आमचा पहिलावहिला लांब पल्ल्याचा कारप्रवास

रोहिणी

रस्त्यावर कोणीही नव्हते. एखादीच कार धावताना दिसत होती. निर्मनुष्य मोकळा रस्ता मनात भीती निर्माण करत होता. आम्ही दोघेही पेचप्रसंगात पडलो होतो. ऐन थंडीचे दिवस होते त्यामुळे दिवसही लवकर लहान होत होता. हळूहळू सूर्यप्रकाश कमी होत होता. आता काय करायचे? नक्की कुठे जायचे? कोणतीही एक्झिट दिसायला तयार नव्हती. विनायक म्हणाला "आपण उलटे परत फिरू" पण उलटे फिरायला यू टर्नही दिसत नव्हता. मी म्हणाले " छे, उलटे फिरायला नको रे. अंधार पडायला सुरवात झाली आहे. आपण खूप अंतर पुढे आलो आहोत. उलटे फिरून ७६ चा फाटा दिसला नाही तर काय करायचे?" त्यावेळी आमच्याकडे सेल फोन नव्हता. फक्त याहू - मॅपक्वेस्ट नकाश्यांचा आधार होता. मला तर रडू कोसळायच्या बेतात होते. जवळ एकही पेट्रोल पंप दिसत नव्हता. हा काय प्रकार आहे? पेट्रोल म्हणता लक्ष गेले तर तेही संपत आले होते. दोघेही केविलवाणे झालो. तेवढ्यात एक यू टर्न दिसला आणि डाव्या बाजूला एक सरळ जाणारा रस्ताही दिसला. रस्त्याचा चौक असतो तसे काहीतरी वाटले. मी लगेच ओरडले "लवकर घुसव गाडी समोरच्या रस्त्याला. तिथे काहीतरी मिळेल आपल्याला. आता सरळ जाणे नको." डावीकडे जाण्याऱ्या सरळ रस्त्यावर कार नेली खरी पण लगेचच एक यू टर्न घेऊन विनायकने कार परत मुख्य रस्त्यालाच आणली. मी म्हणाले " हे काय?" विनायक म्हणाला "आपण याच रस्त्याने सरळ जाऊ. पुढे आपल्याला शार्लोट नक्की लागेल." मी म्हणाले "आणि नाही लागले तर?" विनायकने रागाने माझ्याकडे पाहिले. माझ्याही लक्षात आले की आता आपणही थोडे धीराने घेतले पाहिजे. त्या ओसाड रस्त्यावरही आम्हाला जंगलात येऊन अडकल्यासारखे वाटत होते.

मी कोणतीही बडबड न करता शांत बसले खरी पण माझ्या मनात वाईट विचारांचे थैमान सुरू झाले. कोणत्याही क्षणी ठप्प अंधार होईल, पेट्रोल संपेल आणि गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावून मागचे लुकलुकणारे दिवे लावून कोणी दिसते का ते पाहून आणि दिसले तर त्याला हातवारे करून 'मदत करा' असे करावे लागेल. आणि असे केले तरी कोणी मदतीला येईल का? मदतीला येण्याकरता एकही गाडी जाताना दिसत नव्हती. ती सोडा, एखादे चिटपाखरू पण दिसत नव्हते. ९११ पोलिसांचा नंबर मदतीसाठी फिरवावा तर फोनही नाही. आता मात्र मी मनातल्या मनात देवाचा धावा करू लागले. काहीतरी दिसू दे. पेट्रोल पंप नाही तरी एखादे शॉपिंग कॉम्प्लेक्स तरी दिसू दे म्हणजे तिथे कार थांबवून पुढे काय करायचे हे सुचेल. तेवढ्यात शार्लोट शहर काही मैलांवरच आहे असे दर्शवणाऱ्या हिरव्या पाट्या दिसू लागल्या. विनायक म्हणाला, "आता काही मैलांवर शार्लोट येईल. तू फक्त कुठे पेट्रोल पंप दिसतो का यावर लक्ष ठेव." माझा परत धावा सुरू झाला, "देवा देवा, लवकर पेट्रोल पंप दिसू दे." पेट्रोल संपण्याच्या निर्देशकावर माझे लक्ष होतेच. काटा पुढे पुढे सरकत होता आणि तेवढ्यात दूरवर काहीतरी आहे असे दिसले. नशिबाने तो एक छोटा पेट्रोल पंपच होता. पेट्रोल भरले. बाजूच्या दुकानात जाऊन कोकाकोला व पाणी विकत घेतले. थोडे बटाटा चिप्स घेतले. तोंडचे पाणी पार पळाले होते. गाडीमध्ये पेट्रोल भरल्यावर आणि कोरड्या घशात पाणी गेल्यावर बरेच हायसे वाटले. थोडीफार चिंता मिटली होती पण आता कोणाला विचारायचे की हा रस्ता कोणता आणि पुढे कसे जायचे? नशिबाने तिथे दोन चार गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. त्यात एक छोटा ट्रक टेम्पो होता. तो निघणार तितक्यात त्या वाहनचालकाला हात दाखवून थांबवले व विचारले " हा आमचा नकाशा. हा रस्ता कोणता आहे आणि क्लेम्सनला कसे जायचे?" त्याने टेम्पोतून कागदी मोठा नकाशा काढला आणि सांगितले "७६ केव्हाच मागे पडला. क्लेम्सनला जायचे तर सरळ जा, शार्लोट लागेल. तिथून महामार्ग ८५ दक्षिण घ्या, एक्झिट १९ बी वरून क्लेम्सनला जाता येईल." विनायकने विचारले "महामार्ग ८५ किती अंतरावर लागेल?" तो म्हणाला "तुमच्या नजरेतून महामार्ग ८५ सुटूच शकत नाही इतका ठळक आहे, तेव्हा तो आला की समजेलच. त्याचे आम्ही अनेकदा आभार मानले व गाडी सुरू केली.

अंधार पडला होता. त्या माणसाने सांगितलेले एक्झिट क्रमांक व महामार्ग क्रमांक मी लिहून घेतले होते. आता मात्र डोळ्यात तेल घालून बघण्याची वेळ आली होती. इथे महामार्गावर दिवे नसतात. आपल्या गाडीच्या पुढच्या दिव्याचा झोत पडेल तितकाच रस्ता दिसतो आणि हिरव्या पाट्या दिसतात ज्यावर कोणते शहर पुढे येणार किंवा कोणती एक्झिट येणार हे दिसते. आता माझे मैलाचे हिशेब संपले. नजर फक्त समोर आणि तीक्ष्ण. पहिल्या प्रवासात अंधारात गाडी चालवण्याचेही नशिबात लिहिले होते. आता शार्लोट शहरातून जात असल्याने झगमगाट, दुकाने, मोठ्या इमारती दिसायला लागल्याने थोडे माणसांत आल्यासारखे वाटले. अर्थात शहरातून गर्दीमुळे, कमी वेगमर्यादेमुळे, शहरातल्या रस्त्यांची नीट कल्पना नसल्याने आणि महामार्ग ८५ केव्हा येणार याबद्दलच्या अनिश्चिततेने गाडी हळूहळू चालवत होतो. महामार्ग ८५ एक्झिटची पाटी दिसली आणि आम्ही दोघेही अतिदक्ष झालो. तेवढ्यात महामार्ग ८५ दक्षिणची एक्झिट डावीकडे असल्याची खूण दिसली आणि एक्झिट उजवीकडे येईल या अपेक्षेने आमची गाडी अगदी उजव्या रांगेत. मधल्या तीन - चार रांगा पार करून एक्झिट घेणार कशी? माझा परत आरडाओरडा सुरू. विनायकला म्हणाले, " विनायक, एक्झिट डावीकडे आहे. तू एकदम डाव्या रांगेत जाऊ नकोस. खूप गाड्या येत आहेत आणि त्याही खूप जोरात! " डावीकडे जायचा सिग्नल दिला होता आणि काही सेकंदांसाठी आम्ही चक्क आमची गाडी थांबवली. आमचा नवशिकेपणा जाणवून बाजूच्या रांगेतल्या गाड्याही काही सेकंदांकरता थांबल्या व आम्ही डावीकडे झटकन गेलो व एक्झिट घेतली. एक्झिट घेऊन ८५ दक्षिण महामार्गाला लागल्यावर एक सुटकेचा निःश्वास टाकला! मी म्हणाले, "बापरे! काय हा भयंकर अनुभव!" विनायक म्हणाला, "चालायचेच. सर्वांना काही ना काही अनुभव येत असतात, आपल्यालाच असे वाटते की आपणच दिव्यातून जात आहोत." मी म्हणाले, " तेही खरे आहेच. फक्त बाकीचे त्यांचे अनुभव उघडपणे सांगत नाहीत. बाकीच्यांचे अनुभव आपल्यापेक्षाही खतरनाक असतील."

आता आम्ही महामार्गावर मधल्या रांगेतून जात होतो. नुकत्याच आलेल्या अनुभवामुळे एक्झिट आता कुठेही येऊ शकते त्यामुळे मधल्या रांगेत असलेले चांगले म्हणजे एक्झिट पाहून झटपट हालचाल करता येईल. माझी नजर आता चौफेर भिरभिरू लागली. क्लेम्सनची एक्झिट चुकता कामा नये कारण आता परत सव्यापसव्य करायची ताकद उरलेली नव्हती. कधी एकदा आपले घर येते असे झाले होते. काही वेळाने क्लेम्सनला जाण्यासाठीची एक्झिट १९बी दिसली आणि जीव भांड्यात पडला. पुढे अर्ध्या तासात घरी पोचलो. आश्चर्य म्हणजे इतके सगळे नाटक होऊनही अगदी सात तासांमध्ये सुखरूप पोचलो होतो. ऐन हिवाळ्याचे दिवस असल्याने थंडी प्रचंड पडली होती. घरात गेलो आणि हीटर चालू केला आणि गरमागरम चहा करायला टाकला. घरात आल्यावर उबदारही वाटत होते आणि सुरक्षितही! चारचाकीच्या आमच्या पहिल्यावहिल्या अनुभवामध्ये मोलाची भर पडली होती!