मनोगत
दीपावली २०११. वर्ष ५ वे.
राजीनामा
"काय सांगावं रे! आलो असतो, पण काय करणार? बायकोचं आवरत नाही. " देवदत्त काहीसा त्रासिकतेने समीरला म्हणाला.
" तुझं हे नेहमीचंच हं! कुठे परिवाराला घेऊन जायचं म्हटलं की एक तर तुला काम असतं, नाही तर तुझ्या बायकोचं कारण देतोस. चल ना! बऱ्याच दिवसांनी सगळे जमलेत, जाऊ या बरोबर! " समजावणीच्या सुरात समीर म्हणाला.
“ मला नाही जमणार रे! तुम्ही जा सांगितलं ना, तुमच्या बरोबर यायला मला आवडत नाही अस वाटतंय का? पण मी तरी काय करू? जा तुम्ही! माझ्या मुळे तुम्ही नका अडकून राहू." असे म्हणून देवदत्त उठून आपल्या कार्यालयीन कक्षाकडे वळला. समीर थोडा नाराजच दिसत होता. काय करावे असा विचार करत असताना त्याच्या टेबलावरचा फोन खणखणला.
" हॅलो! हं कोण? कोतवाल! नमस्कार साहेब, बोला! ..... काय? उद्याचं!.. हो ऽऽ पक्कं आहे... निघू साडेसहा- सातला...... हो सगळे तयार आहेत, गाडीदेखील सांगून ठेवली आहे. ठीक आहे तुम्हाला आम्ही घरुनच पिकअप करू.. काय?..... नाही त्याला जमणार नाही म्हणाला..... हे आपण काय सांगणार? जाऊ दे. आपण निघू सगळे.... बघा प्रयत्न करून आलाच तो तर आनंदच होईल सगळ्यांना.... नक्की नक्की.. काही बदल झाला तर कळवेन होऽऽ हो! निघतोय आता. आज लवकर निघणार आहे... शिंदेंना सांगितलं आहे तसं. ते तेवढं पत्र पाठवतील. ठीक आहे ठेवू फोन?"
फोनवर ठरवल्या प्रमाणे गाडी सहाला आली पण ती कोतवालांच्या घरी न येता देवदत्तच्या घरी आली. देवदत्त सगळ्यांना स्वागतासाठी सामोरा गेला. सगळे गाडीतून खाली उतरले, देवदत्तच्या घरी चहा पाणी घेतले आणि पुन्हा गाडीत बसून दुगारवाडीच्या धबधब्याकडे रवाना झाले. ठरल्याप्रमाणे सहल सुंदर झाली. सगळ्यांनी मनमुराद सहलीचा आनंद लुटला. अगदी देवदत्त आणि त्याच्या परिवाराने पण मनमुराद आनंद लुटला. कोतवाल मात्र सह’कुटुंब’ न येता त्यांच्या पुतणीला घेऊन आले होते. सगळ्यांना हे कोडे काही केल्या सुटत नव्हते. पण काही असो, दिवस बाकी छान गेला होता.
एक दिवस मध्ये रविवार, लगेच दुसऱ्या दिवशी कार्यालयात दोन गोष्टींची चर्चा होती. पहिली सहलीची आणि दुसरी देवदत्तची. कारण देवदत्त नाही म्हणत असतांना ऐन वेळेस कोतवालांनी अशी काय जादू केली की देवदत्त आपल्या परिवारासह सहलीचा आनंद लुटायला हजर होता. काहीच समजत नव्हते. एक-दोन लोकांनी धिटाई करून कोतवाल साहेबांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनीही उडवून लावले. बरे, देवदत्तला विचारले तर येत्या काही दिवसात कळेल म्हणाला. समीरला पण त्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या, तर बाकीच्यांना काही सांगण्याचा तर प्रश्नच कुठे येत होता.
मध्ये आठ, दहा दिवस असेच कामात निघून गेले . सहलीचा विषय आता जुनाच झाला होता. जो सहलीला नाही आला त्याला सहलीची मजा चघळून सांगणे मागे पडले होते. जो तो आपल्या कामात व्यग्र होता. बाकी एवढ्या कामाच्या व्यग्रतेत एक बदल मात्र सगळ्यांना जाणवत होता आणि तो म्हणजे देवदत्तमधील बदल. हल्ली तो कामात जास्त रमायला लागला होता. त्याची थोड्या थोड्या कारणाने होणारी चिडचिड खूपच कमी झाली होती. हे जेंव्हा कोतवालांना कळले तेंव्हा ते फार आनंदी झाले. ह्या आनंदात त्यांनी आपल्या कार्यालयातील सगळ्यांना येत्या रविवारच्या चहापानाचे आमंत्रण दिले.
तसे कोतवालांचे व्यक्तिमत्त्व आनंदी, अगदी खेळकर होते. एकदम मोकळे व्यक्तिमत्त्व असलेला माणूस. वेळ प्रसंगी कोणाच्याही मागे उभा राहणारा. तसे कोतवाल सहा महिन्यांपूर्वीच कंपनीत रुजू झाले होते. घरची शेतीवाडी भरपूर. चांगले सेंट्रलला होते मोठ्या हुद्यावर. पण मध्यंतरी त्यांची बदली हरिद्वारकडे झाली. एक- दोन महिने रुजू पण झाले. तब्येतीसाठी बदली करण्याचे पण प्रयत्न केले, पण नाहीच म्हटल्यावर सरळ राजीनामा दिला आणि इकडे आले ते कायमचेच. त्यामुळे कोतवालांबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती आणि त्यात आमंत्रण होते म्हटल्यावर सगळेच वाट पाहत होते रविवारच्या संध्याकाळच्या साडेपाचाची.
झाले म्हणता म्हणता रविवार आला. एखाद्या माणसाबद्दल उत्सुकता असणे हे समजता येते. पण, त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल एवढी उत्सुकता असणे म्हणजे त्याला माणूसही तसाच असावा लागतो. सगळ्यांत मिसळणारा. म्हणूनच की काय पेंडसेंचा फोन शिंदेंना, शिंदेंचा पाटलांना, अशी फोनाफोनी सुरू झाली आणि सगळे जण एकत्र कोतवालांच्या घरी जमले. प्रसन्न मुद्रेने कोतवालांनी सगळ्यांचे स्वागत केले.
सगळे बैठकीच्या खोलीत जमा झाले. बैठकीच्या खोलीची सजावट म्हणावी तशी काही फार नव्हती. बैठकीच्या खोलीत प्रवेश करतांच समोरच्या भिंतीवर स्वामी रामकृष्णपरमहंस, स्वामी विवेकानंद यांचे फोटो आणि ह्या दोघांच्या मधोमध दोन राजहंसांची चित्रे लावलेली दिसत होती. एक बसलेला आणि दुसरा फडफडत उडण्याच्या तयारीत असलेला. एका कोपऱ्यात एक दिवा, जवळच एक तिपाई, त्यावर एक मनी प्लांट. बाकी बसायला म्हणून भिंतीच्या कडेला ओळीने भारतीय बैठक. छान पांढर्या शुभ्र तक्क्यांवर भरतकाम केलेले आभ्रे. सुरेख ओळीत मांडून ठेवल्यामुळे छान दिसत होते. बाजूलाच स्वयंपाक घर असावे कारण तिथे वस्तू देण्याघेण्यासाठी एक छोटीशी खिडकी होती.
एवढ्यात "देवदत्त! " असा आवाज आला. समीर तिकडे पाहतो तो देवदत्त त्या छोट्याश्या खिडकीतून पाण्याने भरलेल्या पेल्यांचे तबक उचलत सगळ्यांच्या मधोमध ठेवून परत खिडकीजवळ पोहचणार होता. एवढ्यात कोतवाल साहेबच हातात चहाचे दोन मोठे थर्मास, चहा घेण्याच्या मगांसह दाखल झाले. पाठोपाठ एका तबकात बिस्किटे घेऊन कोतवालांची पुतणीही आली. पण, जशी आली तशी झरकन एखादे फुलपाखरू उडावे तशी माघारी गेली सुद्धा.
" काय शिंदे? एकटेच? " काही तरी विषयाला तोंड फुटावे म्हणून, " दोघं येणार असं ठरलं होतं ना? " देवदत्तने विचारले.
" नाही, येणार दोघंच होतो, पण ऐनवेळी जरा पाहुण्यांनी घोळ केला. " शिंदे म्हणाले.
" अहो चालायचंच! या सगळे आपण पहिले चहा घेऊ, आणि सावकाश चहा घेता घेता गप्पा मारु. बाकी स्वंसेवा (सेल्फ सर्व्हिस)चालेल ना! " कोतवालांनी सगळ्यांना विचारले, विचारले काय जवळ जवळ सुचवलेच. मग प्रत्येक जण चहा घेता घेता थोडा सैल झाला.
" बाकी कोतवाल साहेब चहापानाचं प्रयोजन नाही कळलं? " पाटलांनी चहाची गुळणी गिळत विचारले.
"कसलं आलंय प्रयोजन! अहो सहलीला जाऊन भरपूर दिवस झाले. म्हटलं पुन्हा एकदा जमायला काही तरी कारण हवं, म्हणून! बाकी काही नाही. " कोतवाल सहजतेने बोलले.
मग गप्पाटप्पा रंगल्या, हास्य विनोद घडले. दोन तासांत कार्यक्रमाची सांगता झाली. कोतवालांनी चहाचे मग, रिकामे थर्मास, बिस्किटांचे तबक त्या छोट्याश्या खिडकीत व्यवस्थित ठेवून दिले. चहापानाची सांगता झाली. " मी थांबतो सर! " देवदत्त म्हणाला. "नाही, एवढं थांबण्यासारखं काही नाही. " कोतवाल म्हणाले आणि चहाचे तबक आणि इतर वस्तू आतल्या खोलीत ठेवण्यासाठी आत वळले.
आता मात्र देवदत्तला सगळ्यांनी गराडा घातला. " काय रे! कोतवाल साहेब काहीच बोलले नाहीत?" शिंदेंनी उत्सुकतेपोटी विचारले.
" कशाबद्दल?" देवदत्त शांत पणे म्हणाला.
"आता तेही आम्हीच सांगायचं? घ्या! " पेंडसेंनी आपला ठेवणीतला स्वर लावत टिप्पणी दिली.
"इथून निघाल्यावर आपण एखाद्या उपाहारगृहात बसू. आता हा विषय इथे पुरे! " कोतवालांना पाहत घाई घाईने देवदत्त म्हणाला.
मग निघायचे म्हणून सगळ्यांनी कोतवालांचा निरोप घेतला आणि बंगल्यातून बाहेर पडले.