प्रवास एका लेखाचा

प्रा. शशिकान्त दामोदर गोखले

अष्टविनायकदर्शन-एक अभ्यास निबंध :
त्यानंतर मी ठरवल्याप्रमाणे माझ्या मूळच्या लेखाला "अष्टविनायक दर्शन -- एक अभ्यास" अशी जोड देऊन एक निबंध तयार करून पुण्याच्या वेदविज्ञान मंडळाला पाठवला. का तर, अंदमानला आलेल्या ४०० लोकांतील एखादा तरी त्या वाचनाचे वेळी येईल व माझ्यावरच लेख चोरल्याचा आरोप करेल ज्यामुळे मला सत्य काय ते सांगायची संधी मिळेल. निबंधाचे मूळ सूत्र असे होते - स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वार्थत्यागामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याचे फळ सत्तेच्या रूपाने ज्या पक्षाचे हाती लागले त्यातील अनेक त्यागी नेत्यांनी तशी कोणतीही भीषण परिस्थिती समोर नसतानाही राजकारणयात्रा आणि एकाने तर आपली जीवनयात्राच संपवली. याउलट सावरकरांच्या वाट्याला काय आले? क्रांतिकार्यात अपयश, बंदिवासातील यमयातना आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गांधीजींच्या राजकीय विचारसरणीचे कठोर टीकाकार म्हणून उपेक्षा व त्याच कारणासाठी आकसाने गांधीहत्येतील एक आरोपी ठरवून अवहेलना! न्यायालयाने निर्दोषी ठरवूनही त्यांची अवहेलना चालूच राहिली! त्यांच्यावर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गुप्तहेरांची पाळत असायची असे म्हणतात. असे असूनही असे कोणते घटक या विनायकात एकवटले होते ज्यांच्यामुळे ’आत्महत्येला प्रवृत्त करू शकणारी’ ही सर्व उद्वेगजनक परिस्थिती असूनही सावरकरांनी त्यावर मात केली? त्यांच्यामध्ये प्रकर्षाने एकवटलेल्या आठ महत्त्वाच्या घटकांमुळे हे हलाहल पचवणे त्यांना शक्य झाले असावे. या आठ घटकांचा अभ्यास हेच आपले प्रेरणादायी अष्टविनायकदर्शन, असे मी मांडले होते.

५ जून २०१० ला मी तो निबंध तेथे वाचला. कोणीही चोरीचा आरोप केला नाही. विशेष म्हणजे वाचन झाल्यावर, मुळात ठेवलेले नसूनही, परीक्षकांनी एक पारितोषिक दिले होते ते अध्यक्षांनी माझ्या निबंधवाचनानंतर ऐनवेळी जाहीर केले व दिले. त्याची रक्कम छोटीशीच होती पण माझ्यासाठी लेखाच्या गुणवत्तेला तज्ज्ञांकडून मिळालेली मान्यता फार मोठी होती. निबंध वाचनानंतरचा अध्यक्ष डॉ. प. वि. वर्तक यांच्यासोबतचा लेखकाचा फोटो या लेखासोबत दिला आहे.

मार्सेलिसच्या (मार्सायच्या) त्रिखंडात गाजलेल्या उडीची शताब्दी. 8 जुलै २०१० ला सावरकरांच्या साहसी उडीला १०० वर्षे पूर्ण होणार होती. त्यावेळी तरी ती पुस्तिका त्याचेकडून वा आणखी कोणाकडून प्रकाशित होऊ शकेल का याची चाचपणी केली. त्यात अपयश आले. कोणाकरता केले सावरकरांनी हे जीवघेणे साहस आणि त्यानंतर भोगलेल्या यमयातना? मनात मोठेच काहूर माजले. लोकांच्या उदासीनतेची चीड येऊ लागली. ती नेहमीच्या बोलण्यातून बाहेर पडू लागली. पण ही चीड व त्यातून बाहेर पडणारे शब्द वांझोटेच की! अशाच मनःस्थितीत माझ्या अंतर्मनाने मलाच विचारले, "अरे कशाला चिडतोस इतरांवर? एका छोट्या पुस्तिकेकरता प्रकाशकावर अवलंबून राहातोस? तू तरी स्वतः यापलिकडे काय करतो आहेस? आपल्या कुवतीनुसार काही करायला तुला कुणी अडवले आहे का?" मनाशीच चाललेल्या या संवादाचे फळ म्हणजे मी ठरवले की ही छोटीशी पुस्तिका जशी जमेल तशी ८ जुलै पर्यंत आपणच छापून घ्यायची आणि कोणी विकत घेवो वा न घेवो, जाणकार लोकांना चक्क भेट म्हणून द्यायची. माझा मूळ लेख आणि हा शोधनिबंध एकत्र करून सुमारे २८ पानी पुस्तिका आपणच छापायची. हा निश्चय झाला तेव्हा ३ आठवडे हाताशी होते. पत्नीलाच प्रकाशक केले. छापायचा मजकूर हाताशी होता पण त्याला व्यावसायिक स्पर्श नव्हता. छपाईचे दर, लागणारा वेळ, खर्च, वगैरे ज्या बाबी एरवी प्रकाशक सांभाळतो त्याची माहिती घेणे सुरू झाले. एकही पुस्तिका विकली जाणार नाही असे गृहीत धरूनच सर्व काही करायचे होते. याबाबतीत निर्णय घेण्यासाठी, या क्षेत्राचा काही अनुभव असलेले माझे मित्र प्रा. रमेश देशपांडे यांचे खूप सहकार्य झाले. पुस्तकाची संपूर्ण आखणी मीच माझ्या लॅपटॉपवर केली. त्यासाठी "बराहा"चा आणि "वर्ड" चा उपयोग केला. ते सर्व सी. डी. वर कॉपी करून घेऊन शेवटी "तरूण भारत" च्या ऑफिसात गेलो. तेथूनच सर्व करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी श्री. क्षीरसागर, श्री. ढोबळे यांचा छपाईसाठी व श्री. महेश दिड्डी यांचा माझ्या मजकुराचे संगणकावरच श्रीलिपीत रुपांतर करणे यासाठी बराच उपयोग झाला. त्या पंधरा दिवसात अनेकदा तिथे जावे लागले. काही ना काही प्रश्न निर्माण होत राहिले. कारण सर्व काही मीच करणार होतो. पण सात जुलैला कोणत्याही परिस्थितीत छापलेली पुस्तिका हाती येणार असे दिसताच त्याचे प्रतीकात्मक का होईना काहीतरी उद्घाटन करावे असा विचार केला. ७ जुलैला संध्याकाळी सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीत गेलो. तेथील प्रा. दिवेकरांना भेटलो. शाळेच्या १०वीच्या मुलांना पुस्तिकेतील काही भाग दुसऱ्या दिवशी वाचून दाखविण्याची माझी इच्छा व्यक्त केली. मी त्यांना भेटण्यास फार उशीर केला होता. त्यांचे ८ जुलैचे कार्यक्रम आधीच निश्चित झाले होते. पण माझा उद्देश आणि वय यांचा मान राखून ८ जुलैला त्यांची अध्यापकवर्गाची जी तासाभराची बैठक होती तीत आधी ठरलेले विषय बाजूला ठेवून माझ्या या पुस्तिकेच्या वाचनाचा कार्यक्रम ठेवला.

८ जुलै २०१० ला संध्याकाळी मी माझ्या पुस्तिकेच्या काही भागाचे वाचन ज्ञानप्रबोधिनीतील अध्यापकवर्गासमोर सुमारे ४० मिनिटे सादर केले. शेवटी पुस्तिकेची एक प्रत मी शाळेला भेट म्हणून प्रा. दिवेकरांना दिली व माझ्या दृष्टीने पुस्तिकेचा प्रतीकात्मक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मी छापलेल्या २५० प्रतींपैकी निम्म्या प्रती भेट दिल्या पण त्यापैकी अनेकांनी विकत घेऊन त्यांच्या त्यांच्या मित्रांना भेट दिल्या. काय मिळाले मला या सर्व खटाटोपातून? मला मिळाले स्वातंत्र्यवीर सावरकरांना कृतज्ञ भावनेने अभिवादन करण्याचे प्रचंड मानसिक समाधान ज्याचे मोल करणे निव्वळ अशक्य आहे. फोटोमध्ये फ़र्ग्युसन कॉलेजच्या होस्टेलमधील सावरकरांच्या खोलीतील पुतळ्यासमोर ठेवलेली दिसते ती हीच आवृत्ती!

दुसरी आवृत्ती :
सावरकर विचार मंचाचे संस्थापक, सावरकर साहित्य संमेलन-२००८ चे अध्यक्ष, निरूपणकार श्री विवेक घळसासी यांचा आणि माझा पूर्वपरिचय नव्हता. तसेच या मंचाचे विद्यमान अध्यक्ष, चित्रपट निर्माते, सिनेकलाकार, आणि धडाडीचे तरूण नेते, विधिज्ञ श्री. शरद बनसोडे , मंचाचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत बडवे आणि श्री अविनाश महागावकर यांच्याशीही पूर्व परिचय नसतानाही माझ्या विनंतीला मान देऊन या सर्वांनी मी भेट दिलेली माझी पुस्तिका वेळात वेळ काढून वाचली ती केवळ सावरकर प्रेमाच्या अतूट धाग्यामुळेच! त्यांना असे वाटले की ही पुस्तिका सुधारित स्वरूपात काढली तर सावरकरांचे कार्य आणि विचार तरूणांपर्यंत पोहोचवता येतील. श्री. विवेक घळसासी यांनी अतिशय बहुमोल अभिप्रायही लिहून दिला. यासाठी आवश्यक मजकूर आणि बरेच फोटो मी त्यांना दिल्यानंतर स्वा. सावरकर विचारमंचाने 'अष्टविनायक दर्शन - पण जरा वेगळे' ही दुसरी आकर्षक स्वरूपातील आवृत्ती तयार झाली. त्या आवृत्तीचे प्रकाशन दिनांक ९ जुलै २०११ रोजी सोलापूरचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवी श्री. दत्ता हलसगीकर यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे आमदार श्री. देवेंद्र फडणवीस यांचे 'अंदमानातील सावरकर' या विषयावर ओजस्वी भाषण झाले. या प्रकाशनसमारंभाचे दोन फोटो येथे दिले आहेत. प्रमुख बाब ही की या आवृत्तीची व तिच्या प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी मंचाने पार पाडली. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की मंचाच्या कार्यालयातून कोणालाही ती विनामूल्य दिली जाते. तिची विक्री होत नाही. याचे श्रेय अर्थातच मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांकडे जाते. माझ्या दृष्टीने हा अत्यंत समाधानाचा क्षण होता.

पुस्तिकेचा इ-अवतार :
बुकगंगा डॉट कॉम च्या श्री मंदार जोगळेकरांना कोठून तरी माझ्या या पुस्तिकेविषयी समजले. त्यांचा मला इ-मेल आला व त्यांनी या पुस्तिकेचे इ-बुक तयार करून देण्याची इच्छा व्यक्त केली. पाठोपाठ त्यांच्या पुण्यातील ऑफिसने माझ्याशी संपर्क साधला. इ-बुक तयार करण्यास मीही उत्सुक होतोच. मी थोड्या मजकुराची भर टाकली. ४० पानांमध्ये ४१ फोटो टाकले. या सर्वांची वर्ड फाईल तयार करून मी इ-मेलने त्यांच्याकडे पाठवली. तासाभरात वाचून होईल असे हे रंगीत फोटो असलेले इ-पुस्तक म्हणजे 'सावरकर इन अ नटशेल' असे असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यांनी त्याचे इ-बुक अगदी थोड्या खर्चात करून दिले ते मार्च २०११ मध्ये! त्याची किंमत ४० रुपये होती. त्यानंतर सावरकर विचार मंचाने जुलै २०११ मध्ये माझी पुस्तक स्वरूपातील दुसरी आवृत्ती विनामूल्य करून दिली. त्याने मलाही हे इ-बुक विनामूल्य (फ्री) करण्याची इच्छा निर्माण झाली. श्री मंदार जोगळेकरांना मी इ-मेल करून विचारले की किमतीतील माझा वाटा मी सोडून दिला तर तुम्ही तेवढी किंमत कमी कराल का? त्यांचे मोठेपण असे की त्यांनी त्यांचाही वाटा आपणहून सोडून दिला.
आणि १ ऑगस्ट २०११ पासून हे इ-बुक विनामूल्य डाऊनलोड करता येते. पहिल्या वाचनात फज्जा उडालेल्या ह्या लेखाचा आशानिराशांवर हेलकावत झालेला हा प्रवास माझ्यासाठी अत्यंत समाधान देणारा ठरला. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हणतात; पण माझ्यासाठी मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'प्रतिकूल तेच घडेल' असे समजून त्यासाठी मनाची पूर्वतयारी ठेवून काम करीत राहाण्याचा विचार मार्गदर्शक ठरला. हाच विचार तुम्हालाही मार्गदर्शक ठरो!

लेखक- प्रा. शशिकान्त दामोदर गोखले, M. E. (Electrical)
निवृत्त प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद
४/३९, विद्यानगर हाऊसिंग सोसायटी-२, सोलापूर-४१३००३
फोन-(०२१७) २३१९३५७; मो-९८५०७१६५९६