जिप्सींचे गाणे

अदिती

सध्या संध्याकाळ मोठी असे. संध्याकाळचं जेवण आणि रात्रीचा अभ्यासाचा तास यांच्यामधला सगळा वेळ सेंट उर्सुलाच्या मुली बाहेर लॉनवर घालवत असत. एखाद्या हॉलमध्ये जमून नाचाचा सराव करण्यापेक्षा हिरवळीवर फेऱ्या मारणं मुलींना जास्त आवडे. आज तर शनिवार असल्यामुळे रात्रीच्या अभ्यासाच्या तासाला सुट्टी होती. त्यामुळे यच्चयावत मंडळी आज बाहेर आली होती. शैक्षणिक वर्ष संपत आलं होतं. उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी तोंडावर होती. त्यामुळे शाळेतल्या चौसष्ठ मुली कानात वारं शिरलेल्या चौसष्ठ कोकरांसारख्या बागडत होत्या. आंधळ्या कोशिंबिरीपासून रस्सीखेचीपर्यंत सगळे खेळ एकाच वेळी जोरात सुरू होते. व्यायामशाळेच्या पायऱ्यांवर दोन गटांचं संगीत युद्ध सुरू होतं. गाणाऱ्यांचा गट वाद्य वाजवणाऱ्यांचा आवाज खाऊन टाकायचा प्रयत्न करत होता. ओव्हल मैदानावर काही मुली कमरेत आडव्या रिंग्ज घालून त्या गोल फिरवत उभ्या होत्या. आणि यापैकी कशातच भाग न घेतलेल्या मुली हिरवळीवर फिरताना एकमेकींशी जोरजोरात गप्पा मारत होत्या.
स्वच्छ अंघोळ करून, चांगले कपडे घालून सभ्य मुलींमध्ये रूपांतर झालेल्या पॅटी - कॉनी आणि प्रिसिला एकमेकींचे हात धरून बागेत फेऱ्या मारत होत्या. आजवर ज्याची आतुरतेने वाट पाहिली तो रम्य भविष्यकाळ आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला होता आणि त्याच भविष्यकाळाबद्दल त्यांची त्यांच्या एरवीच्या अवखळपणाला न साजेशी गंभीर चर्चा सुरू होती.

"पोरींनो, " पॅटीने नकळत एक आवंढा गिळला. "एका आठवड्याभरात आपण मोठ्या होऊ. "

त्या मुली आपापल्या जागी थबकल्या आणि नकळत त्यांनी मागे वळून पाहिलं. हिरवळीवर मुलींचा आनंदी जमाव फुलपाखरांसारखा भिरभिरत होता. हिरवळीच्या मागे संधिप्रकाशात झळाळून उठलेली शाळेची उंच आणि मोठी वास्तू उभी होती. गेली चार वर्षं या प्रेमळ वास्तूने त्यांना घरासारखं प्रेम दिलं होतं. त्यांची चिमणी सुखदुःखं आणि निरागस बालपण तिथे निर्धास्तपणे आणि विश्वासाने नांदलं-खेळलं होतं. मोठं होणं हे एखाद्या वैराण वाळवंटासारखं ओसाड वाटत होतं. एक क्षणभर त्यांना असं तीव्रतेने वाटलं की आपले हात पुढे करून इतक्या बेफिकीरीने जगून टाकलेल्या आपल्या गोजिरवाण्या बाळपणाला घट्ट धरून ठेवावं.

"मोठं होणं किती भयाण आहे... मी बाई लहानच राहीन." कॉनी म्हणाली.

अचानक वातावरण तंग झालं. कावऱ्याबावऱ्या झालेल्या तिघी मुली तिथून पुढे निघाल्या. 'विषामृत' खेळायला आलेलं आमंत्रण नाकारून, व्यायामशाळेला बगल घालून - व्यायामशाळेच्या पायऱ्यांवरून जिप्सींच्या गाण्याचे सूर येत होते - वेलींच्या मांडवाखालून मागच्या गल्लीत आल्या. या गल्लीमध्ये सफरचंदाच्या झाडाच्या फुलांचा सडा पडलेला होता. या गल्लीच्या दुसऱ्या टोकाला दोन माणसांच्या आकृत्या दिसत होत्या. तिकडे लक्ष जाताच तिघीजणी श्वास रोखून एकदम उभ्या राहिल्या.

"ही तर जेली आहे!", कॉनी हळूच म्हणाली.

"आणि मि. गिल्रॉय", पॅटी कुजबुजली.

"चला इथून पळूया." कॉनी गडबडून गेली होती.

"नको. आपलं त्यांच्याकडे लक्ष नाही असं दाखवू. " पॅटी म्हणाली.

खाली जमिनीकडे नजर लावून त्या चालत राहिल्या. पण त्यांच्या शेजारून जाताना मिस जेलिंग्जने त्यांना हाक मारली. ती भलतीच आनंदात दिसत होती. कळेल न कळेल अशी उत्साहाची आनंदाची आणि थराराची लाट तिच्या सभोवताली पसरल्यासारखं वाटत होती. काही तरी चैतन्याने सळसळणारं आहे असं पॅटीला वाटून गेलं.

"काय गं जिप्सी बायकांनो! "

खरं तर अशी हाक एरवी कोणी मारली नसती. पण उत्साहाच्या भरात आपण काहीतरी वेगळं बोललो हे तिच्या गावीही नव्हतं.

"जिप्सी बायका? "

गिल्रॉयने हे शब्द उच्चारले आणि त्याची बंद पडलेली विचारचक्रं पुन्हा सुरू झाली. त्याने बारकाईने तिन्ही मुलींच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मुलींनी मलमलीचे झुळझुळीत झगे चढवले होते आणि त्या नमुनेदार सभ्य तरुण मुलींसारख्याच दिसत होत्या. पण झपाट्याने कमी होत असलेल्या प्रकाशात सुद्धा पॅटी आणि कॉनीच्या चेहऱ्यावरचं सावळेपण लपत नव्हतं. कडकडीत पाण्याने खसाखसा चोळून धुतल्याशिवाय चेहऱ्यावरचे कॉफीचे डाग निघत नसतात!

"अच्छा! "

गिल्रॉयच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने एक खोल श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावरून अनेक भाव झरझर सरकत गेले. संकोचून कॉनीने जमिनीकडे नजर वळवली. पॅटीने मात्र मान वर करून त्याच्याकडे पाहिले. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. तेवढ्या एका क्षणात दोघांनीही एकमेकांना मनोमन बजावले, "काही बोलू नको हं !" आणि दोघांनीही मनोमन एकमेकाला सांगितले, "नाही बोलणार !"

व्यायामशाळेच्या पायऱ्यांवरचे जिप्सींच्या गाण्याचे सूर वाऱ्यावर नाचत तिथवर आले. मुली पुढे निघून गेल्या आणि मिस जेलिंग्ज त्या सुरांबरोबर गुणगुणायला लागली...

जिप्सींच रगात जिप्सींच्या रग्ताच्या
पाठी धावतं
जगात मावतं,
सखे, जगात मावतं
जगात साऱ्या रगात आपलं
एकच हाय
जगात साऱ्या रगात आपलं
भरून र्‍हाय
रगताची आपल्या जातच अश्शी
फिरून धावतं तुज्याच पाशी
सखे, तुझ्याच पाशी
जिप्सींच्या रग्ताची एकच धाव
घ्या चला सारं रामाचं नाव!

हळूहळू हे शब्द वाऱ्यावर विरून गेले.

कॉनी, पॅटी आणि प्रिसिला त्या दोघांकडे बघत राहिल्या,

"मिस जेलिंग्ज आता शाळा सोडून जाईल आणि हे आपल्यामुळे होतंय कॉनी! " पॅटी म्हणाली.

"किती छान झालं! " कॉनी मनापासून बोलत होती. "सगळं आयुष्य तिने फक्त आयरीन मॅक्कलोला सरळ उभं रहायला सांगण्यात घालवावं असं मला नाही वाटंत. तिची लायकी यापेक्षा कितीतरी जास्त आहे. "

"काय असेल ते असो, पण मला नाही वाटत गिल्रॉयला राग येईल असं आपण वागलो. कारण आपल्या मदतीशिवाय तिच्याशी बोलायचा त्याला धीरच झाला नसता. ", पॅटी म्हणाली.

तशाच चालत चालत त्या मैदानाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कुरणापर्यंत आल्या. तिथल्या गवताच्या भाऱ्याला टेकून त्यांनी आभाळाचा शेंदरी रंग बघायला सुरुवात केली. मिस जेलिंग्जचा उत्साह संसर्गजन्य असावा. त्यांनाही त्याची बाधा झाली. भविष्यकाळातल्या गोष्टींची अनाकलनीय सूचना मिळाल्यासारख्या त्या थरारून गेल्या.

"मला वाटायला लागलंय, की हे इतकं वाईट नाही... " कॉनीने शांततेचा भंग केला.

"काय वाईट नाही? " प्रिसिलाने विचारलं

"हे सगळंच." गोलाकार हात फिरवत कॉनी म्हणाली.

प्रिसिलाने सगळं समजल्यासारखी मान हलवली आणि मग अचानक ती म्हणाली, "माझा विचार बदललाय. मी कॉलेजला जायची नाही. "

"कॉलेजला जायची नाही? ते का? ", पॅटीने विचारले.

"त्यापेक्षा लग्न करून संसार थाटीन मी. "

"हा हा ! मी मात्र दोन्हीही करणार आहे" पॅटी हसत हसत म्हणाली.