नशीब माझे - - भाग - ९

शिक्षण संस्थेतून बाहेर जाताजाता माझ्या त्याच खर्‍या हितचिंतकाने त्याच्या बॅंकेत नोकरी दिली. बॅंकेच्या बहुमजली इमारतीत अग्निदर्शक / सूचक  ( फायर अलार्म ) पद्धतीची दुरुस्ती, ध्वनी / चलचित्र साधनांची दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक नियंत्रकांची दुरुस्ती असे कामाचे स्वरूप होते. पद्धतशीर काम करणार्‍याला ते काम तसे कमी होते. इथे मी कामगार संघटना पद्धतीत शिरलो होतो. कामाचा पसारा वाढवता कसा येईल ह्याची काळजी घेतली जात असे. त्यामुळे काम करण्याचे नाटक करीत एखादे काम लांबवणे शक्य असल्यास सर्व प्रकारच्या शक्यता शोधण्याचे प्रयत्न केले जात असत आणि त्यातच एकमेका साहाह्य करुचे पूर्ण पालन करणारे मदतनीस मदतीला धावून येत असत.

लहानपणापासून एकला चलोचा सराव झाल्याने मला ही गट पद्धती नवीन होती. महिन्याभरात माझे काम पूर्ण नियंत्रणात आल्याने काही कामगार मंडळी व त्यांची मदत करणारे / घेणारे अधिकारी माझे शत्रू झाले. मला त्यांच्या घोळात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यांच्या एका धुडगूस मेळाव्यात ( आजकाल ज्याला रेव्ह पार्टी म्हणतात ) ओढला गेलो. तिथे एका प्रसंगाने धुडगूस मेळाव्याचा खरा अर्थ समजला. लघुशंका निरसना करता जात असताना एका खोलीतून जे ऐकायला आले त्याने थबकलो. मेळावा आयोजक दोन व्यक्ती थंड पेयात दारू मिश्रणाच्या कामात मग्न असताना बोलत होते. " ए जास्त पिऊ नकोस आज मी दिलेली नाव विसरू नकोस, कोणत्याही परिस्थितीत माहिती मिळवलीच पाहिजे." तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज झाला मी तिथून बाजूला झालो. मी शेवट पर्यंत त्यांच्या घोळ प्रयत्नात फसलो नाही.

१९७६ एक प्रसंग घडला, मी ती नोकरी सोडली. बॅंकेचे काम चालू असताना व्यत्यय नको म्हणून मी २ तास नंतर थांबून दुरुस्तीचे काम करीत असे. इमारतीच्या गच्चीवर असलेले काही नियंत्रक दुरुस्तीचे काम होते. सुरक्षा कार्यालयात त्याचा मुख्य नियंत्रक होता. ४४० वीज दाबाचे काम असल्याने, तो बंद केला, त्यातले फ्यूज बाहेर काढले, त्या नियंत्रकावर सूचना लिहून चिकटवली. ह्या सगळ्याची नोंद सुरक्षा कर्मचार्‍याने तिथल्या वहीत केली त्यावर आम्ही दोघांनी वेळ लिहून सही केली. मी फ्यूज माझ्या कपाटात ठेवले व कुलूप लावले. गच्चीवर काम करायला गेलो. एकटाच होतो. शिडीवर चढलो, नियंत्रकाचे दार उघडले, मीच वीज बंद केली होती, तरीही सवय म्हणून चाचणी करता स्क्रुड्रायव्हर आत घातला, मोठा आवाज झाला, मी शिडी वरून खाली पडलो. अंतर फारसे नव्हते ४ फुटा वरूनच पडलो होतो. हातातून रक्त आले होते. पाठ व हातातून कळा यायला सुरुवात झाली. कसाबसा सावरत तळमजल्याला आलो. माझी अवस्था बघून तिथे असलेले पुढे धावले.

सुरक्षा कार्यालयात नेले. प्रथमोपचार झाले. गरम चहा झाला. मग विचारपूस सुरू झाली. झालेल्या घटनेची नोंद सुरक्षा कर्मचार्‍याने तिथल्या वहीत केली. तिथे लिहिलेली आधिची नोंद त्याने वाचून दाखवली. मी फ्यूज काढल्यानंतर वीज दुरुस्तीवाला धावत आत आला होता. चाचणी करायची असे सांगून त्याने फ्यूज लावून नियंत्रक सुरू केला व चाचणी करता जातो म्हणत जिन्याकडे गेला. त्यानंतर काही वेळाने सुरक्षा कार्यालयातील नियंत्रकातून फ्यूज गेल्याचा आवाज आला होता.

दसर्‍या दिवशी वीज दुरुस्तीवाला एक दिवसाच्या रजेवर असल्याने कामावर हजर नव्हता.  तिसर्‍या दिवशी संबंधीत अधिकारी वर्ग, मी व तो वीजवाला बैठक झाली. वीजवाल्याचे पाठीराखे कोण ते समजले. मी ती नोकरी सोडली.

मंडळी तुम्ही / मी जिवंत असणे ५०% स्वबळ व ५०% इतरांचे फसलेले प्रयत्न. हे सांगायला आज मी जिवंतं आहे - - नशीब माझे
भेटूया - भाग - १०