या निर्बुद्ध 'सकाळ' चे काय करायचे?

पुण्याच्या किंवा एकंदर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत 'सकाळ' चा फार महत्त्वाचा वाटा आहे - असा तमाम जनतेचा समज करून देण्यात खुद्द 'सकाळ'च आघाडीवर आहे. 'परुळेकर ते पवार' हा प्रवास 'पत्रकारिता ते पैसा' असा झाला आहे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. निव्वळ वैचारिक असे काही लिहिले तर ते खपत नाही, आणि शेवटी वृत्तपत्र खपले नाही, तर त्यातले विचार वाचणार कोण? या तत्त्वावर 'सकाळ' च्या चालक / मालकांचा इतका काही विश्वास आहे, की त्यामुळे वाचक हा निव्वळ 'तिसरी ब' मधला विद्यार्थी असून त्याला रोज न्याहारीला काहीतरी खमंग, चुरचुरीत आणि खुसखुशीत दिले की झाले, हे त्यांनी आपले धोरणच करून टाकले आहे. बरोबरच आहे. 'सकाळ' चे पडद्याआडचे सूत्रधार नाही का, 'आधी सत्ता, मग बदल' हे धोरणच अवलंबत आले? सत्ताच नसेल तर मग बदल होणार कसा?
पण 'सकाळ' ला पर्याय नाही. पुण्यात तर नाहीच नाही. सकाळच्या चहाबरोबर 'सकाळ' नसेल तर पुणेकरांना कायकाय अडचणींना सामोरे जावे लागते, याबाबतचा एक असभ्य वाक्प्रचार पुण्यात प्रसिद्धच आहे. मग 'सकाळ' ने काहीही छापावे आणि आम्ही ते मिटक्या मारत वाचावे. आवडले नाही तर 'छा! यांना काही अकला आहेत की नाही? ' असे म्हणून पान उलटावे आणि दुसऱ्या दिवशीच्या 'सकाळ' ची वाट पाहावी. ''सकाळ' हे निर्बुद्ध लोकांचे वर्तमानपत्र आहे' या सकाळमध्येच काम करणाऱ्या एका पत्रकाराचे मत ऐकून आम्ही मान डोलावली होती. 'आयुर्वेद? हा काय आयुर्वेद आहे? दुकानं आहेत ही दुकानं! ' आमचे एक वैद्य मित्र म्हणाले. आम्ही मान डोलावली. 'लवासा ते ताडोबा ... किती म्हणून भूक असावी या लोकांची! ' एक पर्यावरणवादी संतापून म्हणाले. 'आता 'सकाळ' बंदच केला पाहिजे साला! ' ते पुढे म्हणाले. आम्ही परत मान डोलावली.
'आजचं 'मुक्तपीठ' वाचलं का तुम्ही? ' एक अंधश्रद्धा निर्मूलनवाले म्हणाले. ' अहो काय, नातू सी. ए. झाला म्हणून दिलेल्या पार्टीत दिवंगत आजीच्या रुपाने कावळा येऊन (आजीची आवडती) शेव-बटाटा पुरी घेऊन जातो काय, मृत आजोबांचे नाव लिहिलेल्या पाटावर बसलेल्या नातीच्या लग्नात तिला आपण आजोबांच्या मांडीवरच बसल्याचा भास होतो काय.... काय वर्तमानपत्र आहे की चेष्टा? ' आम्ही परत मान डोलावली.
घरी येऊन जेवण झाल्यावर वामकुक्षीआधी 'मुक्तपीठ' चाळताचाळता बाकी हा प्रश्न पडला, 'या 'सकाळ' चं करायचं तरी काय?'