नशीब त्यांचे - भाग २७

२२,००० दाबाचा मुख्य वीज प्रवाहाचा सर्कीटब्रेकर (स्वीच) स्वयंचलित उघडझाप करण्याच्या कामाची जबाबदारी माझ्या वर येताच मी माझे समर्थक असणारे चार इराणी मदतनीस घेतले. प्रथम जनरेटरचा सुरक्षा सर्कीटब्रेकर बंद केला व त्याच्या कपाटाला कुलूप घातले. तिथून २०० मीटर दूर असलेल्या मुख्य प्रवाहाच्या सर्कीटब्रेकर कपाटा कडे गेलो. सुरक्षा नियमाप्रमाणे कपाटाचे दार नेहमी बंद असावे लागते तरच तो सर्कीटब्रेकर सुरू करता येतो. सर्कीटब्रेकर बंद केल्याशिवाय कपाटाचे दार उघडणे शक्य नसते परंतु ते कपाट उघडे होते व सर्कीटब्रेकर सुरू स्थितीत होता. ति चूक आहे ह्याची जाणीव बरोबर आलेल्या सहकार्‍यांना दिली.

त्यातल्या एका धाडसी सहाकार्‍याला सर्कीटब्रेकर बाहेर काढण्याकरता लागणारा साखळदंड आणायला सांगितला व तो साखळदंड आम्ही बाहेरून येणारी मुख्य प्रवाह केबलची टोके व जनरेटरला जाणार्‍या केबलची टोके असे सगळ्यांना एकत्र गुंढाळून ठेवला. सगळ्यांना त्याचे फार आच्शर्य वाटले. मी त्यांना अपघात होऊ नये म्हणून एक सुरक्षा असे सांगितले, आम्ही सगळे सर्कीटब्रेकरच्या खूपच जवळ होतो, नटबोल्ट उघडण्याच्या तयारीत होतो तेव्हढ्यात आम्हा सगळ्यांचेच केस एकदम ताठ उभे झाले. जमीन हादरली व मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. बाहेर धावा धाव ऐकायला आली त्यातला एक जो कपाटा बाहेर उभा होता त्याने सांगितले जनरेटरच्या जागेकडे सगळे पळत जात होते.

मी त्यांना खात्रीपूर्वक सांगितले कोणीतरी आम्हा सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यांना कळेना कसे घडले. आम्ही हातातले काम तसेच टाकून जनरेटरकडे धावलो. तिथल्या चालकाने सुरक्षा कपाटाचे कुलूप उघडून सर्कीटब्रेकर सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या स्फोटाचा तो आवाज होता. माझ्या त्या सहकार्‍यांनी मला चक्क मिठी मारली माझे १२ मुके घेतले ( ३ मुके घेणे हा आनंद दर्शवण्याचा इराणी रिवाज ). सगळा अधिकारी वर्ग जमा झाला. साखळदंड बांधून चार इराण्यांचे जीव वाचवले म्हणून खूप कौतुक झाले.

जनरेटर चालकावर गुन्हा दाखल करा, पोलिस बोलवा सुरू झाले. मी ओरडून सगळ्यांना थांबा सांगितले. " माझा आता इराणी व्यवस्थेवर मुळीच विश्वास नाही. माझ्या जवळ मुख्य वीज प्रवाहावर काम करण्याचा परवाना नाही म्हणून मलाच शिक्षा सुनावली जाईल ह्याची मला खात्री आहे. ह्या चार जणांचे जीव वाचले ह्यांच्या शुभेच्छा मला मिळाल्या आहेत. हे असेच घडेल ह्याची कल्पना मला होती म्हणूनच मी सुरक्षा नियम पाळले." कंपनीचा कामगार वर्ग आजूबाजूच्या गावात राहणारा होता त्या घडलेल्या प्रसंगाचे वर्णन कंपनी बाहेर समजले होते. गावकरी मला, बायकोला रस्त्यात थांबवून आम्हाला शुभेच्छा देताना जाणवायचे ते नशीब त्यांचे.

कंपनीचा वेफर बिस्किटाचा एक वेगळा प्रकल्प होता. त्यात वीज दुरुस्तीचे काम करणारा माझ्या वर फार चिडलेला असायचा. त्याच्या बायकोच्या बहिणीशी मी लग्न नाकारले होते व माझ्या विविध कामामुळे त्याचे कंपनीतले महत्त्व कमी झाले होते. क्रांती नंतर इराणी तथाकथित संशोधकांचा सुळसुळाट झाला होता. त्याने पण एक उष्णता नियंत्रकाचा शोध लावला आहे असे सांगायला सुरुवात केले. माझ्या समर्थकांनी मला डिवचण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सरळ प्रश्न टाकला, आधी खराब झालेले सगळे नियंत्रक कुठे गेले त्याचा हिशेब विचारा, मग हे सुटे भाग इराण मध्ये मिळत नव्हते त्याने कोठून आणले. मी अशी शंका दाखवल्या बद्दल त्याने माझ्या वर एकदा एअर रायफल चालवली व दुसर्‍यांदा भर बैठकीत पिस्तूल रोखले होते ते कसे ? - भेटू भाग - २८.       इथे मला मनोगत संयोजकांचे शतशः आभार मानायचे आहेत, अजून माझे लेख त्यांनी सुरक्षित ठेवले आहेत, लेख नाहीसे करण्याचा उपक्रमी विक्रम केला नाही. मला मनोगत शुद्धलेखनाच्या सोयीची फारच महत्त्वाची मदत होते आहे.