मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
त्या चार पाच दिवसात एखाददुसऱ्या दिवशी, शक्यतो मंगळवार, शुक्रवार या दिवशी, बायका हळदीकुंकू करीत. बरेच लोक आपल्या सवडीनुसार कृष्णाबाईला नैवेद्यही करीत. शेवटून दुसऱ्या दिवशी ’प्रेजन’ असे. म्हणजे सर्व आळीला जेवण असे. (’प्रेजन’ शब्दाची व्युत्पत्ती मला माहीत नाही. कुणीतरी सांगितले, तो ’प्रयोजन’ शब्दाचा अपभ्रंश आहे. पण मला मात्र भोजनाच्या कार्यक्रमात प्रयोजनाचे काय प्रयोजन हे अजूनपर्यंत कळलेले नाही!) आळीतले लोकच स्वयंपाक करत. आम्ही मुलीही त्यात लुडबूड करत असू. त्यात एखादी, दुसऱ्या गावाहून वाईला सासरी आलेली नवविवाहिता असेल आणि त्यातून ती ’गोरी गोरी पान, फुलासारखी छान’ असेल तर आम्ही शाळकरी मुली तिच्याभोवती ’वहिनी, वहिनी’ करत घोटाळत असायचो. प्रेजनाला सगळी आळी लोटत असे. मांडवात पंक्ती बसत. बादल्या, वेळण्या यांच्यातून पदार्थ वाढले जात. पूर्वी जेवणाचा बेत साधाच असायचा. वरणभात, आमटी, वांगी-बटाटा रसभाजी, त्या भाजीत आदल्या दिवशीच्या हळदीकुंकवाच्या वेळी ओटीसाठी आणलेले हरभरेही असत. गोड म्हणून बहुतेक वेळा गव्हाची खीर किंवा शिरा असायचा. हल्ली मात्र जिलबी, लाडू असेही पदार्थ असतात. पण आमच्या आळीच्या प्रेजनातला हुकमी एक्का म्हणजे आमटी! रामडोह आळीची आमटी सबंध वाईत प्रसिद्ध होती आणि अजूनही आहे. तशा चवीची आमटी मी अजूनपर्यंत दुसरीकडे कुठेच खाल्ली नाही! आमच्या आळीतल्या बायका पूर्वी सांगत की त्या आमटीच्या मसाल्याच्या फक्त दोन याद्या आहेत, एक यादी आपल्या पंचांजवळ आणि दुसरी एका किराणामालाच्या दुकानदाराजवळ! तो दुकानदार रामडोह आळीतला नसूनही ती यादी तो ’फोडत’ नसे. त्याच्या ह्या प्रामाणिकपणाचे मला विशेष वाटत असे! जेवणात चटण्या, कोशिंबिरी फारश्या नसत. म्हणजे प्रेजनाच्या स्वयंपाकात त्या केल्या जात नसत. पण आळीतले लोकच आपली हौस म्हणून म्हणा किंवा तेवढंच आपलं उत्सवात योगदान म्हणून म्हणा घरून कोशिंबिरी करून आणत. दुकानदार लोक स्वयंपाकासाठी तेल, तूप, गुळाच्या ढेपा हेही देत.
शेवटच्या दिवशी कृष्णाबाईची रथातून मिरवणूक निघत असे. ती तर पर्वणीच!हा रथ जगन्नाथाच्या रथाप्रमाणेच माणसे ओढत आणि अजूनही ओढतात. शिक्षण किंवा नोकरीनिमित्ताने परगावी गेलेली मुले काहीही करून रथाच्या दिवशी वाईला येतच! त्यावेळी सर्व वातावरणच भारल्यासारखे होत असे. आम्हीही रथाबरोबर शक्य तेवढे अंतर जात असू. रथ गावातून फिरत असताना दोन्ही बाजूला असलेल्या घरातून लोक रथावर शेंगा, रेवड्या उधळत. त्या रस्त्यावरच्या शेंगा, रेवड्या आम्ही वेचून खात असू. आता आठवले की कसेतरीच वाटते! शेंगांचे एक वेळ ठीक आहे. त्या टरफले काढून खायच्या असतात पण रेवड्या?! पण तेव्हा कधी त्यामुळे कुणाचे पोट बिघडल्याचे काही आठवत नाही! रथाचा मार्ग ठरलेला असे. आळीतील प्रत्येक घरासमोर तो थांबे. तेव्हा पुन्हा बायका कृष्णाबाईची ओटी भरत. रथाच्या वेळी कृष्णाबाईची पहिली ओटी भरण्याचा मान एका जोशी नावाच्या कुटुंबाचा आहे. तर शेवटची ओटी भरण्याचा मान नरसिंहभट शेंड्यांच्या वंशजांचा आहे. एकदा शेंड्यांनी रथाची ओटी भरल्यावर दुसऱ्या कुणालाही ओटी भरता येत नाही. संध्याकाळी निघालेला रथ जवळजवळ अर्ध्या गावातून फिरून रात्री दोन अडीचपर्यंत परत येत असे. रथ ठिकाणावर पोहोचला की पुन्हा सगळे मांडवात जात. तिथे ’लळिताची कथा’ होत असे आणि ती संपता संपताच मखराचे कागद फाडल्याचा फट्फट्फट्फट आवाज ऐकू येई. कारण सूर्योदयाच्या आत मांडव उतरला गेला पाहिजे असा अलिखित नियम होता.
सर्व घाटांवर थोड्याफार फरकाने अशाच तर्हेने उत्सव होत असत आणि अजूनही होतात. पण तरी प्रत्येक आळीचे आपले असे वैशिष्ट्य आहेच. सर्व आळ्यांच्या कृष्णाबाईची प्रतिष्ठापना रात्री होते पण आमच्या आळीतल्या नरसिंहभटांनी उत्सव सुरू केले, त्याचे स्मरण म्हणून आमच्या आळीची कृष्णाबाई दिवसा बसते. तसेच फक्त मधल्या आळीच्या कृष्णाबाईची मूर्ती बसलेली आहे, बाकी सर्व उभ्या आहेत. ब्राह्मणशाहीत कृष्णाबाई नसते तर मुरलीधर असतो. कृष्णाबाई उठताना रथातून मिरवणूक फक्त रामडोह आळीचीच असते. रथात कृष्णाबाईबरोबरच गरुडाची सुबक आणि गोजिरवाणी मूर्ती असते. गरूड नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. कृष्णाबाईला लोक साड्या देतात तशा गरुडाला कुंच्या देतात. ह्या साड्या-कुंच्यांचा नंतर लिलाव होतो. लेकुरवाळ्या बायका गरुडाची कुंची विकत घेऊन श्रद्धेने आपल्या बाळाला घालतात.
![]() |
गरूड |
माझी शाळा संपल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी वाई सोडली. मग नोकरी, लग्न यामुळे वाई सुटली ती सुटलीच. पण तरीही आईवडील, बहिणी तिथे असल्याने अनेकदा वाईला जाणे व्हायचे. पण उत्सवाच्या दिवसांत मात्र कधी जाणे झाले नाही. तरी पण त्याबद्दल बहिणींकडून कळत असे. बदलत्या काळानुसार उत्सवाचा आकृतीबंधही थोडाफार बदलला आहे. पूर्वी मनोरंजन, प्रबोधन हे लोकांना फक्त कीर्तनातूनच मिळायचे. आता कीर्तने फारशी नसतात पण निरनिराळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची व्याख्याने असतात. प्रथितयश कलाकारांचे कार्यक्रम असतात. विविध स्पर्धा असतात. बहुतेक स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी खुल्या असतात. शिवाय कृष्णाबाईच्या साड्यांचा लिलाव, धनिकांनी ’कृष्णाबाई संस्थान’ला दिलेल्या देणग्या इत्यादीमधून मिळालेल्या पैशाचा विनियोग सामाजिक कार्यासाठीही केला जातो
![]() |
कृष्णाकाठचा घाट |
सध्याची प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी ही जेव्हा शाळकरी विभावरी आपटे होती तेव्हा तिने कृष्णाबाई उत्सवातील अशाच एका गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि पहिले बक्षीस मिळवले होते. विभावरीची आठवण गोड आहे पण एक कटू आठवणही आहे. भक्ती बर्वे हिला एक कार्यक्रम करायला बोलावले होते. कार्यक्रम रात्री होता, तो झाला आणि ती वाईहून मुंबईला परत जात असताना तिच्या गाडीला अपघात होऊन त्यात तिचा मृत्यू झाला! भक्ती बर्वेसारख्या कलावंताच्या मृत्यूने सर्वच मराठी रसिक हळहळले पण हे आपल्या इथून ती जाताना झाले याचेही वाईकरांना दु:ख झाले! त्या आळीच्या लोकांनी दुसऱ्या दिवशीचा प्रेजनाचा कार्यक्रम रद्द केला. ज्यांनी ’सरगम’ चित्रपट पाहिला आहे त्यांना त्यातील ’रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी’ हे गाणे आठवत असेल. त्या गाण्याचे चित्रीकरण वाईत, आमच्या रामडोह आळीत झालेले आहे. इतकेच नव्हे तर त्यातील रथ हा आमच्या आळीच्या कृष्णाबाईचा रथ आहे! ’सरगम’कारांनी तो रथ आम्हाला सुंदर रंगवून दिला पण त्यात आमच्या लहानपणची एक छान गंमत नाहीशी झाली! रथ आधी ज्यांनी रंगवला होता त्या बाबुराव पेंटरांनी आपले नाव ’बाबुराव पेंटर, वाई’ असे रथावरील पानाफुलांच्या वेलबुट्टीत बेमालूमपणे गुंफले होते आणि ते शोधून काढणे हा आमचा खेळ होता, तो आता उरला नाही!
तर असा तो बालपणीचा उत्सव! काळानुरूप आता त्यात बरेच बदल झाले आहेत. ते स्वागतार्हही आहेत. पुढील काळात आणखीही बदल होतील. पण इतक्या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट मात्र कायम राहाणार आहे. ती म्हणजे हे उत्सव!