मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
पहिल्या कॅमेऱ्याने मी मनसोक्त फोटोग्राफी केली. त्यातले काही फोटो लक्षात राहण्यासारखे आहेत. ते फोटो बघितले की मला त्यासंदर्भातल्या आठवणी जाग्या होतात. नॉर्थ कॅरोलायना राज्यातील राईट ब्रदर्स मेमोरियल बघण्यासाठी गेलो होतो, तिथे जाताना मोठमोठाले पूल लागतात, त्याचे फोटो छान आले आहेत. इथे जाताना युएस ६४ महामार्गावर एक विश्रांती थांबा आहे. तिथे मला एक छान फूल मिळाले. हिरव्यागार पानांमध्ये गुलाबासारखे दिसणारे एक गोंडस फूल! राईट ब्रदर्स मेमोरियल व आजुबाजूचा परिसर पाहण्यासाठी आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो ते अगदी समुद्रकिनाऱ्याला लागूनच होते. इथे मला समुद्रातून होणारा सूर्योदय पहायचा होता आणि फोटोही काढायचा होता. ही इच्छा पूर्ण झाली नाही कारण आभाळ ढगाळलेले होते. त्या समुद्रकिनाऱ्याचा फोटो मात्र अगदी आठवणीत राहण्यासारखा आला आहे. आकाश, समुद्र आणि जमिनीवरची वाळू असा एकसंध फोटो आला आहे. असाच दुसऱ्या एका समुद्रकिनाऱ्याचा फोटोही छान आला आहे. हा समुद्रकिनारा चित्रित करताना कॅमेरा मी एका विशिष्ट कोनात ठेवून क्लिक केला आणि फोटो मस्त आला.
बाहेर फिरायला जाताना रस्त्याच्या बाजूने पावसाचे पाणी जमा झाले होते व पाण्याच्या वर व खाली हिरवळ होती. त्याचा एक फोटो घेतला. त्या फोटोकडे पाहून तो आरसा आहे असे वाटते. फिरायला जाताना मध्ये वाटेत एक ओबडधोबड खडक आहे तिथे मी थोडी बसते. एकदा त्या खडकावर बसल्यावर खाली पाहिले तर वेलीसारखे दिसणारे एक रोपटे व त्यावर अधुनमधून पांढरी फुले होती. ते रोपटे तोडून त्या खडकावर ठेवले व त्याचा एक फोटो घेतला. हा फोटो पण खूप वेगळा आणि छान आला आहे. गवतफुलांपैकी पिवळी, पांढरी, लव्हेंडर रंगाची अतिशय नाजूक व छोटी फुले अप्रतिम आली आहेत! एका बदकपिल्लाचा फोटो पाहिला की त्याच्या डोळ्यातला निरागस भाव अगदी स्पष्टपणे दिसतो. आकाशातल्या ढगांचे भरपूर फोटो घेतले. त्यातला एका ढगाचा फोटो पिंजलेल्या कापसासारखा दिसतो. मुंग्यांचे वारूळ, पावसाळ्यात हिरवळीवर उगवलेल्या छत्र्या, झाडावर एकही पान नाही असे ओसाड झाड, सावल्या, आकाशात उडणारा पतंग, समुद्रकिनाऱ्यावरची वाळू, सफेद फेसाळणाऱ्या लाटा, शंखशिंपले, असे वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य फोटो काढले आहेत.
मला असाच सूर्याचा फोटो घ्यायचा होता, पण प्रखर सूर्याकडे पाहून फोटो नीट येईना, मग एकदा आकाश ढगाळले असताना त्यात सूर्य व्यवस्थित दिसत होता. सकाळचा चंद्र निळ्या निरभ्र आकाशात छान आला. तळ्यातील पाण्यात पडलेल्या आभाळाचे काही फोटो काढले. एकदा आकाशातील निळे रंग व आकाशात जमलेल्या काही ढगांचे प्रतिबिंब तळ्यातील पाण्यात खूप छान दिसत होते म्हणून तो एक फोटो काढला. एकदा हिमवृष्टी झाली असताना तळ्यावरील बर्फ गोठून स्फटिकाप्रमाणे पसरला होता तेव्हा त्यावरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाशही खूप छान दिसत होता. असे दोन फोटो लक्षात राहिलेले आहेत. आमच्या शहरात क्वचितच हिमवृष्टी होते. मागच्या वर्षी झालेल्या हिमवृष्टीचे बरेच फोटो काढले. त्यात मी बर्फात केलेल्या कलाकुसरीचे फोटो छान आले. प्रत्यक्षापेक्षा फोटोमध्ये ही कलाकुसर अधिक छान दिसते! विमानातून जाताना काढलेले एक दोन फोटो चांगले आले आहेत. एकात विमानाच्या खिडकीतून खाली दिसणारी छोटी घरे व रस्ते छान आले आहेत आणि एकात काही ढग आणि निळेशार आकाश मस्त आले आहे. काही प्राण्यांचे व पक्ष्यांचे फोटोही असेच लक्षात राहिले आहेत. त्यातच एका मगरीचा फोटो आहे. आमच्या घरासमोरील येणाऱ्या बऱ्याच पक्ष्यांपैकी बगळा व करकोचा यांचे फोटो घेण्यात यश आले. एक भले मोठे कासव वावरत असताना कॅमेऱ्यात बंदिस्त केले.
एकदा एक कोळी आमच्या गॅलरीत जाळे विणत होता त्याचाही फोटो स्पष्ट आला आहे. तसेच काही गवतफुले, रानटी झाडे अमाप वाढतात त्यात काही खूप सुंदर सुंदर फुले मिळाली. फॉल रंगांमध्येही काही पाने तर इतकी काही सुरेख दिसतात! इंद्रधनुष्याचे असेच दोन तीन फोटो घेतले त्यात एक अगदी लक्षात राहण्यासारखा आला आहे. आकाशात ढग होते, तसाच सूर्यप्रकाशही स्वच्छ होता. शिवाय आकाशात थोडे रंगही होते. या सर्वांमध्ये छोटेसे इंद्रधनुष्य छान दिसत होते. एकदा वसंत ऋतूतील नवीन फुटलेल्या पालवीचे फोटो काढले. काही झाडांचे फोटोही वेगळे मिळाले. त्यात उंच उंच झाडांची खोडे जमिनीवर पसरलेली होती. आमच्या घरासमोरील तळ्यावर अनेक सीगल पक्षी येतात. त्यात काही सीगल्स यांना हवेत उंच फेकलेला ब्रेड खायला जास्त आवडतो. हवेत फेकलेला ब्रेडचा तुकडा खाऊन परत दुसरीकडे उडत जाऊन एक चक्कर मारून येतात आणि परत ब्रेडचा फेकलेला तुकडा खातात. असे हवेत उडणारे काही सीगल पक्षांचे फोटो मला मिळून गेले. एका बदकपिल्लाचा हिरवळीतला फोटो छान आला आहे. बदकपिल्लू व त्याची बदकीण आई त्या पिल्लाच्या शेजारी उभी. जणू काही मायलेकी खास फोटोसाठीच उभ्या आहेत असे फोटो पाहताना वाटते. असे दोन फोटो लक्षात राहिले आहेत. एका विश्रांती थांब्यामध्ये फिक्या निळ्या रंगाची नाजूक फुले मिळून गेली. दोन तीन बागा पाहिल्या, त्यामध्ये काढलेला एक फोटो असाच वेगळा आहे. एका झाडाचे खोड कापलेले आहे आणि त्यामध्ये काही वेली उगवलेल्या आहेत, हा तो फोटो!