नशीब त्यांचे - भाग १८

हॅन्डब्रेकच्या करकरीत आवाजाने जाग आली. गाडी मेहमान सार्‍याच्या (गेस्ट हाउस) समोर येऊन थांबली होती. बाहेर अंधार होता. दुभाष्याने माझ्या राहण्याची जागा दाखवली व सकाळी  भेटू म्हणत निघून गेला. ८ इंचाच्या स्प्रिंगच्या गादीवर बसण्याचा झोपण्याचा अनुभव नव्हता, त्यात मृदू मुलायम उशीच्या स्पर्शाने झोप उडाली होती. चाय / सुभाने ( सकाळचा नाश्ता ) असे म्हणत दारावर थाप पडली. मी दार उघडले त्याने मला चहाची खूण करत हाजेर असल्याची सूचना दिली.

पंचतारांकित व्यवस्था पाहून आनंद झाला. अर्धनग्न अवस्थेत एक इंग्रजी तरुण, चपले सकट, टेबलावर पाय ठेवून कॉफीचे घोट घेत होता. आधुनिक जंगली पणाचे निरीक्षण मी करीत होतो तेवढ्यात एक मध्यम वयीन इंग्रज त्याच्या जवळ येऊन बसला. त्याने निदान कामगाराचे कपडे घातले होते. त्या दोघांचे बोलणे माझ्या बाबतीतच होते ह्याची जाणीव झाली तेवढ्यात उंच, प्रौढ, तिसरा इंग्रज वेगळ्या टेबलावर जाऊन बसला. त्याने एकसंध हिरव्या रंगाचे कामगाराचे कपडे घातले होते. एका हातात वर्तमानपत्र दुसर्‍या हातात चहाचा कप, सिगरेट नळीत अडकवलेली तोंडात अशा रितीने धरली होती की नेहमी पाइप ओढण्याची सवय पण तडजोड म्हणून सिगरेट ओढतो, माझे निरीक्षण चालू होते एवढ्यात माझ्या मागून वेलकम असा मोठा आवाज आला. मी मराठीची ग्वाही देत एक हसरा चेहर्‍याचा तरुण समोर आला. आम्ही जुने मित्र भेटल्या सारखे खूप काही बोलत नाश्ता संपवला व कार्यालयात जाण्याच्या तयारीला लागलो.       

उत्पादन प्रकल्प जिल्हा झांजांन , तालुका अभार , खोर्राम दार्रेह ( हिरवीगार दरी ) ह्या गावाच्या हद्दीत होता. महत्त्वाची कागद पत्रे कार्यालयात जमा केली व दुभाष्या बरोबर माझ्या कार्यक्षेत्राची ओळखयात्रा सुरू झाली.  

माझा कामाचा अनुभव ह्याचा अर्थ जरा हटके होता, आजही आहे. ज्या कामाकरता माझी निवड होते त्या संबंधात जे काही मी करतो ते माझे वैयक्तिक गुण असतात पण त्याच कामाशी संबंध असणार्‍या व्यक्ती कोण, त्यांची पात्रता सगळ्याच बाबतीत, त्यांचे बरे वाईट योगदान, त्यांचे त्या कंपनीत / प्रकल्पात असणारे महत्त्व, ह्या सगळ्याच्या गोळाबेरजेमुळे घडणारे पेचप्रसंग हाच खरा अनुभव. ह्या अनुभवात क्षणाक्षणाला बदल होत असतो. ह्याच पार्श्वभूमीने मी ओळख प्रकार सुरू केला. हसत खेळत माझे बोलणे कोणाला आवडले, कोणी आंबट, लांबट, चौकोनी चेहरे केले त्याची मी नोंद घेतली. त्याची जाणीव झाल्याने दुभाष्याने माझ्या ओळख प्रकाराचे कौतुक केले.

बिस्किट प्रकल्पात उत्पादनाच्या चार शृंखला होत्या. प्रथम कणीक तयार करणारे यंत्र, कणकेची चादर बनवणारे मोठे लाटणे, चादरीची जाडी कमी करणारी अधिक तीन लाटणी, चादरीतून बिस्किटे कापणारे साचे, बिस्किटांना भाजून काढणार्‍या सात शेगड्या त्यातून फिरणारा लोखंडी जाळीचा पट्टा, पुढे ओळीने बिस्किट थंड करणारे कापडी पट्टे व शेवटी पट्ट्याच्या दोन्ही बाजूला असणारी पुडे बनवणारी यंत्रे,  अशी योजना प्रत्येक शृंखलेची होती. या सगळ्या यंत्र सामुग्रीला एकसंध नियंत्रण करणारी इलेक्ट्रॉनिक साधने, त्यांची जुळणी, नकाशे ह्याचा अभ्यास मी सुरू केला. शृंखला क्र. ३ काही कारणा करता बंद असल्याने मला बारकाईने अभ्यास करणे जमले.

१५ दिवसात कामाचे स्वरूप लक्षात आले. ५० टक्के अडथळे मुद्दाम घडत होते. ५० टक्के इंग्रजी - फारसी भाषेमुळे होते. त्यात मनुष्य स्वभावाचा फार मोठा वाटा होता.  हे मला कसे समजले ?  - भेटू भाग - १९.