ह्यासोबत
- अमेरिकायण! (भाग -१: नवीन)
- अमेरिकायण! (भाग २: घर देता का कुणी घर..)
- अमेरिकायण! (भाग ३: न्यूयॉर्कशी भेट)
- अमेरिकायण! (भाग ४: खाद्यपंढरी)
- अमेरिकायण! (भाग५ : जर्सी सिटी, मुक्काम पोस्ट भारत)
- अमेरिकायण! (भाग ६: नूतनवर्षाभिनंदन)
- अमेरिकायण! (भाग ७: राजधानीतून१ [प्रथमदर्शन आणि सकुरा])
- अमेरिकायण! (भाग८ : राजधानीतून२ [म्यूझियम्स आणि निरोप] )
- अमेरिकायण! (भाग ९ : जागीच अडकवणारा हिवाळा)
- अमेरिकायण! (भाग १०: द्युतक्षेत्री)
- अमेरिकायण! (भाग११ : वॉल स्ट्रिट)
- अमेरिकायण! (भाग १२: शिकागो[१- आगमन])
- अमेरिकायण! (भाग १३ : शिकागो२ - शहराच्या अंतरंगांत)
- अमेरिकायण! (भाग १४: शिकागो ३)
- अमेरिकायण! (भाग १५ : धोबीघाट)
- अमेरिकायण! (भाग १६ : धबाबा!)
- अमेरिकायण! (भाग १७ : वेडे खेळ)
- अमेरिकायण! (भाग १८ : मध्य-न्यूयॉर्क-१)
- अमेरिकायण! (भाग १९ : मध्य-न्यूयॉर्क- २)
- अमेरिकायण! (भाग २० : लास वेगास १ - तोंडओळख)
- अमेरिकायण! (भाग २१ : लास वेगास २ - कसिनोंच्या शहरात)
- अमेरिकायण! (भाग २२ : लास वेगास ३ - हुवर डॅम आणि ग्रँड कॅन्यन)
- अमेरिकायण! (समारोपः कोलाज)
"एकटा राहणार का? मग जेवणाचं काय? फक्त पिझ्झा, बर्गर का मग?"
"तुझाही सबवे एके सबवे होणार"
"तू काय त्यांच्या सारखं काहीही खाणार नाहीस तेव्हा घरीच बनवायला लागणार"
हि आणि अशी अनेक भाकितं मी निघे पर्यंत सगळे जण करत होते. तसं एक होतं की मला चांगलं जेवण बनवता येत असल्याने (चांगलं म्हणजे मला रुचेल आणि पचेल असं ) घरच्या जेवणावर भागू शकणार होतं. पण मलाच स्वतःचं जेवण सतत खाण्याची सवय नव्हती
. त्यामुळे पिझ्झा तर पिझ्झा... पण मी रोज काही घरी जेवण बनवणार नाही असं मी ठरवलंच होतं. पण न्यूयॉर्क आणि जर्सी सिटीने मला पूर्ण खोटं ठरवलं.
मी एकतर खवैय्या!, म्हणजे भरपूर खातो अस नाही, पण सतत वेगवेगळं चाखायला नक्कीच आवडत. त्यामुळे खाणं हा माझा आवडता विषय. खरंतर खाणं हाच एक असा विषय आहे ज्यावर कोणीही बोलू शकतो. त्याला वयाची, ज्ञानाची, अनुभवाची, संपत्तीची अट नाही. साऱ्या मानवजातीला कवेत घेणारा असा हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. अगदी इथेही मी पाहिलं, गप्प गप्प वाटणारे हे गोरे, "खायला कुठे काय छान मिळतं?" ह्या प्रश्नानंतर इतके भरभरून सांगू लागतात की बस्स!
न्यूयॉर्क-न्यूजर्सी म्हणजे तर खाद्यपंढरीच. "आज काय जेवायचं?" हा सगळ्यात मोठा प्रश्न येथे मला पडतो. पण हा प्रश्न पदार्थांच्या कमतरतेमुळे नव्हे तर भरपूर पर्याय असल्याने पडतो. इथे वेगवेगळे अमेरिकन पदार्थच नाहीत तर जगातील विविध प्रांतातील पदार्थ मिळतात. तुम्ही इथे मेक्सिकन बरिटोज घेऊ शकता, मध्यपूर्वेतील फ़लाफ़ल चाखू शकता (मला ह्या पदार्थाची फ़ार उत्सुकता होती, पण पाहिलं तर निघाले गायरो ब्रेड मध्ये चीझ बरोबर कोंबलेले भाजणीचे वडे. मात्र अति रुचकर), इटालियन पिझ्झा-पास्ता आहेतच! झालंच तर अफगाण राईस (हा भात मुळातच तपकिरी असतो. माझा स्वतःचा अत्यंत आवडता), वेगवेगळ्या प्रांतातील मासे, जॅपनीज सुशी, स्पॅनिश फ़ोंडू आहे. तुम्ही इथे इजिप्शियन मोरायना (की मोरयाना?) सुरवात म्हणून, मंगोलियन चिकन राईस आणि थाई करी मुख्य आहार म्हणून आणि शेवट म्हणून स्विस केकने तोंड गोड करू शकता. आणि जर्सी सिटी म्हणजे तर गुजरातच उपनगर. इथे प्रत्येक प्रकारचा भारतीय पदार्थ मिळतो, अगदी चितळ्याची बाकरवडी सुद्धा .
जेवणाचं सोडा, साध्या नाश्त्याला पण इथे "बेगल" पासून ते 'एग ऑन रोल', फळं, डोनटस, हॉट डॉग पर्यंत नाना पदार्थ सेवेला हजर असतात. बेगल हा मला विशेष प्यारा ब्रेड. वेगवेगळ्या चवीचे बेगल्स बटर किंवा चीजमध्ये लोळवून मिळतात, आणि सोबत गरम गरम कॉफी अहाहा! काय छान दमदमीत न्याहारी. जरी पोहे/मिसळ/उपमा ह्यांत मजा असली, तरी बेगल्स/ टोस्टेड रोल यातही काही कमी ऐट नाही. इथे अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे सगळे पदार्थ "कागदी" पिशवीमध्ये देतात. सगळी नोकरदार मंडळी सकाळी एक कागदी पिशवी घेऊन लगबगीने ऑफिसला जाताना दिसतात.
कॉफी.. अमेरिकन खाद्यसंस्कृतीच एक महत्त्वाच अंग. खरंतर कॉफी मी भारतीय पेय मानायचो, पण इथे आल्यापासून इतक्याप्रकारची कॉफी प्यायली आहे की विचारू नका. वेगवेगळ्या चवींची कॉफी(फ़्लेवर्ड कॉफी) , कोकोबरोबरची कॉफी, उन्हाळ्यात थंडगार कॉफी, आइसक्रीम कॉफी, कधी कोरी कॉफी. मग एक्स्प्रेसो, कॅपचिनो, मोका इ. कॉफी प्रकार आहेतच. शिवाय इथे मी वेगवेगळ्या दुधातही कॉफी प्यायला मिळाली; गायीच्या दुधातली, बकरीच्या दुधातली कॉफी इतकंच काय पण चायनाटाऊन मध्ये प्यायलेली याक च्या दुधाची कॉफी.
कॉफीबरोबर चहा भारतीयांमध्ये अजूनही मनाच स्थान टिकवून आहे. आणि इथे चहाला टी म्हणतातच, पण बऱ्याच दुकानात "CHAI" असं लिहिलेलं आहे. सगळ्या परक्या वातावरणात तो शब्द कित्येकदा चहापेक्षा अधिक टवटवी देतो.
इकडची लोकंही पट्टीचं खाणारी, अगदी "१२-इंच" सबवे अश्या भाषेत अगदी "फूट"पट्टीचं खाणारी . प्रत्येकाची खाण्याची तऱ्हा वेगवेगळी. जसे अगदी काट्या चमच्याने खाणारे "सोफेस्टिकेटेड" आहेत तसेच हाताने भुरका घेणारे गोरेही पाहिले. इथल्या लोकांना "स्पाईस" (मसाले)चं भारी वेड. भारतीय हॉटेलात ह्या गोऱ्यांची गर्दी. तेही अगदी मजबूत बिर्याणी वगैरे चापताना दिसतात. इथे घरुन डबा आणणं वगैरे प्रकार आपणच करतो, हि मंडळी बाहेरच खाणारी. एक मजा अशी वाटली की ही मंडळी जर डाएट वर असतील तर सलाड चघळताना दिसतील. एरवी मग तब्येतीत तंगडी मटकावतत लेकाचे!
तर अश्या ह्या खाण्याच्या मक्केत मी नेहमीच तृप्त होत आलो आहे. पण एकदा भुकेलं राहायचा प्रसंगही आला होता. त्याच असं झालं एकदा मला "रिअल चायनीज" खायची इच्छा झाली. हॉटेल मध्ये तर शिरलो, साध्यासुध्या नव्हे तर अगदी चायनाटाऊन मधल्या चायनीज हॉटेलमध्ये! तिथे गेल्यावर बराचसा कारभार चायनीज मध्ये. शेवटी त्या पाट्याच्या गर्दीत एक इंग्रजी पाटी दिसली. अरेरे, पण इथल्या पदार्थांची नावच कधी ऐकलेली नव्हती. खरंतर ती सगळी नाव वेगळी वाटताहेत म्हणून वेगळी म्हणायचं, नाहीतर सगळी नाव मला इथुनतिथुन सारखीच वाटत होती. एकतर त्या हॉटेल मध्ये कसला तरी भयंकर दर्प सुटला होता. त्याने इथून निघून जावंसच वाटत होतं, पण इतक्यात त्या यादीमध्ये 'लंग-फंग सूप' नाव दिसलं. हे सूप मी मेनुकार्डावर कधीतरी भारतात पाहिलं होत, म्हणून देवाच नाव घेतलं आणि ते सूप मागवलं. ते मागवल्यानंतर मला समोर काचेमागे ठेवलेला एक पदार्थ(?) दिसला. आधी नुडल्स म्हणून दुर्लक्ष करणार इतक्यात ते नुडल्स वळवळायलाच लागले. आता मात्र माझा धीर आणि धैर्य संपलं. मी आता तिथून पळणार तोच एका चिनी फटीने ते सूप समोर आणून ठेवलं. बापरे!! त्यातही न्युडल्स(?!!?) होते, मी पैसे मोजून न खाताच बाहेर पडलो. जगात इतकं काही खाण्यासारखं असताना हे आपले शेजारी अस काहीतरी का खातात कोण जाणे!
असो, ह्या खाद्यपंढरीत खाल्लेल्या एकेका पदार्थावर लिहायचं तर नवी लेखमालाच चालू करावी लागेल. म्हणून थांबतो. या अश्या शहरात मी ठरवलंय की दर आठवड्याला एक तरी न चाखलेला पदार्थ खायचा. अन मला खात्री आहे की मी दररोज जरी एक नवा पदार्थ चाखला ना तरी ह्या खाद्यपंढरीत खाण्यासारखं काहीतरी उरेलच. पण .. (हा पण नेहमी हवाच का? )कधीतरी मात्र मला शहाळंवाले, चणेवाले याची कमी जाणवते. तसंच आपला वडापाव, मिसळ, दाबेली यांची लज्जत कधीतरी चाखावीशी वाटते. पोहे, साबुदाणा खिचडी, उपमा यांचीही आठवण येते. इंडियन स्ट्रीटवर जरी हे सगळं मिळत असलं तरी चौपाटीवरच्या भैय्याची खानदानी चव अजूनही मला साता समुद्रापार खेचते. आणि शेवटी जरी हे सगळं मिळालच तरीही आईच्या हातची तव्यावरची पोळी आणि गरम गरम भाजी याची तोड ह्या खाद्यपंढरीतील एकही पदार्थाला येईल का?
(क्रमशः)
ऋषिकेश