ह्यासोबत
- अमेरिकायण! (भाग -१: नवीन)
- अमेरिकायण! (भाग २: घर देता का कुणी घर..)
- अमेरिकायण! (भाग ३: न्यूयॉर्कशी भेट)
- अमेरिकायण! (भाग ४: खाद्यपंढरी)
- अमेरिकायण! (भाग५ : जर्सी सिटी, मुक्काम पोस्ट भारत)
- अमेरिकायण! (भाग ६: नूतनवर्षाभिनंदन)
- अमेरिकायण! (भाग ७: राजधानीतून१ [प्रथमदर्शन आणि सकुरा])
- अमेरिकायण! (भाग८ : राजधानीतून२ [म्यूझियम्स आणि निरोप] )
- अमेरिकायण! (भाग ९ : जागीच अडकवणारा हिवाळा)
- अमेरिकायण! (भाग १०: द्युतक्षेत्री)
- अमेरिकायण! (भाग११ : वॉल स्ट्रिट)
- अमेरिकायण! (भाग १२: शिकागो[१- आगमन])
- अमेरिकायण! (भाग १३ : शिकागो२ - शहराच्या अंतरंगांत)
- अमेरिकायण! (भाग १४: शिकागो ३)
- अमेरिकायण! (भाग १५ : धोबीघाट)
- अमेरिकायण! (भाग १६ : धबाबा!)
- अमेरिकायण! (भाग १७ : वेडे खेळ)
- अमेरिकायण! (भाग १८ : मध्य-न्यूयॉर्क-१)
- अमेरिकायण! (भाग १९ : मध्य-न्यूयॉर्क- २)
- अमेरिकायण! (भाग २० : लास वेगास १ - तोंडओळख)
- अमेरिकायण! (भाग २१ : लास वेगास २ - कसिनोंच्या शहरात)
- अमेरिकायण! (भाग २२ : लास वेगास ३ - हुवर डॅम आणि ग्रँड कॅन्यन)
- अमेरिकायण! (समारोपः कोलाज)
काही दिवसांपूर्वीपर्यंत "नवीन" असं काहीच माझ्या आयुष्यात नव्हतं.. जर काही नवीन गोष्ट मिळालीच तर मी फार खूश होत असे.. तेव्हा काय कल्पना होती की लवकरच माझ्या आयुष्यात 'नवीन' हाच एकमेव दैनंदिन शब्द होणार आहे!!
शेवटी तो दिवस आलाच! माझ्या पी.एम. (project manager, आम्हा आय. टी. वाल्यांना असल्या लघुरूपाची आवडच असते म्हणा ना तेव्हा सवयीचा परिणाम).. तर माझ्या 'पी.एम.' ने बातमी दिली की मला ह्या महीन्या अखेर अमेरिकेला जायचं आहे!.. मी ऐकतच राहिलो. 'अमेरिका'! ह्या बातमी पासून पुढे जे जे काही घडत होतं.. आणि अजूनही बरचस जे घडतं ते माझ्यासाठी "नवीन"च .. सारच नवीन.. मी परदेशात जाणार ही भावना, आई बाबांच ते कृतार्थ डोळ्यांनी पाहणं, खरेदी, व्हिजा अगदी विमानप्रवासही...
माझ्या सारख्या प्रत्येक मध्यमवर्गियांनी मनात एक स्वप्न जपलेलं असतं, परदेशवारी! आता ते स्वप्न पूर्ण होणार होतं. पण त्या आधिची सारी सव्यापसव्यही माझ्यासाठी नवीन होती. व्हिजासाठिचा अर्ज वगैरे तांत्रिक गोष्टी ऑफिसने पूर्ण केल्या होत्या. पण तिथे जाऊन ती मुलाखत देणं आणि व्हिजा मिळवणं ही एक परीक्षा जवळ येत होती. सगळ्याच्या शुभेच्छा, सूचना, माहितीचा डोंगर (कित्येक प्रमाणात अनावश्यक माहिती ), मनातली भीती आणि अपेक्षा यांच ओझं घेऊन मी त्या व्हिजा ऑफिस मध्ये दाखल झालो. एखाद्या किल्ल्याला असवी तशी सुरक्षाव्यवस्था पार केली आणि मुलाखत दिली.. एव्हढी तयारी केल्याच मान राखायचा म्हणून तरी निदान चार प्रश्न विचारायचे पण नाही!! दोन मिनिटात मुलाखत संपली आणि व्हिजा मिळाला हे नक्की झाले. आणि माझ्या परदेशवारीच्या तयारीला जोर चढला..
घरातलं वातावरण तर एकदमच बदललं होतं. मुलाचे लाड किती करू आणि किती नको असं आईला झालं होतं. "खा खा!! पुढे हे असलं घरचं मागितलंस तरी मिळायचं नाही" हा संवाद ठरलेला होता. माझ्या नावडत्या भाज्या बनणं बंद झालं होतं. नातेवाईकांचे फोन आई-बाबांना नवीन हुरूप, शंका, काळजी आणि सूचना देण्याचं काम व्यवस्थित करत होते. रोज काहीतरी नवीन नवीन वस्तू येत होत्या. वस्तूंची निवड आवडीपेक्षा "वजन" ह्या तत्त्वावर होऊ लागली होती. कपडे, भांडी, बॅगा, खाण्याचे पदार्थ यांची घरात रेलचेल होती. थोडक्यात काय तर घरात उत्साहाचं, काळजीचं, आनंदाचं, हुरहूरमिश्रित उत्सुकतेचं एक निराळंच धुकं साचलं होतं
हा हा म्हणता तो दिवस आला. तिकिट आणण्यासाठी ऑफिसला गेलो. तेथील मित्रांचा निरोप घेतला. ऑफिस मधील प्रत्येक गोष्ट डोळेभरुन पाहत होतो. खरंतर सकाळपासून प्रत्येक गोष्ट करताना , हि कृती पुढील बरेच दिवसात घडणार नाही असं उगाचच वाटत होतं. तिकिट हातात पडलं आणि मन एकदम भरून आलं. आता नक्की, आपण अगदी नक्की जाणार!
घरी परत आलो. बघतो तर काय माझ्या कॉलेजच्या दोन तीन मित्र-मैत्रिणींनी घरीच डेरा जमवला होता. आपापली कामं सोडून / आटपून केवळ मला निरोप द्यायला ते जमले होते. घरी आई, बाबा, काका, काकू भाऊ असा घरगुती मनातल्या जवळच्या लोकांचा गोतावळा होताच, पण मित्रांना पाहून फार फार बरं वाटलं. एक एक करत बरेच जण जमले.. शेवटी विमान तळावर पोहोचे पर्यंत १५-२० जण मला सोडायला जमले होते.. माझे वेडे मित्र मैत्रिणी.. अगदी माझ्या सारखे.. माझ्याबरोबर सतत असणारे.. मला माझ्यासारखे बनवणारे.. जमेल तसे, मिळेल ते वाहन पकडून अगदी पुण्या-हैद्राबादहुन फक्त मला सोडायला जमलेले.. अगदी वेडे!! माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणारे.. वाटलं हीच ती संपत्ती जी मी मिळवली आहे. आणि आता वेड्यासारखं सगळं सोडून चाललो आहे..
इथे तर माझ्या नविनपणाचा पहिला अध्याय होता. आता पुढे मला, मला एकट्याला ह्या नवीन दुनियेला सामोरं जायचं होतं. सगळ्यांचा मनापासून निरोप घेऊन विमानात बसलो. खरंतर विमानप्रवासही माझ्यासाठी नवीनच होता, आता कसलीच भीती वाटेनाशी झाली होती. पण आता कुठून कोण जाणे एक नवा आत्मविश्वास, नवा उत्साह, नवी जिद्द, नवी उत्सुकता एक नवं पर्व चालू होत होतं. मुंबईचा विमानतळ सोडला, आणि बाहेरचा पाऊस नकळत डोळ्यात उतरला. मनात उगीचच "पोटासाठी भटकत जरी.." आलं आणि "राहो चित्ती प्रिय मम परी जन्मभुमी सदैव" अस म्हणून त्या विमानाच्या काचेतून जुन्या सुंदर विश्वाला अच्छा म्हटलं आणि एका नव्या दुनियेत मनापासून प्रवेश केला.
मजल दर मजल (खरं तर वायुमैल दर मैल) करत एकदाच न्यू-यॉर्क आलं इथेही "न्यू" होताच. माझ्यासाठी ऑफिसने गाडी तयार ठेवली होती, आणि त्या गाडीतून मी ह्या भूमींचं पहिलं जवळून दर्शन घेतलं. पहिलंच दर्शन फार वेगळं होतं. फार उंच उंच इमारती, चालताना पाय आणि चालवताना गाड्या घसरतील की काय अशी शंका येणारे प्रचंड रुंद आणि गुळगुळीत रस्ते, अफाट वेगात भारतापेक्षा उलट्या दिशेने जाणाऱ्या गाड्या!!!
ह्या अश्या भारतापेक्षा उलट्या तऱ्हेने वाहणाऱ्या महासागरात असाच एक भारतीय थेंब येऊन दाखल झाला. गेल्या वर्षभरात अनेक भले काही बुरे, काही वेगळे, काही साधे, काही चमचमीत, काही अवमानकारक, काही उर भरून येणारे, काही भितीदायक, काही मनस्वी, काही गोंधळात टाकणारे, काही आनंदी, काही एकटे असे सारे अनुभव आले. ह्या अमेरिकायणात ते सारे मांडण्याचा हा प्रांजळ प्रयत्न आहे. कदाचित मी पाहिलेली अमेरिका हा अमेरिकेचा केवळ शहरी अनुभव असू शकतो. पण तो ऐकवायला काय हरकत आहे? आणि धोंडो भिकाजी जोशी यांचं आत्मचरित्र असू शकतं तर ह्या ऋषिकेशने त्याचं अमेरिकायण का ऐकवू नये.
तर असा हा महासागरात मिसळलेला, आणि मिसळूनही वेगळेपण जपण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या अश्या आधुनिक भारतातील एका युवकाची अनुभवशृंखला "अमेरिकायण!"