पद्यानुवादांचा रसास्वाद

मनोगताच्या चवथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

१५ ऑगस्ट २००८. मनोगताचा चवथा वर्धापनदिन. त्यानिमित्त, मनोगतचे मालक, चालक, प्रशासक, लेखक, वाचक आणि सर्वच मनोगतींना हार्दिक शुभेच्छा! मी मनोगतावर येत असल्यापासून, बरेच पद्यानुवादात्मक लेखन केलेले आहे. त्या साऱ्या लेखनाचा आढावा घेत असतांना मला जाणवले की पद्यानुवादांप्रतीचा सगळ्यांचाच दृष्टीकोन फारसा उत्साहवर्धक नाही. तसा तो असावा असे मला वाटते. मग अडचण काय आहे? तर पद्यानुवादात कशाकशाचा आस्वाद घ्यायचा याची सामान्य वाचकास पुरेशी जाण नसते. तो आवडले तर आवडले म्हणतो. पण पद्यानुवाद आणखीही होत राहावेत ह्याबाबत आग्रही नसतो. ज्यांना ते आवडत नाहीत ते मात्र पद्यानुवाद होणे थांबेल कसे ह्याबाबत अत्यंत आग्रही दिसून येतात. असे का व्हावे? पद्यानुवाद लोकांना नको असतात का? याचा शोध मला वेगळ्याच तथ्यांप्रत घेऊन गेला. या वर्धापन दिनानिमित्त त्या शोधाचे फलीत आपणाप्रत पोहोचवावे अशी उमेद धरून हे लिहीत आहे. आपल्याला आवडावे हीच प्रार्थना.

पद्यानुवादांचा रसास्वाद

अनुवादात, इतर भाषांत अभिव्यक्त झालेल्या रचनांमधील आनंद कुणीतरी आपल्या मातृभाषेत आणून देऊ इच्छित असतो. सर्वसामान्य लोकांना अनुवादांतला आनंद घेण्याची उपजत इच्छा असतेच. गद्यापेक्षा, पद्य साहित्य जास्त रुचकर असते. कदाचित त्याच्या गेयतेमुळे असेल, पण बरेचदा ते संक्षिप्त, सारमय आणि अनुभूतीच्या यथातथ्य अभिव्यक्तीमुळे आस्वादकास पद्य आवडू लागते. एकदा का आवडले की मग निसर्गतःच ते दुसऱ्याला सांगण्याची प्रवृत्ती होते. ऐकणाऱ्याची भाषा वेगळी असली तरीही सांगणाऱ्याचा हुरूप कमी होत नाही. मग जे गद्यात समजवून सांगता येत नाही किंवा अपुरे वाटते, ते मग त्या भाषेत पद्यात सांगण्याचा प्रयास होऊ लागतो. आणि पद्य अनुवाद जन्माला येतो.

पद्यानुवाद कशाकरता आस्वाद्य असू शकतात?

एक यादीच करू या!

१.  इतर भाषेतल्या पद्याचे आकलन होण्याचा आनंद. म्हणजे अर्थानुवादातील आनंद.
२.  त्या मूळ पद्यातील भाव-भावनांशी सहानुभूत होण्यातला आनंद. म्हणजे भावानुवादातील आनंद.
३.  त्या मूळ भाषेतल्या शब्दांच्या पदलालित्याच्या व शब्दरचनेच्या आस्वादातील आनंद.
४.  त्या मूळ पद्यातील नाद, लय, सूर, ताल इत्यादी. म्हणजे सांगितिक आकलनातील आनंद.
५.  त्या मूळ पद्यातील गेयता अनुवादाच्या भाषेत आणता आली तर तो अनुवाद गाण्यातील आनंद.

पद्यानुवाद कायमच विवादास्पद राहण्याचे एक कारण म्हणजे गेयतेतील आनंद त्यात शोधू पाहणाऱ्यांच्या पदरी पडणारी निराशा हेच आहे. अनुवादकर्ता अनुक्रमे अर्थ, भाव, पदलालित्य, सांगितिक अभिव्यक्ती आणि गेयता साधण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक पातळीवर त्याला कमी अधिक प्रमाणात ते साधते. अनुवादकाच्या मगदुराप्रमाणे, मूळ गीताच्या दर्जाप्रमाणे आणि अनुवादकाने साधलेल्या मूळ गीताप्रतीच्या तन्मयतेनुरूप अनुवाद वरील पाच पातळ्यांवर साधला जातो. तेव्हा हे उघडच आहे की सर्वोच्च पातळीवरील गेयता सर्वात अधिक क्षतिग्रस्त ठरते. आस्वादक जर तिथेच आनंद शोधू लागला तर पद्यानुवाद आस्वाद्य होत नाही. "मग साहिर लुधियानवीच्या ताजमहालाला आपली वीट जोडू नका" अशा स्वरूपाचे आक्रमक प्रतिसाद मिळू लागतात. त्यातून अनुवादकाच्या क्षमतेवर जी टिप्पणी होत असते तिची दखल तो घेतोच. पण अशा प्रतिसादातून आस्वादकाची उत्तम सांगितिक जाण व्यक्त होते. किंबहुना असे प्रतिसाद उत्तम सांगितिक जाण असणाऱ्यांकडूनच मिळत आलेले आहेत.

इथे याचा विचार करण्यासारखा आहे की जेवढे मूळ गीत अधिक लोकप्रिय, तेवढेच त्याचे रचयिते जास्त गुणाढ्य असतात. उत्तम शब्दरचना, अनुपम संगीत आणि अलौकिक गायन यांनी अलंकृत मूळ गीताचा पद्यानुवाद एक साधा अनुवादक करतो; तेव्हा तो प्रथम कवी, मग संगीतकार आणि नंतर गायकही बनण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यांना पद्यानुवाद करण्याची इच्छा असते ते बहुधा लेखक/कवी/गीतरचना अशा क्षेत्रात उमेदवारी करणारे लोक असतात. संगीत आणि गायन यांतील त्यांचे नैपुण्य यथातथाच असते. म्हणून पद्यानुवाद सामान्यतः पहिल्या तीन पायऱ्यांवर सर्वात अधिक आस्वाद्य असतात. नंतरच्या पायऱ्यांवरील यश केवळ बोनस. बहुधा ते मिळतच नाही. अपवाद वृत्तबद्ध, छंदबद्ध काव्याचा.

मूलभूत प्रेरणाः अभिव्यक्तीतील आनंद

"आई, आई पाहा जरा, गंमत नामी किती अहा!
चांदोबा खाली आला, हौदामध्ये बघ बुडला
कसा उतरला किंवा पडला, की धडपडला,
कशास उलटे चालावे, पाय नभाला लावावे? "

ह्या ओळींमध्ये काहीतरी प्रकर्षाने सांगायचे आहे. दाखवायचे आहे. कुणितरी निकटच्या माणसाने आपल्या अनुभवाशी सहमत व्हावे, सहानुभूत व्हावे ह्याची तीव्र इच्छा आहे. का? तर सहानुभूत लोकांच्या आनंदातील सहभागाने, आपलाच आनंद द्विगुणित होतो म्हणून. अगदी तशीच आदिम प्रेरणा, इतर भाषेतील पद्यांत आपल्याला आढळलेला आनंद, स्वभाषेतील सुहृदांस सादर करणाऱ्या पद्यानुवादकास असते.

अर्थानुवाद

खरे तर मूळ पद्याचा गद्य अनुवाद आणि मग अनुवादित गद्याची पद्य रचना अशा दोन पायऱ्यांनी नवे पद्यानुवाद तयार होत असतात. बाजारात अनेक सार्थ गीता मिळतात. त्या म्हणजे अर्थानुवाद. याच पहिल्या पायरीवर सार सांगून झालेले असते. अर्थानुवाद गद्य असू शकतो.

पद्यानुवाद

मग दुसऱ्या पायरीचा सोस का? तर सार म्हणजेच सर्वस्व नव्हे. त्यासोबतचे रचनासौंदर्य, गेयता इत्यादी अनेक सुसंगतींची आस्वाद्यताही अनुवादकाला वाचकास/श्रोत्यास/दर्शकास लक्षात आणून द्यायची असते. त्या अनुभूतीतला आनंद मिळवून द्यायचा असतो. ते साधते कितपत, हे अनुवादकाच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. अत्यंत समर्थ अनुवादकांनाही खरे तर शंभर टक्के साधत नाहीच. सर्वसामान्य अनुवादकास ते साधावे कसे? आणि मग नसेल साधणार तर त्याने तसा प्रयत्न उगाचच का करावा? आता मला सागरमाथा (एव्हरेस्ट) चढता येत नाही म्हणून मी तो चढण्याचे स्वप्नच पाहू नये का? अशासारखाच हा प्रश्न आहे. उत्तरही तसे सोपेच आहे. हर एकाने अवश्य प्रयत्न करावा. त्याला कितपत साधला ते लोक सांगतीलच. मात्र, जितपत साधेल तितपत तो दुसऱ्यास काहीतरी आनंद मिळवून देऊ शकणार आहे. हे नक्कीच साधणार आहे.

आता प्रश्न हा आहे की कुठला आनंद? विनोबा भाव्यांनी गीता वाचली. आत्मसात केली. तिच्यावर प्रवचने दिली. मात्र गीता जीवनाचे तत्त्वज्ञान कसे व्यवस्थित समजवून सांगते हे त्यांना त्यांच्या आईलाच सांगायची पाळी जेव्हा आली, तेव्हा त्यांना समश्लोकी पद्य रचनाच जास्त समर्पक वाटली. विनोबा आईला गीता प्रवचनही देऊ शकले असते. आणि मराठीतून सांगितलेले ते तत्त्वज्ञान आईला समजलेही असते. ते समजून तिला जे कळायचे ते कळलेही असते आणि व्हायचा तो यथोचित आनंदही झाला असता. पण गीतेत केवळ प्रतिपाद्य विषयच नाही तर रचना सौंदर्य आहे. गेयता आहे. शब्दांचा नेमकेपणा आहे. शब्दांचा मोजकेपणा आहे. नाद आहे. आणि लयही आहे. ह्या साऱ्यांचा आस्वाद जसा मला संस्कृतातून गीता वाचतांना घेता आला तसा आस्वाद आईला घेताच येणार नाही का? हा सल विनोबांना पद्य रचनेसाठी प्रवृत्त करण्यास कारण ठरला असावा. त्यांना ते साधलेही मोठ्या प्रमाणात आहे व म्हणून ते आईला समाधानही अपार देऊ शकले आहेत.

स्वैर पद्यानुवादः भावार्थदीपिका, अर्थात ज्ञानेश्वरी (टीका, टिप्पणी, भावार्थदर्शन, भाष्य, समीक्षा)

ज्ञानेश्वरीचा उद्देश गीतेचा भावार्थ विशद करणे हा आहे. नावातच तसे सांगितले आहे. एक प्रश्न असाही आहे की भाष्याला अनुवाद समजावे का? भाष्य जर मूळ काव्याच्याच भाषेत असेल तर समजण्याची गरजच नाही. मात्र मूळ काव्याच्या भाषेव्यतिरिक्त भाषेत केलेल्या भाष्यासही अनुवादच म्हणायला हवे.

त्यासाठी पद्याचाच आकृतीबंध ज्ञानेश्वरांनी अवलंबला आहे. मूळ काव्यातील प्रासादिकता वाचकांप्रत पावती करावी हाच त्यापाठीचा उद्देश दिसतो. मात्र विनोबांप्रमाणे समश्लोकी आकृतीबंध निवडलेला नाही. अनुष्टुभ छंदात पुरेसे स्वातंत्र्य मिळत नसल्याने असेल किंवा ओवीच्या आकृतीबंधावर हुकुमी अधिकार सिद्ध झालेला असल्याने असेल ज्ञानेश्वरांनी ओवी हा प्रकार अभिव्यक्तीसाठी निवडला. शेवटलाच पर्याय जास्त समर्पक वाटतो. जे स्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत होते त्याचाही त्यांनी प्रच्छन्न वापर केला आहेच. एक एका श्लोकासाठी अनेक ओव्यांचा समुह लिहून अर्थ विशद केला. तत्कालीन मराठीच्या वाचकांना तो अपार भावला. मान्यता पावला. ह्यासाठीच ह्या अनुवादाचे वर्गीकरण करायचे तर ते स्वैर पद्यानुवाद म्हणूनच करावे लागेल.

उदाहरणार्थ पाहाः गीतेतील पहिल्या श्लोकापूर्वीच ज्ञानेश्वरीत ८४ ओव्या प्रस्तावनेत खर्ची पडल्या असून, गीतेतील पहिल्या श्लोकाच्या अर्थाकरता तीन ओव्या वेचल्या आहेत.

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किममुर्वत संजय ॥ १ ॥

तरी पुत्रस्नेहे मोहितू । धृतराष्ट्र असे पुसतू ॥ म्हणे संजया सांगे मातू । कुरुक्षेत्रींची ॥ ८५॥
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । झुंजाचेनी ॥ ८६॥
तरी तिहीं येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं । तें झडकरी कथन करी । मजप्रती ॥ ८७॥

विकिपेडीयावर ज्ञानेश्वरीबाबत पुढील माहीती दिलेली आहे. "ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात लिहीला. शके १२१२ (इ. स. १२९०) मध्ये प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्दीष्टाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरीत झाली असून त्याचे मुद्रित ग्रंथ उपलब्ध आहेत."

इथे आणखीही एक मुद्दा पद्यानुवादांच्या रसग्रहणाखातर उघड झाला आहे. जर अनुवादित काव्याचा विषयभागच केवळ महत्त्वाचा असता तर गीतेचा मराठी अनुवाद ज्ञानेश्वरीत केल्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरीचा अनुवाद संस्कृतात करण्याची गरज न भासती. आता संस्कृतातला ज्ञानेश्वरीचा अनुवाद पद्यानुवाद आहे किंवा नाही ते मला माहीत नाही. मात्र तो तसा असल्यासही नवल वाटणार नाही. कारण पद्यानुवाद करण्यामागची मूळ प्रेरणा आपल्याला झालेल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याचीच आहे.

सैल पद्यानुवाद

एका कडव्याखातर अनेक कडवी, प्रसंगी भिन्न वृत्तात, छंदात, तालात रचून पद्यात अनुवाद लिहीला तर त्यास सैल पद्यानुवाद म्हणावा लागेल. ज्ञानेश्वरीलाही सैल पद्यानुवाद म्हणता आले असते, पण त्यात भाष्य समाविष्ट असल्याने ते स्वैर म्हणावे लागेल. मेघदूत या कालीदासाच्या मूळ संस्कृत महाकाव्याचा कुसुमाग्रजांनी केलेला मराठी अनुवाद अन्य वृतात केलेला आहे. श्री. चिंतामण द्वारकानाथ देशमुख (आपल्या भारत देशाचे पहिले अर्थमंत्री. हेच पाकिस्तानचेही पहिले अर्थमंत्री होते. ) यांनी केलेला मेघदूताचा मराठी अनुवाद मात्र मूळ संस्कृत महाकाव्याप्रमाणेच मंदाक्रांता वृत्तातच लिहीलेला असून सुरस वठला आहे. त्याला  सैल पद्यानुवाद म्हणता येणार नाही.

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी ।
नीत्वा मासांकनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः॥
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं ।
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥२॥ पूर्वमेघ - कालीदासाचे मूळ संस्कृत काव्य

प्रेमी कांता-विरही अचली घालवी मास काही ।
गेले खाली सरूनी वलय स्वर्ण हस्ती न राही॥
आषाढाच्या प्रथम दिनी तो मेघ शैलाग्री पाहे ।
दंताघाते तटी गज कुणी भव्यसा खेळताहे ॥२॥ पूर्वमेघ - देशमुखांचा समवृत्ती संस्कृतप्रचुर मराठी अनुवाद
(देशमुख संस्कृतचे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीधारकच होते. )

कृश हातांतून गळून पडले सोन्याचे कंकण ।
कामातुर हो हृदय, कामिनी दूर राहिली पण! ॥
आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतावरी ।
नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रीडांगण! ॥२॥ पूर्वमेघ - कुसुमाग्रजांचा भिन्नवृत्ती मराठी अनुवाद
(चालः औदुंबर)

सम मंथ्स वेअर गॉन, द लोनली लव्हर्स पेन ।
हॅड लूज्ड हिज गोल्डन ब्रेसलेट डे बाय डे ॥
अर ही बिहेल्ड द हरबिंजर ऑफ रेन ।
अ क्लाऊड दॅट चार्ज्ड द पीक इन मिमिक फ्रे ॥
ऍज ऍन एलिफंट ऍटॅक्स अ बँक ऑफ अर्थ इन प्ले ॥२॥ पूर्वमेघ - देखमुखांचा समकालीन इंग्रजी अनुवाद

देखमुखांची समकालीन इंग्रजीवरही चांगलीच पकड होती. त्यांनी मूळ संस्कृत मेघदूताचा सरस इंग्रजी अनुवादही केला आहे. तो मात्र समवृत्त तर नाहीच, शिवाय प्रत्येक चार ओळींचे मूळ कडवे इंग्रजी अनुवादात पाच ओळींचे लिहीले आहे. म्हणून इंग्रजीतील हा अनुवाद निस्संशयपणे सैल पद्य अनुवादाचे उदाहण म्हणून सांगता येईल.

भिन्नवृत्ती पद्यानुवाद

आता वर दिलेल्या कुसुमाग्रजांच्या पद्यानुवादाकडे जर बारकाईने पाहिले, तर तो कुठल्याच अंगांनी सैल वाटणारा नाही. यथातथ्य आणि सुरस आहे. पण भिन्नवृत्ती आहे. ज्या वृत्तात तो लिहीला आहे त्या वृत्तात सुरेख बसला आहे. तरीही गाण्याच्या अंगाने आस्वाद घेणाऱ्यांना, मुळात मंदाक्रांता वृत्तात लिहीलेला मजकूर, इतर वृत्तात तेवढाच गेय राहत नाही किंवा तेवढाच आनंददायी राहत नाही. म्हणून तो कमी लोकप्रिय होतो. कुसुमाग्रजांचा मेघदूताचा अनुवादही, ह्या कारणानेच मला देशमुखांच्या अनुवादापेक्षा कधीच सरस वाटला नाही, जरी कित्येकदा देशमुखांचा अनुवाद अगदीच संस्कृतमय झालेला आहे तरी.

भिन्नवृत्ती अनुवाद करण्यात मनोगती व्यक्तीरेखा "टवाळ" यांचा हातखंडा आहे. हिंदीतील अत्यंत लोकप्रिय गीताचा; समर्थ, पण भिन्नवृत्ती पद्यानुवाद त्यांनी केला. संगीताच्या अंगाने पाहणाऱ्यांकरता, तो काही पूर्ववत रंजक राहिला नसावा. मात्र त्याच गीताचा "माफीचा साक्षीदार" यांनी व मी केलेला समवृत्ती अनुवाद, सरस नसला तरी केवळ समवृत्त असल्याने सहज स्वीकारार्ह झाला आहे.

यूँ तो हमने लाख हंसीं देखे हैं । 
तुमसा नहीं देखा, हो, तुमसा नहीं देखा ॥धृ॥  मूळ हिंदी लोकप्रिय गीत

सुंदर तरुणी फार बघितल्या होत्या। 
पण असल्या नव्हत्या ॥धृ॥ - माफीचा साक्षीदार यांनी केलेला समवृत्ती अनुवाद

मी तर असल्या लाख पऱ्या पाहील्या।
तुजपरी न पाहीली ॥धृ॥ - मी केलेला समवृत्ती अनुवाद

पाहील्या आहेत लाखो, आजवर मी सुंदरी ।
पाहीली ना तुज परी ॥धृ॥ - टवाळ यांनी केलेला भिन्नवृत्ती अनुवाद

चालः कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला, थांबला तो संपला

त्यांनी लिहीला त्या चालीत अनुवाद अगदी चपखल बसला आहे. सुरेख गाताही येतो आहे. मात्र नव्या चालीत. मूळ गाण्याच्या लोकप्रियतेमुळे अशा सरस अनुवादाची स्वीकारार्हता अकारणच कमी होते. असेच आणखीही एक उदाहरण देता येईल.

न मुँह छुपा के जियो, और न सर झुका के जियो ।
गमों का दौर भी आये, तो मुस्कुरा के जियो ॥ धृ ॥ - मूळ हिंदी लोकप्रिय गीत

न तोंड लपवून जगा, आणि न मान ही झुकू द्या ।
की दुःख कोसळो कितीही, तुम्ही हसून जगा ॥ धृ ॥ - मी केलेला समवृत्ती अनुवाद

घाबरूनी तू मुखाला, लपविणे नाही बरे ।
लाजुनी तू मस्तकाला, झुकविणे नाही बरे ॥
काळ हा आला समोरी, दुःख घेऊनी जरी ।
जीवनीच्या या सुखांना, हरवणे नाही बरे  ॥ धृ ॥ - "मी राधिका" यांनी केलेला भिन्नवृत्ती अनुवाद

चालः कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला, थांबला तो संपला

भावानुवाद

वृत्त सुटले तरी चालेल पण भाव घट्ट धरून ठेवायचा ह्या वृत्तीने अनुवाद केल्यास भावानुवाद होतो. वरील "मी राधिका" यांचाच अनुवाद ह्याचे एक सुरेख उदाहरण आहे. भावानुवादकांना स्वतःस अपरिमित आनंद मिळतोच. मात्र इतरांना तो तेवढा उत्कट वाटत नाही. कारण त्या आनंदाचे मूळ, मूळ गीताच्या लोकप्रिय झालेल्या चालीत असते. भावानुवादात सापडलेला आनंद, मूळ गाणे गातांना होणाऱ्या आनंदाशी तुलनीय राहत नाही.

शब्दशः अनुवाद

प्रथमतः अनुवाद हे व्हायलाच हवेत. इतर भाषांतले ज्ञान, शब्दरचनासौंदर्य, नाद, लय, माधुर्य हे आपल्यापर्यंत, आपल्या भाषेपर्यंत पोहोचायलाच हवे, तरच आपल्याला अनोख्या आनंदाचा ठेवा सापडू शकेल. आता त्या अनुवादात मूळ कवितेतील जास्तीत जास्त गुण यायचे तर मग शब्दानुवाद, अर्थानुवाद, भावानुवाद, पद्यानुवाद, गीतानुवाद या क्रमाने ते साधता येऊ शकतात. कमीत कमी गुण आस्वादास मिळावेत म्हणून किमान शब्दानुवाद ही पहिली पायरी समजायला हवी.

समारोप

पद्यानुवादाप्रती वाचकाचा दृष्टीकोन कसा असावा? तर तो बंद शिंपल्याकडे पाहण्याचा असावा. कुठल्या शिंपल्यात पाणीदार मोती सापडेल ते आपल्याला काय माहीत. जमतील तेवढी बंद शिंपली पदरात बांधून घ्यावी हाच दृष्टीकोन श्रेयस्कर ठरेल. म्हणून मला असे वाटते की पद्यानुवादकांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे. पद्यानुवाद ही सहजसाध्य कला नाही. परिश्रमानेही त्वरीत साधते अशीही कला नाही. म्हणून, मूळ भाषेतील रचनेतील, मूळच्या आवडी-निवडीला, अभ्यासपूर्ण आकलन आणि कुशाग्र अभिव्यक्तीद्वारे अधिक आस्वाद्य करून, आपणास सहर्ष सादर करणाऱ्या कलाकारांची आपण योग्य ती कदर करायला हवी. त्यांच्याकडून आपणांस अनुपमेय कलाकृती, कायमच, आस्वादास मिळाव्यात अशी अपेक्षा करायला हवी. आपणही या दुर्मिळ कलेला प्रोत्साहन देऊन, उमेदवार मिळवून द्यायला हवेत. म्हणजे अन्य भाषांतील आविष्कारांच्या आस्वादाची, स्वभाषेत सोय उपलब्ध होऊ शकेल!

मनोगतावर अलीकडेच अनेकांना पद्यानुवादात रुची निर्माण होत आहे. मनोगताच्या प्रशासकांची पद्यानुवादांकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यांवर त्यांनी दाखवलेला विश्वासच ह्यासाठी कारणीभूत आहे. अनेकदा राजाश्रयाने साधता येतात त्या गोष्ठी लोकाश्रयानेही साध्य होऊ शकत नाहीत. इथल्या राजाश्रयाने, पद्यानुवादांस भरभराटीचे दिवस येवोत हीच प्रार्थना. पद्यानुवादास प्रवृत्त होणाऱ्या नवोदितांसही सहर्ष आमंत्रण आणि शुभेच्छा!