बिनडोक संस्कृती

मिलिंद फणसे

बिनडोक संस्कृती
कार्ल बर्नस्टाइन ह्यांच्या "धी इडियट कल्चर”(१९९२) ह्या लेखाचा अनुवाद

अनुवादकाची नोंद : १९९२ साली कार्ल बर्नस्टाइनने रेखाटलेले अमेरिकी वृत्तसंस्था, माध्यमसंस्था, व पर्यायाने अमेरिकी संस्कृती ह्यांचे हे शब्दचित्र भारतातील सद्यस्थितीस चपखलपणे लागू होते असे वाटल्यामुळे हा अनुवाद-प्रपंच.

बिनडोक संस्कृती

वॉटरगेट प्रकरणाने सुरू झालेल्या व रिचर्ड निक्सनच्या राजिनाम्याने संपलेल्या नाट्यमय घटना होऊन आता उणीपुरी वीस वर्षे होऊन गेली आहेत. ह्या वीस वर्षांच्या काळात अमेरिकी प्रसार माध्यमे त्या प्रकारातील त्यांच्या योगदानाविषयी विचित्र आत्मस्तुती करताना, व बचावात्मक पवित्रा घेताना दिसली. ही आत्मस्तुती अनाठायी असली तरी त्यांचा बचावात्मक पवित्रा मात्र दुर्दैवाने योग्यच आहे. अमेरिकी प्रसारमाध्यमांत दाखवली जाणारी अमेरिका अधिकाधिक प्रमाणात आभासी व भ्रामक आहे--विद्रूप, खोटी, आणि आपल्या आयुष्यापासून तुटलेली आहे. अमेरिकी जीवन दाखवताना माध्यमे सातत्याने व नवनवीन पद्धतीने चुकत असतात. त्यांचे वार्तांकन धेंडांनी, धेंडांच्या पूजनाने, आणि सनसनाटी व कुटाळक्यावजा निकृष्ट बातम्यांनी विकृत झाले आहे; समाजाच्या खर्‍या अवस्थेस विन्मुख झाले आहे. वृत्तपत्रे, इतर माध्यमे, राजकारणी, व आपण सारे, राजकीय व सामाजिक चर्चेला गटाराचे स्वरूप आणत आहोत.

पुन्हा वॉटरगेटकडे वळू. त्यात विशेषत: वृत्तपत्रांसाठी एक बोध आहे. वीस वर्षांपूर्वी, १७ जून १९७२ रोजी, मी व बॉब वूडवर्ड वॉशिंग्टन पोस्टसाठी वॉटरगेट प्रकरणाचा शोध घेऊ लागलो. कोलंबिया स्कूल ऑफ जरनॅलिझमनुसार वॉशिंग्टन डि.सी.मध्ये त्यावेळी साधारण २००० पूर्णवेळ पत्रकार कार्यरत होते. पहिल्या सहा महिन्यात अमेरिकी वृत्तसंस्थांनी त्या २०००तील केवळ १४ जणांना ह्या बातमीवर पूर्णवेळ कामाला लावले, आणि त्या १४पैकी "शोध-पत्रकारिता" करणार्‍या पत्रकारांची संख्या होती केवळ सहा. म्हणजे पत्रके गोळा करण्याच्या व कोर्टाच्या कामकाजाचे वृत्तान्त लिहिण्याच्यापलीकडे जाऊन काही करण्यासाठी, नक्की काय घडले होते ते शोधण्यासाठी फक्त त्या सहा जणांना नेमले होते.

“शोध" पत्रकारितेभोवती कितीही मिथके असली तरी आम्ही वॉटरगेटमध्ये नक्की काय केले व काय केले नाही हे लक्षात ठेवायला हवे. खरे म्हणजे आम्ही जे केले ते काही फार वेगळे नव्हते. वॉटरगेटची बातमी उकरून काढताना आम्ही मूलभूत पोलीसी पत्रकारिताच करत होतो. उमेदवारीच्या काळात जुन्या वॉशिंग्टन स्टारमध्ये आम्हाला शिकवलेल्या मेहनत, व्यवहारज्ञान, व सत्याचा आदर ह्या तत्त्वांवर आमची भिस्त होती. वुडवर्डला व मला ज्या बातमीचा छडा लावायला सांगितला होता ती मुळात एका घरफोडीची बातमी होती. तिचा तपास आम्ही आम्हाला ठाऊक असलेल्या पत्रकारी तंत्रांनीच केला. लोकांच्या दारी गेलो, बरेच प्रश्न विचारले, खूप ऐकले - सर्व चांगले पत्रकार वर्षानुवर्षे करत आले आहेत तेच आम्हीही केले. आम्ही स्थानिक पत्रकार होतो, आमच्याकडे कोणी बातम्या पुरवणारे उच्चपदस्थ स्रोत नव्हते, की अमर्याद खर्चाची मुभा नव्हती. मोठ्या लोकांना आम्ही उंची फ्रेंच हॉटेलात नेऊ शकत नव्हतो. कामगार होतो आम्ही.

त्यामुळे आम्ही मेहनत केली, कारकुनांच्या, सचिवांच्या, प्रशासकीय सचिवांच्या मुलाखती घेतल्या. त्यांना त्यांच्या कार्यालयांबाहेर रात्री आणि शनिवारी-रविवारी भेटलो. अभियोक्ते व FBI चे तपासनीसही ह्याच सर्वांना भेटले, पण ते भेटले ते दिवसाढवळ्या, त्यांच्या कार्यालयात, आणि शासनाच्या वकिलांसमक्ष; त्यांच्या कामापासून व दबावापासून दूर, खासगीत नव्हे. साहजिकच FBI व न्याय खात्याचे निष्कर्ष आमच्याहून बरोबर उलटे होते. त्यांनी महत्त्वाच्या माहितीकडे डोळेझाक केली कारण (तत्कालीन कार्यकारी निदेशक एल. पॅट्रिक ग्रेंच्या म्हणण्यानुसार) राष्ट्राध्यक्षांभोवती असलेल्या माणसांवर त्यांनी विश्वास ठेवला.

आमच्या साध्या पद्धतीतून असाधारण व वादातीत माहिती मिळेपर्यंत आमच्या सहकार्‍यांनीही आमच्या बातम्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. ह्या बातम्या होत्या बेकायदा पद्धतीने व्हाइट हाउसने घडवून आणलेल्या राजकीय हेरगिरीच्या; पद्धतशीर घातपाताच्या, काळ्या पैशांच्या, फोन टॅपिंगच्या. ह्या बातम्या होत्या हे सर्व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी करणार्‍यांच्या, आणि शेवटी हे सारे दडवण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या बेकायदा प्रयत्नांच्या.

ह्या बातम्यांवरची निक्सन राजवटीची प्रतिक्रिया लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यांनी वॉटरगेट प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या सहकार्‍यांच्या वर्तनाऐवजी वृत्तसंस्थांच्या वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. निक्सनचे व्हाइट हाउस रोज 'न-नकार' देत असे. आमच्या बातम्यांवर टिप्पणी मागितल्यास वृत्त सचिव रॉन झिगलर, हाउस विरोधी पक्ष-नेते जेरी फोर्ड, किंवा सिनेट रिपब्लिकन नेते बॉब डोल त्या बातम्यांतील मुद्द्यांविषयी न बोलता आम्ही त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला केल्याचे, ऐकीव माहितीवर विसंबून राहिल्याचे, व व्याजोक्तीचे आरोप करत असत. वॉटरगेट घरफोडीसाठी, व ते प्रकरण दाबून टाकण्यासाठी वापरण्यात आलेला गुप्त पैसा राष्ट्राध्यक्षांच्या निकटच्या सहकार्‍यांच्या ताब्यात होता अशी बातमी जेव्हा आम्ही दिली, तेव्हा व्हाइट हाउस उत्तरले, “वॉशिंग्टन पोस्टचे स्रोत म्हणजे चुकीच्या माहितीची उगमस्थाने आहेत.” (जॉन मिचेल तर मला म्हणाला होता: “हे जर तुम्ही छापलेत तर केटी ग्रॅहॅमचे स्तन चरकातून काढले जातील...”).

वृत्तसंस्थांना लक्ष्य करण्याचे हे निक्सनी तंत्र वॉटरगेट प्रकरणानंतर नाहीसे होण्याऐवजी रीगन शासनात अधिक विकसित व छद्मी झाले, आणि ते आजतागायत फोफावतच आहे. पुराव्यादाखल इराण-कॉन्ट्रा ह्या दुर्दैवी घटनेविषयी रीगनचे बोलके विधान पहा: “वृत्तसंस्थांना बेरूटमधील त्या वर्तमानपत्राकडून बातमी मिळेपर्यंत व त्यांनी तिला वारेमाप प्रसिद्धी देईपर्यंत ही हार कोणाच्या गावी नव्हती. म्हणजे मुळात हे सर्व प्रेसच्या बेजबाबदारपणामुळे घडले आहे.”

आता जॉर्ज बुशच्या रूपात गुप्ततेने झपाटलेला आणखी एक राष्ट्राध्यक्ष आपल्याला लाभला आहे. ह्याच्या माणसांनी व्हाइट हाउसच्या समोर लाफायेट स्क्वेअरमध्ये अमली पदार्थांसाठीची खोटी धाड टाकली होती. त्याची बातमीदारांनी दखल का घ्यावी हेच ह्यांना समजत नाही. बुश विचारतात, “तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?”. खरा निक्सनी प्रश्न. (बुशसकट) सरकारी अधिकार्‍यांना असलेली प्रेसविषयीची ही तुच्छता हा निक्सन शासनाचा सर्वात महत्त्वाचा व टिकून राहणारा वारसा असावा.

मागे वळून पाहता असे वाटते की आम्ही कितीही नाकारले तरी वृत्तसंस्थांच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा निक्सन शासनाचा डाव बर्‍याच अंशी यशस्वी झाला. ह्याला कारण आहेत आमच्यातील उघड उणिवा. आमचे वार्तांकन तेव्हढे बरे नव्हते हे कटू सत्य आहे. निक्सनच्या काळात नव्हतेच, रीगनच्या कालावधीत जास्तच खराब झाले, व आजही तसेच खराब आहे. आम्ही उन्मत्त आहोत. समाजातील शक्तिशाली संस्थांच्या सखोल परिनिरीक्षणाची (scrutiny) आम्ही मागणी करतो पण स्व:तच्या वृत्तसंस्थांच्या व माध्यमांच्या छाननीची मागणी करत नाही. राजकारण्यांच्या व नोकरशहांच्या चुका दाखवतो पण स्वत:च्या चुका विनयाने स्वीकारत नाही.

वुडवर्ड नुकताच म्हणाला त्याप्रमाणे आज वृत्तव्यवसायात सगळ्यात मोठा अपराध कोणता असेल तो एखादी मोठी बातमी मिळवण्यासाठी उशीर करणे, किंवा ती अजिबात न मिळवणे हा. काटेकोरपणे सांगायचे झाले तर महत्त्वाची बातमी न मिळवताना दिसणे, किंवा उशिरा मिळवताना दिसणे . त्यामुळे परिपूर्णता, दर्जा, अचूकता, व तारतम्य ह्यांची जागा वेगाने व संख्येने घेतली आहे. स्पर्धेचा दबाव, दुसरा कोणीतरी बातमी आधी देईल ही भीती, एक बेभान वातावरण निर्माण करतात, ज्याने माहितीचे वादळ निर्माण होते पण गंभीर प्रश्न उठवले जात नाहीत; आणि उठवले गेलेच (क्लिंटन कुटुंबाविषयी गेले तसे) तरी कोणीही त्यावर आठवडेच्या आठवडे, वा महिनोन्‌ महिने काम करून उत्तरे शोधलेली नसतात.

बातमीदार होणे म्हणजे लघुलेखक होणे नव्हे. बातमी म्हणजे सत्याचे सर्वोत्तम उपलब्ध रूप. पत्रकारितेचा महत्त्वपूर्ण कल अशा सत्यशोधनाविषयीच्या बांधीलकीचा किंवा गंभीर, वैचारिक पत्रकारितेचा राहिलेला नाही. आणि हे आपल्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवरून, "पेज थ्री"वरून आणि दूरचित्रवाणीवरील बातम्यांतून पदोपदी जाणवते.

एबीसी न्यूजवरील (सर्वाधिक अमेरिकी नागरिकांचा बातमीस्रोत) “प्राइम टाइम लाइव" मध्ये डायॅन सॉयरने एका मुलाखतीत मार्ला मेपल्सला विचारले, “तो तुझ्या जीवनातला सर्वोत्कृष्ट संभोग होता का?”. हा प्रश्न म्हणजे पत्रकारितेचा नीचांक होता. (सॉयर आता वर चढण्याचा प्रयत्न करत आहे). पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण खर्‍या पत्रकारितेपासून दूर जात एक निकृष्ट माहिती-करमणूक अशी संकरित संस्कृती निर्माण करत आहोत. ह्या संस्कृतीत ओप्रा आणि बातमीदारांमधील, वर्तमानपत्रे व कुटाळक्यांमधील भेद लोप पावत आहे. ह्या नव्या काचकुलिक (titillating) पत्रकारितेतून आपण आपल्या वाचकांना, प्रेक्षकांना काय शिकवतो तर किरकोळ गोष्टीच कशा महत्त्वपूर्ण आहेत, वेडपटपणा खर्‍या बातम्यांहून कसा महत्त्वाचा आहे, हे. आपण वाचकांची, प्रेक्षकांची सेवा करत नाही, तर कुंटणगिरी करतो. आपण त्यांना कमी लेखतो, त्यांना काय हवे आहे ते आपणच ठरवतो आणि त्यांना तेच देतो, जे खपेल व आपले मुल्यांकन जे वाढवू शकेल तेच देतो. दुर्दैवाने त्यांच्यातील अनेक लोक त्यांना कमी लेखणे योग्यच असल्याचे सिद्ध करतात, आणि आपण दिलेल्या कचर्‍याने उद्दीपित होतात. पत्रकारांचे काम लोकांना आव्हान देण्याचे आहे, त्यांना केवळ हसवण्याचे नाही.