नशीब माझे ......भाग - १

प्रश्नांची उत्तर शोधून सापडली नाही की मग एक हुकमी उत्तर हाताशी येते - देव जाणे! असच काहीस - नशीब माझे! हेही एक हुकमी उत्तर असावे असाच माझा समज होता. वयाची गद्धेपंचविशी संपायला आली त्याच काळातील परिस्थितीमुळे ३ वर्ष निद्रानाशाच्या आजाराने मला पछाडले होते. त्या आजारात एखादा चित्रपट पाहावा तसे मी माझे बालपण बघत होतो, माझी ती तशी परिस्थिती होण्यास जबाबदार कोण? प्रश्नांची उत्तर शोधली. वर्तमानातील प्रश्नांची उत्तर सहजतेने मिळायची.

आहो खरंच सांगतोय! सतत अविश्वासात जगणारे आम्ही मराठी कसा विश्वास ठेवणार ? हो ना! तर पी एन पी ट्रान्झीस्टरचे कार्य, एस सी आर / थायरीस्टर त्याचे ट्रीगरींग, झेनर डायोड, व्होल्टेज स्टॅबीलायझर, ऑसीलेटरचे कार्य हे सगळे मी चित्रपट पाहतो तसे त्या निद्रानाश अवस्थेत गादीवर लोळत असताना अनुभवले आहे.

असो तर, मला डोकं नव्हत, मी हमालच होणार, जनावर होतो असे ठराव पास करण्याचे जन्मसिद्ध हक्क बाहेरच्या समस्त बघे जमातीचे होते. पण घरातले ज्यांना मी आप्त म्हणायचे त्यांनीच हे असले ठराव का संमत केले होते?

बालपण चे रस्ते कडेकडेने शोधताना धक्कादायक उत्तर सापडले. माझे वागणे, बोलणे सगळेच संशयास्पद होते, मी एक नको असलेले शेंडेंफळ होतो. सगळे धागेदोरे विणले गेले व एक पडदा तयार झाला, त्या पडद्यावर माझा रंगीत बोल पट दिसू लागला. त्याचा अभ्यासक बनलो. परिस्थितीशी झगडा हाच एक मार्ग निश्चित झाला.

"मी" ह्या व्यक्तीच्या बांधणी चा अभ्यास करताना पायाचे बांधकाम कसे असेल ह्याचा अभ्यास करणे ओघानेच आले. मग हा पाया कोणी घडवला असणार? माझी आई ती ३ वर्षाची असताना माझी आजी देवा घरी गेलेली. आईला संस्कारांचे बाळ कडू पाजणारे त्या काळचे ती चे बघे हितचिंतक (आपल्याला आपल्याच हिताची चिंता करायला शिकवणारे) होते. लग्नानंतर शेजारच्या पोक्त बायकांनी अवाजवी शेजारधर्म दाखवला, अहो ही आपलीच सून असल्यासारखा माझ्या आई वर मानसिक ताबा मिळवला होता. आम्ही मुलांनी कोणता आहार घ्यावा, कोणते कपडे घालावे, एवढेच नाही तर केव्हा, कोठे, किती बोलायचे हसायचे हे देखील ही मंडळी ठरवीत होती.

असो, असल्या भेसळ वातावरणात मी हा असा घडत गेलो. एका आजींना मी आजवर विसरलेलो नाही बाहेर गावाहून आलेल्या माझ्याच वयाच्या नातवाला केळी आवडतात म्हणून मला बाजारात पाठवले, एक ताजे केळे त्याला दिले आणि मला तीन दिवसाचे काळे साल झालेले केळे खायला दिले. मी ते केळे कचर्‍याच्या टोपलीत टाकले. दुसर्‍या दिवशी ह्या म्हातारीने आईला काय सांगितले ते देव जाणे, माझ्या आईने त्या आजींच्या नातवा समोर माझ्या चेहर्‍यावर तीच्या रागाचे शिक्के उमटवले. कोणाला काय काय सांगणार....... नशीब माझे ! _____________भेटू पुढील भागात

विनायक उवाच . . . ह्या माझ्या ब्लॉगला भेट . . . अपेक्षित.