गेल्या काही वर्षात खालील निष्कर्ष सर्रास फक्त मुंबईतील वातावरण पाहून काढले जात आहेत असे जाणवते. यात इतर महाराष्ट्राचा अभ्यास फारसा केलेला जात नाही असे माझे मत आहे. तसेच, मुंबईतील या परिस्थितीला महाराष्ट्रातील इतर कुठलाही माणूस जबाबदार नाही.
या गोष्टी अश्या:
१. मराठी माणसाचा अभिमान लुप्त झालेला आहे.
२. इतर भाषिकांच्या तुलनेत मराठी माणूस व्यावसायिक दृष्ट्या कायम मागेच पडतो.
३. मराठी भाषा संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.
४. मराठी माणसाचा त्याच्याच प्रदेशात इतर भाषिकांकडून अपमान होत असतो व तो सहन केला जातो.
५. स्फुर्तीदायक काव्य-गायन केले किंवा काल्पनिक स्वरुपाचा चित्रपट काढला की हे सगळे प्रॉब्लेम्स (? ) नष्ट होतील.
मला ही परिस्थिती एक चिंतेची बाब यासाठी वाटते कारण यातून महाराष्ट्राबाबतचे सर्व निर्णय मुंबईवरून करण्याची एक प्रथा पडण्याची शक्यता आहे.
( यात कुठेही 'मुंबई श्रेष्ठ नाही' वगैरे म्हणायचे नाही. मुंबईचे प्रश्नही खूप महत्त्वाचे आहेत हे मान्य आहेच. तसेच, मुंबई देशाची राजधानी वगैरे आहे हे मला माहित आहे. प्रश्न 'मुंबईवरून का? ' असा नसून 'फक्त मुंबईवरूनच का? ' असा आहे. )
मी असे म्हणण्याचे निदान दोन तरी पुरावे माझ्याकडे आहेत.
१. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात कुठेही हे दाखवले नाही की मराठी माणसाचा इतकाच अपमान वगैरे इतर शहरातही होतो काय? एकंदर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे दाखवलेले नाही.
२. एक मोठे मराठी गीत निघण्याच्या मार्गावर आहे. त्यात हेतू असा की ते गीत ऐकले की मराठी माणसांना मराठी भाषेबद्दल अधिक प्रेम वाटायला लागेल.