नशीब भाग - ५३

आई आणि मोठी बहीण मस्कतला होती तेव्हा त्यांना माझे, बायकोचे व मुलांचे कौतुक दाखवण्यात आम्ही आनंदात होतो. पण आज झालेल्या घोळाचा विचार करताना कोणत्या चुका कशा घडल्या ते जाणवते आहे. सगळा प्रवास खर्च करून मी काय मिळवले तर त्या दोघींनी दाखवलेल्या माझ्या बायकोच्या व मुलांच्या चुकांची यादी. आमचे वागणे, बोलणे, मुलांचे संस्कार त्यांची प्रगती ह्या सगळ्याचे इतर समवयस्क नातवंडांशी तुलना करून असा काही परिणाम साधला की माझ्या मोठ्या मुलाला पुण्यात पाठवावे असे बायकोला जाणवू लागले. त्या दोघींना बायकोने तिचे चलचित्रण - छायाचित्रणाचे काम ति कसे करते हे दाखवण्या करता बरोबर नेले होते. मी आंतर्राष्ट्रीय प्रदर्शनाचे चलचित्रण - छायाचित्रणाचे काम कसे करतो. मुलाने कोणतेही प्रशिक्षण न घेता ऍपल संगणक वापरण्यात मिळवलेले यश हे, सगळे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. ह्या सगळ्याचे तोंडदेखले कौतुक झाले. पण "काजळाचे एक गालबोट लावायला" मोठी बहीण विसरली नाही. आम्ही करत होतो ते क्षणभंगुर होते (बायको मुलांनी हा शब्द कधी ऐकलेला  नव्हता), त्या कामाला भविष्य नव्हते. तिचे मार्गदर्शन घेऊन आम्ही भारतात परतावे असे प्रयत्न तिने बायकोवर सुरू केले.

मी २० वर्षात फुकट दिलेले सल्ले सहज झटकून टाकले होते. पण त्या घटकेला योग जुळून आले होते. आई, बहीण व बायको तिघी अगदी जवळच्याच, रोज दिवस रात्र मला मुलाला भारतात पाठवण्याचे सल्ले देत होत्या. त्याच्या भविष्याचा विचार आताचं करावा लागेल, त्याला माझ्या सारखाच अशिक्षित ठेवणार की काय, असा पण टोला मारून झाला. मुलाला पुण्याला पाठवण्याचे ठरले. मी मोठ्या मुलाचा माझ्यावर असलेला विश्वास तोडण्याची फार मोठी चूक केली होती हे आज जाणवते आहे. पण हे घडणार होते व घडले म्हणूनच "शेवटी नशीब आमचे कोणाला दोष देणार? " 

आवश्यक कागदपत्रे जमवली. १५ दिवसांनी आई आणि मोठी बहीण भारतांत परत जाणार होती. त्यांच्या बरोबर बायको व दोन्ही मुले पुण्याला गेली. बहिणीने, तिच्या मुलांनी व नवऱ्याने माझा मुलगा पुण्यातील चांगल्या शाळेत प्रवेश मिळवू शकणार नाही, तसेच "डोनेशन" किंमत मोजावी लागेल वगैरे बायकोला पटवून दिले. एका इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत प्रवेश मिळवला. CBSE व SSC पाठ्यक्रमातील फरक म्हणून आठवी पास झालेल्या मुलाला पुन्हा आठवीत बसावे लागले होते. काय काय मुलाला भोगावे लागणार होते ह्याची कल्पना मला अजून आली नव्हती. बायको लहान मुलाला घेऊन मस्कतला परतली होती. पुण्यात काय घडले ते ऐकून डोके सुन्न झाले. मोठ्या बहिणीने मस्कत सोडताना माझ्या मुलाची जबाबदारी घेईन ह्याचे आश्वासन दिले होते. ते पाळण्या करता नव्हते हे पटवून दिले. तिच्या नवऱ्याने मुलाची जबाबदारी घेण्याचे नाकारले होते. त्या शाळेच्याच एका वसती गृहात मुलाची सोय केली होती. वर्षाचा सगळा खर्च शाळेला दिला होता. पुण्यात पालक म्हणून बहिणीचे नाव दिले होते त्यामुळे पहिल्या ३ महिन्याचा अहवाल व प्रगती बहिणीने सगळे उत्तम असल्याचे कळवले. पण मुलगा आईशी बोलताना बऱ्याच तक्रारी करत होता. आम्ही सवय होईल अशी फसवणूक करून घेत होतो. बायकोला सहन झाले नाही, तिने पुण्याला जाण्याचे ठरवले. ति पुण्याला येणार असे कळताच मुलाकडून शिक्षकांनी व बहिणीने मस्कतहून सामान आणण्याची मोठी यादी पाठवली. मी साफ नकार दिला. त्याचा परिणाम १५ दिवसात सुरू झाला. माझा मुलगा अत्यंत बेजबाबदार, घाणेरड्या सवयी लागलेला, उलट उत्तरे देणारा वगैरे तक्रारी शिक्षकांच्या व बहिणीच्या सुरू झाल्या. सहामाही परीक्षेत नापास. दंगामस्ती मारहाण पोलिसांत मुलाविरुद्ध तक्रार वगैरे सगळ्या गोष्टी पचवाव्या लागल्या.

शाळेचे वर्ष संपायला आले मुलगा परीक्षेत नापास झाला असे सांगण्यात आले. पण काही हजाराची रक्कम दिल्यास ए दर्जा मिळेल असे मला सांगण्यात आले. मी नकार दिला, शाळेतून काढण्याची सगळी कागद पत्रे तयार केली व मुलाला मस्कतला परत आणले. विश्वास कोणावर ठेवला की विश्वास घात होण्याची शक्यता वाढते, तेच माझे झाले. सल्ला त्यांचा होता पण निर्णय माझा होता, चूक माझीच होती. मुलाने मला बघताच मिठी मारली. माझे सगळे ऐकायला तो तयार होता पण मला सोडून दूर जायला तो मुळीच तयार नव्हता. मस्कतला पून: नववीच्या वर्गात तो जायला तयार झाला कारण आता SSC व CBSE पाठ्यक्रमातील फरक होता.

मधूनच मुलगा रडायला लागायचा. पुण्यातल्या त्या शाळेचे व वसतिगृहाचे वातावरण, जेवण, आत्याची वागणूक, शाळेतल्या मुलांची ति गावरान शिव्या मिश्रीत भाषा सगळेच चीड आणणारे घडले होते. मुलाचे एक वर्ष वाया गेले होते. नशीब म्हणायचे अजून काय?

१९९४ला बायकोला ओमान माहिती / प्रसारण मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाचे छाया - चल चित्रणाचे काम मिळाले. त्यातून माही ओळख झाली त्यांच्या घरात जाणेयेणे वाढले. टीव्ही स्टुडिओत वापरणारी साधने त्यांच्या घरात होती त्याचा वापर करून मी त्यांना चलचित्र संपादन व मुद्रणाची व्यवस्था तयार करून दिली. त्यांना मी नव्याने समजलेल्या अंकित (डिजीटल) छायाचित्र व्यवस्थेची माहिती दिली. मी व्यवस्था बघितली नव्हती पण माहिती पुस्तिकेच्या आधारावर मला सगळे उमजले होते. कारण हि व्यवस्था सुक्ष्मचित्र पद्धतीचाच सुधारलेला एक भाग होता. सुक्ष्मचित्र पद्धतीचा माझा ६ वर्षाचा अनुभव होता. मी सगळे समजवून सांगण्यात यशस्वी ठरलो. योग बघा, त्यांनी २० हजार रियाल काढून दिले व एका नातेवाईकाच्या नावाने मस्कत मधील पहिल्या अंकित छायाचित्र स्टुडिओ उभारणीला सुरुवात झाली. रसायने वापरून चित्रमुद्रणाची व्यवस्था शहरात बऱ्याच ठिकाणी होती. फुजी फिल्म कंपनीचा डिएस ५०५ हा अंकित प्रतिमा ग्राहक - प्रग्रा (कॅमेरा), ऍपल मॅकींतॉश ८५०० संगणक व पिक्टोग्राफी ३००० मुद्रण यंत्र असा तो प्रकार होता. गोळा बेरीज ३० हजार रियालचे भांडवल हातात मिळाले. उपकरणे विकत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. दोन महिन्या नंतर यंत्र सामुग्री मस्कतला आली. जपानचा अंकित चित्र व्यवस्था वितरण अधिकारी व शोध - नियोजन अभियंता असे दोघे मस्कतला आले होते. ते मला व माझ्या ओमानी भांडवलदार मित्राला भेटायला आले होते. वितरण अधिकाऱ्याने आम्हा सगळ्यांना गोड धक्का दिला. जगातली सर्व प्रथम अंकित चित्र व्यवस्था व्यावसायिक तत्त्वावर सुरू करणारे आम्ही होतो. तीन पिक्टोग्राफी ३००० मुद्रण यंत्र तयार झाली होती त्यातले एक न्यूयॉर्कला व एक बर्लिनला प्रदर्शनाकरता विक्रेत्याकडे होते. तिसरे मुद्रण यंत्र मस्कतला आले होते. मुद्रण यंत्राचे विशेष कार्य व माझी प्रगती बघू या पुढील भागात. - क्रमश:

माझा स्टुडीओ ह्या इमारतीत होता.

 
स्टुडीओतील अंकीत चित्र व्यवस्थेची साधने व जाहिरात निरिक्षणाची चलचित्र मुद्रण व्यवस्था.


स्टुडीओतील क्षणीक प्रकाश व्यवस्था.

(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे. )