मरणा, काय तुझा तेगार!

तेगार हा एक अस्सल कोल्हापुरी शब्द आहे. तेगार म्हणजे तोरा, मस्ती. 'अवकाळी पावसानं घट्मुट झालेली जमीन बगून यदुबा मनात म्हनाला, "काय तुजा तेगार! माजं हौशा-नकऱ्या दोन तासात उलटंपालटं करुन टाकत्याल तुला!" अशा संदर्भात तो वापरला जातो. हौशा-नकऱ्या ही बैलांची नावं.

मृत्यूची भीती ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भीती समजली जाते. माणसाला सगळ्यात जास्त कशाचं भय वाटत असेल तर ते मरणाचं. इतक्या वेळा 'आनंद' बघूनही काही माणसं अशी मृत्यूच्या सावलीनं काळवंडलेली आयुष्यं जगत असतात. आयुष्याचा उतार लागलेली काही माणसं तर मरणाच्या कल्पनेने केंव्हाच मरून गेलेली असतात.


इतकी भीती घ्यावी इतकं मरण खरोखर भयानक आहे का? आयुष्य जर इतकं सुंदर आहे, तर त्या आयुष्याचा अपरिहार्य उत्कर्षबिंदू इतका भीतीदायक कसा असेल? वृद्धापकाळ, आजारपणं, वेदना, परावलंबित्व हे क्लेषदायक असेल, नव्हे आहेच, पण आयुष्याचं वर्तुळ पूर्ण करणारा क्षण कुरुप कसा असेल? मग या अपरिहार्य पूर्णविरामाला एक तृप्त उद्गारवाचक चिन्ह करून बाहू पसरून मरणाला सामोरं जाणं इतकं अवघड का असावं?


मला वाटतं ते असं. हिवाळ्यातली सकाळ असावी. स्वतः लावलेल्या बागेतल्या पिवळ्या गुलाबाला टपोरं फूल आलेलं असावं. चहाचा वाफाळता कप हातात घेऊन धुक्याचे उलगडणारे ढग पहात बाल्कनीत उभं रहावं. खोबरं-कोथिंबीर पेरलेल्या साबुदाण्याच्या खिचडीचा नाश्ता व्हावा. वाचून संपत आलं की हुरहूर वाटावी असं एखादं पुस्तक वाचायला मिळावं. टीव्हीवर एखादी गुंगवून टाकणारा क्रिकेटचा सामना असावा. दीडशे किलोमिटर वेगानं टाकलेल्या चेंडूवरचा तेंडुलकरचा कव्हर ड्राईव्ह डोळ्यात 'फ्रीज' व्हावा, गप्पांचा अड्डा जमावा, दुपारी पुरणपोळीचं जेवण व्हावं, मस्त वामकुक्षी व्हावी, संध्याकाळी लांबची रपेट व्हावी, आयुष्यभर सावलीसारखा बरोबर असलेला दोस्त रात्री जेवायला यावा, झकास मैफल व्हावी, आईसक्रीम संपतासंपता दारावर हलकेच थाप पडावी, 'चला रावसाहेब, वेळ झाली...' आनंददूताने हसतहसत म्हणावे, 'दोनच मिनिट हं... तूही ऐक जरा...' मी त्याला सांगावं, त्याच्या मांडीला मांडी लावून 'दिलमें समा गये सजन' शेवटचं ऐकून घ्यावं, तलतच्या आवाजानं अंगावर मोरपिसं फिरावीत, लताचा आवाज शेवटच्या आलापाला टिपेला पोचावा, 'सलाम सज्जादसाब' दाद देण्यासाठी उंचावलेला हात हलकेच गळून पडावा....
मरणा, काय तुझा तेगार!