मायेचा हात

अरुंधती कुलकर्णी

''मी त्यांना काही उत्तर देणार तितक्यात वैद्यबुवांनी प्रश्न केला, '' बरं, ते औषधांचे जाऊ देत. पण रोज तूप तरी खातेस का?

'' मी तर घाबरून आवंढाच गिळला. कारण आता मला त्या तुपाबरोबरच टाळलेले दुधाचे पेलेही आठवू लागले होते. माझी अपराधी मुद्रा पाहून वैद्यबुवा काय समजायचे ते समजले, आणि तापलेल्या डोक्याने आजकालच्या पोरींची अक्कल काढत रागारागाने तिथून चालते झाले.''

''दुसर्‍या दिवशी मी सासरी जायला निघाले तरी वैद्यबुवांचा पत्ता नव्हता. शेवटी मला त्यांची काळजी वाटू लागली. गुरवांच्या पोराने सांगितले की वैद्यबुवा शंकराच्या देवळात बसलेत. हुश्श झाले मग! जाताना त्यांच्या पाया पडले तशी रुद्ध कंठाने म्हणाले, ''पोरी, रागात जास्त बोललो असेन तर माफ कर मला. पण तुझ्या काळजीने जीव राहवला नाही म्हणून बोललो गं! आज तुझी काकी असती तर तिने तर कानच पिळले असते तुझे. असो. झालं-गेलं विसरून जा. तुझ्यासाठी औषधाच्या पुड्या केल्या आहेत त्या घेऊन जा. रोज सकाळ-सायंकाळ दुधाबरोबर घ्यायचं बरं का औषध! '' माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवला.''

''सासरी आल्यावर मी वैद्यबुवांनी दिलेले औषध घेऊ लागले. घरी पोचल्यावर दोनच दिवसांनी गावचा विष्णू धापा टाकत आमच्या सासरच्या वाड्यावर आला. हातात मोठी खाकी पिशवी, आत चांगला वजनदार डबा. म्हणाला, वैद्यबुवांनी किर्तीताईसाठी औषध घालून लाडू बनवलेत ते द्यायला आलो आहे. मला विष्णूने पुन्हा पुन्हा ''ते लाडू फक्त तूच खायचेस ताई, '' असे बजावले आणि चहा पिऊन निघून गेला.''

''एरवी आमच्या सासरी एखादा पदार्थ केला रे केला की धाकटे दोन दीर, नणंद, घरातली बाकीची माणसे त्याचा बघता बघता फन्ना उडवत असत. पण ह्या खेपेस ते औषधी लाडू म्हटल्यावर घाबरून कोणी त्यांना हात लावला नाही. सलग दोन-तीन महिने वैद्यबुवा स्वहस्ते लाडू बनवून माझ्या सासरी ते धाडून देत होते. मीही त्या बेसनाच्या लाडवांचा रोज चवीने समाचार घ्यायचे. तो लाडू खाताना वैद्यबुवांना आठवायचे. दोन महिन्यांच्या उपचारांनंतर माझा अशक्तपणा गेला. कंबरदुखी थांबली. रोज दूध प्यायची सवयही लागली.''

''त्याच वर्षी दिवाळीच्या दरम्यान श्रीहरीचे कार्य निघाले. त्यावेळी वैद्यबुवांना मी धीर करून विचारलेच, लाडवांमध्ये कोणते औषध होते नक्की? कधी नव्हे तो वैद्यबुवांच्या रागीट चेहर्‍यावर मला मिश्किल भाव दिसले.

''कसलेही औषध नव्हते त्यात! अस्सल शुद्ध तुपात केलेले लाडू होते ते फक्त! पण तुझ्या सासरी तसे सांगितले नसते तर तुझ्या मुखी त्या लाडवाचा कण तरी लागला असता का? म्हणून मुद्दाम निरोप पाठवला की औषधी लाडू आहेत. इतर कोणी खाऊ नयेत म्हणून हो! '' मी अवाक होऊन त्यांच्याकडे बघतच राहिले! ''

''वैद्यबुवांच्या मायेचे मला हे आगळेच स्वरूप दिसत होते. गावातले लोक भले त्यांना तापट, तर्कट किंवा आणखी काही म्हणोत!

त्यानंतर काही वर्षांनी वैद्यबुवांचा देहांत झाला. त्यांना मुलेबाळे कोणीच नव्हते. त्यांच्या लांबच्या भाच्याने बुवांचे घर विकले. गावातून बुवांची नामोनिशाणी मिटली. माझ्या मनात आपला सारखा विचार यायचा.... वैद्यबुवा आणि काकींनी आम्हा आईवेगळ्या मुलींना इतकी माया दिली, आमचे सारे काही प्रेमाने केले.... आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजातल्या अशा मुलींसाठी काही करता आले तर करूया.''

''त्याच दरम्यान माझी या आपल्या आश्रमाशी ओळख झाली. मला इथला कारभार आणि माणसे आवडली. पहिल्यांदा टप्प्याटप्प्याने आणि मग नियमितपणे इथे येऊ लागले. इथल्या मुली माझ्या मुली बनल्या. त्यांच्यासाठी काही करायला मिळतंय यातच आनंद वाटू लागला. तरी त्यांना अधून मधून का होईना, घरी बनवलेले अन्न खायला मिळावे अशी माझी इच्छा होती. इथल्या व्यवस्थापकांना विचारलेच मग शेवटी! त्यांनी सुरुवातीला इथल्याच स्वयंपाकघरात पदार्थ बनवायला सांगितले. तेही बनवले. हळूहळू जशी त्यांना माझी खात्री पटली तशी त्यांनी मला ते पदार्थ तुमच्या घरी बनवून आणलेत तरी चालतील अशी परवानगी दिली. मग तेव्हापासून मी दर आठवड्याला काही तरी खाऊ बनवते आणि इथल्या मुलींना खाऊ घालते. पण बेसनाचे लाडू मात्र चोवीस तारखेलाच बरं का! खास वैद्यबुवांची आठवण म्हणून! अगं, ऑक्टोबराच्या चोवीस तारखेला त्यांचा वाढदिवस असायचा ना! ''

किर्तीताईंच्या चेहर्‍यावर समाधान फुलले होते. बघायला गेले तर एक किती साधीशी कृती... पण त्याच्याशी त्यांच्या आयुष्यातील कितीतरी खास आठवणी, भावना जोडल्या गेल्या होत्या. आपल्या छोट्याशा का होईना, पण मायेच्या कृतीतून त्या वैद्यबुवांचा आणि काकींचा वात्सल्याचा वारसा पुढे चालवत होत्या.

बघता बघता आमच्या गप्पांमध्ये अर्धा तास उलटून गेला होता.

''चल गं, बराच वेळ खाल्ला तुझा! '' किर्तीताई खुर्चीतून उठत उद्गारल्या.

''हो, आणि मीही तुम्ही दिलेल्या लाडवाचा फडशा पाडला की! '' मी हसत हसत कोटी केली.

किर्तीताई खुदकन हसल्या आणि उत्तरल्या, ''आवडला ना तुला लाडू? मग झालं तर! आता पुढच्या वेळीही तुझ्यासाठी करून आणेन! ''

आपल्या मायेच्या पदराखाली आश्रमातील मुलींना घेऊन त्यांना घराची ऊब देणार्‍या, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या मायेच्या हाताने त्यांना खाऊ-पिऊ घालणाऱ्या किर्तीताई तेव्हा मला त्यांच्या वैद्यबुवांएवढ्याच खूप खूप मोठ्या वाटल्या.