बिनडोक संस्कृती

मिलिंद फणसे

एकुणात काय तर आपण एक बिनडोक संस्कृती निर्माण करत आहोत. प्रत्येक समाजाच्या पृष्ठभागाखाली असणारी एक निरुपद्रवी व गमतीदार बिनडोक उपसंस्कृती नव्हे तर प्रत्यक्ष संस्कृती. इतिहासात प्रथमच वैचित्र्य, निर्बुद्धपणा, व ढोबळपणा हे आपले सांस्कृतिक दंडक, आपले सांस्कृतिक आदर्श होत आहेत. गेल्या महिन्यात न्यू यॉर्कमध्ये झालेल्या निवडणुकीत "डॉनाह्यू", “आयमस इन धी मॉर्निंग", न्यू यॉर्क डेली न्यूज, व न्यू यॉर्क पोस्ट ह्यांच्या लांछनास्पद वार्तांकनाने न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील वार्तांकन, आणि अनुभवी व गंभीर पत्रकारांना झाकोळून टाकले. प्रत्यक्ष न्यू यॉर्क टाइम्सचीही इतकी अधोगती झाली आहे की त्यांनी विली स्मिथ खटल्यातील बलात्कारितेचे नाव छापले; किटी केलीला बातमी बनवून पहिल्या पानावर झळकवले; सर्वेक्षणांना धोरणांचे रूप दिले.

माझा उद्देश लोकप्रिय संस्कृतीवर हल्ला चढवण्याचा नाही. चांगली पत्रकारिताही लोकप्रिय संस्कृतीचाच भाग आहे, पण ती उपभोक्त्यांना माहिती पुरवते, त्यांच्या कक्षा रुंदावते. त्यांच्या सतत घसरणार्‍या ल.सा.वि.च्या पातळीला उतरत नाही. लोकप्रिय संस्कृती म्हणजे उपभोक्त्यांची संपूर्ण निष्क्रियता असे समीकरण असेल तर दर्जेदार, लोकप्रिय पत्रकारिता संपलीच असे म्हणावे लागेल. दुर्दैवाने आजकाल खर्‍या पत्रकारितेची जागा लोकप्रिय संस्कृतीच्या नीचतम पातळीने - माहितीच्या अभावाने, चुकीच्या माहितीने, खोट्या व विपर्यस्त माहितीने, आणि सत्याविषयीच्या व सामान्यांच्या आयुष्यांविषयीच्या तुच्छतेने - घेतली आहे.

आज सामान्य अमेरिकन लोकांना कचरा भरवला जात आहे : डॉनाह्यू-जेराल्डो-ऑप्रा तमाशे (बाजारात विरुद्ध-लिंगी कपडे घालणारे; कोपर्‍यावरच्या हॉटेलातले मवाली; खुन्यांच्या आणि लैंगिक गुन्हेगारांच्या मनोव्यापाराबद्दल बोलणारे प्रसिद्धीलोलुप मानसशास्त्रज्ञ); मॉरी पॉविच बातमीपत्र; “हार्ड कॉपी"; हॉवर्ड स्टर्न; गाजावाज्याचाही गाजावाजा करणारे स्थानिक बातमीपत्रांचे खास भाग. गेल्या महिन्यात न्यू यॉर्कसारख्या तथाकथित सुविकसित आणि प्रसारमाध्यमांसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात ११च्या बातम्यात एक पाच भागांची मालिका दाखवली गेली. तिचे नाव होते "व्हेअर डू दे गेट दोज पीपल..." (ही माणसे त्यांना सापडतात तरी कुठे...?) जेराल्डो, ऑप्रा, आणि डॉनाह्यू ह्यांना त्यांच्या कार्यक्रमात येणारी विचित्र माणसे कुठे सापडतात ह्यावर ही मालिका होती. (मालिकेच्या ट्रेलरमध्ये डॉनाह्यू डायपर घातलेल्या व तोंडात बोंड असलेल्या माणसाची मुलाखत घेताना दाखवला होता).

ही भंकस पत्रकारिता आहे हे उघड आहे. मुद्दा केवळ एवढाच नाही. हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की हा कार्यक्रम NBCच्या वाहिनीवर होता. जेराल्डोचे वितरक कोण? तर शिकागोची ट्रिब्यून कंपनी. ज्या वाहिन्यांवर विरुद्ध-लिंगी कपडे घालणारे, हिजडे, मवाली, अनेक खून करणार्‍यांचे वकील वगैरे लोक मिरवतात त्या वाहिन्या कोणाच्या आहेत? त्या आहेत मोठ्या केबल कंपन्या, धी वॉशिंग्टन पोस्ट कंपनी, आपल्या स्वत:च्या वाहिन्या असलेली डझनावारी वर्तमानपत्रे, टाइम्स-मिरर, न्यू यॉर्क टाइम्स कंपनी वगैरेंच्या. गेल्या महिन्यात तर ह्या बिनडोक संस्कृतीची, पीत पत्रकारितेची सर्वात महत्तम निर्मिती असलेली इवाना ट्रम्प ही व्हॅनिटी फेअरच्या मुखपृष्ठावर झळकली. म्हणजे कॉन्डे नॅस्टच्या अग्रगण्य मासिकावर! ह्याच कॉन्डे नॅस्ट / न्यूहाउस / रॅन्डम हाउसचे कर्मचारी आपल्या पेशाविषयी अतिशय गांभीर्याने बोलतात, अमेरिकी संस्कृतीविषयी तासन्‌तास बोलतात, सत्याविषयी आपण किती गंभीर आहोत ते सांगत असतात.

न्यू यॉर्क टाइम्सच्या विक्रमी खपाच्या पुस्तकांच्या यादीवरही एक नजर टाका. "डबल क्रॉस: धी एक्स्प्लोसिव इन्साइड स्टोरी ऑफ धी मॉबस्टर हू कन्ट्रोल्ड अमेरिका", लेखक : सॅम व चक गियान्काना , वॉर्नर प्रकाशन, $२२.९५. (ते $२२.९५ विसरू नका.) हे पुस्तक म्हणजे अथपासून इतिपर्यंत निव्वळ कल्पनाविलास आहे. त्यात कपोलकल्पित गोष्टी, थापा, न घडलेली कटकारस्थाने, खोटी व चुकीची माहिती काठोकाठ भरलेली आहे. हे सर्व कशासाठी, तर एका गुंडाच्या प्रसिद्धीलोलुप नातलगांचा अहंकार सुखावण्यासाठी, व कुणाचे तरी खिसे भरण्यासाठी. परंतु हे पुस्तक प्रकाशित केले आहे टाइम वॉर्नर समूहाचा एक भाग असलेल्या वॉर्नर प्रकाशनाने. ह्या समूहाशी माझा दीर्घ काळ संबंध आहे. ('ऑल धी प्रेसिडंट्स मेन' हा चित्रपट वॉर्नर ब्रदर्सने काढला होता, त्याची मृदुपृष्ठावृत्ती वॉर्नर प्रकाशनाने काढली होती, व मी टाइम मासिकाचा वार्ताहर म्हणून नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली आहेत.) असले फसवणूक करणारे पुस्तक निव्वळ आर्थिक लाभाकरता छापणे टाइमच्या प्रकाशकांना शोभत नाही.

ज्या संस्थांवर मी हल्ला चढवतो आहे त्या एव्हाना (अनुवादकाची नोंद: बचावासाठी) घटनेच्या पहिल्या दुरुस्तीचे नाव घेऊ लागल्या असतील. पण मुद्दा पहिल्या दुरुस्तीचा, किंवा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा नाहीच. स्वतंत्र देशात कचरानिर्मितीचेही स्वातंत्र्य आहेच. पण कचर्‍यास कोठून तरी वाट मिळणारच आहे म्हणून आपणच त्याला वाट करून द्यावी असे नाही. सध्या ह्या देशातील मोठमोठे माहिती-समूह कचरा वितरणाचा धंदा करत आहेत. आपण सारे अश्लील साहित्य पाहताक्षणी ओळखू शकतो, त्यालाही अस्तित्वाचा हक्क आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण सार्‍यांनी अश्लील साहित्य प्रकाशित करावे. गेल्या पंधरा वर्षात अमेरिकेत फार थोड्या बड्या माध्यमसंस्था अशा असतील ज्या अश्लीलतेशी समतुल्य राजकीय व सामाजिक व्यवसायात उतरल्या नाहीत.

खरे तर अनेक आता कमरेपर्यंत त्या चिखलात रुतल्या आहेत. डॉनाह्यूचे उदाहरण घ्या. अठरा वर्षांपूर्वी वूडवर्ड व मी आमच्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी ओहायोला गेलो होतो. तिथे टॉक शोच्या माध्यामातून उत्तम मुलाखती घेणारा एक माणूस आहे असे ऐकले होते आणि ते खरेही निघाले. डॉनाह्यूने आमचे पुस्तक वाचले होते. त्याच्याकडे तक्ते होते, पुरावे होते. राष्ट्रावर आणि माध्यमांवर वॉटरगेटचे काय परिणाम होतील ह्यावर त्याने गांभीर्याने चर्चा केली. मात्र, गेल्या महिन्यात डॉनाह्यूने त्याच्या कार्यक्रमात बिल क्लिंटनला बोलावले--आणि अर्धा तास त्याच्यावर अशी काही चिखलफेक केली की स्टुडियोतील प्रेक्षकही चिडले. WNBCच्या "व्हेअर डू दे गेट दोज पीपल...?” ह्या खास कार्यक्रमासाठी डॉनाह्यूचीही मुलाखत घेतली तेव्हा ऑप्रा व इतर असेच करतात म्हणून मलाही करावे लागते असे त्याने त्यात स्वत:चे लंगडे समर्थन केले होते.

सवंग पीत-पत्रकारिता पहिल्यापासून होती. हेड्डा हॉपर व वॉल्टर विन्चेलसारख्यांची कुटाळकीवजा सदरेही होती. पण आजच्यासारखी परिस्थिती ह्याआधी कधीच नव्हती. आज ह्या देशातील तथाकथित बुद्धिजीवी व उच्चभ्रू लोक अशा स्वरूपाच्या सदरांवर व कार्यक्रमांवर जीव टाकतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात. करोडो लोकांसाठी माहिती व बातम्यांचे हेच मुख्य स्रोत असतात. न्यूजडेची गॉसिप सदर-लेखिका लिझ स्मिथ हिने अनेकदा कबूल केले आहे की ती तिच्या "बातम्यां"ची सत्यासत्यता तपासण्यासाठी फारसे कष्ट घेत नाही, किंवा ज्यांच्याविषयी ती लिहिते त्यांना त्यावर प्रत्युत्तर देण्याची संधीही देत नाही. आणि ही त्यातल्या त्यात बर्‍या गॉसिप-लेखिकेची कथा, तर इतरांचे काय सांगावे!

रीगन फार बुद्धिमान नसला तरी तो खरा नेता होता हे त्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या आठ वर्षांत पत्रकारांच्या लक्षात आलेच नाही. फ्रॅंकलिन रूझवेल्टनंतर आलेल्या इतर कोणत्याही नेत्याने अमेरिकेला एव्हढे बदलले नाही, की देशावर व जगावर आपला इतका ठसा उमटवला नाही. पण रीगनच्या कार्यकालात शासनाच्या धोरणांचे जनतेवर व संस्थांवर, शिक्षणक्षेत्रात, कार्यालयांमध्ये, न्यायालयांमध्ये, कृष्णवर्णीयांवर, सामान्य कुटुंबांवर कोणते परिणाम होत आहेत हे पाहण्यासाठी आम्ही बातमीदार वॉशिंग्टनबाहेर गेलो असे क्वचितच घडले. रीगनच्या "दुष्ट साम्राज्या”विरोधी भाषणांची टर उडवण्यात आम्ही इतके दंग होतो की त्याचे धोरण व गोर्बाचेवचे उदारीकरण ह्यातील कार्यकारणभाव आम्हाला समजलाच नाही. खरे म्हणजे, आमच्या काळातील बहुतेक महत्त्वाच्या घटनांकडे आमचे दुर्लक्षच झाले. उदा. इराण-कोन्ट्रा, सेव्हिंग्स व लोन बॅंक घोटाळा.

वृत्तसंस्थांच्या ह्या अपयशातून "टॉक-शो"-देशाचा उद्गम झाला आहे. ह्यात सार्वजनिक चर्चेची जागा आरडा-ओरड्याने व नाटकी अभिनिवेषाने घेतली आहे. वृत्तसंस्थांच्या विषय-पत्रिकांवर ह्याचाच पगडा असतो. ज्या दिवशी नेल्सन मॅंडेला सोवेटोला परतले, आणि दुसर्‍या महायुद्धाच्या जेत्यांनी जर्मनीच्या एकीकरणाला परवानगी दिली त्या दिवशी अनेक "जबाबदार" वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर डोनाल्ड व इवाना ट्रम्प ह्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या झळकत होत्या.

ह्या "टॉक-शो" संस्कृतीची जणु परिसीमा म्हणता येईल असा रॉस पेरो हा राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार आता आपल्यासमोर आहे. हा उमेदवार दूरचित्रवाणीने निर्मिला व तगवला. “लॅरी किंग लाइव्ह" ह्या कार्यक्रमाद्वारे हा प्रथम लोकांसमोर आला. ह्याचे शिरा ताणून बोलणे, व आविर्भाव लोकशाहीशी फारसे सुसंगत नाहीत. ह्याचा सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव काय तर म्हणे लोकशाहीची जागा संपूर्ण देशासाठी असलेल्या एका "टॉक-शो"च्या थेट प्रक्षेपणाने घ्यावी. अन्‌ असा हा स्वत:च्या अनभिज्ञतेचा अभिमान असणारा उमेदवार सध्या बर्‍याच मोठ्या राज्यांतील सर्वेक्षणात दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर आघाडी घेऊन आहे.

आज अमेरिकेची दुर्दशा ही जगातील सर्वात महत्त्वाची बातमी आहे. आपली राजकीय व्यवस्था संकटात आहे; अमेरिकी लोकशाहीच्या जडणघडणीचा पाया असलेली समाज-भावना लोप पावत चालली आहे. “टॉक-शो"-देशाचा उद्भव हा ह्याचाच एक भाग आहे. आजही चांगली पत्रकारिता आहे, नाही असे नाही. पण ती नियमाला अपवाद आहे. चांगल्या पत्रकारितेस लागणारे धैर्य आज माध्यमांत अभावानेच दिसते. अमेरिकेतील वर्णभेद, अर्थकारण, आपल्या शहरांचे भवितव्य ह्यांविषयीच्या अनेक प्रचलित गृहीतकांना आव्हान देण्याची गरज आहे. त्यासाठी माध्यमांपासून सुरुवात करता येईल, कारण वर्णभेदाखालोखाल अमेरिकी माध्यमांची सद्यस्थिती ही आज अमेरिकेतील सर्वात मोठी दुर्लक्षित बातमी आहे. समाजातील इतर शक्तिशाली संस्थांबद्दल विचारतो तेच मूलभूत प्रश्न वृत्तसंस्थांविषयी विचारण्याची गरज आहे--त्या कोणाची सेवा करताहेत, त्यांचा दर्जा काय आहे, त्यांचे स्वहित, व ते जपण्यामुळे सामाजिक हितास व सत्यशोधनास ग्रहण लागत आहे काय, वगैरे. वस्तुस्थिती ही आहे की आज इतर सर्व संस्थांहून माध्यमे प्रबळ आहेत; आणि ती त्यांच्या शक्तीचा अपव्यय करत आहेत व दायित्वाकडे कानाडोळा करत आहेत. त्यांनी--किंवा खरे तर आपण--जबाबदार्‍या झटकून टाकल्या आहेत, आणि ह्याचा परिणाम म्हणजेच बिनडोक संस्कृतीचा विजय.