नशीब हे शिकलो - भाग ३८

माझे काम मायक्रोफिल्मींग ( सुक्ष्मचित्रांकन ) पद्धतीच्या साधनांची - प्रतिमा ग्राहक, प्रक्रियक, वाचक व मुद्रण (कॅमेरा, प्रोसेसर, रिडर व प्रिंटर) - दुरुस्ती व निगा राखणे असे होते. मायक्रोफिल्मींग म्हणजे रोजच्या वापरात असणार्‍या कागद पत्रांची फार छोटी प्रतिमा बनवून साठवण करणे असे आहे. ही छोटी प्रतिमा कृष्ण - धवल पद्धतीचा वापर करून, पारदर्शी भाग पांढरा व अपारदर्शी भाग काळा, म्हणून धन प्रतिमा (पॉझिटिव्ह इमेज) असते. ह्या फितीचे दोन मुख्य प्रकार आहेत. १६ मी.मी. हे अंतर एका आयताकृती चौकटीच्या दोन विरुध कोनातील आहे, तर ३५ मी.मी. हे अंतर फितीच्या एका आयताकृती चौकटीच्या दोन विरुद्ध बाजूतील असते. ह्या फितीचे दोन उपविभाग होते. १६ मी.मी. पट्टीचे ७२ फुटाचे रीळ होते तर ३५ मी.मी. फितीचा एक तुकडा संगणक विदाप्रवेशन पत्रकावर (डाटा एन्ट्री कार्ड) बसवलेलेला होता, त्यामुळे दोन वेगळे प्रतिमा ग्राहक ( कॅमेरा ) प्रकार होते.

एका सेकंदाला एका ए४ कागदाची प्रतिमा ग्रहण करण्याची क्षमता १६ मी.मी. फीत प्रग्राची होती. प्रतिमा ग्रहणाचे काम पूर्ण झालेले रीळ एका रासायनिक प्रक्रिया उपकरणातून वाचन सुलभ होत असे. १६ मी.मी. प्रतिमा वाचना करता विशेष वाचक उपकरण होते. हे सगळे एका टेबलावर मावत असे. तसाच काहीसा प्रकार ३५ मी.मी. फीत प्रग्राचा होता, परंतु रासायनिक प्रक्रिया उपकरण विशिष्टं पद्धतीने जोडलेले होते. प्रतिमा ग्रहण व रासायनिक प्रक्रिया क्रमाने एकाच जागी होत असे. हा प्रतिमा ग्राहक १० फूट लांब, १० फूट रुंद व १० फूट उंच जागेत ठेवणे आवश्यक होते. ह्या ग्राहकाच्या साहाय्याने ए३ ( १३.९० * १९.६८ इंच )  ते ए० ( ३९.३७ * ५५.६७ इंच ) मापाच्या नकाश्याची प्रतिमा ३५ मी.मी. आयताकृती चौकटीत ग्रहण होऊन त्याच जागी रासायनिक प्रक्रियेने वाचन सुलभ होत असे. ३५ मी.मी. प्रतिमा वाचन व पुन:मुद्रणा करिता विशेष उपकरणे होती.

ह्या दोन्ही प्रग्रांनी चित्र प्रतिमा चित्र फितीच्या मापाची दोन आरशांच्या साहाय्याने होत असे, ह्या प्रकाराला प्रतिमा घडी (इमेज फोल्डींग) करणे म्हणतात. एका मोठ्या आकाराच्या आरशातील पूर्ण चित्र प्रतिमा थोड्या अंतरावर असलेल्या लहान आरशात पूर्ण दिसते, ती परावर्तित प्रतिमा भिंगाच्या साहाय्याने चित्र फितीवर मुद्रित होते. हे दोन्ही आरसे दर्शनी भागावर पारा लावलेले असतात, त्यामुळे परावर्तित प्रतिमा दोष रहित असते. परंतु सामान्य आरसा पार्श्वभागावर पारा लावल्याने त्यात दोन परावर्तित प्रतिमांचा दोष असतो.

ओमानच्या ह्या कंपनीच्या एका विभागात एक मराठी माणूस गट प्रमुख होता, त्यामुळे त्याची एक पातळी ( लेव्हल ) होती. मी एक तंत्रज्ञ म्हणजे कामगार पातळीचा होतो, एका मराठी कार्यक्रमाला जाताना मला बरोबर नेशील का असा प्रश्न मी त्याला केला असताना कळले की, त्याला त्याची पातळी सांभाळावी लागते, त्यामुळे तो मला " एन्टरटेन " करू शकणार नाही. ही व्यावसायिक जातपात मला नवीन होती, हे असले अनुभव पचवणे मी शिकलो.   

मस्कतला १९८३ च्या काळात चार रस्ते मिळतात तिथे रहदारी नियंत्रक दिवे नव्हते तर गोल मैदान होते अजूनही आहे. मला गाडी घेऊन तीन महिने झाले असताना एका अशाच गोल मैदानात मी असताना मला डावीकडे वळायचे होते, मी डावा दर्शक दिवा सुरू केला. माझ्या मागून येणार्‍या गाडीचा डावा दर्शक दिवा सुरू बघून मी वळलो पण डाव्या बाजूने जाणार्‍या गाडीने न वळता सरळ जायचे ठरवल्याने माझ्या गाडीच्या डावीकडच्या दोन्ही दाराच्या मधोमध जोरदार धडक दिली. माझ्या डाव्या खांद्याला मुका मार बसला. रहदारीला अडथळा नको म्हणून गाडी घेऊन सरळ पोलिस ठाण्यात जाऊन थांबलो. माझ्या मागून पोलिसाची गाडी आली, मी अपघात स्थळ सोडले म्हणून तो पोलीस माझ्यावर चिडला होता. मी नवीन चालक आहे हे समजल्यावर तो शांत झाला होता. पूर्णं विमा असल्याने पैशाचा त्रास फारसा नव्हता परंतु गाडी हातात मिळेस्तोवर महिना भर कंपनी वाहन, भाड्याचे वाहन हा त्रास मात्र झाला. एक वर्ष संपले. बायकोला व मुलाला कधी एकदा भेटतो असे झाले होते. त्यांच्या ओमान प्रवेश परवान्याचे अर्ज भरून झाले होते. परंतु हातात येण्यास वेळ लागणार होता. रिकाम्या हाताने एका महिन्या करता पुण्याला आलो. - भाग ३९