कृतार्थ...

डिस्क्लेमरः खालील मजकूर म्हणजे काय आहे ते मला माहिती नाही. माझ्या काही शंकेखोर मित्रांच्या मते ती चोरून केलेली कविताच आहे. माझ्याकडून बरेच पैसे उसने घेऊन ते आजवर परत न केलेल्या एका मित्राला बाकी तो मजकूर म्हणजे 'माझ्यातल्या विद्रोही स्फुल्लिंगाचा लयबद्ध आविष्कार' वाटतो. खरे काय ते बा वाचकाने ठरवावे. २० जून १९९७ रोजी मुंबई - पुणे प्रवासात मी हे लिहीले होते. 



कृतार्थ



नमस्कार.
ओळखलं मी तुम्हाला.
तुमच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला
होतो ना मी.
अमुकतमुक कंपनीत
'पस्तीस वर्षाची निष्ठा...' वगैरे
चांगले बोलले तुमचे साहेब.
पँटचं कापडही रेमंडचं आहे मला वाटतं...


ब्लॉक डोंबिवलीलाच ना?
आणि दीपाचं सासर कल्याणला, हो माहित्येय मला ...
उमेशसाठी बघताय म्हणे यंदा
नोकरीवाली शक्यतो आपल्यातलीच बरी...


सकाळंचं फिरणं बाकी चुकत नाही हो तुमचं
आणि हल्ली काय हास्यक्लब वगैरे जोरात
दुपारच्या पोळ्या अडीच मोजून
तीनचा पाऊणच कप कोमट चहा
संध्याकाळी पाय मोकळे करून येतायेता
देवदर्शनही जमून जाते बुवा तुम्हाला


भात आणि गोड खाणं तर सोडलंयच तुम्ही
डायबिटीसची शंका असतानसताना
बीपीवरची एकच दुबळी गोळी सकाळी
बरी आपली मनःशांतीला..


वर्षातून एकदा कोकणात
आणि शिर्डीही, हो, म्हणाला होतात तुम्ही...
महिनाभर आधी रिझर्वेशन्स करता ना
दोन्ही वेळच्या प्रवासाची


जूनमध्ये छत्रीशिवाय
बाहेरही पडत नाही तुम्ही
आणि ऑक्टेबरमध्येच बाहेर काढून ठेवता
स्वेटर, मफलर आणि कानटोपीसुद्धा
डांबरगोळ्यांचा वास घालवण्यासाठी...


सोडण्यासारखं व्यसन तर कधी नव्हतंच तुम्हाला...
परेराकडं चोरून खाल्लेलं मटण एकदाच
ऑफिसच्या पार्टीत घेतलेला अर्धा पेग स्कॉचचा
घाबरत तोही पण असते कशी ते बघू म्हणून
तेवढ्यानंही डोकं जडावलं होतं तुमचं
दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत
सिग्रेटच्या वासानंही मळमळल्यासारखं होतं तुम्हाला
हां, तशी अधूनमधून
तपकीर ओढता तुम्ही, गंमत म्हणून
पण तीही हल्ली नाहीच.


जाग्रणामुळं पित्त.. हो, ते आहे बुवा तुमचं पहिल्यापासून
गाण्याला, अहो, सिनेमालासुद्धा वहिनी आणि मुलं एकटी यायची.
चौपाटीवरही मी पाहिलं  होतं तुम्हाला एकदा
पाणीपुरी नको, सोसणार नाही, म्हणत होता तुम्ही
तुमच्या लाल रंगाच्या गरम पाण्याच्या थर्माससह...
मोठी पिशवी होती बघा तुमच्या हातात
म्हणत होता बघा, आता भेळेचे पैसे 'विवेक' आणि 'सनातन प्रभात' च्या रद्दीतून असं काहीतरी..


आणि आता दहाच्या ठोक्याला
दोनदोनदा कड्याकुलुपं तपासून दिवा मालवताना
आपण किती सार्थ, कृतार्थ आयुष्य जगलो असं वाटत असेल ना तुम्हाला...
चांगलं आहे
चांगलंच आहे की
पण माझी एक शंका..
हे सार्थ वगैरे सगळं ठीक आहे
पण जगणं म्हणजे काय जगलात हो तुम्ही?
नक्की?


नाही सांगता येणार?
नाहीच म्हणता?
असो.
नमस्कार.