मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
मायेचा हात
![]() |
''हे घे, लाडू खा हा आधी आणि मग कर तुझं काम! '' किर्तीताईंनी माझ्या समोर लाडूची वाटी धरल्यावर मला समोरच्या रजिस्टरमधून नजर हटविणे भागच होते. वाटीतल्या त्या खमंग बेसन लाडवाचा एक तुकडा मोडून मी अलगद जिभेवर ठेवला मात्र आणि त्या चवीने खुशीची एक लकेर अंगभर नाचत गेली.
''वा! किर्तीताई, कसला मस्त जमलाय लाडू! आज काय विशेष? '' साजूक तुपात खरपूस भाजलेल्या बेसनाच्या लाडवाचा मनोभावे आस्वाद घेत घेत मी विचारले.
''काही विशेष असं नाही गं! दर महिन्याला या तारखेला मी आश्रमातल्या मुलींसाठी लाडूचा खाऊ बनवते. एरवी तसं आश्रमातलं जेवण कोरडं कोरडंच असतं. त्या निमित्ताने या मुलींच्या पोटात थोडंसं तूप जातं. चव पण बदलते तेवढीच. कंटाळतात गं त्याही रोज तेच ते खाऊन! ''
किर्तीताईंच्या बोलण्यात तथ्य होते म्हणा! महिलाश्रमातले जेवण तसे साधे आणि कोरडेच असायचे. आईबापाचं छत्र हरपलेल्या चाळीस - पन्नास मुलींना तिथे दोन वेळचे जेवण, न्याहारी मिळायची. अन्नाची चवही बरी असायची. पण त्यात घरचा गोडवा कोठून येणार? मी इथे गेले चार महिने कामासाठी येत होते. त्या काळात किर्तीताईंना मुलींसाठी काहीबाही खाऊ करून आणताना बघायचे. कधी लाडू, कधी चिवडा, कधी गोडाचा शिरा, कधी पुरण.... स्वतः जातीने खपून त्या ते पदार्थ तयार करायच्या, आश्रमात घेऊन यायच्या आणि स्वतःच्या हाताने मुलींना खाऊ घालायच्या.
''त्यांचा केटरिंगचा बिझनेस आहे का? '' आश्रमात लेखनिक पदावर काम करणार्या जयाला मी एकदा न राहवून विचारले होते. जया नुसतीच हसली. म्हणाली, ''तुला नाही कळायचं! ''
आता मात्र मला राग आला. ''का गं? मी काही चुकीचं विचारलं का? ''
''छे! तू असं का नाही करत? त्यांनाच विचार ना! त्याच तुला उत्तर देतील, जाम गोष्टीवेल्हाळ आहेत त्या! '' एवढं बोलून जयाने हसत हसत पुन्हा समोरच्या कॉम्प्यूटरमध्ये तिचे डोके खुपसले होते. मला आता तशा संधीची वाट बघण्यावाचून पर्याय नव्हता.
आज ती संधी अनायासेच गवसली.
''किर्तीताई, तुम्ही कायम आश्रमातल्या मुलींसाठी खाऊ करून आणता... कसं जमतं हो तुम्हाला? शिवाय तुमची इतर कामं तर असतातच.... आणि तुम्हाला कधीचं विचारावं म्हणतेय, पण दर महिन्याच्या चोवीस तारखेलाच तुम्ही सर्व मुलींसाठी बेसनाचे लाडू करता... काही खास कारण आहे का? '' मी बिचकतच किर्तीताईंना विचारले.
माझ्या प्रश्नांसरशी कीर्तीताईंच्या चेहर्यावर हसू झळकले. पदराने कपाळावरचा घाम टिपत त्या खुर्चीत जरा मागे रेलून बसल्या. वयाच्या बासष्टाव्या वर्षीही त्यांचा उत्साह अपरिमित असला तरी कधी कधी त्या थकलेल्या असतात हे मी आधीच पाहिले होते. समोरच्या स्टीलच्या तांब्यातील पाणी फुलपात्रात ओतून त्या पाण्याचा हलकेच एक एक घोट घेत त्या उद्गारल्या, ''तुझं काम बाजूला ठेवणार आहेस का थोडा वेळ? तर मग सांगते माझं कारण...!! ''
मी मुकाट्याने रजिस्टरमध्ये खूण घालून ते बंद करून ठेवले.
''हं, आता बोला! ''
किर्तीताईंची नजर खिडकीतून दिसणार्या आंब्याच्या झाडावर खिळली होती.
''माझ्या माहेरीही असेच झाड होते अंगणात. पण ते आमच्या मालकीचे नव्हते. आमच्या शेजारी वैद्यबुवा राहायचे. त्यांच्या मालकीचे होते ते झाड. दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही चोरून कैर्या पाडायचो. मग वैद्यबुवा रागावायचे आणि घरी मार बसायचा. पण आमचे कैर्या चोरणे काही थांबले नाही. आमचे आणि त्यांचे अंगण शेजारी-शेजारी. सुट्ट्यांच्या दिवसांत आम्ही त्यांच्या अंगणाचा ताबाच घ्यायचो! खूप छान होते ते दिवस. पुढे मी बारा वर्षांची असताना माझी आई अचानक वारली. वडिलांना खूपच धक्का बसला. ते एकदम कोरडे, अलिप्त झाले. '' किर्तीताईंचा चेहरा त्या आठवणीने उदास झाला होता. पण मग त्या सावरल्या आणि पुढे सांगू लागल्या,
''आम्ही तीन भावंडे. मोठी सुनिती ताई, मधली मी व धाकटा श्रीहरी. आमची आई गेल्यावर शेजारच्या वैद्यबुवांनी आम्हाला आपल्या पोरांगत वागवायला सुरुवात केली. त्यांना पोटी मूलबाळ नव्हते. आता त्यांनी आम्हालाच त्यांची मुले मानले. त्या वर्षी त्यांनी आपण होऊन झाडावरच्या कैर्या तोडून दिल्या. पण आम्हा तिघा भावंडांना त्यात मजा उरली नव्हती. ''
''वैद्यबुवा आणि त्यांची बायको, दोघेही तसे मायाळू होते. वैद्यबुवांचा स्वभाव जात्याच तापट, आणि शिस्तीला तर ते महाकडक. आमची आई गेल्यानंतर आमचा जास्तीत जास्त वेळ त्यांच्याचकडे जाऊ लागला. मी त्यांच्या दवाखान्याजवळ घुटमळायचे, कधी त्यांना औषधांच्या पुड्या बांधायला मदत करायचे, कधी कोण्या पेशंटला औषधाच्या डोसनंतर कसं वाटतंय याची चौकशी करायला श्रीहरीबरोबर जायचे, कधी पोस्टकार्डावर पत्र लिहून द्यायचे.... एक ना दोन. आणि वैद्यकाकी कधी आमच्या वेण्या घालून दे, कधी शिकेकाईने न्हाऊ-माखू घाल, आजारी असलो की गरमागरम खिचडी-सार खायला घाल, काढा करून दे अशा तर्हेने आमच्यावर मायेचा वर्षाव करत असत. स्वयंपाकघरात चार गोष्टी करायला मला त्यांनी आणि वैद्यबुवांनीच शिकविले बरं का! दर वर्षी गणपतीत आणि नवरात्रात वैद्यबुवा स्वतःच्या हाताने सारा नैवेद्य व स्वैपाक बनवत असत. फार सुंदर स्वैपाक करायचे ते! आणि आम्हाला सारखे 'तूप खा, तूप खा, ' म्हणून कानीकपाळी ओरडत असायचे. मुलींनी तर तूप खाल्लेच पाहिजे, तब्येत जपायला पाहिजे वगैरे वगैरे! मला तर अजिबात आवडायचे नाही तूप तेव्हा! पण ते रागावतील म्हणून खायचे कशीबशी. ''
''पुढे माझे लग्न झाले, दोन वर्षांत माझ्या थोरल्या मुलाचा, दीपकचा जन्म झाला. माझे सारे बाळंतपण वैद्यबुवा आणि काकींनीच केले. ''आम्ही आहोत ना, मग तू कशाला काळजी करतेस? '' हे त्यांचे शब्द! खरे तर दोघेही थकले होते तेव्हा. काकींची तब्येत जास्तच खालावली होती. पण तरी मला वाटणार्या काळजीला न जुमानता त्या ''काही होत नाही गं मला! '' करत माझे सगळे करत होत्या. बाळंतपणानंतर तीन महिन्यांनी मी सासरी परतले. तेव्हा काकींना पाहिले ते शेवटचे! दीपक वर्षाचा व्हायच्या आतच त्या वारल्या. माझे सासरे तेव्हा बरेच आजारी होते, दिरांचा पाय फ्रॅक्चर होता, दीपकही लहान... मला त्यामुळे लगेच घरून निघता आले नाही. तेराव्याला मात्र पोचले कशीबशी तिथे. वैद्यबुवा आता फारच थकले होते. मला म्हणाले, ''पोरी, काळजी करू नकोस, समाधानाने गेली ती. '' माझे दुसरे बाळंतपण देखील माहेरीच करावे लागले. त्याही खेपेस वैद्यबुवा जातीने माझ्या तब्येतीकडे लक्ष ठेवून होते. मदतीला दोन बायका घेतल्या होत्या. त्यांना सार्या सूचना देत आणि स्वतः बाहेरच्या खोलीत बसून देखरेख ठेवत. देविकाच्या जन्मानंतर मी सासरी गेले आणि अक्षरशः कामाला जुंपलीच गेले. घरात बरीच माणसे असायची, मुलेही लहान होती. सार्यांचं करता करता कमरेचा काटा ढिला होई. स्वतःकडे लक्ष द्यायलाही फुरसत नसे. मग काय!! व्हायचा तो परिणाम झालाच! काही दिवसांनी कामासाठी खाली वाकले की मला चक्कर आल्यासारखे व्हायचे. बघता बघता घाम यायचा. लगेच थकायला व्हायचे. नेहमीच्या डॉक्टरची औषधे, टॉनिके सुरू केली. पण फरक पडत नव्हता. शेवटी वैद्य काकींच्या श्राद्धाला गेले होते तेव्हा घाबरत घाबरतच वैद्यबुवांना काय होत आहे ते सांगितले. पहिल्यांदा तर ते जामच उसळले. ''स्वतःकडे लक्ष द्यायला नको या पोरींना! म्हणे संसार करताहेत! अगो, चार दिवस जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलेस तर पाप नाही लागणार गो तुला! दोन मुलांची आई ना तू? उद्या तुला काही झाले तर त्यांनी कोणाकडे पाहायचे? ''
''मी तर शरमेने मान खाली घातली. बाळंतपणानंतर मी सासरी जायच्या वेळी वैद्यबुवांनी मला सोबत कसले कसले कल्प, चूर्णे, गोळ्या, औषधे वगैरे दिले होते. त्यांच्या सोबत रोज किमान दोन चमचे तूप तरी पोटात जायला पाहिजे हे बजावले होते. मला मुळात तूप पानांत वेगळे वाढून घ्यायचा कंटाळा! त्यात सासरी एवढी माणसे म्हटल्यावर त्यांचे करता करता ते तूप खाण्याचे वगैरे पार डोक्यातून निघूनच जायचे. आता वैद्यबुवांचा भडका उडाल्याचे पाहिल्यावर मला सासरी कपाटात एका कोपर्यात पडलेली ती चूर्णे, गोळ्या वगैरे आठवली. मनात अपराधी भावना दाटून आली.''