उत्सव बालपणीचा

मीरा फाटक

माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत. तेच तर सांगायला बसले आहे!

कृष्णाकाठचा घाट

गाव नदीच्या दुतर्फा वसलेले. लोक नदीचे पाणी आणीत, नदीवर जाऊन कपडे धूत, पोहायला जात, संध्याकाळी नदीकाठी हवा खायला जात. त्याकाळी जनजीवन खरोखरच नदीवर अवलंबून होते. काही जुनी मंडळी तर तिला कृष्णा न म्हणता ’गंगा’ म्हणत असत. एवढेच नव्हे तर तिला देवीच मानत. प्रतापगडावर अफझलखानाचा वध झाला हे सर्वांना इतिहासातून माहीत असते. पण इतर तपशील माहीत नसतो. तर तो असा : त्यावेळी खानाचा तळ प्रतापगड/महाबळेश्वर पासून केवळ वीसेक मैलावर असणाऱ्या आमच्या वाईत होता! शिवाजी-अफझलखान भेटीत काय होणार याची सगळ्यांना काळजी लागली होती. त्यावेळी वाईतील शेंडे घराण्यातील नरसिंहभट शेंडे यांनी अनुष्ठान केले आणि कृष्णेला विनवले, "शिवबाला विजयी कर, मी तुझा उत्सव करीन."

कृष्णाबाई

तेव्हापासून वाईत हे कृष्णाबाईचे उत्सव सुरू झाले ते अजूनही चालू आहेत! हे उत्सव माघ महिन्यात सुरू होतात. नदीची म्हणजेच कृष्णाबाईची सुरेख मूर्ती असते. ती वर्षभर आळीतल्याच एका घरात असते. प्रत्येक आळीचा उत्सव असतो आणि तो चार ते पाच दिवस चालतो. उत्सवाची व्यवस्था, जमाखर्च, हिशेब, महत्त्वाचे निर्णय इत्यादी पाहण्यासाठी पंच असतात. (पंच म्हणजे ’अम्पायर’ नाहीत! ही पंच मंडळी म्हणजे ’कृष्णाबाई संस्थाना’चे कार्यकारी मंडळच.) उत्सवाचा खर्च पूर्वी फक्त आळीकरांकडून गोळा केलेल्या वर्गणीतूनच भागवावा लागत असे. आता भाविक लोक कृष्णाबाईच्या उत्सवासाठी आर्थिक मदतही करतात. वाईत एकूण सात ’आळ्या’ आहेत. त्यामुळे हे उत्सव जवळजवळ दोन महिने चालतात. नरसिंहभट शेंडे हे रामडोह आळीमध्ये राहात होते आणि आम्हीही त्याच आळीत राहात होतो. इतकेच नव्हे तर नरसिंहभटांच्या खापरखापर....पतवंडाच्या वाड्यात आमचे बिर्‍हाड होते.

आमच्या आळीची कृष्णाबाई महाशिवरात्रीनंतर तीन दिवसांनी बसते. पण त्याच्या कितीतरी दिवस आधी तयारी सुरू होते. मुहूर्तमेढ हा शब्द मला अगदी तिसरी/चौथीत असताना माहीत झाला, कारण उत्सवासाठी मांडव घालण्याची सुरुवात मुहूर्तमेढ रोवून होत असे. शिवरात्रीच्या काही दिवस आधी चांगला दिवस पाहून, एक कळक (बांबू) विशिष्ट ठिकाणी रोवून त्याची पूजा केली जात असे. नंतर सवडीने पण वेळाचे भान ठेवून मांडव घातला जात असे. ही सर्व कामे आळीकर उत्साहाने आणि घरातले कार्य समजून करत असत. कृष्णाबाईच्यासाठी देखणे मखर केले जाई. कृष्णाबाई बसते त्यादिवशी आधी तिची पालखीतून मिरवणूक काढत. पालखी संपूर्ण आळीत फिरत असे. प्रत्येक घरापुढे पालखी थांबत असे, घरातील सवाष्ण बाई कृष्णाबाईची भक्तिभावाने ओटी भरत असे आणि पालखी पुढे जात असे. असे करत करत जवळ जवळ दहा बारा तासांनी पालखी मांडवात पोहोचत असे. त्यानंतर ’मक्ता’ घेतला जायचा. (ह्या मक्त्याचा आणि गझलेतील मक्त्याचा काही संबंध असेल असे वाटत नाही!) मक्ता कुणी घ्यायचा हे कसे ठरवतात? ते फार मनोरंजक आहे. आळीतील एखादा जबाबदार माणूस स्वेच्छेने हे काम करायला सुरुवात करत असे. कृष्णाबाईपुढे आलेले ओटीचे खण, नारळ, तांदूळ, गहू, पैसे आणि इतर गोष्टी यांची साधारण किंमत काय होईल ते ठरवून तो ती जाहीर करत असे. हे सर्व सामान त्या मक्ता घेणाऱ्याला मिळणार असे. त्यानंतर अगदी बोली लावून, एखादी वस्तू किंवा वास्तू विकत घ्यावी त्या पद्धतीने हे होत असे. कुणी तरी सुरुवात करायचं आणि मग तो आकडा वाढत, वाढत जायचा. बोली जरा स्थिरावली आहे असं वाटल्यावर त्या व्यक्तीच्या नावानं, उदा: ’शंकरराव जोशी- एक वार, शंकरराव जोशी- दोन वार’ असा पुकारा केला जाई. त्यानंतरही कोणी बोली लावली नाही तर ’शंकरराव जोशी-तीSSSSSन वार’ असे म्हणून झांजांच्या खणखणाटात त्यावर शिक्कामोर्तब व्हायचे! मग शंकरराव जोशी किंवा जे कोणी असतील त्यांनी ती रक्कम कृष्णाबाई संस्थानला दिली की मक्ता घेण्याची प्रक्रिया पुरी होत असे. त्यानंतर कृष्णाबाईची प्रतिष्ठापना होई. मक्ता घेणाऱ्या माणसावर कृष्णाबाईच्या पूजेअर्चेची जबाबदारी असे. तसेच कृष्णाबाईपुढे भक्तगणांनी टाकलेले पैसे, नारळ किंवा दिलेल्या साड्या,खण ह्यातील काही भाग मक्तेदाराला मिळत असे. लहानपणी आम्हाला त्या ’एक वार, दोन वार’ याची फार गंमत वाटत असे.

पण खरी गंमत तर कृष्णाबाई बसल्यावर सुरू होई. मग रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर आम्ही मैत्रिणी घाटावर खेळायला जात असू. मांडवात खेळायला मजा येई. मांडवात काही बांबू कठड्याने जोडून इंग्रजी ’यू’ अक्षरासारखी रचना केलेली असे. त्याला ’मधलं तबक’ असं म्हणत आणि त्याबाहेरील जागा म्हणजे बाहेरचे तबक. माझ्या लहानपणी कृष्णाबाईपुढे रोज रात्री कीर्तन (आमच्या भाषेत कथा!) होत असे. पुरुषांनी मधल्या तबकात बसायचे आणि बायकांनी बाहेरच्या, असा संकेत होता. त्यात कुणालाच काही वावगे वाटत नसे. स्त्रीपुरुषसमानतेचे वारे सोडा, साधी झुळूकही तेव्हा वाहात नव्हती! मांडवात खेळून आल्यावर पुन्हा रात्री कथेला जाण्याचा कार्यक्रम असायचा. त्यातले निरूपण वगैरे काही तेव्हा कळायचे नाही. त्यामुळे पूर्वरंग कंटाळवाणा व्हायचा पण त्या वेळात मैत्रिणींशी काही तरी खुसुखुसू चालायचे आणि मजा यायची. पूर्वरंग संपल्यावर मध्यांतर किंवा दूरचित्रवाणीच्या भाषेत ’थोडी विश्रांती’. त्या मधल्या वेळात कोणी होतकरू गायक-गायिका एखादे गाणे म्हणत. त्यानंतर सर्वजण कृष्णाबाईचे पुढील भजन म्हणत:

स्फटिकविमलजलदायिनी
श्रीकृष्णे अघमलहरिणी
महाबळेश्वरनंदिनी
दीर्घ-आयुरारोग्यखनी

भजन झाले की उत्तररंग सुरू होई. त्यात बुवा कुणाचे तरी आख्यान लावत. पण आमच्या दृष्टीने मात्र ती केवळ एक गोष्ट असे. अर्थातच गोष्ट ऐकायला आवडायचेच. त्यावेळी काही श्रीमंत घाटांवर गोविंदस्वामी आफळे यांचीही कीर्तने होत (गरीब आळ्यांना आफळेबुवांची बिदागी परवडत नसे!) आणि ती त्यांनी राजकारण्यांवर परखड भाषेत केलेल्या टीकेमुळे चांगलीच गाजत. त्यांनी लावलेली, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके अशांची आख्याने ऐकताना अगदी स्फुरण चढत असे!