राजीनामा

आलोक जोशी

उपाहारगृहात सगळे एका वर्तुळाकार टेबलाभोवती गोळा झाले.

"हं! आत्ता बोल देवदत्त! " अधीरतेने समीर म्हणाला.

मध्येच काही हवे का विचारायला म्हणून उपाहारगृहाचा नोकर येऊन गेला.

" नंतर मे बुलाता है! " म्हणत पाटलांनी त्याला कटवले आणि सगळे समीरकडे बघायला लागले.

देवदत्त शांततेने म्हणाला, " आज जे आपण कोतवालांकडे चहा-पाण्याला जमलो होतो, ते एका विशिष्ट उद्देशाने. पण, तो उद्देश आपला होता. त्यात कोतवाल साहेबांचा हेतू काहीही नव्हता. केवळ आपण पुन्हा एकदा एकत्र येऊन एकमेकांत वेळ घालवावा एवढाच उद्देश होता. "

मध्येच त्याला तोडत उसळून पेंडसे म्हणाले, " प्रस्तावना खूप झाली. आता पुढचं बोला! "

" थांबा हो! " पेंडसेंना सावरत पाटील म्हणाले.

" मित्रांनो, " सावरत देवदत्त म्हणाला, " कोतवाल साहेब आपल्याकडे सहा महिन्यांपूर्वी रुजू झाले हे तर आपण जाणतोच. माझा चिडचिडा स्वभाव आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा. त्या दिवशी मी सहलीसाठी समीरला नकार दिलेला आठवत असेल सगळ्यांना. पण, अर्ध्या तासात मला कोतवाल साहेबांचा फोन आला की ते स्वतः माझ्या घरी पाच वाजता येणार आहेत म्हणून. आपल्याला परिवारासकट जायचंय. मी येतो तू तयार राहा म्हणाले, आणि तो गृहस्थ चक्क पहाटे पाचला घरी हजर! त्यांच्या येण्याने आम्ही उठलो असं म्हणा हवं तर! घरात आल्यावर सगळ्यात पहिले ह्या माणसाने काय केलं असेल माहित आहे? "

"काय? " बोलायच्या ओघात शिंदे पटकन म्हणाले, आणि आता पाळी पेंडसेंची होती. त्यांनी शिंदेंकडे रागाने पाहिले. शिंदे मनोमनी थोडे लाजले, मग देवदत्तकडे बघायला लागले.

देवदत्तने तोच धागा पकडून पुढे सांगायला सुरवात केली, "ह्या माणसाने चक्क आम्हाला कपड्यांच्या घड्या घालायला मदत केली. बायको नको म्हणाली, तर ’तुम्ही तुमचं आटोपा! मी आणि देवदत्त आवरतो' म्हणाले. मलाच लाजल्यासारखं झालं. मी जलदगतीने माझं सगळं आवरलं. बायकोने अंघोळ केली होती. तिने पटकन गॅस पेटवून चहा टाकायला घेतला. तर ते म्हणाले चहा टाकतांना सगळ्यांचाच टाका. नाही तर थांबा, मी करतो ते. तुम्ही मुलांचं आवरा, फक्त चहा साखर आणि इतर वस्तू दाखवा, म्हणत हा महाशय माझ्या स्वयंपाकखोलीत शिरला सुद्धा. ह्या माणसाने चहा तयार करून थर्मास मागवून त्यात भरूनदेखील ठेवला आणि परत दिवाणखान्यात हजर. मग आम्हीही फटाफट आवरलं. बायकोने परत एकदा स्वयंपाकगृहाकडे काही बरोबर घेण्यासाठी मोर्चा वळवला, तर हा माणूस लगेच पाकीट हाताने काढत म्हणाला ' अं हं! बाकी आवरा आता. न्यायचे जिन्नस मी माझ्याबरोबर तुमच्यासाठी वेगळे आणलेत.' पुन्हा अवाक होण्याची पाळी. बरोबर ती चिमुरडी आली होती आठवते ना?"

" हं! " करत पेंडसेंनी दुजोरा दिला.

पुढे चालू ठेवत देवदत्त म्हणाला, " ती त्यांची पुतणी, तिने तर माझ्या मुलाशी छान गट्टी जमवली. आपण सगळे आलात, चहा घेतला, बाहेर पडलो. पुढे सहल झाली आणि घरी परतत असतांना ती छकुली माझ्या घरी राहिली. आता मुलांची गट्टी जमली होती आणि नेमका दुसऱ्या दिवशी रविवार होता. तीही राहते म्हणाली. कोतवाल साहेब नाही म्हणत होते, पण माझ्या बायकोने ठेऊनच घेतले. बरं सकाळी मी घ्यायला येतो असं ते म्हणाले, पण त्या अगोदरच सकाळी तिने लवकर आवरलं आणि मग घरी जाण्याचा हट्ट करु लागली. मग मीही कोतवाल साहेबांना त्रास नको म्हणून मुलीला घरी सोडायला गेलो. त्या वेळेस सकाळचे आठ वाजले असतील. मी बंगल्यात प्रवेश केला पण साहेबांची भेट काही होऊ शकली नाही. थोडं विचित्र वाटलं. मी मुलीला तिथेच सोडली आणि बाहेर आलो. रस्त्यावर येऊन मी माझ्याशीच पुटपुटत होतो, ’काय माणूस आहे!’ वगैरे. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एक बाईने माझं वाक्य ऐकलं आणि ती थांबली. माझ्याकडे पाहत ती म्हणाली, 'काय झालं? ' मी ’काही नाही’ म्हटल्यावर ती म्हणाली, ’अहो तुमची वेळ चुकली. कोतवालांसारखा माणूस दिसायला योग लागतो आणि तो नवरा म्हणून असायला भाग्य.' ’म्हणजे? ' मी सहज उद्गारलो. तेव्हा त्या बाईने जी हकीकत सांगितली ती थक्क करण्याजोगी होती. ह्या माणसाची बायको अधू (अपंग) आहे. लहानपणी तिला थंडी ताप आला की काय, त्या बाईचे हात पाय पिळले गेले आहेत. हे लग्नाअगोदरपासून कोतवाल साहेबांना माहीत होतं. वडिलांनी परस्पर लग्न ठरवलं, ह्यांनीही होकार दिला. बरं, मुलगी अधू आहे म्हणून ठरवतांना सांगितल पण होतं, पण एका विशिष्ट ध्येयापायी ह्या माणसाने लग्न केलं. सकाळी घरून निघतांना त्यांची अंघोळ-पांघोळ, व्यवस्थित कपडे बदलून, स्वयंपाक करून, आपला डबा भरून, ह्या दोघींचे जेवणाचे टेबलावर ठेऊन, मग ते कार्यालयात येतात. हा नित्यक्रम अव्याहतपणे लग्नापासून चालू आहे. मला माझीच लाज वाटली. मी घरी आलो, तास दीडतास शांत बसून होतो. विचार करत होतो. जगात अशीही माणसं आहेत, जी स्वतःची व्यथा कधी बाहेर पडू देत नाहीत आणि दुसऱ्याच्या व्याधीवर औषध शोधत असतात. माझी विचार करण्याची पद्धतच बदलली. आज सुद्धा त्यांच्या बायकोला दवाखान्यात ठेवलं आहे, कारण ती डोक्यावर पडली. हे मला काय माहित, तर मी नेमका चार वाजता काही मदत होईल म्हणून गेलो तर त्यांना दवाखान्यात नेण्याची तयारी चालू होती. मी कोतवाल साहेबांना चहापानाचा कार्यक्रम रद्द करू म्हणून म्हणालोदेखील. पण अजून दोन तास आहेत, तेव्हा कशाला रद्द? म्हणत गेले. "

दुसऱ्या दिवशी कोतवाल साहेब येतील म्हणून सगळे कोतवाल साहेबांची वाट पाहत होते पण साहेब काही आले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी त्यांचा राजीनामा तेवढा आला.

लेखकाची टीप : सदरहू पात्र मी अनुभवले आहे. कथेसाठी त्यात नावाचे व इतर बदल करण्यात आले आहेत.