नशीब त्यांचे - भाग ३०

हॉन्गकॉन्ग विमानतळावर मी भारतीय म्हणून एका रांगेत उभा होतो माझी बायको इराणी म्हणून एका वेगळ्या रांगेत उभी होती. मला प्रवेशाचा शिक्का मिळाला मी पुढे जाऊन बायकोची वाट पाहतं उभा होतो. काचेच्या मागून बायकोला उशीर का होतो म्हणून बघत होतो. तेवढ्यात दोन स्त्री पोलिस पुढे आल्या, बायकोच्या दोन्ही दंडांना धरून एका खोलीत नेताना मी बघितले. ति मागे वळून रडक्या चेहर्‍याने माझ्या कडे बघत होती. मी हादरलो होतो. दर १५ मिनिटांनी चौकशी मदतनिसाला बायको बाहेर का येत नाही म्हणून विचारीत पिडत होतो. तिसर्‍या वेळेला मी पुढे होताच तो उठला मला थांबायला सांगून आंत निघून गेला. १५ मिनिटाने बाहेर आला. माझ्या बायकोची तपासणी अजून चालू होती, दोन तास लागणार होते, तपासणी संपल्यावर ती माझ्याशी बोलू शकणार होती.

त्या दोन तासात मी विमान कंपनीच्या, भारतीय / इराणी दूतावासातल्या अधिकार्‍याला भरपूर त्रास दिला सगळ्यांनी मदत करणे शक्य नसल्याचे सांगितले. अडीच तास कसे निघून गेले कळलेच नाही. चौकशी मदतनिसाने मला बोलावून बाजूच्या खोलीत जाऊन बायकोशी ध्वनी व्यवस्थेतून ( इंटर कॉम ) बोलायला परवानगी दिली. बायको रडत होती, तिचे हुंदके ऐकून मला रडायला येत होते. तिच्या कडून जे कळले त्याने आम्ही दोघांनी जितके जितक्यांना दोष देणे शक्य होते तेवढे दिले, तेवढेच आमच्या हातात होते. त्याच दिवशी आम्ही विमानात असताना इराण मधील ब्रिटिश दूतावासावर क्रांतिकारकांनी हल्ला केल्याने माझ्या बायकोची कसून तपासणी घेतली गेली व ३६ तासानंतर आमच्या तिकीट योजने प्रमाणे बॅन्कॉक ला जाणार्‍या पहिल्या विमानाने तिला परत जाण्यास सांगितले होते, तो पर्यंत तिला विमानतळावरील सुरक्षा कवचात राहावे लागणार होते.

योगायोग बघा, बायको माझी ५ महिन्याची गर्भवती होती, शंका म्हणून स्त्रि वैद्यकीय तज्ञाने तिला विवस्त्र करून कसून तपासणी केली होती, नंतर कर्तव्य आहे असे सांगत तिची माफी मागितली होती. तिला बोल भरून पाणीदार सूप देण्यात आले होते. पुढील ३० तासात हेच मिळणार होते. तिच्या पिशवीतली बिस्किट संपणार होती. हो सांगायचे राहिलेच, संवेदनक्षम लेखात नमूद केल्याप्रमाणे आम्ही दोघांनी आमचे पहिले मूल योजनाबद्ध असावे असे ठरवले होते त्यात अशा प्रसंगाचा विचार केला नव्हता. त्या प्रसंगाचे बरे-वाईट परिणाम लहानग्या जीवावर होणार हे निश्चित होते. ह्यालाच नशीब म्हणतात हे सिद्ध झाले.

मी विचित्र परिस्थितीत बाहेर पडलो. माझी खासियत,  मी फार लवकर स्वतःला सावरू शकतो. ज्या कामाकरता हॉन्गकॉन्गला आलो होतो ते पूर्ण करण्याच्या मार्गी लागलो. कॅनन ए१ प्रतिमा ग्राहकाची (कॅमेरा) माहिती मिळवली व एका ठिकाणी प्रतिमा ग्राहकाचा मुख्य भाग ( कॅमेरा बॉडी ), १.२ झरोक्याचे ( ऍपरचर ) ८५ मी.मी.चे सामान्य भिंग ( नॉर्मल लेन्स ), ३५ - ३०० मी.मी.चे फेरभिंग ( झूम लेन्स ), वखडू - वर-खाली, डावे-उजवे भिंग ( टिल्ट-शिफ्ट लेन्स ),  क्षप्र - क्षणिक प्रकाश ( फ्लॅश ) आणि चर्म पेटी ( लेदर बॉक्स ) विकत घेतले, त्या खर्च केलेल्या किमतीत तेहरानला फक्त प्रतिमा ग्राहक, ५५ मी.मी. चे सामान्य भिंग व क्षप्र एवढेच भाग मिळत होते.  मी मला हॉटेलच्या खोलीत बंद करून घेतले, विकत घेतलेल्या वस्तूंना नीट समजून घेतले आणि इतक्या वेळा हाताळले की त्या वस्तू माझ्या शरीराचा एक भाग झाल्या पाहिजेत, असे केल्यानेच अशा प्रकारच्या कोणत्याही उपकरणावर आज पर्यंत मी प्रभुत्व मिळवले आहे.

बर्‍याच उशिरा थकव्याने मी झोपलो. सकाळी बर्‍याच उशीराने जागा झालो, शहरात कुठेही न जाता सरळ विमान तळावर गेलो. परवानगी मिळवून बायकोशी बोललो, तिला शक्य तेवढा धीर देण्याचा प्रयत्न केला. तासाभराने विमान कंपनीच्या ताब्यात सामान दिले कॅनन प्रतिमा ग्राहकाची चर्म पेटी हातात ठेवली व विमान प्रस्थान सुरक्षा कक्षात बायकोला भेटायला गेलो. ति माझ्या आधीच तिथे आली होती. मला घट्ट मिठी मारून बसली व तिला झोप लागली, मधूनच घाबरून जागी झाली, तिला आम्ही बाहेर जाणार ह्यावर विश्वास नव्हता, कदाचित त्या स्त्री पोलीस तिला परत आत नेतील अशी भिती वाटत होती, मी काहीही सांगितले तरी तिला
पटत नव्हते. विमानात बसण्याची परवानगी मिळाल्यावर तिचा चेहरा खुलला. रोज दर तासाला इराणी चहा पिणारी, गेल्या ३६ तासात तिला एक कप चहा मिळाला नव्हता. तिची परिस्थिती ऐकून व बघून हवाई सुंदरीने तिला मोठी बाटली भरून चहा आणून दिला. खुर्चीचा पट्टा उघडण्याची परवानगी दिल्यावर तिला आनंद झाला. मग ति माझ्याशी बोलू लागली. नवीन घेतलेला प्रतिमा ग्राहक व  खर्च केलेली किंमत ऐकून तिला आनंद झाला.

बॅन्कॉक विमान तळाच्या बाहेर आलो, स्थानिक वेळेनुसार रात्रीचे दोन वाजले होते. सुरक्षा हद्दीतून बाहेर येताच प्रवास वाटाडे (गाईड) मागे लागले. त्यातल्या एकाला हाताशी धरले. त्याने हॉटेल मिळवून दिले, तो आमची सर्व प्रकारची काळजी घेईल असे आश्वासन सारखे देत होता, आम्हाला तो व्यवसायाचा भाग वाटल्याने जास्त लक्ष दिले नाही. सकाळी १० ला तो मला शहराची सहल करण्या करता हजर राहा सांगून गेला. - भेटू भाग - ३१