झालंय हे मला माहित्ये...." पॅटी त्यांचा मागचा विषय पुढे सुरू करत म्हणाली.

"काय झालंय?" "काय झालंय?" दोघीजणी उत्सुकतेने म्हणाल्या.

"आपल्या वीज मंडळाच्या कचेरीत काम करणारा तो लॉरेन्स गिल्रॉय आहे ना, त्याच्याशी जेलीचं भांडण झालंय. पूर्वी नाही का ते दोघे तासनतास गप्पा मारायचे. अलीकडच्या काही दिवसात तो एकदम गायब झालाय. आपल्याला नाताळची सुट्टी होती ना तेव्हा तर तो अगदी रोज नियमाने यायचा. ते दोघं दोघंच फिरायला जायचे. ते दोघंच फिरायला जायचे याबद्दल आपल्या मोठ्या बाईंनी एरवी किती आरडाओरडा केला असता. पण त्या काहीच बोलल्या नाहीत माहित्ये? आणि मिस जेलिंग्ज त्याच्याशी किती लाडे लाडे वागायची हे तर तुम्ही बघायलाच हवं होतं. सगळा बावळटपणा नुसता. आयरीन मॅक्कलोच्या एवढ्याशा चुकीकडे तिचं कमी लक्ष असेल इतकं लक्ष देऊन ती त्याच्याशी वागायची. "

"पण त्याचं काही चुकलं तर त्याला पी.टी. करावी लागत नसेल. तो हे सगळं कसं काय सहन करतो?" कॉनीचा भाबडा प्रश्न.

"कुठे सहन करतोय..."

"तुला कसं गं माहीत?"

"त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. म्हणजे मी काही मुद्दाम ऐकलं नाही. त्याचं काय झालं, नाताळच्या सुट्टीत एक दिवस मी ग्रंथालयामध्ये बसून ’द मर्डर्स इन द रु मॉर्ग’ हे पुस्तक वाचत होते. तेव्हाच मिस जेलिंग्ज आणि मिस्टर गिल्रॉय तिथे आले. त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही आणि सुरुवातीला मीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मी पुस्तक वाचण्यात इतकी गुंग झाले होते की बास. मी अशा ठिकाणी पोचले होते, जिथे तो गुप्तहेर म्हणतो ना की इथे तर एका माणसाच्या बोटांचा स्पष्ट ठसा उमटला आहे ... पण तेवढ्यात जेली आणि गिल्रॉय यांची जोरजोरात वादावादी सुरू झाली आणि त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. मी काहीच करू शकत नव्हते आणि त्यानंतर मी तिथून बाहेर पडले असते तर मला खूपच शरमल्यासारखं झालं असतं... "

"काय बोलणं झालं त्यांच्यात? " पॅटीच्या कबुलीजबाबांकडे दुर्लक्ष करत कॉनी म्हणाली.

"मला सगळं काही कळलं नाही, पण गिल्रॉय तिला काहीतरी समजावून सांगायचा प्रयत्न करत होता आणि मिस जेलिंग्ज त्याचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. ती आपल्याला कशी सांगते - मला सगळं माहित्ये. उगाच कारणं देत बसू नका. मी तुम्हाला दहा काळे गुण दिलेले आहेत आणि रविवारी दुपारी जादा कवायत करून तुम्हाला ते भरून काढायचे आहेत.- तशीच ती त्याच्याशी वागत होती. ते दोघं बराच वेळ भांडत होते. दहा पंधरा मिनिटांनंतर दोघांचाही पारा खूप चढला. मग गिल्रॉय त्याची हॅट घालून निघून गेला. आणि माझी अशी खात्री आहे की त्या दिवसानंतर तो कधीच परत आला नाही. निदान मी तरी त्याला परत कधी शाळेत आलेलं पाहिलेलं नाही. आणि आता मिस जेलिंग्जला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतोय आणि म्हणून ती सगळ्यांशी अशी पिसाळलेल्या अस्वलासारखी वागते आहे."

"पण मनात आणलं तर ती किती चांगली वागू शकते... ", प्रिसिला म्हणाली.

"वागू शकते. पण ती खूप घमेंडखोर आहे. मला कधीकधी वाटतं गिल्रॉयने एकदा येऊन तिला चांगलं सरळ करावं आणि तिची जागा दाखवावी.", पॅटी म्हणाली.

एव्हाना फोटो काढायला सुरुवात झालेली होती त्यामुळे या तिघी जणींची ही गंभीर चर्चा तिथेच थांबली. सुरुवातीला शाळेतल्या सर्व मुलींचा एक ग्रूप फोटो काढण्यात आला. मुलींचे छोटे छोटे ग्रूप्स आपले फोटो काढून घ्यायला कॅमेऱ्यासमोर उभे राहायला लागले. ज्या मुली फोटोमध्ये येणार नव्हत्या, त्या कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला उभ्या राहून इतरांना हसवण्याचं काम करत होत्या.

"मुलींनो, तुम्ही दोन मिनिटं जरा शांत राहाल का? माझ्या तीन प्लेटस वाया गेल्या आहेत. आणि हो. फोटोसाठी उभ्या असलेल्या संन्याशाने आपलं खिदळणं बंद करावं... ", फोटोग्राफर वैतागून म्हणाला. "कृपा करून सगळ्यांनी आपापल्या जागेवर स्थिर उभं राहावं आणि कॅमेऱ्याच्या पीप-होलकडे बघावं. मी तीन आकडे मोजून फोटो घेणार आहे. एक दोन तीन... "

नुकत्याच घेतलेल्या फोटोची प्लेट घेऊन फोटोग्राफर डार्क रूमकडे पळाला.

आता पॅटी आणि कॉनी असा दोघींचाच फोटो घ्यायचा होता. पण सेंट उर्सुला आणि तिच्या अकरा हजार कुमारी झालेल्या मुलींनी मध्ये घुसून गोंधळ करायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं होतं की आमची संख्या जास्त आहे त्यामुळे आमचा फोटो आधी काढला पाहिजे. त्यांचा गोंधळ पाहून दोघी जिप्सी बायका निमूटपणे बाजूला उभ्या राहिल्या.

कॅरन हर्से ही सेंट उर्सुला झाली होती तर अकरा लहान मुली मिळून तिच्या अकरा हजार कुमारी झाल्या होत्या. त्या सगळ्यांचा एकत्र फोटो घेण्याल आला.

जेव्हा जिप्सी बायकांचा फोटो घेण्याची दुसऱ्यांदा वेळ आली तेव्हा नेमका पॅटीचा परकर एका खिळ्याला अडकला आणि पुढच्या बाजूने उभा फाटला. निघालेला धांदोटा पॅटीने परिश्रमपूर्वक केलेल्या खऱ्या जिप्सींच्या वेषभूषेच्या हिशोबाने सुद्धा खूप मोठा ठरला असता. त्यामुळे तिला बिचारीला शेजारच्या मेक अप रूम मध्ये जाऊन घाईघाईने एका पांढऱ्या दोऱ्याने तो शिवावा लागला.

शेवटी एकदाच्या दोघी जिप्सी बायका फोटोसाठी उभ्या राहिल्या. फोटोग्राफर स्वतःच एक कलाकार असल्याने त्याने उत्साहाने दोघींना निरनिराळ्या पोझेस सुचवायला सुरुवात केली. या दोघींच्या वेषभूषा खऱ्या जिप्सींच्या खूप जवळ जात असल्यामुळे तो खूश झाला होता. जिप्सी बायका नाचताना, एका कॅनव्हासच्या ढगांच्या पार्श्वभूमीवर उभ्या असलेल्या, अशा वेगवेगळ्या पोझेस मध्ये त्यांचे फोटो काढले. आता फोटोग्राफर त्यांचा तीन दगडांच्या चुलीवर उकळत असलेल्या किटलीच्या पार्श्वभूमीवर फोटो काढायच्या तयारीत होता. तेव्हाच कॉनीच्या एकदम लक्षात आलं की आजूबाजूला एकदम शांतता पसरलेली आहे.

"बापरे, सगळ्या जणी कुठे गेल्या? "

कॉनी धावत जाऊन मेक अप रूम्स मध्ये शोधून आली. तिला एकाच वेळी खूप हसू येत होतं आणि ती गोंधळूनही गेली होती.

"ए पॅटी, आपली घोडागाडी कधीच निघून गेली ! दुसऱ्या गाडीतल्या मुली ’मार्श आणि एल्किन्स’च्या शेजारी आपली वाट पाहतायत. "

"कसला दुष्टपणा आहे हा सगळा... आपण इथे आत आहोत हे त्यांना माहीत होतं. " आपल्या हातातली लाकडं खाली टाकत पॅटी एकदम उठून उभी राहिली. किटलीवरची धूळ पुसण्यात मग्न असलेल्या फोटोग्राफरला ती म्हणाली, "क्षमा करा, पण आम्हाला गाडी पकडायची आहे आणि त्यासाठी आम्हाला पळावं लागेल."

"ए पॅटी, अगं आपल्याकडे कोट पण नाहीयेत. मिस वर्डस्वर्थ आपल्याला या कपड्यांमध्ये कधीच गाडीत घेणार नाहीत... " कॉनी एकदम म्हणाली.

"पण त्या आपल्याला गावात असं सोडून देऊ शकत नाहीत. त्यांना आपल्याला गाडीत घ्यावंच लागेल. "

त्या दोघी धावतच खाली आल्या आणि खालच्या अंधाऱ्या खोलीतून रस्यावर उतरताना क्षणभर थबकल्या. शनिवार दुपारच्या गर्दीचा लोंढा गावातल्या मुख्य रस्त्यावरून वाहत होता. पण ही थबकायची, बिचकायची किंवा संकोचायची वेळच नव्हती. त्यामुळे दोघींनी मोठ्या शूरपणाने मुख्य रस्त्यावर पाऊल टाकलं.

"ए आई! त्या बघ जिप्सी बायका चालल्या आहेत. " या दोघी बाहेर पडलयावर एक लहान मुलगा आपल्या आईला म्हणाला.

"अरे देवा! मला आपण सर्कशीत काम करायला लागलो आहोत असं वाटतंय... " कॉनी म्हणाली.

"चल लवकर. " पॅटीने कॉनीचा हात धरला आणि पळायला सुरुवात केली. धापा टाकतच ती म्हणाली. " गाडी तिकडे थांबली आहे. ए थांबा! .. थांऽऽबा... !!!" गाडीतल्या लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिने खंजिरीचा जोरजोरात आवाज केला.

चौकात एक मोठी गाडी उभी होती. त्या गाडीने या मुलींचा रस्ता अडवला. अकरा हजार कुमारींपैकी शेवटची मुलगी शाळेच्या गाडीमध्ये चढली आणि मागे वळून सुद्धा न बघता गाडी निघाली. बघता बघता ती गाडी एखाद्या ठिपक्याएवढी दिसायला लागली. दोघी जिप्सी बायका चौकात उभ्या राहून नुसत्याच एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या.

"माझ्याकडे एक सेंटही नाहीये. तुझ्याकडे काही पैसे आहेत का? "

"अजिबात नाहीत."

"आता आपण घरी कशा जाणार? "

"मला तर काहीच सुचत नाहीये.. "

पॅटीच्या कोपराला एक झटका जाणवला. तिने वळून पाहिलं तर शाळेच्या देणगीदारांपैकी एक असलेला जॉन ड्र्यू डॉमिनिक मर्फी तिथे उभा होता आणि असुरी आनंदाने त्यांच्याकडे पाहत होता. हा माणूस अगदी तरूण होता आणि योगायोगाने त्याची आणि पॅटीची चांगलीच ओळख होती.

"आम्हाला तुमचा नाच बघायचाय... गाणंही ऐकायचंय."

"या अवतारामुळे निदान आपल्या ओळखीची माणसं तरी आपल्याला ओळखू शकत नाहीयेत हे त्यातल्या त्यात नशीब म्हणायचं", कॉनी स्वतःचीच समजूत घातल्यासारखं म्हणाली.