मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
पाचवा दिवस केशरी, पण रविवारच्या सुट्टीत बुडाला. सहावा दिवशी पांढरा रंग. पावित्र्य, मांगल्य आणि साधेपणाचे प्रतीक असलेल्या ह्या रंगाच्या सजावटीत जिंकले ते गणपती बाप्पांचा देखावा साकारणारे कार्यासन. पांढर्या शिंपल्यांचा बाप्पा, बाहेरून हलवा लावून पांढरी केलेली फुलदाणी, पांढरी सजावट, पांढरा प्रसाद आणि पांढऱ्या कागदावर डकविलेली चित्रे व महत्त्व सांगणारे शब्द.
![]() |
सातवा दिवस लाल रंगाचा!
![]() |
![]() |
विजेत्या सजावटीने सर्वांचीच मने जिंकून घेतली. वाहतूक नियंत्रकाचा दिवा ’थांबा’ अशी सूचना देतो तर लाल बावटा वा लाल दिवा धोका दर्शवितात. नेमका याच बोधरंगाचा वापर ‘भ्रष्टाचाराचा देशाला असलेला धोका आणि तो थांबविण्याची तातडीची गरज’ सूचित करण्यासाठी केला गेला होता. देवी हे शक्तिचे, असूरदमनाचे प्रतीक म्हणून जीभ बाहेर असलेल्या रौद्ररूप देवीच्या गळ्यात तिने मारलेल्या दैत्यांऐवजी राजा, कणीमोळी, दाऊद, लादेन, कसाब, अबू सालेम अशा दमनयोग्य पात्रांच्या मुंडक्यांनी बनविलेली माळ दाखविली होती. कार्यासनावर ठेवलेल्या पांढऱ्या टोपीवर लाल रंगाने ’मी अण्णा हजारे’ असे शब्द लिहिले होते.
शेवटचा म्हणजे आठवा रंग जांभळा.
![]() |
दोन तिथींचा एक दिवस आल्याने नऊ ऐवजी आठ दिवस होते आणि दहावा रंग दसऱ्याचा पण त्या दिवशी सुट्टी. जांभळ्या रंगाचा काही खास प्रतीकात्मक देखावा करता येण्याजोगा नव्हता. तरीही या समारोपाच्या दिवशी जिंकली तीते दैनंदिन जीवनातील जांभळ्या वस्तूंचा वापर केलेली सजावट. गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत! त्यामुळे बाप्पांच्या बाजूला शाईच्या कुप्या होत्या, खाण्यातली भाजी म्हणुन वांगे होते, तबकात सर्वांची लाडकी कॅडबरी होती, तर बाजूला जांभळे प्रकाशकिरण देणारा लेझरदीप होता.
केवळ कर्मचाऱ्यांना एक विरंगुळा, रोजच्या कामात थोडा वेगळेपणा आणि त्यांतून त्यांचे निर्माण होणारे भावनिक बंध या प्रयोजनाने योजलेल्या या स्पर्धेने आम्हाला बरेच काही दिले. कल्पकतेचे दर्शन तर घडलेच पण त्याहूनही दिसून आली ती संघभावना आणि सामाजिक बांधिलकी. निरनिराळ्या विभागात निरनिराळ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जी काही निर्मितीमूल्ये आणि सर्जनशीलता दाखविली ती कौतुकास्पद होती. ही जरी वैयक्तिक स्पर्धा असली तरी संकल्पना, साहित्य व प्रत्यक्ष कृती यात अनेकांनी आपल्या विभागातल्या कर्मचाऱ्याला वा आपल्या मित्र-मैत्रिणीला उत्स्फूर्त मदत केली. याच वेळी घडले ते सामाजिक बांधिलकीचे दर्शन व पर्यावरणविषयक आस्थासुद्धा. लाल रंगाची सजावट करताना एकाने संपूर्ण कार्यासन पांढऱ्या कागदाच्या पार्श्वभूमीवर लाल कागदाचे रक्ताचे लाल बिंदु दाखविले होते आणि कार्यासनावर गुलाबाच्या फुलांचा गुच्छ ठेवून ’जर तुम्ही रक्तदान करीत असाल तर यातले एक फूल घ्या.’ असे लिहून रक्तदानाचा संदेश दिला होता.
![]() |
राखाडी रंगाच्या सजावटीत तर पर्यावरणाचे रक्षण न केल्यास या पृथ्वीची राख होईल असा संदेश दिला होता.
![]() |
हिरव्या रंगाच्या सजावटीत अनेकांनी पर्यवरणाचे भान राखण्याचा संदेश दिला होता. अनेकांनी रोज सजावट करुनही पारितोषिक मिळाले नाही तरी निरुत्साही न होता, वा कुणाला दोष न देता चिकाटीने सर्वच्या सर्व नऊ दिवस भाग घेतला व अखेर सातत्याचे पारितोषिक मिळविले. चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते हे दाखवून दिले. याच नवरात्रीने आम्हाला समतेचे व भेदरहित समाजाचे रूप दाखविले. आमच्या कचेरीत नवरात्र हा केवळ हिंदूंचा सण नव्हता तर त्यात ख्रिस्ती व मुसलमानही उत्साहाने सामील होते. रोजच्या चित्रणप्रसंगी महाव्यवस्थापकापासून ते आमच्या कर्मचारी नसलेल्या पण आमच्या सेवा पुरवठादार असलेल्या, मूळ स्वच्छता व सेवा विभागाची कर्मचारी, परंतु आमच्या कचेरीत कार्यरत असलेल्या मुलींपर्यंत सर्वजणी एकत्र उभ्या होत्या. भेदभावाला इथे थारा नव्हता. कुणी उत्साही मुलींनी ही चित्रे फेसबुकावर टाकताच ’निदान यासाठी तरी आम्हाला तुमच्या आस्थापनेत असावेसे वाटते’ अशा प्रतिक्रिया बाहेरच्या परिचितांकडून आल्या, तर ’असे चित्र पाहिल्यावर आम्हाला आमचे इथले दिवस आठवले’ अशा माजी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या.
नवरात्रीच्या निमित्ताने आम्हाला हे अनेक पैलू दिसून आले. परंपरा आणि ’कॉर्पोरेट विश्व’ यांचा हा अनोखा संगम नक्कीच सुखदायक आहे.